हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेथी
मेथी, पालेभाजी व मसाल्याचा पदार्थ म्हणून सर्वाच्या वापरात सर्रास आहेच. मेथीची भाजी पथ्थ्यकर भाजी आहे. पाने थंड गुणाची, सारक, पाचक, वातानुलोमक, पित्तनाशक व सूज कमी करणारी आहेत. मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक व गर्भाशय संकोचक आहेत. बिया रक्त व पित्तवर्धक आहेत.
पित्तप्रधान मलावरोधात पालेभाजीचा उपयोग पोट साफ करण्याकरिता आहे. पित्तप्रधान ज्वरात मेथीच्या पानांचा रस घ्यावा. जखम व सूज या दोन्ही लक्षणांत मेथीची पाने वाटून लेप लावावा. रक्त पडणाऱ्या आवेत कोवळय़ा पानांची भाजी उपयुक्त आहे. मेथीची पालेभाजी, हृद्रोग, भगंदर, कृमी, खोकला, कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.
बाळंतपणात मेथीच्या बियांचे सुगंधी पदार्थाबरोबर लाडू करून देतात. त्यामुळे बाळंतिणीस चांगली भूक लागते. खाल्लेले अन्न पचते, अजीर्ण होत नाही. शौचास साफ होते. रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय लवकर पूर्ववत होतो. स्थूलपणा वाढत नाही. कंबरेचा घेर कमी होतो.
मेथी वात व पित्तप्रकृती रुग्णांकरिता उत्तम आहे. मेथी बियांचे विशेष कार्य पचनसंस्थांवर आहे. मेथी चावून खायला लागल्यापासून लाळास्राव उत्तम सुरू होतो. आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक मधुमेह या व्याधीकरिता जी एकमेव वनस्पती मानतात, ती म्हणजे मेथी होय. मेथी बियांचा प्रत्येक कण तोंडातील, आमाशय, पच्यमानाशय, स्वादुपिंड या आतडय़ातील गोडपणावर, कफावर कार्य दरक्षणी करीत असतो. त्यामुळे नुसत्या मेथ्या चावून खाणे, सकाळी मेथीपूड पाण्याबरोबर घेणे, मेथ्या उकळून त्याचे पाणी पिणे, मेथीकूट खाणे, मेथी पालेभाजी खाणे, मेथी पालेभाजीचा रस पिणे असे अनेक उपाय जगभर मधुमेही माणसे यशस्वीपणे करीत आहेत. सर्वात सोपा उपाय म्हणजे एक चमचा मेथीपूड एक पोळीला लागणाऱ्या कणकेत मिसळून अशा हिशोबात पोळय़ा खाणे. यामुळे रक्तातील साखर कमी होते. नियंत्रित राहते. शरीराचा बोजडपणा कमी होतो.
मेथीच्या बियांमुळे आमाशयातील कफाचे विलयन व यकृताचे स्राव निर्माण करणे, वाढवणे, आहार रसांचे शोषण ही कार्ये होतात. आमवातात रसादि धातू क्षीण व दुर्बल होतात. हृदय दुर्बल होते. त्याकरिता मेथी व सुंठ चूर्ण मिसळून भोजनोत्तर घ्यावे. शरीर निरोगी व सबल होते. मेथीच्या फाजील वापराने शुक्रनाश होण्याची शक्यता असते. गरगरणे, चक्कर, अंधेरी ही लक्षणे दिसल्यास मेथीचा वापर करू नये.
मोहरी
स्वयंपाकात रोज वापरात असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थात मोहरी सर्वात उष्ण आहे, तीक्ष्ण आहे. त्याकरिता सर्व पदार्थात चव आणण्याकरिता, झटका आणण्याकरिता मोहरी वापरली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान या भागत थंडीच्या मोसमात मोहरीच्या तेलाने मसाज करून घ्यायचा प्रघात आहे. समस्त वातविकारात थंड, कफ प्रकृतीच्या रुग्णांकरिता मोहरीच्या तेलाचे मसाज फार फायदेशीर आहे. ज्यांना हे तेल फार उष्ण वाटते त्यांनी त्यात तीळ तेल, खोबरेल किंवा एरंडेल मिसळावे. मोहरीच्या तेलाच्या मसाजामुळे काहींना पुरळ येते. त्याकरिता काळजी घ्यावी. दुखऱ्या गुडघ्यावर किंवा लहान-मोठय़ा सांध्यांवर मोहरीचा वाटून लेप लावावा, बांधून ठेवावे, रात्रीत गुडघ्यातील दुखावा कमी होतो.
