पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ पदपथावर ग्रंथविक्री करणाऱ्या पुण्यातील वसंत आठवले यांनी शेकडो अभ्यासक, लेखक, पत्रकार आणि संशोधन संस्थांना उपयुक्त असे दुर्मीळ ग्रंथ आपल्या व्यवसायातून उपलब्ध करून दिले. एकंदर वाचनव्यवहाराच्या साखळीत असे महत्त्वाचे दुवे अनेकदा दुर्लक्षित राहतात. दरएक दशकात वाचकांच्या बदलत्या पिढीचे साक्षीदार असलेल्या आठवलेंशी साधलेल्या संवादातून तयार झालेला हा माहितीलेख जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने..

पदपथावरील ग्रंथ उलाढाल..

महाराष्ट्राच्या साठ-सत्तर वर्षांच्या इतिहासातील संशोधक, अभ्यासक आणि अभ्यासू वाचकांची पिढी ही फक्त ग्रंथ दुकाने किंवा ग्रंथालयांच्या खुराकावर पोसलेली नाही. त्यांना जीवनरस देणारी यंत्रणा ही इतिहासाच्या कुठल्याच कप्प्यात न नोंदली गेलेली पदपथावरची ग्रंथ दालने होती. कुठल्याही शहराच्या सांस्कृतिक उन्नती-अवनीतीची ओळख करायची झाली, तर ती तिथल्या जुन्या पुस्तकविक्री यंत्रणेत कोणत्या प्रकारची पुस्तके दाखल होतायत हे पाहणे पुरेसे ठरावे!

मुंबईत २००५ चा महापूर येईस्तोवर हा ग्रंथव्यवहार सुरक्षित होता. त्यानंतर झपाटय़ाने विक्रीची ही साखळी फोर्ट परिसरातून उपनगरांपर्यंत विस्थापित झाली. नंतरच्या दहा वर्षांत खासगी वाचनालयांच्या अस्तासोबत हे ग्रंथ शिलेदारही दिसेनासे झाले. आज मुंबईच्या फ्लोरा फाऊंटनपाशी होणाऱ्या खूपविक्या पुस्तकांच्या गर्दीत दर्दीचा गोतावळा फार पाहायला मिळत नाही. नाशिक, नागपूर या शहरांमध्ये आता दुर्मीळ जुन्या पुस्तकांची यंत्रणा त्रोटक असली, तरी पुणे आणि कोल्हापूर या टापूंमध्ये या प्रकारच्या ग्रंथ-खरेदी विक्रीचे गाडे असोशीने सुरू आहे. येथील पदपथ विक्रेत्यांकडून ग्रंथांचा ऑनलाइन लिलावही होतो आणि ग्रंथवेडय़ांच्या चकरा काही विशिष्ट भागांमध्ये सातत्याने सुरू असतात. कोल्हापूरचे चाँद आणि नेताजी कदम यांच्याकडे येणारा दुर्लभ जुन्या पुस्तकांचा नवा साठा आपल्या ताब्यात यावा यासाठी मुंबई आणि पुण्यातील काही संग्राहक सातत्याने सक्रिय असतात. पुण्यातील प्रसिद्ध लकडी पुलाजवळील प्रभाकर यांच्या जुन्या ग्रंथांच्या दुकानात डोकावून पुढे शेट्टी, समीर, पवार आणि कदम यांच्याकडच्या पुस्तकांवर कुतूहल आणि आशाभरीत नजरा फिरवून आल्याशिवाय शहरातील कित्येक पुस्तकवेडय़ांना चैन पडत नाही अन् शिरस्त्याप्रमाणे रविवारी पुण्यात ग्रंथपर्यटन करणाऱ्या असामींच्या फौजा बाजीराव रस्त्यावरील सरस्वती शाळेच्या पायऱ्यांवर बसणाऱ्या वसंत (आणि त्यांचे सुपुत्र धनंजय) आठवलेंकडे धडकून दुर्मीळ ग्रंथखरेदीचा आरंभ करतात. त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लक्ष्मी वाबळे, राजेंद्र लिंबोरे, भागवत यांच्याकडेही काय ऐवज आला आहे, याचाही धांडोळा घेतात.

लोकांमध्ये वाचनाचा आवेग अधिक असणाऱ्या गेल्या शतकापासून मराठी प्रकाशन व्यवसायात आर्थिक गणिते बिघडण्याचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे पुस्तकाची पहिली आवृत्ती संपल्यानंतर ग्रंथदुकानांतून ती उपलब्ध होण्याची शक्यता नसते. मग पन्नास आणि साठच्या दशकांपासून अलीकडच्या काळात गाजलेल्या कैक पुस्तकांच्या पूर्णपणे अनुपलब्ध प्रती मिळविण्याचा एकमेव मार्ग हा पदपथावरील ग्रंथविक्री यंत्रणेकडे वळणारा असतो. ललित, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, ज्योतिषविषयक, तंत्र-मंत्र जारणविद्या, कामशास्त्र, तंत्रज्ञानाची माहिती देणारी, आधुनिक शास्त्रांतील मूलभूत संकल्पना मांडणारी, वैद्यकीय क्षेत्रात आदिम काळापासून संशोधनाचा पल्ला नोंदविलेली महत्त्वाची ग्रंथसंपदा या बाजारात माफक किमतीत सहज उपलब्ध होऊ शकते. फक्त त्यासाठी शोधक नजर आवश्यक. एका पिढीने पदराला खार लावून आयुष्यभर जमविलेला आणि दुसऱ्या पिढीच्या अनास्थेतून घर रिकामे करण्याच्या उद्देशाने फुंकून टाकलेला ग्रंथसंग्रह या बाजारातील विक्रेते मिळवितात आणि संग्राहकांच्या पुढय़ात आणून ठेवतात. लेखकाच्या सहीची पुस्तके, पहिल्या आवृत्तीची पुस्तके, एका दिग्गज लेखकाने आपल्या काळातील तुल्यबळ लेखकाला भेट दिलेल्या प्रती, एकाच लेखकाच्या गाजलेल्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या सालातील आवृत्त्या, वेगवेगळ्या आवृत्त्यांच्या बदललेल्या मुखपृष्ठांच्या प्रती, संशोधनासाठी लागणारी पुस्तके, अभ्यासविषयाला आणखी संदर्भाची जोड देऊ शकणारी पुस्तके, एखाद्या विलक्षण विषयाची तपशिलात माहिती पुरवणारे ग्रंथ, एखादा संपूर्ण काळ-समाजव्यवस्था आदींची इत्थंभूत नोंद असलेली पुस्तके अशा वाचकवेडय़ांच्या मूलभूत निकषांवर उतरणारी अनंत प्रकारची पुस्तके या बाजारात उपलब्ध असतात अन् त्यामुळेच पन्नास रुपयांपासून काही हजार रुपयांची खरेदी एकेका दर्दी वाचकाकडून घडू शकते.

