लिव्हरपूल क्लबकडून खेळणाऱ्या स्टिव्हन गेरार्डने आता या क्लबला रामराम ठोकून ला गॅलैक्सी क्लबकडून खेळायचा निर्णय घेतला आहे. लिव्हरपूलबरोबरचा त्याचा शेवटचा खेळ पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

अॅनफिल्ड स्टेडियमने गत आठवडय़ात एक अभूतपूर्व सोहळा अनुभवला.. स्टिव्हन गेरार्ड या आपल्या लाडक्या फुटबॉलपटूला लिव्हरपूल क्लबकडून शेवटचे खेळताना पाहण्यासाठी जनसमुदाय लोटला होता.. लिओनेल मेस्सी व ख्रिस्टियानो रोनाल्डो या प्रसिद्धीच्या छायेत वाढलेल्या खेळाडूंच्या पंगतीतला गेरार्ड नसला तरी त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळेच एवढे लोक त्याचा खेळ पाहायला आले होते. गेरार्डचा निरोप समारंभ पाहताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची वानखेडेवरील शेवटची कसोटी लढत डोळ्यासमोर उभी राहिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना खेळणाऱ्या तेंडुलकरचा प्रत्येक क्षण डोळ्यांत टिपण्यासाठी चाहत्यांची जी धडपड सुरू होती तीच गेरार्डच्या अखेरच्या लढतीतही पाहायला मिळाली. मनमिळाऊ, नेहमी संघासाठी झटणारा, सहकाऱ्यांना सावरणारा आणि शांत डोक्याचा स्वभाव असलेल्या गेरार्डने निरोपाच्या भाषणाने सर्वाच्या डोळ्यात पाणी आणले. या दोन्ही खेळाडूंची तुलना करणे चुकीचे जरी असले तरी त्यांच्याप्रति असलेल्या चाहत्यांच्या भावना समानच होत्या. फरक इतकाच तेंडुलकरला अपेक्षेप्रमाणे विजयाने निरोप देण्यात संघसहकाऱ्यांना यश मिळाले, मात्र, गेरार्डला निरोपाच्या लढतीत मोठय़ा पराभवाचा सामना करावा लागला. क्रिस्टल पॅलेसविरुद्धच्या लढतीत लिव्हरपूलला ३-१ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. हा पराभव गेरार्डच्या जिव्हारी लागला आणि म्हणूनच त्याने आपल्या भाषणात त्याची खंत व्यक्त केली. परंतु, याला कोणालाही जबाबदार न धरता त्याच्याप्रति चाहत्यांनी, संघसहकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रेमाच़े, पाठिंब्याचे आभार मानले. सामन्याशेवटी दोन्ही हात उंचावून सर्वाचा निरोप घेणाऱ्या गेरार्डला पाहताना सर्वाना गहिवरून आले होते. १८ वष्रे लिव्हरपूलच्या ‘रेड जर्सी’त दिसणारा गेरार्ड यापुढे त्या जर्सीत खेळताना दिसणार नाही. त्याला पराभवाने निरोप मिळाला, ही बाब मनाला बोचणारी आहे.