अर्धागवायू, संधिवात, आमवात, सायटिका, खांदा जखडणे, मान गुडघ्याचे विकार या सगळय़ा वातविकारांत थंड ऋतूत मोहरी तेल किंवा मोहऱ्या वाटून त्याचा लेप यांचा वापर जरूर करावा. तीळ तेल, एरंडेल तेल, लिंबोणी तेल, करंजेल तेल यांच्या जोडीला मोहरी तेलाच्या मदतीमुळे, अभ्यंगार्थ महानारायण तेल तयार केले जाते. एक वेळ संबंधितांनी जरूर वापरून पाहावे. कोणत्याही सर्दीला इतर उपचार दाद देत नसतील तर मोहरीची चिमूटभर पूड मधाबरोबर खावी. कोणत्याही विषावर उलटी करण्याकरिता मोहरीचे पाणी प्यावे. उलटी होऊन बरे वाटते. छातीत खूप कप झाल्यास मोहरी व मीठ यांचा काढा प्यावा. उलटी करवून कफ निघून गेला की दमेकऱ्यास बरे वाटते. तरुण माणसांवरच हा प्रयोग करावा. जंत व कृमी सहजपणे पडत नसल्यास मोहरीची चिमूटभर पूड तीन दिवस घ्यावी. जंत नाहीसे होतात. पोटदुखी, डोकेदुखी याकरिता मोहरी वाटून त्या त्या अवयवांवर लेप लावावा. लघवी साफ होण्यासाठी ओटीपोटावर लेप लावावा. पोटफुगी, अपचन, अजीर्ण याकरिता मोहरी चूर्ण आल्याच्या रसाबरोबर घ्यावे. मोहरी खूप उष्ण आहे, याचे भान नेहमी ठेवावे.
उचकी, कफ, दमा, खोकला, विशेषत: लहान बालकांच्या तक्रारींवर एक-दोन मोहऱ्या उकळून त्यांचे पाणी किंवा मोहरी चूर्ण मधाबरोबर चाटवावे. खूप लस व खाज असलेल्या इसब, गजकर्ण, नायटा या विकारांत मोहरीचे तेल बाहेरून लावावे. कंड लगेच थांबते, गाठ, सूज फार दडस असल्यास मोहरीचा लेप लावावा.
लवंग
लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता. विडय़ाच्या पानाबरोबर मसाल्यात वापर म्हणून लवंग असे. अतिमहागाईमुळे किंवा ज्याच्या बहुऔषधी उपयुक्ततेची तितकी माहिती नसल्याने लवंग कोणाच्याच घरात नसते. आजच्या महाग औषधांच्या राज्यात तुलनेने स्वस्त लवंग पुन्हा घरोघर वापरात यावयास हवी.
लवंगेचे संस्कृत नाव देवकुसुम आहे. दाबल्यानंतर ज्यातून तेल निघते ती लवंग चांगली. लवंगेचे तेल पाण्यापेक्षा जड असते. लवंग तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळय़ांना हितकारक आहे. पाचक व रुची उत्पन्न करणारी प्रामुख्याने कफ विकारावर व काही प्रमाणात पित्त व कफ विकारावर काम करते.
ग्रंथाप्रमाणे लवंग अग्निप्रदीपक, पोटदुखी, तहान, खोकला, कफ, दमा, उचकी, क्षय, मुखदरुगधी, उलटी, पोटदुखी, रक्तविकार इत्यादींवर काम करते.
लवंगेचा फाजील वापर केल्यास डोळे, मूत्राशय व हृदयावर परिणाम वाईट होतो. तोंड येते, जिभेला जखम होते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्राणवह स्त्रोतसाच्या सर्व विकारात लवंग उत्तम काम करते.
सर्दीने सतत नाक वाहत असेल तर एकएक करून तीन-चार लवंग लागोपाठ चघळाव्या. सर्दी लगेच थांबते. लवंगेत तेल आहे. त्याचा विशद गुण आहे. त्यामुळे घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहते.
लवंगेचे तेल सर्दीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. रुमालावर दोन थेंब तेल टाकले की, त्याच्या हुंगण्याने नाक मोकळे होते. सवय लागत नाही. कपाळावर लवंग, सुंठ व वेखंड असा उगाळून गरम गरम लेप लावावा. जुनाट सर्दी बरी होते. तोंडात घाण वास येत असल्यास लवंग तेल व पाणी अशा गुळण्या कराव्या. दुखऱ्या दातांकरिता लवंग तेल, कापूस व किंचित तूप असा बोळा ठेवावा. तेल फार वापरू नये.
बाजारात दाताच्या आरोग्याकरिता लवंग असलेली टूथपेस्टची जाहिरात असते. या जाहिरातीच आहेत हे लक्षात ठेवावे. दाताच्या आरोग्याकरिता त्याऐवजी गेरू, कात व किंचित लवंग चूर्ण हे उत्तम दंतमंजन दातांच्या पायोरिया या विकारात उपयोगी पडते.
वृद्धांच्या ठसका, खोकला, आवाज बसणे, गाणारे गायक किंवा वक्ते, अध्यापक यांच्याकरिता लवंग नेहमी जवळ असावी अशी उपयुक्त आहे. गाणे, भजन म्हणावयाचे असेल, व्याख्यान द्यावयाचे असेल तर लवंग तोंडात धरावी एक मिनिटाने कार्यक्रम सुरू करावा. स्पष्ट मोकळा आवाज होतो.
लवंग उष्ण आहे. पण शरीर क्षीण करीत नाही. उलट लवंग ओज, शुक्र, वीर्यवर्धक आहे. ज्या माणसाला भरपूर काम करावयाचे आहे. दिवसाचे २४ तास काम आहे त्याने जरूर लवंग खावी. लवंग बुद्धी तल्लख ठेवते. विचारशक्ती दगा देत नाही. समोरचा माणूस बोलावयाला लागला की त्याला उत्तर देण्याकरिता बुद्धी सदैव जागरूक ठेवणारी लवंग आहे. मंदबुद्धी मुलांकरिता लहान प्रमाणात नियमित लवंग द्यावी.
मूच्र्छा आली असताना लवंग उगाळून त्यांच्यात थोडे पाणी मिसळून डोळय़ात टाकावे. मूच्र्छा ओसरते. मोटारच्या प्रवासात लवंग उलटी थांबवते. तसेच जड जेवणामुळे जर अन्न वर येत असेल तर एक-दोन लवंगा चावून खाव्यात. क्षयाचा खोकला, स्वरभंग याकरिता नियमित लवंग ऋतुमान बघून खावी. माझ्या वापरातील अनेक औषधी गुणवान कल्पात लवंग हे एक घटकद्रव्य आहेच. उदा. लवंगादी गुग्गुळ, दमा गोळी, जखमेकरिता एलादी तेल. येथे एक वैयक्तिक अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाही. एक काळ बीड जिल्ह्यत सव्वाशे गावात मी विविध आरोग्य निदान चिकित्सा शिबिरे घेतली. वेळी-अवेळी भरपूर धूळ असणाऱ्या या मागास भागात दिवसभर मी अधूनमधून लवंग चावून खात असे. काही वेळेस ही संख्या १५-२० इतकी असायची. त्यामुळे माझे आरोग्य उत्तम राहिले. ही लवंग भगिनीची, देवकुसुमची कृपा!
वेलची
वेलचीमध्ये दोन प्रकार आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखे आहेत. वेलदोडा जुनाट व किडका नसावा. गरज तेव्हाच ताजा वेलदोडा आणावा. वेलची गुणाने रूक्ष, कफ, पित्त दोन्हींवर काम करणारी, शरीराला हलकेपणा आणणारी आहे. वेलची थंड का उष्ण हा वादाचा भाग आहे. रक्तविकार, तहान, मळमळ, उचकी, कोरडा खोकला, मूत्रविकार, डोळय़ांचे विकार, केसांचे व डोक्याचे विकार, शरीराचा दाह, हृद्रोग, आर्तवविकार, मुखविकार इत्यादी विविध विकारांत वेलचीचा उपयोग आहे.
वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण घेतल्यास उचकी व उलटी थांबते. लघवीतून व योनीतून रक्तस्राव होत असल्यास वेलची चूर्णाचा लगेच उपयोग होतो. दरुगधी जखमांवर वेलची चूर्ण व तूप किंवा खोबरेल तेलाची पट्टी ठेवावी. जखम लवकर भरून येते. पोटफुगी या विकारात वेलची दाणे हिंगाबरोबर मिसळून खावे. ज्या पुरुषांचा लैंगिक दुबळेपणा आला असेल त्यांनी, वारंवार स्वप्नदोष होणाऱ्यांनी तुपाबरोबर नियमितपणे वेलची चूर्ण घ्यावे. शुक्रधातूचे कार्य सुधारते. वेलची मूत्रप्रवृत्ती साफ करते. त्याकरिता डाळिंब किंवा दह्याबरोबर वेलची चूर्ण खावे.
