आयुष्य अगदी उदासीन झाले होते. आला दिवस ढकलणे चालले होते. सुजाता टाळते म्हणते म्हणून विजयही नाटक-सिनेमे- पिकनिक टाळायला लागला. लग्नाला आठ वर्षे झाली होती…

सुजाताचे घर आनंदात न्हाऊन निघत होते, फुलांनी सजले होते, पाहुण्यांनी गजबजले होते, सनईच्या सुरात भिजले होते, आणि हो, तिच्या आईचे डोळेही भिजत होते परत परत.. का नाही? सुजाताच्या घरी बारा वर्षांनी पाळणा हलला होता, तिला मुलगी झाली आहे आणि आज बारसं आहे. सुजाताच्या सासूबाईंना तर काय करू काय नको असे झाले होते, आणि विजय हे सर्व अत्यंत समाधानाने पाहत होता, त्याची आणि सुजाताची जेव्हा जेव्हा नजरानजर होत होती, सुजाताचे डोळे पाणावत होते आणि विजयचे हृदय कृतज्ञतेने भरून येत होते. आभार कुणाचे मानायचे? विधात्याचे की..
या बारा वर्षांत काय काय नाही केले? नवससायास, बाबा-बुवा, उपासतापास, डॉक्टर-वैद्य. सर्व काही. स्वत: विजय एका वंध्यत्व निवारण औषधांच्या कंपनीत मोठय़ा पदावर काम करीत असल्यामुळे त्याच्या मोठमोठय़ा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांशी चांगली ओळख होती. त्यामुळे उत्तम रिझल्ट असलेल्या टेस्ट टय़ूब सेंटरमध्ये आय.व्ही.एफ. उपचार केले, पण सगळंच फसत होतं. पण मागच्या वर्षी कसे सगळेच जुळून आले आणि हा दिवस दिसला. विनिताच्या आई आणि वहिनी आल्या होत्या, सुजाताच्या मनात नव्हते, पण सुजाताच्या सासूबाईंनी बोलावले होते. बारशाचा सोहळा पार पडला. विशाखा नक्षत्र निघाल्यामुळे ‘वि’वरून नाव सुचवणे चालू होते- विभा, विनिता, विनया, विद्या, वीरश्री.. अशी अनेक. ‘विनया’ सासूबाईंना आवडले होते, पण विनयाचे परत ‘विनू’च होणार आणि सुजाताला ते नाव परत कानावर नको होते. सुजाता म्हणाली, ‘‘विशाखा’च ठेवू, म्हणजे ‘विशू’ म्हणता येईल,’’ सासूबाई नाही म्हणणे शक्यच नव्हते. त्यांना विजयच्या दिवंगत भावाची ‘विश्वास’ म्हणजे विशूची आठवण हवीच होती. मग विशाखाच ठरले. ‘विशाखा’.. दोन शाखा असलेली?
विजय बाहेर अंगणात पुरुष मंडळींबरोबर जेवत होता. आत आता आलेल्या बायका बाळाला बघायला पाळण्याजवळ जमल्या होत्या. जेमतेम पंधरा दिवसांचे ते बाळ, पण मस्त मुठी चोखत पाय हलवत बघत होते. दाट काळे जावळ, विजयसारखेच सावळे, सडसडीत आणि हसरे, पण खिळवून ठेवत होते तिचे डोळे. काळे, अत्यंत पाणीदार, सरळ डोळ्यांत बघत ठाव घेणारे. सुजातालाही त्या डोळ्यांकडे बघताना काहीतरी घालमेल झाल्यासारखी होत होती, पण काय ते कळत नव्हते. विनिताची वहिनी जरा बडबडी आणि आचपोच नसलेली होती. ती म्हणाली, ‘‘अय्या, आई बघा ना, बाळ अगदी विनिता ताईसारखे दिसते.’’ सुजाता डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिली. विनिताच्या आई सावरून घेत म्हणाल्या, ‘‘काहीही काय गं सुमा, असं कसं दिसेल आणि इतक्या छोटय़ा बाळाचं साम्य कसं असणार?’’ तरी सुमा ठासून म्हणाली, ‘‘अहो आई, विनिताताईचे असे पाळण्यातले फोटो नाहीत का अल्बममध्ये, अगदी असेच दिसतात बरं का सुजाता.’’ काहीतरी सापडल्यासारखे सुजाताचे मन निवत गेले, विस्फारलेल्या डोळ्यांमधील ताण कमी झाला आणि ती हसली, जराशी विचित्रच. तेवढय़ात सीताक्का म्हणाल्या, ‘‘तान्हं लेकरू ते, रोज नवं दिसतंय. त्याचं काय? चला, आता ओवाळून घ्या सुजीला.’’
