एकदा सुजातानेच विजयला विचारलं, ‘‘विनिताचं काय चाललंय अमेरिकेत?’’ विजयने पुस्तकातून डोके न काढताच सांगितले की, ती तिथे एका आय.व्ही.एफ. सेंटरमध्ये काम करते. सुजाताने काही विषय वाढवला नाही. तिला फक्त बघायचे होते की विजय तिच्या संपर्कात आहे की नाही.. नंतर तिने विषय नाही काढला. स्वत:ला मैत्रिणी आणि शॉपिंगमध्ये गुंतवून घेतले. सहाएक महिन्यांनी विजयनेच पुढाकार घेऊन मुंबईच्या एका मोठय़ा आंतरराष्ट्रीय आय.व्ही.एफ. सेंटरबद्दल माहिती सांगितली आणि तिथे प्रयत्न करून बघायचे ठरले. विजयने स्वत: पुढाकार घेतल्याने तिला खूप बरे वाटले. कारण तिला वाटत होते विनिताच्या विषयाबरोबरच आयुष्यही थांबले आहे. जणू विजय नाही, तीच विनिताशी जोडली गेलेली आहे. जेव्हा तिचा विषयही नव्हता तेव्हा आयुष्यच गोठल्यासारखे झाले होते. आणि आज वाहते आहे तर तिची आठवणही वाहायला लागली आहे. तिला परत प्रेग्नन्सीसाठी केलेले प्रयत्न आठवायला लागले. पण आता कृतार्थतेची भावना होती मनात, पण तेव्हा वाटत होते कशाचाच काही उपाय नाही. निराशेने ग्रासले होते. त्यावर औषधे चालू होती. विजय म्हणतोय म्हणून ती तयार झाली होती, पण मनात फार आशा न ठेवता. बरोबर एक वर्षांपूर्वी ते मुंबईला गेले होते. बऱ्याच नवीन तपासण्या केल्या. परत एकदा टेस्ट टय़ूब बेबी. पण हे यशस्वी होण्याचे प्रमाण कमी आहे, पण या वेळेस ज्या तपासण्या गर्भ गर्भाशयात टाकण्याआधी केल्या जातील त्यावरून पुढची ट्रीटमेंट ठरेल. त्या पीजीडी (PGD) तपासणीत गर्भ तयार होतानाच काही त्रुटी होत्या. त्यामुळे तो वाढू शकणार नव्हता. पण डॉक्टर मात्र आशावादी होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘यावर उपाय आहे, पण परत टेस्ट टय़ूब बेबी करावे लागेल.’’
ती तयार होती, पण विजय या वेळेस खूपच विचलित होता, इतर वेळी तो खूप शांत असे. त्याची आणि डॉक्टरांची काही तरी बरीच चर्चा झाली. तिला त्यातून बाहेरच ठेवले होते. पण तिला नाही तरी ते अनाकलनीय बोलणे ऐकायला आवडतच नसे. पण पीजीडी म्हणजे preimpantation genetic detection इतके कळले. या वेळेस परत अंडी वाढण्याची इंजेक्शने दिली नाहीत आणि अंडबीजपण काढले नाही. फक्त विजयलाच वीर्य द्यायला सांगितले. मागच्या वेळेसच जास्तीचे अंडबीज काढून विशिष्ट तापमानाला साठवून ठेवले होते. त्यातूनच परत गर्भ तयार करणार होते. तसे करण्यात आले आणि या वेळेस पीजीडी टेस्ट नॉर्मल होती. त्यामुळे गर्भरोपण केले योग्य दिवशी. विजय खूपच काळजीत असे. या वेळेस देवाची की डॉक्टरची की आणखी कुणाची कृपा.. पण सगळे चांगले शकुन दिसायला लागले आणि दिवस, मास सरले आणि तीसुद्धा आई झाली. ती धन्य झाली. विजयही तिला वाटले त्यापेक्षाही आनंदी आणि कृतार्थ झाला होता. तिला वाटले हिने मला विजयशी जोडून दिले आहे. सर्व अंतर मिटले. तिच्या डोळ्यात गुंतत गेली. सुजाताला आज विनिताची आठवण झाली आणि वाटले विजयलाही हिचे डोळे विनिताची आठवण देत असतील का? त्याने तिला कळवले असेल का? कदाचित बाळाचे फोटोही मेल केले असतील. असो. केव्हा तरी पहाटे तिचा डोळा लागला. विशाखा जशी मोठी होत होती तशी जास्तच विनितासारखी दिसत होती. तिच्या बऱ्याच लकबी विनितासारख्याच होत्या. ती एकदा विजयला म्हणालीही, ‘‘ही विनितासारखी कशी दिसते?’’ विजय तिला चिडवून म्हणाला ‘‘तू प्रेग्नंट असताना तिचा विचार करत असशील त्यामुळे.’’ त्यावर सुजाता म्हणाली, ‘‘काही अवैज्ञानिक बोलू नको.’’ आणि थोडा वेळ विचार करून ती अति अवैज्ञानिक बोलून गेली, ‘‘तूच करत असशील तिचा विचार आणि तीच सावली पडली हिच्यावर.’’ विजयने फक्त डोक्यावर हात मारून घेतला आणि स्वत: सुजाताही हसली. बघता बघता विशाखा सतरा वर्षांची झाली. खूप हुशार अभ्यासात, खेळात. बुद्धिबळाची तर ती चॅम्पियन होती. खूप मित्रपरिवार तिचा. सर्वाची लाडकी. सगळे कसे दृष्ट लागण्यासारखे होते आणि लागलीच दृष्ट. मलेरियाचे निमित्त झाले आणि किडनीवर परिणाम झाला. ACUTE RENAL FAILURE. दोन्ही किडनी निकामी. आभाळच कोसळले. विजय रात्र रात्र झोपतच नव्हता. किडनी प्रत्यापरोपणाचा मार्ग होता, पण दोघांचाही HLA विशाखाशी जुळला नाही. जगभर शोध सुरू होता. आणि आठ दिवसांतच सिंगापूरच्या एका दात्याचा HLA जुळला. तिथेच ऑपरेशन करायचे ठरले. सर्व काही सुरळीत झाले. विशाखाची नवीन किडनी काम करू लागली. सुजाताला त्या देवदूताला भेटायचे होते. कुणीतरी केनियन माणूस होता. पण त्याने कुणालाच भेटायला नकार दिला. त्याला योग्य मोबदला दिला असे विजयने सांगितले, पण ज्याने तिच्या विशूचे प्राण वाचवले आणि विशूचेच नाही तर सर्व घरचेच प्राण परत केले त्याला काय मोबदला देणार? परत नवीन आयुष्य सुरू झाले. पण सुजाता मात्र त्या अज्ञात दात्याचे आभार मानायची. विशूने इंजिनीिरग केले आणि उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. तेव्हा सुजाताला परत विनिताची आठवण आली. तिने विजयला विचारलेच, दोघींच्या शहरांत किती अंतर आहे? हजारो मैलांपेक्षा जास्त. पण अंतराने काय फरक पडतो? विजयने कळवले असेलच. सांगावे का तिला विशूकडे लक्ष ठेवायला? तेही सांगितले असेल विजयने. जाऊ दे दोन वर्षांचा तर प्रश्न आहे.
विजय रिटायर झाला एक वर्षांने. खूप भरभरून बोलले सहकारी. तिथले त्याचे सर्व सामान घरी आणले. किती तरी पुस्तके, वह्य, नोट्स, डायऱ्या सर्व त्याने विशूच्या रूममध्ये ठेवले. आता काय करायचे ते त्याने सर्व ठरवले होतेच. पेंटिंग्ज करायची, खूप वाचायचे आणि समाजकार्य करायचे.
पुढच्या वर्षी अमेरिकेला जायचे ठरले. विशूचा पदवीदान समारंभ होता. सर्व तयारी सुरू झाली. सुजाता तर आताच मनाने तिथे पोचलीसुद्धा. रोज काही तरी नवे प्लान मनात येत होते. कुठे जायचे? कुणाला भेटायचे? विनिताला? का नाही? काय फरक पडणार आहे आयुष्यात? खरंच काही फरक नाही पडणार?