वेलची अत्यंत पाचक आहे. जडान्न, तुपाचे अजीर्ण, खूप ढेकरा याकरिता तीन-चार वेलदोडे दोन कप पाण्यात उकळून अष्टमांश काढा करून प्यावा. कोणत्याही पदार्थात सुगंधी म्हणून वेलचीचा जसा वापर आहे तसेच शरीरात थंडावा आणण्याकरिता वेलची सर्वत्र वापरावी. गर्भवती स्त्रीने वेलची फार खाऊ नये. रात्री वेलची खाणे टाळावे. सीतोपलादि चूर्णातील एक घटकद्रव्य वेलची हे आहे. दुर्धर गँगरिनसारख्या विकारात मधुमेही विकारात वापरल्या जाणाऱ्या एलादी तेलात, तसेच कोरडा खोकला, आवाज बसणे याकरिता प्रसिद्ध असलेल्या एलादी वटी या औषधात वेलची दाणे हे प्रमुख घटकद्रव्ये आहेत. लहान प्रमाणात वेलची खाल्ल्यास उलटी थांबते. खूप प्रमाणात खाल्ल्यास उलटी होते. हे लक्षात असावे.
आले, सुंठ
नुकताच रामनवमीचा उत्सव अनेकानेक राममंदिरांत संपन्न झाला. उत्सवानंतर समस्त भाविकांना सुंठवडा देण्यात आला. त्यानिमित्त सुंठेचे व श्री प्रभू रामचंद्राचे स्मरण करू या.
‘नागरं दीपनं वृष्यं ग्राही हृद्यं विबंधनुत्।
रूच्यं लघु स्वादुपाकं स्निग्धोष्णं कफवातजित्॥’
शुण्ठय़ामवातं शमयेद् गुडुची।’
जिभेच्या टोकापासून ते गुदापर्यंत अन्न वाहून नेणाऱ्या महास्रोतसांत दीपन, पाचन व अनुलोमन अशी तीनही कामे आले किंवा सुंठ करते. ही कामे करताना आतडय़ाची यत्किंचित हानी होत नाही. उलट आतडय़ांना नवा जोम प्राप्त होतो. आले, सुंठ चवीने उष्ण असूनही शरीराचे वजन किंवा बल घटवत नाही. आले रुची उत्पन्न करते, फाजील चरबी वाढू देत नाही. त्याचबरोबर शरीर फार रूक्षही होऊ देत नाही. आल्याचा तुकडा किंवा सुंठचूर्ण जिभेचा चिकटा दूर करते, उलटीची भावना थांबवते. आमाशयात आमपचनाचे काम करते. लहान आतडय़ात पित्त वाढू देत नाही. मोठय़ा आतडय़ात मळ सुटा करते. त्यामुळे मळ चिकटून राहात नाही. सर्व आतडय़ांतील वायूचे अनुलोमन व खाल्लेले अन्न ठरावीक वेळात पुढे नेणे, त्यावर पचनाचे संस्कार करणे हे काम आले एकटे करू शकते म्हणून जेवणात सर्व पदार्थात आले हवे. सुंठ आल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण आहे. संधिवात, आमवातातील वेदना आल्याचा रस किंवा सुंठेचे चूर्ण घेतल्यास लगेच थांबतात. उलटी, वारंवार संडासची भावना, अजीर्ण, पोटफुगी, करपट ढेकरा, आम्लपित्त, पोटदुखी या तक्रारींत आल्याचा तुकडा, रस किंवा सुंठचूर्ण काम करते. आले, लिंबाचे पाचक प्रसिद्ध आहे. प्रत्येक घरात असे हुकमी औषध ‘इमर्जन्सी’ तातडीचे औषध म्हणून हवेच. जुनाट सर्दी, दमा, कफ, खोकला या विकारांत न कंटाळता आले तुकडा चघळावा, रस प्यावा. सुंठ कधीही उकळू नये.
