आपल्या मनालीच्या मनात तुझ्या भावाबद्दल काहीतरी आहे, जरा दोघांकडूनही अंदाज घे ना, असं सासूबाईंनी सांगितल्यापासून चैतूचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.. असं खरंच झालं तर..

‘‘चैतू बॅग भरून झाली का? मदत करू का काही?’’ तिच्या खोलीत येत वसुधाने विचारले.
‘‘झाली आई बॅग भरून.. एकच तर न्यायची आहे. स्वैपाक मघाशीच झालाय. गरम गरम फुलके करते, मग जेवायला बसू. बाबांना आणि समरला भूक लागली असेल..’’ बोलता बोलता चैत्रालीने बॅगची झिप लावली व स्वैपाकघरात पोळय़ा करण्यासाठी गेली.
चैत्राली पुण्याला माहेरी जात होती. तिच्या बाबांचा एकसष्टी समारंभ साजरा होणार होता. ती दोन दिवस आधी जात होती. समर व त्याचे आईबाबा म्हणजेच वसुधा व यशवंत दोन दिवसांनी जाणार होते. चैत्रालीने गरमागरम पोळय़ा करतानाच आग्रहाने सगळय़ांना जेवायला बसवले. वसुधा नाही नाही म्हणत असूनही तिला गरम फुलके वाढले व झाल्यावर सगळय़ांचे होताना ती पण जेवायला बसली. मनाली म्हणजे तिची नणंद कॉलेज पिकनिकबरोबर माथेरानला गेली होती.
जेवणानंतरची झाकपाक करून वसुधाताई हॉलमध्ये आल्या तेव्हा समर व चैत्राली टीव्हीवर डिस्कवरी चॅनल पाहात होते. पदराला हात पुसत त्या सोफ्यावर बसल्या आणि समरला म्हणाल्या, ‘‘समर जरा टीव्ही म्युट कर ना, मला चैतूशी जरा बोलायचे आहे..’’ समरने टी.व्ही. बंदच केला आणि म्हणाला, ‘‘बोला मातोश्री.. काय म्हणायचे आहे..’’ वसुधा म्हणाली, ‘‘चैतू जरा खाजगी विषय आहे. नाही पटला तर रागावू नको, सोडून दे.’’
‘‘अहो, आई बोला ना.. काय म्हणायचंय तुम्हाला?’’ चैतूने असे म्हटल्यावर वसुधाताईंना जरा धीर आला व त्या म्हणाल्या, ‘‘अगं बरेच दिवसांपासून तुला सांगीन म्हणते पण जमतच नाहीये. पण आज मात्र बोलणारच आहे. आपल्या मनालीच्या मनात तुझ्या भावाबद्दल चिन्मयबद्दल काहीतरी आहे असे मला वाटते. तू आता पुण्याला जातेच आहेस तर जरा चिन्मयच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेशील का? खरंच दोघं एकमेकांमध्ये गुंतली असतील तर पुढचा विचार करायला हरकत नाही ना?’’
अगदीच अनपेक्षित गोष्ट कानावर आल्यामुळे चैत्राली क्षणभर गांगरली, पण लगेच स्वत:ला सावरत म्हणाली, ‘‘पण मग मला कसं कळलं नाही ? चिन्मय माझ्याशी बोलला असता. पण ठीक आहे मी बघते..’’
दुसऱ्या दिवशी सकाळी ८च्या बसने चैत्राली पुण्याला जायला निघाली. सकाळपासून कामाच्या गडबडीत तिला विचार करायला वेळच मिळाला नव्हता. पण आता बसमध्ये बसल्यावर मात्र ती रिलॅक्स झाली. थोडा वेळ तिला डुलकी लागली. पण बसने एक जोरदार ब्रेक दिला आणि चैत्राली अचानक जागी झाली. थोडीशी झोप मिळाल्यामुळे तिला फ्रेश वाटत होते. आता मात्र सासूबाईंच्या बोलण्यावर तिने विचार करायला सुरुवात केली. खरंच चिन्मय आणि मनालीमध्ये काही असेल का? मागे दोन-तीन फंक्शनमध्ये ते एकमेकांना भेटले होते आणि बऱ्यापैकी मोकळेपणी गप्पाही मारत होते. पण त्यावरून असा काही निष्कर्ष लावणे चुकीचे होते. मानेला हलकासा झटका देत तिने ती नकारार्थी हलवली. सासूबाईंचे बोलणे मात्र ती डावलू शकत नव्हती. त्यामुळे चिन्मयच्या मनात काय आहे हे तिला या भेटीत काढून घ्यायचे होते.