३० मे १९८० साली विस्टन शहरात जन्मलेल्या गेरार्डने आपल्या फुटबॉल कारकीर्दीची सुरुवात विस्टन कनिष्ठ संघाकडून केली. त्याच वेळी लिव्हरपूलच्या संघ निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडली. त्यामुळेच वयाच्या ९व्या वर्षांत त्याने लिव्हरपूल अकादमीत प्रवेश केला. या अकादमीत असताना तो वयाच्या १४व्या वर्षांपर्यंत अनेक क्लबमध्ये खेळला, परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात यश मिळाले नाही. त्यामुळेच त्याला इंग्लंडच्या शालेय संघात स्थान मिळाले नाही. ५ नोव्हेंबर १९९७ मध्ये तो लिव्हरपूलशी करारबद्घ झाला. मात्र, त्याला प्रत्यक्षात एक वर्षांनंतर क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. ब्लॅकबर्न रोव्हर्सविरुद्धच्या लढतीत अखेरच्या मिनिटाला वेगार्ड हेग्गेम याला बदली खेळाडू म्हणून त्याला मैदानात उतरवले. कर्णधार जॅमी रेडक्नॅप दुखापतग्रस्त झाल्यामुळे गेरार्डला त्या सत्रात १३ वेळा लिव्हरपूल क्लबचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दडपणामुळे त्याला या संधीचे सोने करण्यात अपयश आले. तसा उल्लेख त्याने ‘दी गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत केला. गेरार्डने त्यानंतर आपल्या कामगिरीचा आलेख चढता ठेवला आणि रेडक्नॅपसह मध्य-मध्यरक्षकाच्या भूमिकेत तो कायम दिसला. १९९९-२०००च्या सत्रात एव्हर्टनविरुद्धच्या लढतीत दुसऱ्या सत्रात गेरार्डला खेळण्याची संधी मिळाली खरी, परंतु एव्हर्टनच्या केव्हीन कॅम्बेल याला धक्काबुक्की केल्यामुळे त्याला कारकीर्दीतील पहिले लाल कार्ड मिळाले. त्या सत्रानंतर लिव्हरपूलच्या शेफिल्डविरुद्धच्या ४-१ अशा विजयात गेरार्डने पहिला गोल नोंदविला. मात्र, त्याला पाठीच्या दुखण्यामुळे चार शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि दीर्घकाळ क्लबकडून दूर राहावे लागले. पुढील सत्रात गेरार्डने दणक्यात पुनरागमन करून दहा गोल्सची नोंद केली आणि लिव्हरपूलच्या एफए चषक, लीग चषक आणि यूईएफए चषक विजयाचा तो साक्षीदार राहिला. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला ‘पीएफए युवा खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. वयाच्या २३व्या वर्षी म्हणजे २००३मध्ये त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. तत्कालीन व्यवस्थापक गेरार्ड हॉलिएर यांनी म्हटले होते की, ‘‘ गेरार्डमधील नेतृत्वगुण मी आधीच हेरले होते, परंतु त्यामध्ये परिपक्वतेचा अभाव होता. आणि तो अभाव आता नाहीसा झाला आहे.’’ २००३-०४ सत्र लिव्हरपूलसाठी निराशाजनक होते, लिव्हरपूलला एकाही मोठय़ा स्पध्रेचे जेतेपद पटकावता न आल्याने हॉलिएर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्याच वेळी गेरार्ड चेल्सी क्लबमध्ये जाणार असल्याच्या वावडय़ा उठल्या. त्याला वेळीच गेरार्डकडून पूर्णविराम मिळाला. २००४ ते २००७ या सत्रात अनेक दुखापती, चढ-उतार याच्यातून गेरार्डने संघाला आनंदाचे क्षण अनुभवायची संधी दिली. २००५च्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलने ०-३ अशा पिछाडीवरून ए. सी. मिलानविरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली. यामध्ये गेरार्डचा एक गोल होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळविण्यात आलेल्या या सामन्यात लिव्हरपूलने ३-२ अशी बाजी मारून २० वर्षांनंतर चॅम्पियन्स लीगवर कब्जा केला. या अंतिम लढतीत पहिल्या सत्रातच लिव्हरपूलचा संघ डगमगला होता. मॅल्डीनीचा एक आणि क्रेस्पोच्या दोन गोलने मिलान संघाने पहिल्या सत्रात ३-० अशी मजबूत आघाडी घेत लिव्हरपूलवर दडपण आणले. मध्यंतराच्या विश्रांतीत गेरार्डने संघाला दिलेल्या प्रोत्साहनपर भाषणात दुसऱ्या सत्रात लिव्हरपूलने पुनरागमन केले. ५४व्या मिनिटाला गेरार्डने गोल करून संघामध्ये ऊर्जा निर्माण केली आणि त्याचे फळ म्हणून अवघ्या सहा मिनिटांत स्मिसर आणि अलोन्सो यांनी प्रत्येकी एक करून ही लढत बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. पेनल्टी शूटआऊटमध्ये लिव्हरपूलने बाजी मारली. गेरार्डच्या नेतृत्व कौशल्यामुळेच हे शक्य झाले. संघसहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यात सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचे कौशल्य गेरार्डकडे होते. त्याच्या सोबत खेळलेला टोसेर म्हणतो, ‘‘ युरोपमधील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूंच्या नावावर चर्चा होते, तेव्हा मेस्सी व रोनाल्डो यांचे नाव आघाडीवर असते, परंतु गेरार्ड हा त्यांच्यापेक्षा सरस आहे. संघ जिंकावा म्हणून तो नेहमी धडपडत असतो, सहकाऱ्यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त गोल करण्याची संधी तो शोधतो. त्याच्या याच कौशल्यामुळे मी आज तुमच्यासमोर आहे. मात्र, गेरार्ड आपली कामगिरी चोख बजावूनही प्रसिद्धीसाठी कधीच हपापलेला नाही. तो श्रेयासाठी कधीच सरसावला नाही.’’