आले हृदयाला हितकारक आहे. पोटात चरबी साठू देत नाही. अर्धशिशी विकारात सुंठ व गूळ उपयुक्त आहे. तसेच आल्याचा रस दोनच थेंब नाकात टाकावा. तीव्र पोटदुखीत आल्याचा रस बेंबीत जिरवावा. आमवातातील तीव्र वेदनांत सांध्यांना आल्याचा रस चोळावा. थंडी, ताप, न्यूमोनिया, कफविकार यात पाठीला व छातीला आलेस्वरस चोळावा. पोटात घ्यावा. आल्याच्या जोडीला पुदिना, तुळस, विडय़ाची पाने वापरावीत. ताज्या आल्याच्या अभावी ताज्या सुंठीचे चूर्ण वापरावे.
हळद
‘पी हळद अन् हो गोरी’ या वचनाचा साक्षात प्रत्यय ज्यांना घ्यावयाचा आहे त्यांना हळदीचा नेटाने पाठपुरावा करावा लागतो. मात्र आज स्वयंपाकात आपण वापरतो ती हळद औषधी गुण देणारी नाही. ज्यांना हळदीचे उत्तमोत्तम गुण आरोग्य राखण्याकरिता वा रोगनिवारणाकरिता हवे त्यांनी ओली हळद किंवा आल्यासारखे जे कंद मिळतात त्यांचा वापर करावा. ओल्या हळदीचे सावलीत वाळवून चूर्ण करावे किंवा ओल्या कंदांचा रस काढावा. ताज्या हळदीचे गुण, रोजच्या वापरातील हळदीच्या पावडरमध्ये येत नाहीत. ओली हळद मिळाली नाही, तर नेहमीची हळद वापरावी.
हळद फार औषधी आहे, पण ती अत्यंत उष्ण व रूक्ष गुणाची आहे. या दोन गुणांमुळे हळद ही वारंवार लघवी होणाऱ्या मधुमेह किंवा प्रमेह या विकारांत अतिशय उपयुक्त आहे. शीत प्रकृतीच्या माणसाला ओली हळद नियमित रूपाने घेतल्यास मधुमेह नियंत्रणात आणता येतो. वारंवार सर्दी, पडसे, दमा, कफाचा खोकला, नाक वाहणे, शेंबूड होणे, सतत कफ होणे, या कफप्रधान विकारांत हळद चूर्ण सकाळी व सायंकाळी पाव चमचा प्यावे. ज्यांना थोडय़ाशा दुधानेही कफ होतो त्यांना दूध, हळद फार उपयुक्त आहे. मात्र रात्रौ दूध हळद घेणे योग्य नव्हे. टॉन्सिल वाढल्या असल्यास तसेच कफ, सर्दी या विकारांत मीठ, हळद व गरम पाण्याच्या गुळण्या नियमित कराव्या. त्यामुळे घसा सुधारतो. घशातील कफाच्या जागा स्वच्छ होतात. कानाकडे घशातील कफाचा प्रसार होण्याला प्रतिबंध बसतो. ज्यांना टॉन्सिल्स वाढल्याने कानावर परिणाम होईल अशी धास्ती वाटते त्यांनी हळकुंड उगाळून खराब टॉन्सिल्सवर त्याच्या गंधाचा लेप लावावा. सेप्टिक किंवा विषार पसरविणारा कफ कमी होतो. हळद ही रक्तशुद्धी करते अशी सार्वत्रिक समजूत आहे. हळद ही रक्त वाहणे थांबविण्याची क्रिया सत्वर करते, ती रक्तस्तंभक आहे. त्यामुळे जखमेवर हळद दाबली की रक्त वाहणे थांबते असा सार्वत्रिक गोड समज आहे. खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. हळद ही रक्तामध्ये जंतूचा प्रवेश करू देत नाही. म्हणून वाहणाऱ्या जखमेवर हळद चेपायची असते. वाहणारे रक्त आपोआपच थांबत असते. कोणत्याही विषबाधेत हळद चूर्ण तुपाबरोबर प्यावे.
ज्याला आपला आवाज सुधारावासा वाटतो, त्यांनी चिमूटभर हळद नियमितपणे खावी. ज्या स्त्रियांना आपली संतती गोरीपान व्हावी असे वाटते त्यांनी गर्भारपणी हळद चूर्ण किंवा ओल्या हळदीचे दोन चमचे रस प्यावा. अंगावर खरूज, वाहते इसब, गजकर्ण, नायटा असे त्वचाविकार उठले तर पोटात हळद चूर्ण घ्यावे. बाहेरून हळदीच्या चूर्णाचा लेप लावावा. लहानथोरांना जंताची खोड असल्यास हळद व गूळ यांच्या गोळय़ा घ्याव्या. डोळे येण्याच्या साथीत हळद चूर्ण पाण्यात उकळून पाणी गाळून घ्यावे व त्या पाण्याने डोळे धुवावे. डोळे लवकर बरे होतात.
