39‘कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी’ ही लहानपणाची कविता आपण सवार्ंनी बऱ्याच वेळा ऐकली असेल. आपल्या रोजच्या संवादात पोटाचा संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी येतो. खपाटीला गेलेले, भुकेलेले पोट, समाधानाने पोटभरून केलेले जेवण आणि लठ्ठ माणसाचे सुटलेले पोट, यावरून कुठल्याही व्यक्तीच्या शारीरिकच नाही तर मानसिक व आर्थिक आरोग्याचीही आपल्याला जाण होते. प्रेमाप्रमाणे आरोग्याचा मार्गही पोटातूनच जातो असे म्हणतात.

प्राचीन आयुर्वेदातील एक श्लोक आठवतो  ‘रोगा: सर्वे अपि मंदेग्नौ’ याचा अर्थ म्हणजे माणसाला होणारे सर्व आजार, त्याचा अग्नी मंद झाल्यामुळे होतात. अग्नी म्हणजे चयापचय करणारे मूलतत्त्व. या अग्नीचे संतुलन जेव्हा बिघडते तेव्हा विकार सुरू होतात. सर्व विकार हे पोटातून निर्माण होतात. ‘शांतेऽग्नौम्रियते, युक्ते चिरंजीवती अनामय:’ अग्नी शांत झाला तर मृत्यू येतो. तो नियंत्रित असेल तर दीर्घायुष्य मिळते आणि म्हणूनच पोटाच्या छोटय़ात छोटय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.
आपले पोट
शरीररचनेप्रमाणे ज्याला आपण पोट म्हणतो, ते म्हणजे छातीच्या श्वास पटलाखालून सुरू झालेला व जांघेपर्यंत पसरलेला भाग. यात पचनक्रियेचे सर्व अवयव तर असतातच, पण त्याचबरोबर मूत्रेंद्रिय व जननेंद्रियेही असतात. परंतु बोली भाषेमध्ये आपण जठरालाच पोट समजतो. आपले पोट ही एक मोठी पिशवी आहे ज्यामध्ये ३३ वेगवेगळे अवयव असतात. यापैकी कोणत्याही अवयवास काही इजा झाली, जंतुसंसर्ग झाला किंवा त्यांच्या कार्यात काही अडथळा आला की पोटदुखी सुरू होते. पोटदुखीने अनेकजण त्रस्त असतात. आयुष्यात कधीना कधी आपल्याला पोटदुखीने त्रास दिलेला असतो. कधी ही पोटदुखी गंभीर असते तर कधी अगदीच क्षुल्लक. कधी ही पोटदुखी एखादी गोळी खाल्लय़ाने थांबते तर कधी इतकी गंभीर असते की शस्त्रक्रियाच करावी लागते.
आपली पचनक्रिया
अन्नाचा घास अन्ननलिकेद्वारे पोटात (जठरात) प्रवेश करतो. जठर हे पखालीच्या आकाराचे आणि वर्तुळाकार तसेच लांबट स्नायूंनी तयार झालेले असते. स्नायूंच्या आकुंचनातून अन्नाचे विघटन होऊन त्यामध्ये आम्ल मिसळते. असे पचन झालेले अन्न पुढे लहान व मोठय़ा आतडय़ात जाते. तेथेही त्यावर चयापचयाची प्रक्रिया होते व उर्वरित टाकाऊ  भाग बाहेर टाकला जातो. अन्नाचे स्वरूप, प्रमाण आणि जेवण सामुग्री आधारित, पोटात अन्न विविध वेळात पचविले जाते. द्रवरूपी पदार्थ १५ ते २० मिनिटात, अर्धपक्व अन्न चाळीस मिनिटे ते एक तास व जड अन्न (मांसाहारी, तेलकट) हे २-४ तासांमध्ये जठरातून बाहेर जाते. मानवी पोटात सरासरी एक लिटपर्यंत अन्न आरामात राहू शकते.
