सतत मित्रमैत्रिणी किंवा कुणाच्या तरी सोबतीची अपेक्षा असते आपल्याला. पण एकदा कुणालाही सोबत न घेता एकटं कुठेतरी जाऊन बघा.. मग तुमच्या लक्षात येईल, आपण स्वत: असतोच की आपल्या सोबतीला.
मागच्या आठवडय़ात आम्ही सगळे मित्रमैत्रिणी नेहमीप्रमाणे एकत्र सिनेमा बघायला गेलो होतो. सिनेमागृह म्हटलं की मधल्या सीट्स ग्रुपमध्ये आलेल्या लोकांनी भरलेल्या आणि ‘कॉर्नर सीट्स’ जोडप्यांसाठी जणू राखीव ठेवलेल्या असतात असं वाटतं मला!! पण त्या दिवशी कॉर्नर सीटवर माझा एक मित्र दिसला, त्याची गर्लफ्रेण्ड मात्र दिसली नाही बाजूला.(ब्रेकअप वगैरे झालं की काय, दु:खात एकटाच आला असेल अशा तर्कवितर्काचा लगेच एक अँटीना डोक्यामध्ये उभा राहिला!!) इंटव्र्हलमध्ये भेटला तेव्हा माझ्या डोक्यात असा कसलाच विचार आलेला नाही अशी जरा अॅक्टिंग करत मी त्याला अगदी सहज विचारलं, ‘हे काय, आज एकटा कसा आला सिनेमाला?’ तर तो म्हणाला, ‘त्यात काय झालं? मी बरेचदा एकटा जातो सिनेमा बघायला. खरंतर मला एकटय़ालाच जायला जास्त आवडतं. आणि काही सिनेमे तर मी एकटय़ाने जाऊन एकदा नाही तर चांगले तीनचार वेळा बघितले आहेत.’ त्याचं ब्रेकअप झालं नाही, हे पण ओघाने कळलंच! मला हा प्रकार जरा अजबच वाटला. एकटं कुणी कसं जाऊ शकतं सिनेमाला?!! आणि ते पण मित्रमैत्रिणींची सोबत मिळू शकत असताना!! असो!! जास्त विचार न करता विषय सोडून दिला.
नंतर अगदी दोन दिवसांनीच मला एका नृत्याच्या कार्यक्रमाला जायचं होतं. माझ्या आवडत्या नर्तकीचा कार्यक्रम अजिबात चुकवून चालणार नव्हतं. तिकीट विक्री चालू झालेली आणि काही तासांतच ७० टक्के तिकिटे विकली पण गेली होती. आता वेळ दवडून चालणार नाही, असं म्हणत मी पटापट माझ्या मैत्रिणींना मेसेज केले, सगळ्यांनी काही ना काही कारणाने जमणार नाही असं सांगितलं. इतर वेळेला ‘कुणी कंपनी मिळत नाही’ या कारणासाठी अनेक प्लॅन्स आत्तापर्यंत मी रद्द केलेत. पण या वेळेस मात्र काही करून मला कार्यक्रमाला जायचं होतं. शेवटी लोकांना विचारून, मेसेज, फोन करून मी कंटाळले आणि माझं एकटीचं तिकीट मोठय़ा जिद्दीने काढून टाकलं. खरं बघायला गेलं तर छोटी गोष्ट होती, पण उगीचंच मला मी काहीतरी ‘थ्रिल’ करतेय अशी भावना मनामध्ये येत होती. कार्यक्रमाला जाऊन पोचले खरी; पण आपण एकटे आलोय याची कुठेतरी मनात भीती, लोकं काय म्हणतील याचा संशय आणि आपण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं करतोय याची मजा असं सगळं एकत्र वाटत होतं. कार्यक्रम सुरू झाला आणि तो संपेपर्यंत मी साफ विसरले होते की मी एकटी आलीये. किंबहुना एकटीने कार्यक्रम बघणं मी जास्त एन्जॉय केलं. बाजूला बसलेल्या लोकांच्या कमेंट्स नाहीत की त्यांच्या मोबाइलचे फ्लॅश नाहीत. फारच मस्त फिलिंग होतं!! मी आणि ती कलाकृती एकरूप झाल्यासारखा मला अनुभव आला; जो आतापर्यंत कुणाच्याही ‘कंपनीमध्ये’ कार्यक्रम बघताना कधी आला नव्हता!! आणि अशा काही गोष्टी एकटय़ानेच करायची मजा त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळली!! एरवी मित्रमैत्रिणी, इतर माणसांची संगत लागणारी मी काही गोष्टी एकटीने करायला सुरुवात केली आणि मी मला देत असलेला हा ‘मी’ वेळ मला सर्वार्थाने आवडू लागला!! एकटीने लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचणं, सकाळी फ्रेश हवेत चालायला जाणं, संध्याकाळी कधीतरी चौपाटीवर एकटीनेच जाऊन बसणं, एकटीने शॉपिंगला जाणं, कधीतरी कॉफीशॉपमध्ये सुद्धा एकटीनेच जाऊन गरमागरम कॉफी पिणं- अशा छोटय़ा गोष्टींतून मला कमालीचा आनंद मिळायला लागला. अगदी धाडसी गोष्टी मात्र एकटीने करायला अजून मी धजावले नाहीये किंवा त्या गोष्टी मात्र मी ग्रुपने मिळून करण्यामध्येच आनंदी आहे.