व्हिसा तिकीट तयार होते. बॅग भरणे सुरू केले होते सुजाताने. विशूच्या खोलीत दोन मोठय़ा सुटकेस तिने उघडूनच ठेवल्या होत्या. आठवेल तसे त्यात समान टाकत होती. विशू गेल्यापासून विजय रात्री तिच्याच खोलीत कॉम्प्युटरवर काम करत बसत असे. त्यामुळे त्याचेही सामान टेबलावर पडलेले होते. पेन्स, स्टेपलर, पेपर. एका ड्रॉवरमधून काही पेपर बाहेर आलेले होते, ते नीट आत टाकण्यासाठी तिने ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुलूप होते. तिला आश्चर्य वाटले. विजयला असे काहीच नीट कुलपात ठेवायची सवय नव्हती, मग इथेच कुलूप कसे? तिला वाटले विशूच गेली असेल कुलूप लावून. ती सुटकेसमध्ये कपडे टाकून गेली. पण दुसऱ्या दिवशी तिचे सहज लक्ष गेले तर टेबलही साफ होते आणि पेपरही नीट आत गेलेले आणि कुलूप. तिला उगाच उत्सुकता लागून राहिली. तिने किल्ली शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही सापडली. दुसऱ्या दिवशी तिला एक छोटी किल्ली विजयच्या गाडीच्या किल्ल्यांच्या पाऊचमध्ये दिसली. त्याच दिवशी तो पाऊच घरी विसरून दुसऱ्यांच्या गाडीतून दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेला. सुजाताला किल्लीपण मिळाली आणि वेळपण. तिने धडधडत्या हृदयाने ड्रॉवर उघडला. त्यात वीस-बावीस डायऱ्या होत्या. मागच्या प्रत्येक वर्षीची. तिने या वर्षीची सर्वात वर असलेली डायरी घेतली. बुकमार्कर असलेले पान उघडले व्हिसा आलेल्या तारखेचे. ‘मी येतोय.’ बस इतकेच लिहिलेले होते. त्याच्या मागची काही पाने रिटायरमेंटबद्दल. त्याच्या शेवटी ‘‘तुझ्याशी जोडलेला एक धागा आज तुटला. ऑफिसमधले तुझे अदृश्य आणि तरी मला वेढून टाकणारे तुझे अस्तित्व आता असणार नाही. प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे.’’ ती असेच मागे मागे जात होती. प्रत्येक पानावर एखादेच वाक्य पण सर्वकाही व्यक्त करणारे. अजूनही कुणाचे नाव नव्हते, पण ही विनिताच आहे हे वेगळे सांगण्याची गरज नव्हतीच. मागच्या वर्षी विशू अमेरिकेला गेली त्या वर्षीची.. ‘‘आपले स्वप्न मी एकटय़ाने जपले. आता तिथे येतेय, तिच्याशी कसे जोडून घ्यायचे ते तूच ठरव..’’ आणि असेच.. आता सुजाताला धक्का बसला. इतका वेळ जे होते ते तिला जाणवणारे वास्तवच होते. काही तरी अनाकलनीय तिची वाट पाहत होते. तिने घाईघाईने आधी किडनीरोपणाच्या वर्षांची डायरी उघडली. त्या दिवसाच्या आसपासची पाने.. ‘‘आपण कितीही लपवले तरी निसर्ग ते सत्य उजागर करण्याचे सतत प्रयत्न करतो.’’ आणि त्या दिवसांनंतरची पाने.. ‘‘आता कुणासाठी लपवायचे सगळे?’’ ‘‘पुरे आता तुझे हे दुसऱ्यासाठी स्वत:च्या मनाला जाळणे..’’ ‘‘स्वत:ची पोर तू मरणाच्या दारातून खेचून आणलीस आणि तिला न पाहता तू परत जाऊ शकतेस? तू खरच ‘मानवी’ आहेस का ‘देवदूत’?’’.. ‘‘आता तर तुझ्या आयुष्यात अजितही नाही. त्याने तुझ्याशी अशी प्रतारणा करायला नको होती. तू तुझ्या सर्व सुखांना सोडून त्याच्या मागे मागे देशोदेशी फिरत राहिलीस. त्याच्यासाठी मला नाकारत राहिलीस? पण तो तुला वाऱ्यावर सोडून निघून गेला. आता कुणासाठी थांबली आहेस? पार्थसाठी? सुजातासाठी? अग सर्वाना सामावून छान जगता येईल.