पोटाचा आकार
आपल्या सर्वाचे आराध्यदैवत श्रीगणेशाला आपण लंबोदर म्हणून संबोधतो; लंबोदर म्हणजे मोठे उदर असलेले. पुराणामध्ये याचीही एक कथा सांगितली आहे. प्रभू कुबेर (संपत्तीदेव) याने एकदा त्याची संपत्ती दाखवण्यासाठी भगवान शिव आणि पार्वती यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. शिव आणि पार्वती यांनी त्याचा भाव ओळखून या निमंत्रणाला नकार दिला व त्यांचा मुलगा श्रीगणेशाला पाठवले. या भोजनाच्या वेळी, गणेशदेवाने एवढे खाल्ले की कुबेराचे जेवण संपून गेले व त्याची फटफजिती झाली. तरीही जेव्हा गणेशाची भूक मिटेना तेव्हा त्याने भगवान शिवाची मदत घेतली. भगवान शंकरांनी त्याला भक्तिपूर्वक मूठभर तांदूळ देण्यास सांगितले व त्याने श्री गणेशाचे समाधान झाले. तेव्हापासून श्री गणेशाचे लंबोदर असे नामकरण झाले. या लंबोदरात पूर्ण ब्रह्मांड सामावले आहे आणि विश्वातील सर्व चांगल्या व वाईट गोष्टी सामावण्याची त्यात क्षमता आहे असे मानले जाते. अर्थात लंबोदराचे पोट मोठं असलं तरी त्याला फारसा फरक पडत, नाही आपल्या पोटाचा आकार मात्र नियंत्रणात असणे गरजेच आहे. कारण पोटाच्या आकाराचा आणि विकारांचाही एकमेकांशी संबंध आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये माणसांचा बांधा हा उंच व सुदृढ असल्याने जेव्हा स्थूलता येते तेव्हा पोट आणि छाती हे दोन्ही भाग फुगून सफरचंदाच्या आकाराची ((apple shaped) स्थूलता येते. आपल्यासारख्या देशात पोटाचा भाग जास्त प्रमाणात वाढतो, पण छाती कमी फुगते. त्यामुळे आपल्याकडे पेअरच्या आकाराची (Pear shaped) स्थूलता येते. आपल्या जेवणातील पिष्टमय (प्रामुख्याने भात, चपाती) पदार्थामुळे असे होते. जागतिक संशोधनानुसार पेअरच्या आकाराच्या स्थूलतेत मधुमेह, हृदयरोग आणि चयापचयाशी संबंधित विकारांचे प्रमाण व जोखीम कमी असते. असे असले तरी आपल्या देशातही मधुमेह व हृदयरोग यांचे प्रमाण वाढते आहे, पण ते बदलता आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे आहे.
पोट आणि अन्न ग्रहण
आपण जे जे अन्न खातो, त्यापासूनच आपलं शरीर आणि मन तयार होत असतं. आहार तीन प्रकारचा असतो. १. सात्विक २. राजसी ३. तामसी ज्या प्रकारे आपला आहार असतो, तसे निर्माण होतात आपले विचार आणि विकार. उद्भवणारे विकार भले शारीरिक असतील वा मानसिक, पण आपले आयुष्य बिघडवून टाकतात.
आपल्या पोटामध्ये अपचन, अ‍ॅसिडीटी व बद्धकोष्ठ या नेहमीच्या आजारापासून ते कॅन्सर व कोलायटीस यांसारखे दुर्धर आजारही होऊ  शकतात. म्हणूनच पोटाच्या छोटय़ा छोटय़ा तक्रारींची दखल घेणे आवश्यक असते. जेवणाच्या नियमित वेळा, सात्विक आहार आणि चांगल्या सवयी पोटाचे निम्म्याहून अधिक विकार टाळू शकतात. एक इंग्रजी म्हण आहे  We should eat to live and not live to eat – आपण जगण्यासाठी जेवावे, जेवणासाठी जगू नये. याचा अर्थ चविष्ट खाऊ  नये असा होत नाही तर ते प्रमाणात खावे.
येत्या वर्षी आपण या स्तंभातून पोटाच्या विविध आजारांवर आणि आहाराबद्दल चर्चा करणार आहोत.