आठवते का गं तुला, ती चिवचिवाट करणारी चिमणी? आजीने दाखविलेला, इकडे तिकडे मान फिरवीत चिवचिव करणारा व आजीच्या कडेवरून डुगुडुगु मान सावरत तू बोळकं पसरून, हसून स्वागत केलेला तो इवलासा पक्षी म्हणजेच चिऊताई. झाली तुझी आणि तिची पहिली दोस्ती. रांगणाऱ्या ताराला जेवताना हट्ट केल्यावर अम्माने भरविला चिऊचा घास. तू तो पटकन् मट्ट केलास, पण बिचारी चिऊताई राहिली उपाशी. तुला पहिला प्रश्न विचारला असेल चिऊताई कुठे चिऊताई? चिऊताई कशी बोलते? मग तुझ्या चिव चिव उत्तरावर सगळ्यांनाच खूश करणारी तुझी पहिली सवंगडी हीच चिऊताई.
तू दुडुदुडु चालायला लागल्यावर अक्काने सांगितलेली पहिली गोष्ट तू विसरूनच गेलीस. गरीब बिचारी, कष्टाने मेणाचं घर बांधणारी, बाळाला न्हाऊ-माखू घालणारी, त्याच्यावर भरपूर माया करणारी लबाड काऊदादाने फसवलेली, तुझी पहिली मैत्रीण चिऊताई.
त्यानंतर तू मोठी झालीस, छोटय़ा वर्गात जाऊ लागलीस. चिऊताईपण मोठी झाली- चिमणी झाली. शाळेत चिऊताई चिऊताई का गं तुझे डोळे ओले? काय सांगू बाबा तुला? माझा घरटा कोणी नेला? गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला तुझी व तिची परत भेट झाली. आठवतंय का नंतर भेट कुठे झाली?
राणेबाईंच्या शाळेत, मोठय़ा वर्गात बाई शिकवत असताना. त्या फळ्यावर लिहीत असताना, त्यांची नजर चुकवून, हळूचकन चोरून, सगळय़ा मैत्रिणींनी मिळून, शेवटच्या बाकावर बसून चिमणीच्या दातांनी तुकडे करून, रुमालात लपवून खाल्लेली ती चिंचा, बोरं, लिमलेटच्या गोळ्या.
तुझ्या लग्नातपण ती होतीच. लग्नात मेंदीला जो रंग चढला होता तो कोणामुळे? नंतर तू संसारात रमलीस. स्मिता-प्रीतीचे लाड करता करता तुझ्या मैत्रिणीला विसरूनच गेलीस. पण निषाद-प्रणवला घास भरवताना तुझ्यातला आजीला ती चिऊताई पुन्हा आठवून आजी, अम्मा मैत्रिणी यांची आठवण नक्कीच झाली असेल.
आता उतारवयात रोज संध्याकाळी, डी.डी. रोडच्या बागेत खवटय़ा ग्रुपबरोबर चाललेला तुझा चिवचिवाट ऐकतेय थकलेली तुझी जीवनसखी ही चिमणी.
तुझे व तिचे ऋणानुबंध जन्मभराचे. आता ही चिमणी चिऊताई संकटात सापडलेली आहे. सीमेंट-कँाक्रीटच्या जंगलात ना तिला उरली आहे घरटं बांधायला वळचण. विलायती झाडं लावलेल्या मोठमोठय़ा बागांमध्ये ना उरलेत खायला किडे. चिमणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तिला वाचविण्याचा प्रयत्न कर. बांधू दे चिमणीला तुझ्या ग्रिलच्या कोनाडय़ात घरटं. ठेव तिच्यासाठी थोडासा कण्यांचा खाऊ आणि वाटीभर पाणी.
चिमणी वाचवा,
घरटी बांधायला जागा द्या!
हरवलेली चिमणी
प्रिय तारा, आठवते का गं तुला, ती चिवचिवाट करणारी चिमणी? आजीने दाखविलेला, इकडे तिकडे मान फिरवीत...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-04-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sparrow