जगूची चाकरी पुण्यात. बायकोचं माहेर कोकणात. तिसऱ्या बाळंतपणासाठी तिला तिच्या माहेरी सोडून सडाफटिंग, मिळेल त्या एस.टी.नं पुण्याला परत निघालेला. नशिबानं खिडकीशी सीट मिळाल्यानं जग जिंकल्याचा आनंद झालेला. धावत्या गाडीतून बाहेर बघणाऱ्या जगूला ‘वेडीवाकडी वळणे’ ही पाटी दिसली. अशा पाटय़ा वाचता वाचता जगू आपल्या आतापर्यंतच्या काही वळणांवर रेंगाळू लागला.
‘रा.म. १७’ (राज्य महामार्ग) लिहिलेला दगड बघून त्याला आठवलं. आपल्या वयाच्या सतराव्या वर्षी झालेला तो साक्षात्कार. आपल्या जीवनात ‘राम’च नाही तर ‘सीता’ही प्रवेशू पाहातीय याचा. पारूच्या रूपानं. तेव्हा ती सोळा वर्षांची चंद्रमुखी पाहून याचा देवदास झाला होता. पुढे तो तिचा कायमचा दास झाला.
‘अपघात क्षेत्र पुढे आहे’ हा फलक पाहून जगूला मनोमन हसू फुटलं. अरे, कुणी विचारलंय का, ‘अहो धर्मक्षेत्र किंवा कुरुक्षेत्र कुठे आहे हो?’ अन् कुणी तरी सांगतंय का की, ‘हे काय जरा पुढे आहे.’ जगूला वाटलं, यांना सांगावं, बाबांनो, पुण्यामध्ये ठायी ठायी अपघात क्षेत्र आहे. तिथे कुठे कुठे लावणार अशी सूचना? कारण पुण्यातल्या सुजाण वाहनचालकांनी प्रत्येक रस्त्याला कुरुक्षेत्राचं रूप आणलंय. आपली सरळ वाट सोडून समोरून येणाऱ्या वाहनाच्या वाटेत जाऊन उभं राहून सगळ्याच रहदारीची वाट लावायची. असो. जगूच्या वाटचालीत अशी कुठलीही पूर्वसूचना न देताच असं एक अपघात क्षेत्र आलं. पारूच्या रूपानं.
‘अरुंद वाट’ ही पाटी वाचून जगूला आठवली. त्याची अन् पारूची झालेली पहिली भेट. पुण्यातली तुळशीबाग.. खरं म्हणजे हेही एक अपघात क्षेत्र असल्याची जाणीव असूनही जगू तुळशीबागेतल्या चिंचोळ्या रस्त्याचा चालत शॉर्टकट मारून मंडईकडे निघाला होता. त्या रस्त्यावरून कडेच्या दुकानांशी टांगलेल्या वस्तू बघत बघत समोरून येणाऱ्या बायकांच्या लोंढय़ातून सहीसलामत पार पडताना कुणाला धक्का लागणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी ही जाणीव जगूला होती. पण अंग चोरून चोरून किती चोरणार!..
तर अरुंद पुलावरून गाडी पुढे गेली आणि आणखी एक पाटी दिसली-
‘एक झपकी एक अपघात’..
जगूला आठवलं, तुळशीबागेतून जाताना हे अवधान फार ठेवावं लागतं. गणपती उत्सवाच्या गर्दीतही पापणी लवून जागेवर येईपर्यंत आपण बरोबरच्यांपासून हरवण्याची किंवा आपली एखादी चीजवस्तू लंपास होण्याची भीती.
तुळशीबागेत त्या दिवशी शेवटी व्हायचं ते झालंच. शकूमावशी दिसली म्हणून तिच्यापाशी पोहोचू पाहणाऱ्या जगूचा समोरून येणाऱ्या पोरीला धक्का लागलाच. तिच्या हातातली ‘तुळशीबॅग’ रस्त्यावर सांडली. ती जगूच्या नावाने खडे फोडत आपल्या वस्तू गोळा करू लागली. तर तिच्याबरोबरची बाई जगूचे डोळे फुटले की काय म्हणून आरपार तोंडसुख घेत सुटली.
तेवढय़ात शकूमावशी ओरडली, ‘अगं, यशोदे, तू काय करते इकडे? हा माझा भाचा जगू. इतक्या गर्दीत व्हायचंच जरा असं. त्या पोरीचं तरी लक्ष होतं का पुढं हे विचारशील की याला बिचाऱ्याला तडातडा बोलत सुटशील?’