रात्री विजयला बाळाशी खेळताना बघून सुजाताला परत परत सुमाचे वाक्य मनात घुमत असल्यासारखे वाटत होते, पण ते तिला अजिबात ओठांवर येऊ द्यायचे नव्हते. तरी विजयचा अंदाज घेत ती म्हणाली, ‘‘विजू, हिचे डोळे वेगळेच आहेत ना?’’
तिच्याकडे न पाहताच तसाच विशाखाकडे अनिमिष बघत म्हणाला, ‘‘सुंदर आहेत, काळ्या रत्नासारखे..’’
मग विशूपण आवाज करून हसली, पण सुजातासारख्या गोड खळ्या काही पडल्या नाहीत. सुजाताही तिच्याकडे भारावून बघत राहिली, ही पण भूल पडते ‘तिच्या’सारखी.. विजय झोपला लगेच. विशाखाला कुशीत घेऊन सुजाता पलंगावर पडली होती, पण इतकी दिवसभराची दगदग होऊनही तिला झोप येत नव्हती. तिच्या मनातून विनिता जात नव्हती. मागच्या जवळजवळ दोन वर्षांपासून तिची आठवणही नव्हती निघाली कधी, पण आज सुमाच्या वाक्यांनी सगळंच ढवळून निघाले होते आणि तिला विनिताच आठवत राहिली.
सुजाताचे विजयशी लग्न जमले ते बहिणीच्या सासरच्या नात्यातून. वयात दहा वर्षांचं अंतर होते, पण त्याची नोकरी आणि कोणतीच जबाबदारी नसलेली बघून तिने होकार दिला. पण त्याचे सामान्य रूपही तिला फारसे आवडले नव्हते. तिच्या मैत्रिणींनीही नाकेच मुरडली. पण जस जसा त्याचा परिचय होत गेला, तशी ती त्याच्या प्रेमात पडत गेली. त्याचे वाचन, पेंटिंग, संगीत यातील आवड, कामाचा उरक, जनसंपर्क.. सर्वच तिला आवडत होते. त्याचे खूप मित्र-मैत्रिणी होते. सर्वच लग्नाला आले होते. मग घरीपण जवळच्या मित्रमंडळींसाठी छोटी पार्टी होती. त्यातच विनितापण होती. ती नवरा व मुलासोबत आली होती. विजयची सहकारी होती, बरोबरच्या हुद्दय़ाची. स्मार्ट, तरतरीत, गोड बोलणारी, सुंदर, काळ्या पाणीदार डोळ्यांची. सरळ डोळ्यांत बघत मनाचा ठाव घेणारी. सुजाताला ती खूप जवळची वाटली. जणू खूप जुनी मैत्रीण, काहीतरी देणंघेणं लागत असल्यासारखी.
विनिताचा नवरा अजित एका मोठय़ा कंपनीत इंजिनीअर होता. मुलगा पार्थ आठ वर्षांचा गोड मुलगा. विनिताच्या वयाच्या मानाने इतका मोठा मुलगा? विनिताचे शिकतानाच लग्न झाले होते, तेही तिच्या बालमित्राशी, अजितशी, प्रेमविवाह. तिच्या लग्नानंतरच्या उच्च शिक्षणाचे आणि घर व करिअर सांभाळण्याचे सुजाताला कौतुक वाटत असे. आणि स्वत:ला इतके मेंटेन ठेवले होते तिने की, एका मुलाची आईच काय, ती लग्न झालेली पण वाटत नसे. आणि पार्थही दिसायला अगदी अजितसारखा होता. सुजाता तिला म्हणालीही होती, ‘‘पार्थ तुझाच मुलगा आहे ना, की अजितच्या पहिल्या बायकोचा? ‘‘ती फक्त डोळ्यात बघून स्मित करत असे. हळूहळू त्याची कौटुंबिक मैत्री वाढत गेली. पार्टी, सिनेमा, ट्रिप्स इ. पण बऱ्याचदा अजित नसे, कारण तो सतत टुरवर असे. हळूहळू तिला विनिता आणि पार्थ आपले फॅमिली मेम्बरच वाटायला लागले. विनिता नसतानाही पार्थ कधी एकटाच घरी येत असे. तिच्या सासूबाई त्याचे खूप लाड करीत असत. विजयही त्याच्याशी तासन्तास बुद्धिबळ खेळत असे. पण विजय आणि विनिताच्या साहित्यावरच्या, संगीताच्या गप्पांमध्ये तिला सामील होता येत नसे. त्या दोघांचे पण वाचन अफाट होते. ऑफिसच्या बऱ्याच कामात दोघे एकत्र असत. ऑफिसचे लोकही सतत ‘विजू-विनू’ करत असत. जणू त्यांचं एकच व्यक्तिमत्त्व होतं. तसे खटकणारे काहीच नव्हते, पण त्यांना जोडणारा अदृश्य धागा सुजाताला वेधून राही. सुजाता येण्याच्या आधी पाच वर्षांपासून त्यांची मैत्री होती. कधी कोणी वावगे बोलले नव्हते. कधी ते मुद्दाम भेटत नसत किंवा नजरेतही चलबिचल नसे. पण तरी सुजाताची घालमेल होत राही. तिला वाटे हे दोघे किती मेड फॉर इच अदर आहेत. विनिताचा नवरा तिच्यासारखाच स्मार्ट आणि देखणा होता, पण इतकी वर्षे लग्नाला होऊनही ते एकमेकांशी जोडल्यासारखे वाटत नसत, पण विजय आणि विनिता मात्र एकमेकांत विलीन झाल्यासारखे वाटत. सुजाताला वाटे विजय सतत विनूशी कशाने तरी जोडलेला असतो. रात्री तो पुस्तक वाचत असेल तर तिला वाटे, उद्या हा याच पुस्तकाबद्दल तिच्याशी बोलणार. तिच्याशी विजय खूप प्रेमळ वागत असे, पण तरी तिच्यात समरस झालाय असे वाटत नसे, जसा विनूशी वाटे.
यातच दोन-तीन वर्षे गेली. हळूहळू आणखी एक कॉम्प्लेक्स येत गेला. आपण आई होऊ शकत नाही याचा. सर्व तपासण्या नॉर्मल, पण तरी मूल राहत नव्हते. तांत्रिक-मांत्रिक यांना विजयचा सक्त विरोध होता, पण तिच्या माहेरच्या सांगण्यावरून ती तेही करू लागली. त्यावरून तिच्यात आणि विजयमध्ये वाद होऊ लागले. पण तिला कसेही करून मूल हवे होते. यात फक्त आई होणे इतकेच नव्हते. तिला तिच्याशी आणि पूर्णपणे तिच्याशी नाळ जुळणारे कुणीतरी हवे होते. विजयच्या जगात तिला उपरे वाटे. विजय अदृश्यपणे विनिताचाच असल्यासारखा वाटे, पण ते तिला बोट ठेवून दाखवता येत नव्हते. तिला वाटे आपले मूल तरी आपले असेल आणि आपल्याला विजयशी जोडेल. विजयला वाटे काय घाई आहे, होईल ना आज ना उद्या. पण सुजाता नैराश्याच्या गर्तेत चाललेली त्याला दिसत होती. त्यामुळे त्याने मग टेस्ट टय़ूब बेबीचा मार्ग स्वीकारायचे ठरवले. पाटकरांच्या आय.व्ही.