चैत्रालीच्या लग्नाला ४ वर्षे झाली होती. मूळची पुण्यातील असलेली चैत्राली समरशी लग्न झाल्यावर मुंबईला आली आणि दुधात साखर विरघळावी तशी समरच्या घरात मिसळून गेली. वसुधाची तर अगदी लाडकी सून झाली होती. चैत्राली आई-बाबांची पण लाडकी होती. तिच्या माहेरी आई-बाबा व मोठा भाऊ चिन्मय होता. एका सॉफ्टवेअर कंपनीत तो एच. आर. मॅनेजर होता. त्याच्यासाठी स्थळे बघणे सुरूच होते. चैत्रालीला वाटले त्याचे जर मनालीशी सूत जमले असते तर त्याने लग्नासाठी मुली बघितल्याच नसत्या.. पण एवढय़ातच काही घडले असले तर..?
मनालीसाठी पण बरेच दिवसांपासून मुले बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. पण काही ना काही कारणांनी योग जुळून येत नव्हता. आलेल्या स्थळांबद्दल मनाली अलिप्तच वाटायची, त्याच वेळी चैत्रालीला एकदा संशय आला होता की, मनाली प्रेमात तर नाही ना पडली? पण ती आपल्या भावाच्या प्रेमात पडेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. चैत्राली पुण्याला घरी पोचली तेव्हा साडेअकरा वाजत आले होते. दार उघडताच समोर लेकीला पाहून आईला इतका आनंद झाला की तिने तिला मिठीच मारली. तिचे माहेरी येणे खूप कमी असायचे. नोकरी करत असल्यामुळे जमायचे नाही. पण यावेळी मात्र अगदी ८ दिवस सुट्टी काढून ती माहेरी आली होती. एकसष्टीचा समारंभ अगदी दणक्यात करायचा ठरवले होते आणि म्हणूनच आईच्या मदतीसाठी ती मुद्दाम लवकर आली होती.
आल्या आल्या चैत्रालीने कामाचा ताबा घेतला व आईने सुटकेचा श्वास घेतला. लेक मदतीला आल्यामुळे ती निर्धास्त झाली. समारंभाला दोनच दिवस राहिले होते. चैत्राली भराभर कामे आटपायला लागली, पण डोक्यातून मनाली आणि चिन्मयचा विचार जातच नव्हता.
खरे म्हणजे सासूबाईंकडून मनाली व चिन्मयमध्ये काहीतरी आहे हे कळल्यावर तिला आनंद व्हायला हवा होता. मनाली खरेच गोड होती. शिक्षण, नोकरी, संस्कार यात कुठेच कमी नव्हती. अशी मुलगी आपली भावजय होते आहे हे कळल्यावर नणंद व भाऊ या दोघांच्याही लग्नाची काळजी मिटणार होती. मनाली आपल्या माहेरच्या घरात नक्कीच मिसळून राहील याची तिला खात्री होती. पण का कोण जाणे, मनाली तिला माहेरी भावजय म्हणून यावी असे वाटत नव्हते. तिच्या ‘सून’ बनून घरी येण्याने चैत्रालीचे माहेरपण संपणार होते. माहेरी आली की ती अगदी पहिल्यासारखी अल्लड मुलगी होत असे. आई-बाबा व भावाकडून आपले लाड पुरवून घेत असे. एखाद्या फुलपाखरासारखी घरभर बागडत असे. कारण तेव्हा ती ‘सून’ नाही तर फक्त त्या घरातील एक लाडावलेली लेक असे. पण मनाली घरात आल्यावर चैत्रालीचे हे स्वातंत्र्य संपणार होते. माहेरीसुद्धा सासरची एक व्यक्ती नेहमीच हजर राहणार होती जे तिला नको होते..
विचारांच्या नादात आपण स्वार्थी तर झालो नाही ना, असे तिला वाटले आणि ती अधिकच अस्वस्थ झाली. दुसऱ्याच क्षणी तिने मनातील विचारांना झटकले व कामाला लागली. बाबांच्या एकसष्टीच्या दिवशी सकाळीच तिचे सासू-सासरे, समर व मनाली आले. समारंभ अगदी व्यवस्थित व उत्तमरीत्या पार पडला. जवळ जवळ ७०-८० लोक आले होते. मनालीने तिला जमेल तशी मदत चैत्रालीला केली, त्यामुळे आईलाही तिचे कौतुक वाटले. समारंभात मनाली चिन्मयशी मनमोकळेपणे बोलत होती. मध्येच त्यांची थट्टामस्करीही चालू होती. ‘चोराच्या मनात चांदणं..’ तसं काहीतरी चैत्रालीचं झालं होतं. मनाली व चिन्मयमधली प्रत्येकच कृती तिला संशयास्पद वाटत होती. दुसऱ्याच दिवशी तिच्या सासरची मंडळी परत मुंबईला जाणार होती. चिन्मयशी बोलणे होईपर्यंत चैत्रालीच्या डोक्याला टेन्शनच होते. एकदा तिच्या मनात आले. खरंच मनाली किती चांगली आहे. ती जर या घरात सून म्हणून आली तर आईलाही आनंद होईल. पण मग आपले काय? माहेरचे स्वातंत्र्य आपण गमक, मनमोकळेपणी माहेरी वागताच येणार नाही. इथे आल्यावर आपण वाटेल तसे वागतो. आपल्यावर कसलेही दडपण नसते. माहेरपण उपभोगायला मिळते, पण नणंद इथे आल्यावर आधीसारखे वागता येणार नाही. माहेरीही सासरीच असल्यासारखे वाटेल. पण आपली ही अडचण आईला किंवा सासुबाईंना कशी सांगायची?
विचारांच्या नादात मनाली तिच्यासमोर येऊन कधी बसली तिला कळलेच नाही. तिचा खांदा हलवत मनाली म्हणत होती ‘‘वहिनी कसला येवढा विचार करते आहेस? कधीची तुला हाक मारते आहे, पण तुझे लक्षच नाहीये?’’
मनालीचा आवाज ऐकून ती दचकली. स्वत:ला सावरत म्हणाली, ‘‘अगं काही नाही. बोल तू कशाला आली होतीस खोलीत?’’ तिच्या नजरेला नजर देत मनाली म्हणाली, ‘‘वहिनी मला तुझ्याशी थोडे बोलायचेय..’’ सासूबाईंनी म्हटलेली गोष्ट खरीच आहे की काय, असा क्षणभर विचार तिच्या मनात आला. हसत ती म्हणाली, ‘‘अगं मग बोल ना..’’
‘‘वहिनी, त्या दिवशी आई तुला जे बोलली ना.. चिन्मय आणि माझ्याबद्दल..’’ चैत्रालीच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्याला जे नको होते तेच आता होणार.. ‘‘मग त्याचं काय? अगं मला वेळच मिळाला नाही चिन्मयशी बोलायला..’’ आता चैत्राली पण थोडी गडबडली होती. ‘‘अगं तेच तुला सांगायला आले आहे. तू काही बोलू नकोस, अगं आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आमच्यात तसे काही नाहीये. माझा जोडीदार मी निवडलाय. सारंग नाव आहे त्याचे. आमच्याच ऑफिसमधला आहे. आई-बाबांशी बोलायला मला भीती वाटते आहे. तू आणि दादा बोला ना जरा त्यांच्याशी. सारंग खरेच चांगला मुलगा आहे..’’
चैत्राली तिचे बोलणे ऐकतच राहिली. तिच्या मनाला पडलेला पेच एका क्षणात मनालीने सोडवला होता. तिला अगदी हलके पिसासारखे झाल्याचे जाणवले. खटय़ाळपणे ती बोलली, ‘‘मग आधीच का नाही सांगितलेस मला? एव्हाना लग्न झाले असते तुझे.. काही काळजी करू नकोस मी बोलेन आईंशी’’
‘‘ळँंल्ल‘२ वहिनी, कालपासून मी टेन्शनमध्ये होते. आता बरे वाटले जरा.. चल जाते मी खोलीत. उद्या निघायचेय परत मुंबईला जायला. तू घरी आल्यावर मग बोलू.’’ मनाली म्हणाली आणि तिला गुडनाइट म्हणून खोलीबाहेर गेली. किती सहजपणे तिचा प्रश्न सुटला होता. सारंगची ओळख मनालीने एकदा करून दिली होती. तेव्हाही तो तिला चांगला वाटला होता. सावळय़ा रंगाचा, उमदा सारंग आणि त्याला शोभेशी नाजूक मनाली.. जोडा खरेच छान जमला असता. लग्न ठरवायच्या आधी त्याच्याबद्दल सर्व माहिती काढणे आवश्यक होते. पण ती चैत्राली करणारच होती. शेवटी तिच्या लाडक्या नणंदेच्या आयुष्याचा प्रश्न होता. पण चैत्रालीच्या मनातला भलामोठा प्रश्न मनालीने चुटकीसरशी सोडवला होता.. समरला ही आनंदाची बातमी द्यायला ती एखाद्या अल्लड मुलीसारखी पळत हॉलमध्ये गेली…

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”