..तू फक्त हो म्हण..’’
सुजाता रडत नव्हती, पण डोळे वाहत होते. त्यात दु:खापेक्षा प्रेमाचा असा आविष्कार पाहून झालेली अवाक् सलामी होती.
तिने विशाखाच्या जन्माच्या वर्षीची डायरी काढली. ‘‘सुजाता मूल दत्तक घ्यायला तयार नाही. आणि तिच्या अंडबिजात काहीतरी जेनेटिक गुंता आहे, त्यामुळे टेस्ट टय़ूब बेबीचा गर्भ टिकत नाही, पण हे तिला सांगितले तर वेडी होईल ती. आधीच डिप्रेशनमध्ये आहे..’’
‘‘..आय नो, एग डोनेशन शक्य आहे, पण कुणीतरी तिसरीच स्त्री अशी आयुष्यभर आमच्या आयुष्यात येणार? तिच्या जीन्ससह? त्याच्या सर्व आविष्कारांना आपले मूल म्हणून वाढवताना मला किती परकेपणा वाटेल? हो मी फारच कन्झर्वेटिव्ह बोलतोय, पण तरी त्या जीन्सच्या परिणामांचा स्वीकार कसा करायचा?’’
दोन दिवसांनंतरच्या पानावर..
‘‘काय? तू? तुला त्यातले धोके माहीत आहेत ना? ती हार्मोन्सची इंजेक्शन नि अतिजास्त अंडी निर्माण होऊन तुला त्रास काय प्रसंगी जिवावरसुद्धा बेतू शकते.’’ ‘‘फक्त मला आनंदी पाहण्यासाठी?’’.. ‘‘मी नाही करू शकत. तुला तर आई नाही व्हायचे ना?’’
दोन दिवसांनी परत.. ‘‘हा काय वेडेपणा? माझी मुलगी म्हणून राजरोस राहायचं माझ्याजवळ? लाड पुरवून घ्यायचे?’’.. ‘‘आई आणि मुलगी एकदाच व्हायचं? माझी मुलगी आणि माझ्या मुलीची आई पण?’’.. ‘‘आणि अजित?’’.. ‘‘त्याला न सांगता? हेच करायचं होते तर राजरोस तेव्हाच लग्न नसतं केलं का?’’.. ‘‘पार्थसाठी तू सगळ्या उपेक्षा, प्रतारणा, हसत सहन केल्यास ना?’’.. ‘‘मग आता कशाला रिस्क घेतेस?’’.. ‘‘मग मला वचन दे, जर कधी हे अजितला कळले आणि त्यातून काही प्रॉब्लेम झाला तर तू तडक माझ्याकडे निघून यायचं.’’..
परत दोन दिवसांनी..
‘‘शक्य आहे? तिथून क्रायो प्रिझर्वेशनने पाठवता येईल विमानाने? पण तुला सर्व हार्मोन्स, सोनोग्राफी आणि अंडबीज काढण्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. तेही अजितला नकळत!’’.. ‘‘ठीक आहे, तो फ्रान्सला प्रोजेक्टवर गेल्यावर करशील?’’.. ‘‘पण मला खूप काळजी वाटते.’’
पंधरा दिवसांनी.. आज विमानतळावर तू पाठवलेली तुझी ‘एक पेशी’ घ्यायला गेलो होतो. जणू तू येत होतीस माझ्याकडे.. मी ते इवलंसं पार्सल हातात घेतलं. वाटलं तुझा हात हातात आहे. कसंबसं छातीशी धरून ते मी डॉक्टरांच्या आयव्हीएफ सेंटरवर पोहोचवलं.. डोळ्यांतून पाणी वाहत होते.. टॅक्सी ड्रायव्हरने विचारलेच ‘‘क्या साब कोई अपने का अस्थि कलश है क्या? ये अपने दूर चले जाते है और ऐसे वापस आते है. मेरा भाई भी दुबई से ऐसे लोटे जैसे कंटेनर में आया था.’’