ग्रंथ जतन करण्याबाबतच्या सरकारी अनास्थेमधून आपल्या राज्यात माहिती आणि ज्ञानाने भरलेली गेल्या शतकातील किती प्रकारची मासिके, साप्ताहिके आणि ग्रंथरचना नष्ट झाली, याची गणती नाही. तरीही पदपथावरील या यंत्रणेमुळे वाचलेल्या अक्षरधनाचा साठाही मोठा आहे. आचार्य अत्रे यांनी आपल्या ऐन तारुण्यात ‘हाऊंड ऑफ बास्करविल’ या आर्थर कॉनन डायलच्या ग्रंथाचा ‘मोहित्यांचा शाप’ नावाने अनुवाद केला होता. अत्रेंच्या कारकीर्दीत त्यांनी गाजविलेल्या कित्येक पुस्तकांच्या ओझ्याखाली हा अनुवाद पूर्णपणे विसरला गेला होता अन् त्याचा पुनर्जन्म हा फोर्टातल्या पदपथावर ते पुस्तक उपलब्ध झाल्यामुळे होऊ शकला. श्रीकांत सिनकर यांनी रमेश राजवाडे हे टोपणनाव धारण करून साठच्या दशकात तीन-चार रहस्यकथा लिहिल्या होत्या. ऐंशी-नव्वदीत त्यांचा जीर्णोद्धार केवळ पदपथावर ती ग्रंथमाला हस्तगत झाल्यामुळे होऊ शकला. शशी भागवत यांच्या साठ-सत्तरीच्या दशकात खळबळ माजविणाऱ्या अद्भुतरम्य महाकादंबऱ्या पुन्हा प्रकाशित होऊनही अनुपलब्ध आणि दुर्मीळ झाल्या होत्या. नव्वदीच्या दशकापासून त्या इच्छुकांसाठी दंतकथा बनल्या होत्या. त्यांच्या ‘मर्मभेद’, ‘रत्नप्रतिमा’ आणि ‘रक्तरेखा’ या कादंबऱ्यांना पदपथावरून हुडकून पुनर्जन्म देण्यात अजिंक्य विश्वास या पुण्यातील ग्रंथप्रेमी तरुणाचा मोठा वाटा आहे.

पुण्यातील जुन्या पुस्तकविक्री व्यवसायाला राज्यभरातील ग्रंथोपासकांपर्यंत पोहोचविले ते तात्या ढमढरे नावाच्या सद्गृहस्थाने. १९६७ साली त्यांची भानू शिरधनकर यांनी एक मुलाखत घेतली होती. त्यांच्या ‘पुस्तकाची दुनिया’ या ग्रंथात ती वाचायला मिळते. अर्वाचीन इतिहासात ‘बुक्स ऑन बुक्स’ या गटातील जी थोडकी मराठी पुस्तके निर्माण झाली आहेत, त्यात या ग्रंथाला आणि या मुलाखतीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण इतर जगाच्या खिजगणतीतही नसलेल्या या व्यवसायातील कुणाची तरी पहिल्यांदाच मुलाखत घेतली गेली होती.

त्यात ते म्हणतात की, ‘‘१९५१ साली मी हा धंदा सुरू केला. त्याही आधी चार-पाच वर्षे आधी मी या धंद्यात पडलो असतो, तर या वेळी मी सर्वात श्रीमंत माणूस झालो असतो. याचे कारण १९४७ साली आपणास स्वातंत्र्य मिळाले आणि येथील सारे युरोपियन लष्कर स्वदेशी परत गेले. या सैनिकांचे पुण्यात अनेक क्लब होते. प्रत्येक क्लबचे एक ग्रंथालय याप्रमाणे अनेक ग्रंथालयांतून अफाट ग्रंथसंपत्ती होती. लष्करातील मोठमोठय़ा अधिकाऱ्यांनी आपल्या उपयोगाकरिता मागविलेले दुर्मीळ ग्रंथ त्यात होते. हे ग्रंथ त्यांनी जाताना येईल त्या किमतीला फुकून टाकले. या परिसरातील रद्दीवाल्यांनी त्याचा पैसा केला. केवळ चार वर्षे उशिराने आल्याने माझी संधी हुकली. ती पुस्तके मला हस्तगत करता आली असती तर मी आज श्रीमंत झालो असतो.’’

त्यांनी गोळा केलेल्या दुर्मीळ ग्रंथांमुळे अर्थातच नंतर त्यांना मुबलक पैसा मिळालाच, पण साहित्यिक, संशोधक यांच्या दरबारी विलक्षण अशी प्रतिष्ठाही मिळाली. गावोगावच्या रद्दीवाल्यांकडे जुनी पुस्तके नाइलाजाने विकण्यास तयार झालेल्या व्यक्ती- संस्थांकडून त्यांनी दुर्मीळ ग्रंथांचा आणि दस्तावेजांचा खजिनाच हस्तगत केला. ढमढरे यांनी सांगितलेल्या आठवणीत वॉरन हेिस्टगने तयार केलेला इंग्लिश-पर्शियन शब्दकोश त्यांना मुंबईतील रद्दीच्या प्रचंड गठ्ठय़ांतून सापडला. पेशव्यांचा फारसी पत्रव्यवहार करणाऱ्या एका सरदार घराण्यातून आणलेल्या ११ पोती रद्दी कागदांतून त्यांना महादजी शिंद्यांचा पत्रव्यवहार सापडला. त्यात मोडी लिपीत जमाखर्चाचे हिशेब लिहिले होते. ‘महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास’ या ग्रंथासाठी गोखले इन्स्टिटय़ूटने या पत्रांचा उपयोग करून घेतला. हिंदी भाषेतील पण उर्दू लिपीत असलेल्या ‘तुलसी रामायणाची’ तीनशे वर्षांपूर्वीची प्रत त्यांना एके ठिकाणी मिळाली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पुण्यातील भेटीत ती हाताळली आणि वृत्तपत्रातून या दुर्मीळ पुस्तकाची चर्चा रंगली. महामहीम दत्तो वामन पोतदार यांनी त्या ग्रंथाची त्या घडीची किंमत २८०० इतकी केली होती अन् त्यांच्या आग्रहास्तव हा ग्रंथ पुण्याच्या ‘राष्ट्रभाषा सभा’ या संस्थेकडे जतन करण्यासाठी ढमढरे यांनी विकला.