एफ. सेंटरमध्ये नाव नोंदविले. तेही म्हणाले, काहीच दोष नाही, पण तरीही पंधरा टक्के जोडप्यांना मूल होण्यास वेळ लागतो किंवा काही वैद्यकीय मदत लागते आणि सुजाताची इच्छा पाहता हा उपाय जरी लाखांच्या घरात जाणारा होता आणि परत यशस्वी होण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्केच होते, तरी विजयने स्वीकारायचे ठरवले. यात तिचे अंडबीज शरीरातून बाहेर काढून त्याचा विजयच्या शुक्राणूशी प्रयोगशाळेत मीलन घडवायचे आणि गर्भ तयार झाल्यावर ४८ तासांनी परत सुजाताच्या गर्भाशयात रुजवायचा आणि मग तिथे तो वाढणार, असे नियोजन असे. गर्भ तयार होऊन तो गर्भाशयात टाकेपर्यंत यशस्वी झाले. पण लगेच एक-दीड महिन्यात गर्भपात झाला. दोघेही निराश झाले. पैसा आणि आशा दोन्ही वाया गेले. पण डॉक्टरांनी समजूत काढली, असे होतच असते बऱ्याचदा. परत प्रयत्न करायला पाहिजे, असे पटवून सांगितले. सुजाता लगेच तयार झाली. कारण तिला आता थांबायचे नव्हते. विजयला मान्य नव्हते, पण सुजाता त्याच्याकडे असे बघे की जणू विचारत होती की तुला नको मूल? विजयाला सर्वात आधी घरात शांती हवी होती. पण तीन वर्षांत तीन वेळा तेच. सुजाता खूपच खचली. नातेवाईकही सारखे चौकशी करत असत. विजय आणि त्याची आई तिची खूप काळजी घेत, नातेवाइकांचे बोलणे तिच्यापर्यंत पोहोचू देत नसत, पण त्यांचे सोशल सर्कल अगदीच कमी झाले. फक्त विनिता आणि ऑफिसचा एक सहकारी रमेश येत असत घरी, पण ते कधी याबद्दल बोलत नसत. आयुष्य अगदी उदासीन झाले होते. आला दिवस ढकलणे चालले होते. सुजाता टाळते म्हणते म्हणून विजयही नाटक-सिनेमे- पिकनिक टाळायला लागला. लग्नाला आठ वर्षे झाली होती. ती ३० वर्षांची आणि विजय ४० चा. पण डॉक्टरांकडेही काही उत्तर नव्हते. त्यांनी सरोगसीचा उपाय सुचवला. पण सुजाताला ते नको होते. म्हणजे या दोघांचा गर्भ तयार झाल्यावर दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा. छे, सुजाताला तिच्याशी नाळ जोडलेले मूल हवे होते. इतके जवळ कुणाला तरी अनुभवायचे होते. नुसतंच नावाला आई होणे तिला नको होते. ती निराश झाली. त्याचा उद्रेक विजयवर होऊ लागला. ती त्याच्या आणि विनिताच्या संबंधावर चिखलफेक करू लागली. त्यातून ती काहीही अतार्किक बोलू लागली. त्याला म्हणाली, ‘‘तुलाच ‘आपले’ मूल नकोय. कारण तुला तशी गरजच वाटत नाही.. तू तिच्या मैत्रीतच पूर्ण समाधानी आहेस, त्याच्यापलीकडे तुला काहीच नकोय..’’ विजय या सर्वाचं उत्तर देण्यापेक्षा याचा काय उपाय करावा याचा विचार करीत राही. तो विनिताला यातलं काही बोलला नाही, पण विनिताला ते जाणवले त्याच्या आणि सुजाताच्या देहबोलीतून. तिचे त्यांच्याकडे येणे-जाणे बंद झाले. ऑफिसपुरतेच त्यांचे भेटणे असे. तरी बरे, विनिता विजयच्या ऑफिसला रुजू झाली तेव्हा तिचा पार्थ तीन वर्षांचा होता. नाहीतर सुजाताच्या हेही मनी आले असेत की पार्थचा आणि विजयचा काही संबंध.. पण छे, पार्थ तर हुबेहूब त्याच्या वडिलांची कॉपी आहे. पण तरी ती विजयला नेहमी म्हणे की, तुझी इच्छाशक्ती कमी पडते. विजय जर म्हणाला की, हे बोलणे अवैधानिक आहे, तर ती म्हणे, ‘सगळ्याच गोष्टी कुठे वैधानिक असतात, नाहीतर आपले मूल नसते झाले का?’
अशातच तिला बरे वाटेल अशी एक गोष्ट घडली. अजितला अमेरिकेत मोठय़ा कंपनीत जॉब मिळाला आणि तो विनिता आणि पार्थला घेऊन अमेरिकेला निघून गेला.
विजय थोडे दिवस सैरभैर होता, पण मग त्याने स्वत:ला कामात खूप गुंतवून घेतले. घरीही तो तासन्तास कॉम्प्युटरसमोर बसलेला असे. प्रोजेक्ट्स, पेपर्समध्ये बुडून गेलेला असे. त्याचे वाचन, संगीत कमी कमी होत गेले. सुजाताला कळत असे, पण काय म्हणणार? त्यांच्यात शरीरसंबंधही खूपच कमी आणि निरस झाले होते. सुजाताला वाटे, कशाचा काही उपयोगच नाही तर कशाला? आणि विजयला काम आणि कामच. त्याबद्दल दोघांचीही तक्रार नव्हती. जणू काही त्यांनीच एकमेकांच्या संमतीनेच असे ठरवले होते. सुजाता विचार करे- मूल झाल्यावर नाही का शरीरसंबंध तसेच आणि नव्या नवलाईने चालू असतात आपल्या मैत्रिणींचे? मग आपल्यालाच का मरगळ आली अशी? विजयला दोघांचीही अवस्था कळत होती. पण सुजाताशी काय बोलावे हेही कळत नव्हते. असेच चालू राहिले. पगार वाढत होता. घर, बंगला, शेत सगळंच वाढत होते, पण वाढत नव्हता संसार, तो दोघांचाच राहिला. सासूबाई पण थकल्या होत्या. विजयने आणि डॉक्टरांनी मूल दत्तक घेण्याचा पर्याय सुचवून पाहिला, पण सुजाता म्हणाली, ‘‘दुसऱ्याच्या मुलाला मी कधीच आपलं म्हणू शकणार नाही. तशी नाटकं करण्यापेक्षा मी अशीच बरी.’’ विजयला वाटले, ती वैतागून असे बोलते बहुतेक. म्हणून त्याने ठरविले की काही दिवसांनी परत विषय काढू. दोघांनाही बरे वाटावे म्हणून त्याने तिला विचारूनच एक कुत्र्याचे पिल्लू आणले. त्याला वाटले तिला दिवसभर विरंगुळा आणि घरात थोडी हालचाल होईल, पण सुजाताने त्याला कधी हात नाही लावला. उलट विजयची त्याच्याशी असलेली जवळीक तिला आवडत नसे. स्वच्छतेचे अनेक नियम करून सारखी त्याच्यावर ओरडत असे. सुजाताला कळत असे आपण जरा जास्तच करतोय, पण तिला त्या पिलाशी विजयची असलेली केमिस्ट्री पाहून विनिताची आठवण येत असे. ती त्या पिलाचा दुस्वास करू लागली. शेवटी विजयने ते त्याच्या एका मित्राकडे दिले. पण नंतर त्याने मूल दत्तक घेण्याचा विषय सुजाताकडे काढला नाही. (पूर्वार्ध)

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Opposition leaders in Nagpur accused government of neglecting farmers laborers and youth of Vidarbha in winter session
महाविकास आघाडी म्हणते…सरकारने शेतकरी, कष्टकरी, तरुण, उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली !
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Kumbh Mela Nashik , Nashik Guardian Minister,
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रिपदाला महत्व, महायुतीत शह-काटशहाचे राजकारण

सुजाता येण्याच्या आधी पाच वर्षांपासून त्यांची मैत्री होती. कधी कोणी वावगे बोलले नव्हते. कधी ते मुद्दाम भेटत नसत किंवा नजरेतही चलबिचल नसे. पण तरी सुजाताची घालमेल होत राही. तिला वाटे हे दोघे किती मेड फॉर इच अदर आहेत.

Story img Loader