सुदैवानं ती बाई शकूमावशीची शेजारीण निघाली अन् जगूचं पानिपत होता होता वाचलं. ती पोरगी त्या यशोदेची पुतणी निघाली. कोकणातून पुण्याला शिकायला आलेली. नाव पार्वती ऊर्फ पारू. ओळख निघाली म्हणताच तिचा गोरा चेहरा वरमून लाल झाला अन् जगूच्या जिवाचं पानिपत व्हायचं ते झालंच. अगदी आत्ता गाडीतून दिसलेल्या ‘चुका ध्यान, गयी जान’सारखंच झालं म्हणा ना!
शकूमावशीकडच्या जगूच्या फेऱ्या वेगानं वाढू लागल्या. पारूच्या अन् त्याच्या भेटींना ऊत आला.
‘आवरा वेगाला, सावरा जिवाला’ ही सूचना पाहून जगूला पुन्हा हसू आलं. छे! आता सावरणं शक्यच नव्हतं. पारूच्या कॉलेजमध्ये, बागेत, बैठक तयार असलेल्या छोटय़ा पुलांवर भेटी होऊ लागल्या. गप्पागोष्टी आणाभाकांपर्यंत गेल्या. यांच्यातलं गोड गुपित चव्हाटय़ावर आलं. पुण्यातले रस्ते पुरेनात तेव्हा ते जगूच्या मोटारसायकलवरून सिंहगड, मुळशी अशा आडरस्त्यांतूनही जाऊ लागले.
‘सडक पर मस्ती, जान नही सस्ती’ ही पाटी दिसली तशी जगूला आठवलं. अगदी याच चालीवर नातलगांनी दोघांनाही सुनावलं होतं तेव्हा. पारूचं शिक्षण पुरं व्हायचं होतं. जगूचं बूड वशिल्यानं लागलेल्या नोकरीत अजून स्थिरावलं नव्हतं. आई-बापांना वाटणारच ना!
‘अपघाती वळण’ ही पाटी ओलांडून गाडी पुढे जाते न जाते तोच ड्रायव्हरनं कच्चकन् ब्रेक मारला. जगूही जागच्या जागी हेलपाटला. समोरून वळणावरून मुसंडी मारत आलेल्या ट्रक ड्रायव्हरच्या आई-बापाचा उद्धार करून ड्रायव्हरनं गाडी सुखरूप पुढं नेली. जगूला आठवलं, प्रेमानं आंधळं होऊन मारलेल्या मुसंडीला, असंच ‘अवघड’ वळण सामोरं आल्यावर त्यांच्यापुढं लग्नाशिवाय पर्यायच उरला नव्हता. ड्रायव्हर आता पुढच्या बसला ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. त्या बसच्या मागे लिहिलेलं वाक्य जगूनं वाचलं- ‘सुरक्षित अंतर ठेवा’.. नाही ठेवता आलं आपल्याला!
‘लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहचा’ एवढी मोठी पाटी चालत्या गाडीतून वाचताना जगूला जरा कष्टच पडले. पण त्याला जाणवलं, आपण पहिले दोन शब्द अगदी आपल्या अठराव्या वर्षीच आचरणात आणले. पुढचे शब्द त्या वयात त्याच्यासारख्या तरण्याला नगण्य होते. ‘फास्टात’ जाऊनही सुरक्षित पोहोचण्याचा दांडगा आत्मविश्वास होता आपल्यापाशी. आपल्या मोटारसायकलच्या वेगाच्या ‘स्टाइल’वर पारूही फिदा होती. ती बावरून घट्ट बिलगून बसायची म्हणून आपण आणखीन उधळायचं हे आठवून त्याला आत्ताही एक गोड शिरशिरी उठली. एका स्पीड ब्रेकरपाशी गाडी मंदावली अन् पाटी दिसली-
‘दारू अन् ड्रायव्हिंग एकाच वेळी, जीव जाईल ना अवेळी’
ही पाटी वाचून जगूला एक कल्पना सुचली अन् तो स्वत:शीच हसला. पहिल्यांदा दारू, मग ड्रायव्हिंग.. आपलं असंच झालं. प्रेमाची नशा करून लग्नाची जबाबदारी उचलली अन् एकविसाव्या वर्षीच दोन पोरींचा बाप होऊन बसलो. मुलाचा हट्ट म्हणून आता बायकोचं तिसरं बाळंतपण. इकडे दिवसेंदिवस जगणं महाग होत चाललंय! जगू असे गंभीर विचार मनात येऊ लागले की विरळ झालेल्या डोक्यावरून हात फिरवून राहिलेले केस मोजू लागतो. खूप राग आल्यावर एकपासून आकडे मोजतात तसे. आताही तेच करता करता त्याला आणखी एक पाटी दिसली अन् तो नकळत ओरडला, ‘‘अरे, हा बोर्ड इतक्या लांबवर आल्यावर कसा दिसला?’’
तो बोर्ड होता- ‘अति घाई, संकटात नेई.’
श्रीपाद कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com