‘शिवाजीचा वंशवृक्ष’ नावाचे एक हस्तलिखित ढमढरे यांना कोल्हापूरमधून हस्तगत झाले. दोनशे वर्षांपूर्वीच्या पोथ्या, ऐतिहासिक पत्रव्यवहार, राजाश्रय लाभलेल्या कवींची काव्यमाला अशा शतकांच्या प्रवासात अबाधित राहिलेल्या अनेक पुस्तकांना त्यांनी अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्याचे अतिमहत्त्वाचे कार्य केले. ढमढरे यांनी पुढे एका आठवणीत म्हटले आहे की, ‘‘मॅक्डोनाल्ड यांनी लिहिलेली नाना फडणवीसांची बखर मला मिळाली. त्यात नानांच्या मेणवली येथील वाडय़ातील ७ ते ८ चित्रे होती. थोरल्या माधवरावांचे एक चित्रही त्यात होते. थोरल्या माधवरावांचे तेच चित्र ‘स्वामी’ कादंबरीच्या स्वस्त आवृत्तीमध्ये आता पाहायला मिळेल.’’

१८८० च्या आधीची कित्येक पुस्तके त्यांनी इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना मिळवून दिली होती. १८९२ ते १९१२ पर्यंतच्या महत्त्वाच्या ग्रंथांना त्यांनी नवसंजीवनी दिली अन् त्यातून अनेक ऐतिहासिक ग्रंथांना संदर्भाचा मोठा साठा उपलब्ध झाला. इंग्लंड-अमेरिकेत जुन्या ग्रंथांचे लिलाव लाख आणि कोटय़वधी डॉलर्सपर्यंत जातात आणि दुर्मीळ ग्रंथांच्या जतनासाठी स्थानिक सरकारी यंत्रणा कार्यरत दिसतात. ब्रिटनमधील रिक गेकोस्की या प्राध्यापकाने या ग्रंथव्यवहारातील नफा आणि त्यातील गती जाणून आपल्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली अन् दुर्मीळ पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या ग्रंथप्रेम आणि दुर्मीळ ग्रंथ खरेदी-विक्री व्यवहाराची पुस्तके आज ‘बुक्स ऑन बुक्स’ गटात लोकप्रिय झालीत. मराठीत रिक गेकोस्कीसारखे जगण्याचे धाडस करणारे शशिकांत सावंत हे एकमेव नाव दिसते; पण पदपथावरील कित्येक पुस्तकविक्रेत्यांच्या नशिबी आपल्या हयातीमधील ग्रंथवेडय़ांची अविरत तहान भागविण्यातल्या आनंदापलीकडे फारसे काही येत नाही.

पुण्यातील ढमढरे यांच्याभोवती वलय निर्माण झाल्यामुळे त्यांचे नाव आजही येथील पुस्तकविक्रेत्यांमध्ये आदराने घेतले जाते. दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे न्यू अ‍ॅण्ड सेकण्ड हॅण्ड पुस्तकविक्रीचे दुकान होते. पारखी शास्त्री, गोंधळेकर ही मंडळी आपापल्या घरातून दुर्मीळ पुस्तकांची विक्री करीत. गोंधळेकर यांच्याकडे अनेक वर्षे काम करणारे सप्रे यांनी या पुस्तक व्यवहाराचे तंत्र शिकून घेतले आणि पुढे स्वत:चा व्यवसाय केला. शेकडो वर्षांपूर्वीच्या संस्कृत पुस्तकांसाठी त्यांचे नाव सर्वात लोकप्रिय होते. त्यांच्या पुढल्या पिढीच्या पुस्तकविक्रेत्यांमध्ये लक्ष्मी रोडजवळील भानुविलास टॉकीजजवळ पदपथावर पुस्तके पसरून बसणाऱ्या काटकर आणि सुधाकर जोशी यांचे नाव येते. पैकी चिंचवडहून येणाऱ्या काटकर यांना दुर्मीळ पुस्तकांबाबत बरीच माहिती होती. सुधाकर जोशी यांनी या व्यवसायापासून चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर प्रकाशन व्यवसायात उडी घेतली. डेक्कन जिमखान्याजवळील उत्कर्ष बुक सव्‍‌र्हिसद्वारे त्यांनी कित्येक नामवंत लेखक मिळविले आणि त्यांची पुस्तकांची दुकाने आणि वाचनालयही उभे राहिले. पन्हाळे नावाचे एक विक्रेते होते. धार्मिक, ज्योतिष, आध्यात्मिक पुस्तकांचा त्यांच्याकडे असणारा साठा कुठेही इतरत्र मिळायचा नाही. काळे नावाचे अतिशय वयोवृद्ध गृहस्थ लक्ष्मी रोडजवळ येत. त्यांच्याकडे अत्यंत दुर्मीळ अशी धार्मिक पुस्तके असत अन् त्यांना त्यातली सर्वाधिक जाणकारी होती. मूळचे झाशीचे असले पळटणवाले नावाचे एक गृहस्थही येत. ते रस्त्यावर पुस्तक घेऊन बसत असले, तरी घरोघरी पुस्तकविक्री करीत असत. गोंधळेकर नावाच्या एका पुस्तकविक्रेत्याचा चार पिढय़ांचा ग्रंथविक्रीचा व्यवसाय होता. सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळ त्यांचे पुस्तकांचे गोडाऊन होते. लक्ष्मी रोडजवळील बाळू नावाचा आणखी एक विक्रेता बसत असे, जो जुने ग्रंथ शोधणाऱ्यांचा वाटाडय़ा ठरला होता. बालगंधर्वजवळील पदपथ आणि आताच्या लकडी पुलाजवळ अब्दुल गनी कलारकोप (समीर या पुस्तकविक्रेत्याचे वडील) ही नावे समाजइतिहासात नोंदली गेलेली नसली, तरी केवळ त्यांच्यामुळे कित्येकांना उपलब्ध झालेल्या ग्रंथसंपदेचे मोल प्रचंड मोठे आहे.

ढमढरे यांनी पुस्तकविक्री व्यवसाय सुरू केल्यानंतरच्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत गंधर्व नाटक कंपनी बंद पडली आणि तेथे काम करणाऱ्या यशवंत आठवले यांची नोकरी कायमस्वरूपी गेली. घराचा आर्थिक गाडा चालविण्यासाठी यशवंत आठवले हे नवे शिलेदार या व्यवसायात उतरले. वेद, वेदांत व्याकरण, न्यायमीमांसा, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, योग आणि धर्मावरील जुन्या पुस्तकांना लोकांकडून पुष्कळ मागणी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गावोगावी फिरून हे ग्रंथ गोळा करणे सुरू केले. सावंतवाडी येथील विठ्ठल धाकोजीराव राणे या गृहस्थाकडून त्यांना एक ट्रक भरेल इतकी मोठी ग्रंथसंपत्ती मिळाली. खेळगडी, विविध ज्ञानविस्तार, मनोरंजन, आनंद या मासिकांच्या बांधलेल्या फाइल्स या संग्रहातून त्यांना मिळाल्या. धार्मिक, आध्यात्मिक, संस्कृत पुस्तकांची खाणच यातून हाती लागली. त्यांनी घरीच या पुस्तकांचा व्यवसाय सुरू केला अन् पुढे नेला. हा व्यवसाय पाहतच लहानाचे मोठे झालेले त्यांचे पुत्र वसंत आठवले यांनी १९५४ साली हिंदविजयमध्ये झालेल्या शेवटच्या प्रयोगाला ४०० हून अधिक गंधर्वगुंफा (गंधर्वाच्या छायाचित्रासह असलेल्या गंधर्वगाण्यांच्या पद्यावल्या) थिएटरभर फिरून विकल्या अन् पुस्तकविक्रीच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. अप्पा बळवंत चौकात उभे राहून चार वर्षांहून अधिक काळ शाळेची पुस्तके विकणारा हा शाळकरी मुलगा गेल्या साठ वर्षांमध्ये पुण्याच्या आणि राज्याच्या ग्रंथसंस्कृती इतिहासासाठी केवढी मौल्यवान कामगिरी करून गेला हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आठवलेंच्या आठवणी..

वसंत आठवले यांच्या आठवणींना संदर्भमूल्य का आहे, याचा विचार केला तर साठोत्तरीतल्या पिढीपासूनचा वाचनव्यवहार त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. ललित साहित्यात नवकथा-नवकादंबरी जोमाने लिहिली जात असणाऱ्या काळात जुन्या लेखकांची सद्दी संपत असतानाचे खरे साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. किमान तीन पिढय़ांच्या बदलणाऱ्या वाचनसवयी, बदलत जाणारा वाचनकल त्यांना अवगत आहे. सत्तरच्या दशकात जोमाने फुललेले रहस्यकथांचे पीक, कधीही न छापल्या जाणाऱ्या विषयांची पुस्तके मराठीत ऐंशी-नव्वदीच्या दशकात यायला लागली. त्याचा वाढू लागलेला वाचक त्यांना जवळून दिसला आहे अन् इंटरनेट युगात ज्ञानासह पुस्तक ओतणाऱ्या आजच्या काळात ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची प्रत मिळविण्यासाठी तळमळणाऱ्या पट्टीच्या वाचकांचे दर्शन त्यांच्याइतके कुणीही घेतले नसेल. ‘वाचन कमी होत आहे’ ही त्यांच्या मते उगाचच पसरलेली अफवा आहे. बाजीराव रस्त्यावरील त्यांच्या हक्काच्या कोपऱ्यात दर रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंतची गर्दी पाहिली तर त्यांचे हे मत अजिबात चुकीचे नाही, हे लक्षात येते. अलीकडच्या काही वर्षांत रविवारी या जागेवर त्यांचा मुलगा धनंजय विक्री करतो, तर इतर दिवशी सकाळी ते असतात. त्यांचे नव्वद टक्क्यांहून अधिक खरेदीदार वसंत आठवलेंना आपले मित्र मानतात. रविवारी धनंजयकडे प्रत्येक वाचक-खरेदीदाराला नुसते पुस्तकच खरेदी करायचे नसते, तर देशाच्या-राज्याच्या राजकारणापासून पुण्यातल्या स्थानिक घडामोडींबाबत चर्चाही करायची असते. आपल्या आयुष्यातील खासगी तपशीलही सांगायचा असतो अन् ही गप्पा-संवादाची परंपरा वसंत आठवले यांच्यापासून टिकलेली आहे.

१९६० साली किलरेस्कर ऑइल इंजिन्समधील ग्रंथालयात नोकरीवर रुजू झालेले वसंत आठवले उरलेल्या वेळेत आपल्या वडिलांना पुस्तकविक्रीत मदत करीत होते. या व्यवसायातील चिकाटी आणि दुर्मीळ पुस्तके मिळविण्याचे कसब हस्तगत केल्यानंतर १९७० साली त्यांनी बाजीराव रोडजवळील पदपथावर स्वत:चा पुस्तकविक्रीचा व्यवसाय सुरू केला. कामावरून घरी आल्यानंतर संध्याकाळी सुरू होणारा धंद्याचा हा शिरस्ता १९८५ पर्यंत कायम राहिला. १९८५ नंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून या व्यवसायाला पूर्णपणे वाहून घेतले. रस्त्यावर बसून अल्प दरात विक्री करणाऱ्या या पुस्तकभक्ताने किती ज्ञानव्रतींना भरभरून ग्रंथ दिले, याची गणनाच करता येणार नाही. लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा.चिं. ढेरे, इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, संगीतकार आनंद मोडक, अभ्यासकांमध्ये दुर्गा भागवत, रा.शं. वाळिंबे, आनंद हर्डीकर, विज्ञानलेखक निरंजन घाटे, भयकथा लेखक नारायण धारप, इतिहास अभ्यासक वि.ग. कानेटकर, रंगकर्मी श्रीराम लागू, निवेदक सुधीर गाडगीळ, लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर, विनोदी लेखक शंकर पाटील, पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये, मुकुंद कुळे, विनोद शिरसाट, ज्योतिषी वि.के. फडके या मातब्बर व्यक्तींसह पुणे विद्यापीठ, जयकर ग्रंथालय, भांडारकर इन्स्टिटय़ूट, भारत इतिहास संशोधक मंडळ, वैदिक संशोधन मंडळ या संस्थांना त्यांनी महत्त्वाच्या ग्रंथांना उपलब्ध करून दिले ज्यावर पुढे अभ्यासही झाला आणि नव्या ग्रंथांमध्ये मौलिक संदर्भाची भर पडली. ब्रिटिशांनी १८१८ साली शनिवारवाडय़ावर युनियन जॅक फडकवला. त्यानंतर १० वर्षांनी म्हणजेच १८२८ सालात या वाडय़ाचा परिपूर्ण असा नकाशा छापण्यात आला होता. मोडी लिपीतील हा नकाशा केशव नारायण मनोलीकर इनामदार यांनी ब्रिटिशांच्या येथील आगमनाच्या सव्वाशे वर्षे आधी तो तयार केल्याचा उल्लेख त्या नकाशावर होता. ग्रंथांसाठीच्या भटकंतीतून त्यांना हा नकाशा सापडला. पुणे महापालिकेकडेदेखील शनिवारवाडय़ाचा तपशील पूर्णपणे मांडणारा नकाशा नव्हता, तो आठवले यांनी त्यांना मिळवून दिला. नावाजलेल्या कित्येक खासगी पुस्तक संग्राहकांच्या २० ते ५० टक्के ग्रंथांची बेगमी आठवले यांच्याकडून झालेली आहे. वरदा बुक्सचे भावे त्यांचे सर्वात आवडते ग्रंथप्रेमी. या भावेंना त्यांनी दिलेल्या पुस्तकांपैकी ४० हून अधिक पुस्तके पुन्हा नव्याने प्रकाशित झाली आहेत. त्यात ‘राधामाधव विलास चंपू’ या शहाजीराजे भोसले यांच्या संस्कृत चरित्रकाव्यावर आधारलेला इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचाही ग्रंथ आहे. राजवाडे यांचे अनेक खंड आज आपल्याला नव्या स्वरूपात दिसत आहेत, त्याचे श्रेयही आठवलेंकडे जाते.

मराठी वाचकांची रुची आणि अभिरुची यांचा सर्वपरीने धांडोळा आठवले यांनी घेतला आहे. सत्तरीच्या दशकात एका बाजूला सत्यकथा आणि डझनावरी मासिकांमधून लेखनाची गंगा वाहत होती. लिटिल मॅगझिनवाल्यांनाही चेव चढला होता. रहस्यकथांचा वेगळा प्रपंच नेटकेपणे सुरू होता. याच काळात स्वयंघोषित संस्कृतिरक्षक काकोडकरांची ‘शामा’ कादंबरी अश्लील असल्याचे पुण्यात उच्चरवात ओरडत होते अन् त्याच पुण्यातील सिटी पोस्टाजवळ दररोज रात्री नऊ ते अकरा-बारा वाजेपर्यंत अश्लील पुस्तक ग्रंथजत्रा भरायची. हिरव्या वेस्टनात बांधलेल्या त्या पिवळ्या पुस्तकांत ‘राणी’, ‘प्यारी’, ‘मस्ती’ या सुभाष शहांच्या बेळगावी मासिकांची चलती असायची अन् ती घेण्यासाठी अक्षरश: गर्दी लोटायची, असे आठवले यांनी सांगितले. या प्रकारची हुकमी पैसा मिळवून देणारी मासिके आणि पुस्तके भरपूर येत असून अन् त्यांना चिक्कार मागणी असूनही त्यांनी कधी ठेवली नाहीत. ‘आपला व्यवसाय प्रतिष्ठेचा असून नाव खराब व्हायला नको म्हणून या साहित्याला माझ्याजवळ कधी ठेवले नाही. या प्रकारचे साहित्य आणि सार्वजनिक ग्रंथालयांतून चोरी करून आणलेल्या पुस्तकांना कधी हात लावला नाही,’ ही बाब त्यांनी आवर्जून नमूद केली.

‘सत्तरच्या दशकामध्ये ललित साहित्यासोबत धार्मिक, मंत्रशास्त्र, भविष्य, योगशास्त्र, आयुर्वेद, शेती यांच्यावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. त्यानंतर धुरंदरबाईंची स्वयंपाकावरची पुस्तके आली, त्यांनाही प्रचंड मागणी होती. तंत्रज्ञान, घराजवळील बागकामाची पुस्तके यायला लागली अन् या सर्व विषयांची पुस्तके या बाजारातून तातडीने विकली जात होती. त्या काळात वयाच्या साठ-सत्तरीतील व्यक्ती हरी नारायण आपटे, हडप आणि दातारांच्या जुन्या कादंबऱ्या आवर्जून मागत असत. फडके-खांडेकर-आचार्य अत्रे यांचा वाचकवर्गही हाच होता. तरुणांकडून सावरकर यांच्या साहित्याला मागणी होती. दलित आत्मकथने गाजू लागल्यानंतर या वर्गातला वाचकवर्गही वाढला. त्यांच्याकडून अनुवादापासून ते इंग्रजी पुस्तकांची खरेदी होऊ लागली.’ हे आठवलेंचे एक निरीक्षण.

‘ऐंशीच्या दशकापर्यंत नवनवे शोध लागत होते. जीवनशैली सुकर करणाऱ्या पुस्तकांना या काळात मागणी वाढायला लागली आणि तरुण वाचकवर्ग कधी नव्हे इतका वाढला. तरुणांचा शास्त्रीय माहिती मिळविण्याकडे ओढा याच काळात झाला. एखादी गोष्ट अशी का, याची चिकित्सा करणारे लेखन उपलब्ध व्हायला लागले होते. टीव्हीच्या ज्ञानगंगेमुळे लोकांमध्ये कुतूहल वाढले होते अन् त्याचा परिणाम त्यांच्या वाचनाला दिशा देणारा होता,’ असे आठवले यांनी सांगितले.

‘नव्वदीनंतरच्या मनोरंजनाच्या तडाख्यात वाचकांच्या सवयी बदलल्या, पण संग्राहकांचा वर्ग जराही कमी झाला नाही. उलट तरुण संग्राहकांचा नवा वर्ग याच काळात तयार झाला. फडके-खांडेकर आणि अत्रे यांची पुस्तके मागणारा वर्ग या काळात कमी व्हायला लागला; पण साठोत्तरीतल्या नव्या दमाच्या लेखकांचे साहित्य या काळात सर्वाधिक वाचले जात होते. इतिहासावर अभ्यास करणाऱ्या तरुणांचा वर्गही याच काळात आश्चर्यकारकरीत्या वाढला. ज्योतिषशास्त्रामध्ये नवनवी पुस्तके येऊ लागली, तसे या पुस्तकांचा वाचकवर्गही नव्वदीपासून वाढला आहे. सोमणशास्त्री, गोरेशास्त्री, कट्टकर यांची ज्योतिषशास्त्रावरची पुस्तके हातोहात खपतात. कालिदास, भवभुती आणि पातंजली व्याकरणावर पीएचडी करणारे अभ्यासक येथे पुस्तकांसाठी येतात. भिक्षुकी करणाऱ्यांना लागणाऱ्या दुर्मीळ पोथ्याही अद्याप चांगल्या प्रमाणात विकल्या जातात. त्यातील ‘स्वयंपुरोहित’ हे पुस्तक या विभागातले खूप मागणी असलेले पुस्तक आहे. सातवळेकरांचे वेदही मागणारे पुष्कळ लोक येतात. संस्कृतच्या अनुवादालाही येथे चांगला उठाव आहे. ‘वाघ सिंह माझे सखे सोबती’ या भानु शिरधनकर यांनी शब्दांकन केलेल्या पुस्तकाला आजही सर्वाधिक मागणी आहे. निवेदन करणारे, संभाषण कला शिकणारे टिळकांचे लेखन आणि भाषणे-व्याख्याने विकत घेण्यासाठी खास येथे येतात. जेम्स हॅडले चेज, अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या अनुवादासह ब्रिटिश-अमेरिकी लेखकांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे अनुवाद, शिकारकथांचे अनुवाद पहिल्यांदा उचलले जातात.’ ही सध्याच्या वाचकांची काही उदाहरणे त्यांनी दिली.

‘रा. चिं. ढेरे सकाळी ७ वाजता माझ्याकडे येत. त्यांच्या संग्रहातील सुमारे १५ ते २० टक्के दुर्मीळ पुस्तके माझ्याकडून गेली आहेत. त्यांना संतसाहित्याच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या कित्येक पोथ्या मी पुरविल्या आहेत. अलीकडच्या लेखकांच्या पुस्तकांमध्येही ढेरेंना आस्था होती. ते ती खास बाजूला काढून वाचत असत. कर्वेच्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचे १२ खंडही मी त्यांना दिले. बाबासाहेब पुरंदरे यांना मी इतिहासातील काही खास पुस्तके उपलब्ध करून दिली. मालशे आणि भीमराव कुलकर्णी दर रविवारी भरपूर पुस्तके घेऊन जात. निरंजन घाटे यांनी विज्ञान अभ्यासाला पूर्णपणे वाहून घेतले. त्यांना लिमये नावाच्या गृहस्थाचा विज्ञान विषयाचा संपूर्ण संग्रह मी मिळवून दिला. कैलास जीवनच्या वैद्य कोल्हटकरांना मी पोती भरभरून पुस्तके दिली. आयुर्वेद, रस, गुटिका, भस्म, चरक, शुश्रुत, शारंगधर यांच्यावरील दुर्मीळ ग्रंथ त्यांच्याकडे पोहोचते केले.’ या आठवणी सांगताना त्यांना आनंद होतो. ‘माझ्याकडून दुर्मीळ पुस्तके घेऊन काही जण पुलंना द्यायचे असे माझ्या कानावर नंतर आले. माझ्या संपूर्ण आयुष्यात पुलंना भेटलो नाही, याची खंत कायम आहे. त्यांना मी भेटलो असतो, तर नारायणसारखा माझ्यावरच त्यांनी लेख लिहिला असता.’ हे ते हसत हसत सांगतात.

पुणे जिल्हा, वाई, बारामती आणि राज्यातील वेगवेगळ्या भागांतील शास्त्री, वकील, प्राध्यापक, सरदारांचे वाडे यांचा अदमास घेत आठवले यांनी दुर्मीळ ग्रंथ मिळविले. तात्या ढमढरे यांनी राज्यभरातील रद्दीवाल्यांशी संपर्क यंत्रणा तयार केली होती. आठवले यांनी मात्र रद्दीच्या दुकानांतून कधीच पुस्तके उचलली नाहीत. व्यक्तिगत-खासगी संग्रहच विकत घेणे त्यांनी पसंत केले. या खरेदीनंतर आपल्याकडे सातत्याने विशिष्ट विषयांसाठी पुस्तक घेण्यासाठी येणाऱ्यांकरिता ते तातडीने वर्गवारी करीत. ‘एखाद्या पुस्तकासाठी अडून बसत फार जास्त किंमत लावण्याचा प्रकार मी कधीच केला नाही. याचा फायदा असा व्हायचा, की लोक माझ्याकडून मिळालेल्या अतिदुर्मीळ पुस्तकाचा मला हवा त्याहून अधिक मोबदला देत.’ हे त्यांनी अनेकांचा दाखला देत सांगितले. एखाद्या पुस्तकाची दोन-चार पाने फाटलेली असतील, तर पुस्तकावर ते आजही तसे नमूद करूनच विक्रीस ठेवतात. त्यामुळेच ग्रंथखरेदी करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याविषयी आदर वाटतो.

पानशेतच्या पुरात सदाशिव आणि नारायण पेठेतील संग्राहकांकडची हजारो दुर्मीळ पुस्तके नष्ट झाल्याचे त्यांना दु:ख वाटते. ‘विविध ज्ञानविस्तार’, ‘चित्रमय जगत’, ‘मनोरंजन’, ‘सत्यकथा’ या मासिकांच्या फायली विकल्याचा पश्चात्ताप त्यांना होतो; पण त्या काळात याच पुस्तकांनी मला गरजेचा असलेला पैसा मिळवून दिला, हेही सांगायला ते विसरत नाहीत. गांधीजींबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे, तितकीच गोडसे याच्याबद्दल सहानुभूतीही. गोडसे यांनी लेखमाला लिहिलेली मासिके ते कित्येक वर्षे शोधत आहेत, पण अद्याप त्यांना त्यात यश आले नाही. जोशी-अभ्यंकर खुनाची दहशत असणाऱ्या काळात एका वृद्ध दाम्पत्याकडे पुस्तक घ्यायला गेलेले असताना घराच्या गजांमधून पुस्तके त्यांच्याकडे टाकली जात होती. त्या घटनेने विफल न होता, परिस्थितीची जाण ठेवत पुस्तके घेऊन ते परतले होते. मे महिन्याच्या भर उन्हात दूरच्या भागात सायकलवरून गेल्यानंतर पुस्तके न मिळाल्याचा विलक्षण किस्सा त्यांच्याकडे आहे. पुस्तक ठेवायला जागा देणाऱ्या अनेक जणांबाबत त्यांना कृतज्ञता आहे. संपन्न घरातून अडगळ म्हणून फुकट पुस्तके देऊ पाहणाऱ्या व्यक्तींच्या नावे त्यांनी सामाजिक संस्थांना मदत दिली आहे.

काही दुर्मीळ पुस्तकांना त्यांनी स्वत:च्या संग्रहात स्थान दिले आहे. घरातील मोठय़ा खोक्यात त्यांना सुरक्षित ठेवले आहे. १८९३ सालातील सतारीवरचे पहिले पुस्तक, सॉक्रेटिसचे १८५७ सालात छापले गेलेले चरित्र, ईस्ट इंडिया कंपनीची पोस्टकार्ड, केरोनाना छत्रे यांचे १८६० सालातील पुस्तक आहे. शिळाप्रेसवरची प्रसिद्ध झालेले एकमेव राहिलेले ग्रंथ आहेत. १८१८ सालातील पंचांग, शेकडो वर्षांपूर्वीच्या फारच काळापुढचा मायना लिहिलेली लग्नपत्रिका, सतराव्या-अठराव्या शतकातल्या किराणा जिन्नसांची नोंद असलेली हस्तलिखिते, असा विलक्षण संग्रह त्यांनी स्वत:साठी ठेवला आहे.

साधारणत: पन्नास वर्षांहून अधिक काळ जुन्या-दुर्मीळ ग्रंथांच्या सहवासात घालविणाऱ्या वसंत आठवले यांनी कष्टपूर्वक हा व्यवसाय चालवत ज्ञानभक्तांना आनंद वाटण्याचे कार्य केले आहे. कित्येक नामवंतांशी, संशोधकांशी जवळची ओळख असली, तरी त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा बडेजाव कधीही दिसू शकत नाही. पोट भरण्यासाठी पुस्तकविक्री करणारा एक साधा माणूस असल्याचे ते सर्वाना सांगतात. जुनी पुस्तके ही केवळ त्यातील साहित्यमूल्यांमुळेच विक्रीयोग्य होतात, याचे उत्तम भान वसंत आठवले यांना आहे. त्यामुळे उत्तम पुस्तके मिळविणे आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचविणे यातील अपूर्व सुख आठवले यांनी अनेकदा अनुभवले आहे. सध्या टाळेबंदीमुळे गेल्या सवा महिन्यांपासून पुस्तकांची खरेदी-विक्री थांबल्याने वाचकांच्या गोतावळ्यापासून ते लांब आहेत; पण टाळेबंदी संपताच सारे पूर्वपदावर येईल आणि दुर्मीळ ग्रंथांची त्यांची ज्ञानपोई आधीपेक्षा अधिक जोमाने कार्यरत होईल, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.

साहित्यिक संदर्भ..

दुर्गाबाईंना महाराष्ट्राचा शब्दकोश हवा होता. त्यांनी अनेक ठिकाणी शोधूनही तो मिळाला नव्हता. पूर्णपणे अनुपलब्ध असलेला हा ग्रंथ वसंत आठवले यांनी आपल्या खजिन्यातून काढून त्यांच्याजवळ पोहोचता केला. या कार्याबद्दल दुर्गाबाईंनी त्यांचा सत्कार केला. केशवराव भोळ्यांच्या घरातील ग्रंथसंपत्ती त्यांना सापडली, तेव्हा त्यांच्याइतक्या काळजीने कुणीच आपली ग्रंथसंपदा जपली नसल्याचे वसंतरावांच्या लक्षात आले. कित्येक लेखकांच्या, संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या लेखांमध्ये आठवलेंकडून मिळालेल्या ग्रंथऐवजाचा उल्लेख आहे. रा. चिं. ढेरे यांच्यापासून निरंजन घाटेंच्या पुस्तकांमध्ये आठवलेंच्या स्नेहाबद्दल कृतज्ञता व्यक्त झाली आहे.