‘‘त्याला काय माहीत तू कशी आणि का आलीस परत?.. तुझी एक पेशी माझे पूर्ण आयुष्य व्यापून टाकायला उत्सुक होती. .. तुझे २३ गुणसूत्रे. ‘तू’ नावाचे ते स्केच. मी रंग भरून पूर्ण करेन. होईल न हे नीट सगळं?’’.. एक खूपच भन्नाट विचार मनात येऊन गेला.. वाटले तू माझ्या मीलनासाठी आतुर होऊन मंद पावले टाकत माझ्या बेडरूममध्ये येत आहेस गर्भदानाचा संस्कार झाल्यावर.. हे जे होत होते तेही तेवढेच पवित्र असणार आहे.. किंबहुना जास्तच पवित्र.. शरीर मीलनाशिवाय.’’
विशूच्या जन्मानंतरच्या दिवशीचं पान.. त्यावर अश्रू पडल्यासारखे दिसत होते. आणि जे लिहिले होते ते सुजातासाठी साक्षात्कार सारखे होते.. ‘‘आलीस तू माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात. पुरुषाचं नातं फक्त एकाच स्त्रीशी तिच्या जन्मापासून ते त्याच्या स्वत:च्या मृत्यूपर्यंत कायम निखळ प्रेमाचं राहतं आणि ती म्हणजे त्याची मुलगी.’’.. ‘‘तू मला भेटलीस आणि माझं आयुष्य असंही व्यापून टाकलं होतंसच, पण आता खरोखर माझे दिवस आणि रात्री व्यापून टाकणार आहेस. फुलासारखी जपू आम्ही दोघेही तुला. सुजाता तर आता कुठे खऱ्या अर्थाने जगायला शिकलीय. वेडी मलाच सारखी धन्यवाद देत होती. ते तुला अर्पण करतो.’’..
सुजाताने पुढे काही वाचायचा प्रयत्न केला नाही. ती नुसती थकून गेली होती. आता पहाट झाली होती खऱ्या अर्थाने. ती विजयच्या आयुष्यात आहे याचं मला वैषम्य वाटत होते आणि तिने तर माझे गर्भाशय व्यापून माझ्या नसानसांतून वाहून आली. मला आई म्हणत राहिली, प्रेमाने आणि बाललीलांनी वेड लावले. जगात आईपण मिरवायला दिलं. नुसतंच दिलं नाही तर ते जगवण्यासाठी स्वत:च्या जिवाशी खेळली. सुजाताला कळतच नव्हते की एक स्त्री हे इतकं विचित्र आयुष्य पेलू शकते? ती खरंच ‘मानवी’ नाही, ‘दैवीच’ आहे. माझ्यासाठी ती विजयला नाकारत राहिली आणि स्वत: माझ्यासाठी रिती होत राहिली, एकटी राहिली आणि माझं आयुष्य संपूर्ण करत राहिली. मी माझ्या अरबो खरबो पेशी घेऊन विजयशी कधी एकरूप नाही होऊ शकले, पण ती तिच्या एक पेशीने विजयच काय माझं आणि घरादाराचा कोपरा न् कोपरा व्यापला. विजय तिच्या एका पेशीबरोबर वाढत राहिला आणि मी पण. तिने माझ्या उजाड आयुष्यात आनंदाचा झरा दिला. मला किमान त्या पाण्याने तिची ओंजळ तरी भरायला पाहिजे ना? सुजाताचा चेहरा उजळला. तिने त्या डायऱ्या सुटकेसमध्ये भरायला सुरू केले.
सुजाताला त्या देवदूताला भेटायचे होते. कुणीतरी केनियन माणूस होता. पण त्याने कुणालाच भेटायला नकार दिला. त्याला योग्य मोबदला दिला असे विजयने सांगितले, पण ज्याने तिच्या विशूचे प्राण वाचवले आणि विशूचेच नाही तर सर्व घरचेच प्राण परत केले त्याला काय मोबदला देणार?
पंधरा दिवसांनी.. आज विमानतळावर तू पाठवलेली तुझी ‘एक पेशी’ घ्यायला गेलो होतो. जणू तू येत होतीस माझ्याकडे.. मी ते इवलंसं पार्सल हातात घेतलं. वाटलं तुझा हात हातात आहे.