रक्त न पडणाऱ्या मूळव्याधीत हळदीचा लेप मूळव्याधीच्या मोडाला लावावा. मोड कमी होतो. तारुण्यपीटिका किंवा तरुण मुलामुलींच्या मुरुमांवर हळदीचा लेप फार उपयुक्त आहे. चेहऱ्याच्या त्वचेवरील काळे डाग घालविणे, तेलकटपणा कमी करणे व मुरुमांतील पू कमी करावयास हळकुंड लेप उपयुक्त आहे. बाळंतिणीच्या अनेक तक्रारींकरिता हळद उपयुक्त आहे. हळद व तेल यांच्या मसाजाने कांती सुधारते. चरबी हटते. पोटात नियमित हळद घेणाऱ्या स्त्रियांना बाळंतरोग होत नाही. हळदीला अनेक नावे आहेत. निशा, रजनी अशा नावांप्रमाणेच वज्रदेही हे नाव आहे. हळदीचा नियमित वापर करणाऱ्याचे शरीर खरोखरच निरोगी होते व कोणत्याही रोगावर प्रतिकारशक्ती वाढवून मात करते. कफप्रधान कावीळ, पांथरी व यकृतवृद्धीत हळदीचा काढा उपयुक्त आहे. श्वेत प्रदर विकारात स्थूल स्त्रियांनी हळदीचे चूर्ण नियमित घ्यावे. वजन कमी होते. हृद्रोगी विशेषत: मधुमेही व स्थूल व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्यात ओली हळद जरूर ठेवावी, कारण ती रक्तवर्धक आहे. शरीरातील रक्ताचा जोम वाढवते. रक्तवाहिन्यांत फाजील चरबीच्या गाठी होऊ देत नाही. अशा गुणवान ओल्या हळदीला अनेक-अनेक प्रणाम!
हिंग
स्वयंपाकाकरिता आवश्यक असणारा हिंग बाजारात कमी-अधिक तिखटपणा, वासाचा मिळतो. व्यापारी आपापल्या फॉम्र्युलाप्रमाणे मूळ हिराहिंगात भेसळ करून विकतात. मूळ हिराहिंग खूपच कडू असतो. तो नेहमीच्या स्वयंपाकात वापरताच येणार नाही. मात्र पोटदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी याकरिता हिराहिंग किंवा नेहमीच्या हिंगाचा गरम गरम दाट लेप उत्तम काम करतो. चांगल्या दर्जाचा हिंग हा उत्तम वातनाशक आहे. हिंगाचा कणभर खडा मिठाबरोबर घेतला की कसलेही अजीर्ण दूर होते.
हिंग वातानुलोमक आहे. आमाशयात वा पक्काशयात वायू अडला असो, हिंग लगेच वायू मोकळा करतो. हिंग भाजून त्याची कढी किंवा ताक हे सर्वानाच माहीत असलेले औषध आहे. हर्निया, पोटदुखी, पोटफुगी, आमांश, जंत, अन्न कुजणे या तक्रारींत हिंग, मीठ, लसूण व गरम पाणी असे मिश्रण नियमित घ्यावे. सर्दी, पडसे, अर्धशिशी या विकारांत हिंगाचे पाणी तारतम्याने नाकात टाकावे. वायुगोळा किंवा पोटातील वातज गुल्म या विकारांत हिंग आल्याच्या रसाबरोबर घ्यावा. लगेच आराम पडतो. प्रसिद्ध हिंगाष्टक चूर्णातील प्रमुख घटकद्रव्य हिंग आहे. पुरुषांच्या हर्निया/ अंडवृद्धी या विकारांत हिंग-लसुणादी तेल मोठेच योगदान देते. एक भाग हिंग, तीन भाग सैंधव, नऊ भाग एरंडेल तेल व सत्तावीस भाग लसणीचा रस असे एकत्र मिश्रणाचे आटवून सिद्ध केलेले तेल हर्नियाकरिता एकदम अफलातून औषध आहे.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com