येतं वर्ष आहे ते फुटबॉल विश्वचषक, ट्वेंटी २० या स्पर्धाचं. जगभरातले क्रीडा रसिक या स्पर्धेकडे डोळे लावून बसले असले तरी प्रत्यक्ष ज्या देशांमध्ये या स्पर्धा होणार आहेत, त्या यजमान देशांमध्ये मात्र या स्पर्धाच्या निमित्ताने रण माजलं आहे..
खेळांच्या माध्यमातून दोन देशांमधील संबंध सुधारण्यात मदत होते, असे म्हटले जाते. भारत-पाकिस्तानमधील दुरावा कमी करण्यात क्रिकेटचा मोलाचा हातभार आहे. पण तरीही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया सुरूच राहिल्यानंतरही पुन्हा खेळांच्या माध्यमातूनच दोन देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या अनेक देशांमध्ये असलेली राजकीय अस्थिरता, गोंधळाची परिस्थिती, दहशतवाद्यांचा धोका आणि अनेक कारणांमुळे प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या आयोजनावर परिणाम होऊ लागला आहे. भारतात २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही मोठय़ा प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाला. तशाच अनेक अग्निदिव्यातून सध्या यजमान देशांना जावे लागत आहे. नवीन वर्षांत फिफा विश्वचषक फुटबॉल, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि अन्य प्रतिष्ठेच्या स्पर्धाची मेजवानी क्रीडा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. पण यजमान देशांमधील अराजकतेमुळे या स्पर्धाच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ब्राझीलमध्ये पुढील दोन वर्षांत ऑलिम्पिक तसंच फूटबॉल विश्वचषक या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष सध्या ब्राझीलकडे आहे. ब्राझीलची फुटबॉल परंपरा आणि फुटबॉलप्रेम सर्वानाच माहीत आहे. पाच वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणारे आणि पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो यांसारखे अनेक दिग्गज फुटबॉलपटू घडवणारे ब्राझील हे तसे आर्थिकदृष्टय़ा गरीब राष्ट्र. मार्च २००४ मध्ये ब्राझीलला फिफा विश्वचषकाच्या संयोजनपदाचे हक्क मिळाल्यानंतर येथील स्टेडियम्सच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली. ब्राझीलमधील विमानतळ तसेच पायाभूत सोयीसुविधा यांवर सरकारने ११ अब्ज डॉलर खर्च करण्याचे ठरवले. त्यानंतर ऑक्टोबर २००९मध्ये ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे २०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळाले. त्यामुळे सरकारसमोरील खर्चाचा आकडा वाढतच गेला. शिक्षण, दळणवळण या सोयीसुविधांवर लक्ष देण्याऐवजी ब्राझील सरकारने गेल्या वर्षी जून महिन्यात जनतेवर प्रवासखर्चाचा आर्थिक भार टाकला. त्यामुळे लोकांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने करण्यास सुरुवात केली. सरकारी प्रवासावर अधिक अवलंबून असलेल्या जनतेचा उद्रेक कॉन्फडरेशन फुटबॉल चषक स्पर्धेदरम्यान झाला. लोकांनीच रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणा केल्या. याची सर्वात मोठी झळ बसली ती रिओ डी जानेरो, साव पावलो, पोटरे अलेग्रे, बेलो होरिझोन्टे आणि रेकिफे या प्रमुख शहरांना. याच ठिकाणी कॉन्फडरेशन चषकाचे सामने होणार होते. उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी फिफाचे पदाधिकारी ब्राझीलमध्ये येणार होते. त्यामुळे लोकांनी आपली बाजू मांडण्यासाठी रस्त्यांवर उतरून फिफाच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. स्टेडियम्सच्या नूतनीकरणाचा खर्च आता १४ अब्ज डॉलरवर गेला आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचारही होत आहे. त्यामुळे संतापलेल्या जनतेने आम्हाला या स्पर्धा नकोत, तर फक्त प्राथमिक सुविधांची अपेक्षा आहे, अशा मागण्या केल्या आहेत. जून महिन्यात होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा जसजशी जवळ येत आहे, तसतसा लोकांच्या उद्रेक वाढू लागला आहे. त्यामुळे फिफा विश्वचषकाच्या संयोजकांना आपल्या हक्कांसाठी भांडणाऱ्या ब्राझीलमधील जनतेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा