विनायक परब
डेबोलिना आणि मनोबिना या दोन्ही जुळ्या बहिणींना त्यांच्या वडिलांनी १९३१ साली त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षी अॅग्फा ब्राऊनी हा कॅमेरा भेट दिला. त्या वेळेस बनारसच्या राजाकडे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या बिनोद बिहारी सेन रॉय यांनाही याची कल्पनी नव्हती की, त्यांनी बंगालच्या कला क्षेत्रातील दोन पहिल्या महिला छायाचित्रकारांसाठी एक नवे दालन खुले केले आहे. आणि त्या दोन्ही बारावर्षीय मुलींनाही याची कल्पना नव्हती की, त्या दोघी बंगालच्या पहिल्या महिला हौशी छायाचित्रकार म्हणून नंतर त्यांची नोंद छायाचित्रणाच्या आणि बंगालच्या इतिहासामध्ये होणार आहे. त्या काळी ही कलादेखील महागडी होती आणि कॅमेरा विकत घेण्याचा विचार तर सामान्य माणूस करूही शकत नव्हता. छायाचित्रण हा पुरुषांची मक्तेदारी असलेलाच विषय होता. त्यावेळेस या दोन्ही युवतींनी घराबाहेर पडत, त्यावेळच्या समाजाचे चित्रण केले. अनेकदा तर त्यांनी आवडते म्हणून तर घरगुती स्मृती जपण्यासाठी छायाचित्रण केले. मात्र ते एवढय़ा कलात्मकतेने त्या छंदामध्ये पूर्णपणे रममाण होत केले की, आज त्याला कलामूल्य प्राप्त झाले आहे. त्यांना ती कला आवडली, भावली आणि त्यांनी त्या कलेवर प्रेम करत पुढचा आयुष्यभराचा प्रवास केला हे विशेष. दोघींनीही आयुष्यभर मनमुराद छायाचित्रण केले असे म्हणण्याऐवजी त्या छायाचित्रण मनमुराद जगल्या, असेच शब्द त्यांची छायाचित्रे पाहिल्यानंतर डोक्यात येतात.
रूढार्थाने ही कला आहे, याचेही भान नसण्याच्या त्या वयात त्यांनी टिपलेली छायाचित्रे त्यांच्यातील सौंदर्यतत्त्वाची जाण किती उच्च कोटीची होती, त्याचा प्रत्यय देतात. अनेकदा तर त्यातली एक दुसरीच्या छायाचित्राचा विषय झाली.. वयपरत्वे मनोबिनाचे लग्न झाले ते विख्यात सिनेमॅटोग्राफर बिमल रॉय यांच्याशी. सुरुवातीस कोलकाता आणि नंतर मुंबईत त्यांचे वास्तव्य झाले. तर डेबोलिनाचे लग्न नितिश्चंद्र मझुमदार या उद्योगपतीशी झाले आणि त्यांचे आयुष्य कोलकात्यामध्येच गेले. मात्र या बहिणींनी नंतर काही काळ लंडन एकत्र उपभोगले, हे त्यांच्या छायाचित्रांतून जाणवते. लंडनची दोन छायाचित्रे अतिशय बोलकी आहे. पैकी एकामध्ये दोन म्हाताऱ्या बायका रस्त्याकडेला गप्पा मारताना दिसतात.. मनोबिनाने तर या छायाचित्राच्या मागे त्याचे वर्णनही लिहिलेले होते. ‘व्हॉट अ लव्हली डे’ असे एकमेकींना सांगण्यासाठीच त्या जणू भेटल्या असाव्यात जणू. दोघीही एकटय़ा, त्यामुळे ही भेट हाच त्यांचा विरंगुळा.. या शब्दांतूनही आपल्या चित्रविषयाविषयीचा एक जिव्हाळाच यातून प्रतीत होतो. छायाचित्र वेधक असून त्यात उन्हाची छटा वातावरणातील उबदारपणा सहज दाखवून जाते. उत्तम छायाचित्रणामध्ये ‘त्या’ क्षणाचे वातावरण पाहणाऱ्यास जाणवावे लागते. त्या कसावर हे छायाचित्र पूर्णपणे उतरते. दुसरे छायाचित्र मनोबिना यांनी एका दुकानाच्या आतून टिपले आहे. मॅनिक्विनच्या मागून टिपलेल्या या छायाचित्रात िवडो शॉिपग करणारी एक महिला दिसते. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने टिपलेले हे छायाचित्र प्रकाशाची एक वेगळीच गंमत सहज उलगडते. शिवाय त्यात दिसणाऱ्या दुकानातील झिरमिळ्या त्या छायाचित्रातील वातावरण जिवंत करतात. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने छायाचित्र टिपून उत्तम परिणाम साधणे हे कौशल्याचे निदर्शक असते. हे छायाचित्र त्या उत्तम निकषात बसणारे आहे.
मनोबिना यांनी टिपलेले पंडित नेहरूंचे छायाचित्र पाहिल्यानंतर तर अनेकांना लक्षात येईल की, हे छायाचित्र आपण आजवर कुठे ना कुठे नक्कीच पाहिले आहे. अनेकदा तर ते नेहरूंच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिसते. तर एखाददोन पुस्तकांच्या ते मुखपृष्ठावरही विराजमान आहे, ते मनोबिना यांनी टिपलेले आहे. यामागे खरे तर एक कथाच आहे आणि त्यातून छायाचित्रकाराची मेहनत, कटाक्ष आणि एकूणच विस्तार असलेला आवाकाही लक्षात येतो. संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन या छायाचित्रासाठी त्यांना पंडित नेहरूंकडे घेऊन गेले होते. कॅमेऱ्याच्या सेटिंगला वेळ लागत होता, त्यावेळेस पंतप्रधान नेहरू म्हणाले, खूप वेळ लागतोय. त्यावेळेस त्यांच्या पदाची भीडभाड न बाळगता छायाचित्रकार मनोबिना म्हणाल्या, प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे मेहनत आणि वेळ खर्ची पडलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या एका छायाचित्रासाठी दरवाजाच्या चौकटीजवळ उभे राहा असे त्यांनी नेहरूंना सांगितले. त्यावर ते म्हणाले, मला असे आजवर कुणी हे करा, ते करा असे सांगितलेले नाही. त्यावर मनोबिना म्हणाल्या की, तुम्ही युसूफ कार्श या जगद्विख्यात छायाचित्रकाराची छायाचित्रे पाहिलेली दिसत नाहीत.. हा किस्सा मनोबिना या तत्कालीन छायाचित्रणाच्या क्षेत्राचे उत्तम ज्ञान राखून होत्या, हेच सिद्ध करणारा आहे. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचे केलेले फोटोसेशन तर ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या तत्कालीन आघाडीच्या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते. केवळ मनोबिनाच नव्हे तर डेबोलिना यांची छायाचित्रेही इलस्ट्रेटेड वीकलीने प्रसिद्ध केली. दोघींनीही हौशी छायाचित्रण केले खरे, पण जे टिपले त्या छायाचित्रामागे केलेल्या नोंदींमुळे आज त्या काळाचे दस्तावेजीकरण या छायाचित्रांमध्ये आपसूकच झाल्याचे लक्षात येते.
असेच एक महाबळेश्वरचेही छायाचित्र आहे आणि मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाचेही. महाबळेश्वरला डोंगरकडय़ावर बसून खाली दरीकडे पाहणाऱ्या दोन लहान मुलांचे एक कौटुंबिक छायाचित्र. ते पाठमोरे ज्या पद्धतीने टिपले आहे, त्यातून छायाचित्राला एक सहज खोली प्राप्त झाली आहे. ते कलात्मक छायाचित्र आहे, आल्बमपलीकडचे. तसेच गेट वेच्या छायाचित्रातही उभा असलेला लहान मुलगा त्या छायाचित्राला खोली प्राप्त करून देता. मनोबिना यांचा मुलगा जॉय रॉय सांगतो, रंगीत छायाचित्रणाला सुरुवात झाल्यानंतरही त्यांच्या आवडीचे राहिले ते कृष्णधवल छायाचित्रणच. कारण काळ्यापासून पांढऱ्यापर्यंतच्या त्या सर्व छटांमध्येच त्यांचे आनंदमयी जग सामावलेले होते. या साऱ्याचे निमित्त आहे ते जॉय यांनी सध्या कोलकाता येथे आयोजित केलेले त्यांचे छायाचित्र प्रदर्शन!
(छायाचित्र सौजन्य : जॉय रॉय आणि अर्बन हिस्ट्री डॉक्युमेंटेशन अर्काईव्ह, सेंटर फॉर स्टडी इन सोशन सायन्सेस, कोलकाता)
@vinayakparab
response.lokprabha@expressindia.com