जागतिक ललित साहित्याच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात जुन्या ग्रंथांचा व्यवहार करणाऱ्या यंत्रणेला केंद्रभागी बनवून कित्येक पुस्तकांचे कथाविषय सजले आहेत. झ्ॉक ग्युरीन नावाच्या एका झपाटलेल्या व्यक्तीमुळे मार्सेल प्रूस्त या फ्रेंच लेखकाची काही पुस्तके, चरित्र रद्दी-भंगारवाले आणि जुन्या पुस्तकांच्या यंत्रणेतून उपलब्ध होऊन पुढे प्रकाशित झाली आहेत. कालरेस मारिया डॉमिंग्वेझ या अर्जेटिनामधील लेखकाच्या ‘हाऊस ऑफ पेपर’मध्ये पुस्तकवेडे आणि दुर्मीळ पुस्तकांच्या विक्रीयंत्रणेचे अद्भुत जग उभे राहिले आहे. स्कॉटिश लेखिका जेनी कोलगन यांच्या ‘द बुकशॉप ऑन द कॉर्नर’ आणि ‘द बुकशॉप ऑन द शोअर’ या दोन कादंबऱ्या, ऑस्ट्रेलियातील लेखक रॉबर्ट हीलमन यांच्या ‘बुकशॉप ऑफ द ब्रोकन हार्टेड’ या पुस्तकांमध्ये जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांना मध्यवर्ती व्यक्तिरेखेत वाचायला मिळू शकते.

भारतात अकथनात्मक पुस्तकात जुन्या पुस्तक यंत्रणांचा उल्लेख पुष्कळ आहे; पण कथनात्मक पुस्तकात फार थोडय़ा लेखकांनी जुन्या पुस्तकविक्रेत्यांना आणि या बाजाराला कथाभाग केले आहे. अंजली जोसेफ यांच्या ‘सरस्वती पार्क’ या गाजलेल्या इंग्रजी कादंबरीत मुंबईतील पदपथावरील पुस्तकविक्री यंत्रणेचे तपशील मोठय़ा प्रमाणावर आले आहेत. मराठीमध्ये भा.रा. भागवतांचा बिपिन बुकलवार हा ‘बुकलव्हर’ असल्यामुळे त्याच्या पुस्तकांमध्ये दुर्मीळ जुनी पुस्तके सापडण्याचे उल्लेख येतात. ‘दुर्मीळ तिकिटांची साहसयात्रा’ या पुस्तकाच्या सुरुवातीलाच मुंबईतील पुस्तकबाजारातील घासाघिशीच्या वर्णनापासून सुरुवात होते.

कथाकार भारत सासणे एके काळचे मराठीतील आघाडीचे लेखक. १९९८ च्या ‘दीपावली’ दिवाळी अंकात त्यांची ‘रात्र, क्षितिजावरची रात्र’ ही दीर्घकथा प्रकाशित झाली होती. त्या कथेत प्रभाकर नावाचा जाहिरात संस्थेचा प्रमुख खूप लोकप्रिय झालेल्या मॉडेलची एका आइस्क्रीम पार्लरजवळ वाट पाहताना दिसतो. संपूर्ण कथा ही प्रतीक्षेवर असल्यामुळे आइस्क्रीम पार्लरच्या भवतालातील घटकांमध्ये हा नायक रमायला लागतो. त्यात भिकारी, नशेबाज, शेंगदाणे विकणारा पोऱ्या, नाटकाची तालीम करणारी मुले यांचा सविस्तर तपशिलांचा भाग येतो. त्यात आणखी एक विलक्षण पात्र आहे, ते फूटपाथवर पुस्तकविक्री करणाऱ्या व्यक्तीचे. पेट्रोमेक्सच्या उजेडात फूटपाथवर लोक पुस्तके चाळत असतात. त्या पुस्तकांतून कुबट वास येत असतो. तेथे मासिकांचे आणि पुस्तकांचे ढीग वेगवेगळे काढून ठेवले असतात. तेथे मेडिकलची सर्व पुस्तके उपलब्ध असल्याचा शोध कथानायकाला लागतो अन् त्या पुस्तकवाल्यावर तो सुरुवातीलाच अविश्वास दाखवितो.

आपल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून एक हजार रुपये किंमत असलेला दुर्मीळ ग्रंथ तो काढतो. त्या पुस्तकाची महती सांगू लागतो. या जगाशी अनेक वर्षे संबंध नसलेला नायक या पुस्तकविक्रेत्याच्या बोलण्यावर आणखी अविश्वास दाखवितो, तेव्हा तो पुस्तकविक्रेता त्याला जगातले सारे ज्ञान इथेही मिळते, सांगत त्याची शाळा घेऊ लागतो. कोकशास्त्रापासून देवापर्यंत सारी पुस्तके येथे असल्याचे तो पटवून देतो. धार्मिक पुस्तकांमध्ये एका योग्याची आत्मकथापासून ‘काशीखंड’, ‘गुरुचरित्र’ अशी सारी तो तावातावाने दाखवायला लागतो, तेव्हा नायकाला एकुणातच तो सांगत असलेल्या वास्तवाची कल्पना येते आणि कथेच्या ओघात या दुर्मीळ पुस्तकविक्रेत्याला ‘रस्ता कॉलेजचा प्रिन्सिपाल’ असे संबोधले जाते, हेही समजते.

वसंत आठवले यांचा माझी पहिली भेट झाल्यावर वीस वर्षांपूर्वी वाचलेल्या कथेतील ‘रस्ता कॉलेजचा प्रिन्सिपाल’ माझ्या डोक्यात नव्याने जागा झाला. आपल्या पोतडीतून सांगितलेला कोणताही ग्रंथ काढून दाखविणारे आठवले हे सर्वार्थाने रस्ता कॉलेजचे प्रिन्सिपाल आहेत. पुस्तकांचा नवा लॉट मिळविण्याचा अदमास सातत्याने घेणारे, मिळालेल्या अतिदुर्मीळ विषयांच्या पुस्तकांतून विभागणी करून त्या त्या गरजवंताला फोन करून अमुक ग्रंथ गवसल्याची आनंदवार्ता देणारे, आपल्या पदपथावरील संग्रहाची जातीने काळजी घेणारे, दूरवरून आलेल्या ग्राहकांना न दुखवता अविरत माहिती देणारे, नसलेल्या पुस्तकाची नोंद डोक्यात ठेवून लवकरच ते मिळवून देण्याचे आश्वासन देणारे अन् हजारोंच्या ग्रंथदालनात गोड आठवणी पेरणारे, याबाबत त्यांच्या कोणत्याही ग्राहक- विद्यार्थ्यांमध्ये दुमत असूच शकणार नाही.