त्या सत्रात गेरार्डने ५३ लढतींत २३ गोल्स केले. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळवर लिव्हरपूलने एफए चषकावर नाव कोरले. एफए चषक, लीग चषक, यूईएफए चषक आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धाच्या अंतिम लढतीत गोल करणारा तो एकमेव खेळाडू आहे. २००६-०७ मध्ये चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत तगडय़ा चेल्सीचे आव्हान संपुष्टात आणत सलग दुसऱ्यांदा जेतेपदाकडे कूच केली; परंतु गेरार्डच्या स्वयंगोलमुळे लिव्हरपूलला ए.सी. मिलानकडून पराभव पत्करावा लागला. या अजाणतेपणाने झालेल्या चुकीची माफी त्याने मागितली. आपल्या स्वयंगोलमुळे संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली याची खंत त्याला होती. गेरार्ड थांबला नाही. लिव्हरपूल क्लबसाठी तो खेळत राहिला. गेरार्डने सामाजिक कार्यातही हातभार लावला आहे. लहान मुलांसाठी खेळविण्यात आलेल्या चॅरिटी सामन्यात गेरार्डने पुढाकार घेतला आणि जवळपास ५ लाख डॉलर निधी गोळा केला.
२००७ मध्ये गेरार्डच्या कारने दहा वर्षीय सायकलस्वाराला अपघात केला. गेरार्डने या प्रकरणातून पळ न काढता त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार होईपर्यंत तो तेथेच थांबला. त्या मुलाला व्ॉन रुनी आवडतो असे कळताच त्याने रुनीचे हस्ताक्षर असलेले बूट मुलाला भेट देऊन दिलगिरी व्यक्त केली. २०१४ हे सत्र गेरार्डसाठी फारसे चांगले नव्हते आणि म्हणूनच त्याने लिव्हरपूल क्लबला सोडण्याचा निर्णय घेतला. गेरार्डचा हा निर्णय सर्वाना धक्का देणारा होता. अॅनफिल्ड स्टेडियमवर गेरार्डने फुटबॉल कारकीर्दीची सुरुवात केली, त्याच अॅनफिल्डवरील अखेरच्या लढतीत गेरार्डला विजयी निरोप देण्यासाठी सर्वाची धडपड सुरू झाली; परंतु ते सर्व व्यर्थ ठरले आणि पराभवाने गेरार्डला घरच्या प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. सत्राच्या शेवटच्या सामन्यातही गेरार्डच्या वाटय़ाला पराभव आला. स्टोक सिटीने ६-१ अशा फरकाने लिव्हरपूलचा धुव्वा उडविला. जुलै २०१५ पासून गेरार्ड ला गॅलैक्सी क्लबकडून नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे.

लिव्हरपूल क्लबचे प्रतिनिधित्व करताना गेरार्डने दोन वेळा एफए चषक, तीन वेळा लीग चषक, एक वेळा यूईएफए चॅम्पियन्स लीग चषक, यूईएफए चषक आणि दोन वेळा यूईएफए सुपर चषक उंचावण्याचा मान पटकावला आहे. २००० मध्ये गेरार्डने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. २०००, २००४ आणि २०१२ च्या यूईएफए युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेत त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले. तसेच २००६, २०१० आणि २०१४च्या विश्वचषक स्पध्रेतही तो संघाकडून खेळला. ११४ सामन्यांत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर जुलै २०१४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली.

Story img Loader