म्हणजे ‘एकटा’ सिनेमा बघायला गेलेला माझा मित्र; असं वागणारा ‘एकटाच’ नाही तर त्यासारखी बरीच तरुण मुलं-मुली आजकाल या ‘मी’ टाइमच्या प्रेमात आहेत. पाश्चिमात्य देशात हा ट्रेंड बऱ्याच काळापासून चालत आला आहे. १६-१७ वर्षांचे झाल्यावरच मुलं आईवडिलांपासून लांब, एकटी राहू लागतात. एकटय़ाच्या जीवावर पैसे कमवतात, फिरतात, आयुष्य जगतात. हा एकटय़ाने वेळ घालवण्याचा ट्रेंड भारतीय तरुणांना पण आता खुणावू लागलाय!! ‘सोलो ट्रीप’, ‘सोलो ट्रेक्स’ अशा बऱ्याच ‘सोलो’ गोष्टींचा फंडा तरुणांना आपलंसं करत आहे. आणि विशेष म्हणजे अशा तरुणांकडे समाज ‘एकलकोंडी, मित्रमैत्रिणी नसलेले, उदास, दु:खी’ अशा नजरेने न बघता ‘धाडसी, काहीतरी हटके करणारे’ अशा दृष्टीने बघत आहे ही नक्कीच जमेची बाजू आहे.
हा ‘मी’ वेळेचा ट्रेंड फक्त ‘मी’पणाचा आहे असं नाही तर महत्त्वाच्या असलेल्या ‘मी’ बरोबर वेळ घालवण्याचाही आहे. आजकाल कार्पोरेट ऑफिसमध्ये कामाचा, बॉसचा; बाहेर मित्रमैत्रिणी, समाज, गर्लफ्रेण्ड/बॉयफ्रेण्डचा आणि घरात घरातल्यांचा, मुलांचा विचार लोक सतत करत असतात; बरेचदा स्वत:च्या इच्छा मारतात, पण स्वत:चा विचार करायला मात्र त्यांच्याकडे वेळच राहत नाही. आपल्याला काय हवंय, काय नकोय, काय आवडतं, काय नाही, आणि स्वत:च्या वर्तनाचं सिंहावलोकन करायला मात्र सवड मिळत नाही. बरेचदा असा स्वत:चा विचार करणं म्हणजे काहीतरी चुकीचं, स्वार्थीपणाचं आहे अशी भावनासुद्धा मन खात असते! पण खरंतर बरेच जण स्वत: खूश नसू तर इतर लोकांना कसं खूश ठेवू शकू हा मूलभूत प्रश्न विसरून जातात आणि आयुष्याच्या, कामाच्या, जबाबदाऱ्यांच्या रहाटगाडग्यात जगत राहतात. मँडी हेल यांच्या ‘‘इट इज नॉट सेल्फिश टू लव्ह यूवसेल्फ, टेक केअर ऑफ यूवरसेल्फ अॅण्ड मेक यूवर हॅपीनेस अ प्रायोरिटी. इट इज अ नेसेसिटी’’ या विचारातून शिकत आजची पिढी आधीच जागी झालीये. त्यांना या ‘मी’ वेळेचं महत्त्व पटलंय आणि एवढंच नाही तर त्यासाठी पाउलं उचलण्याची सुद्धा धाडसी सुरुवात त्यांनी केली आहे. प्रत्येकालाच जमणारी, शक्य असणारी किंवा आवडणारी ही गोष्ट नाही- म्हणूनच असं एकटय़ाने जे लोक भटकतात, मजा करतात त्यांचा बऱ्याच लोकांना हेवा वाटतो, काहींना कौतुक वाटतं तर इतरांना आश्चर्य आणि कुतूहल!!
या ‘मी’वेळेची सफर करताना बऱ्याच गोष्टींचा शोध लागतो. बऱ्याच दिवसांपासून, वर्षांपासून स्वत:शी न झालेला मनमोकळा संवाद साधता येतो, स्वत:ची दिलखुलास स्तुती करता येते आणि अगदी स्पष्टपणे निंदासुद्धा करण्याचा हक्क आपल्याला असतो. ‘मी’ च्या शोधात बरेच प्रश्न पडतात, बरीच उत्तरही मिळतात, बऱ्याच गोष्टींकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. रोजच्या दैनंदिन आयुष्याची, टेन्शनची धूळ साफ होते आणि अशा स्वच्छ आरशात आपलं ‘खरं’ प्रतिबिंब अगदी लख्ख दिसू लागतं!! बरेचदा आपण आपल्याच प्रेमात पडतो की मग इतर लोक आपल्याला काय नावं ठेवतात याची फिकीर उरत नाही आणि आपण आयुष्य मनसोक्त जगू शकतो!! ऑस्कर वाइल्ड यांचं या संदर्भातलं एक वाक्य मला पटतं, ‘‘आय थिंक इट इज व्हेरी हेल्दी टू स्पेंड टाइम अलोन. यू नीड टू नो हाऊ टू बी अलोन अॅण्ड नॉट बी डीफाइन्ड बाय अदर पर्सन’’ आपण आपली ओळख बरेचदा लोक आपल्याबद्दल काय बोलतात, काय विचार करतात, कसे वागतात यावरून ठरवत असतो. पण असा स्वत:शी केलेला संवाद आपल्याला आपली खरी ओळख बनवायला शिकवतो. तसंच एकटे फिरताना, भ्रमंती करताना अडचणीसुद्धा येतात, त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपण या अनुभवातून आपणहून शिकतो आणि लाइफ बिगेन्स अॅट द एन्ड ऑफ युवर कम्फर्ट झोन’’ची प्रचीती आपल्याला येते. अशा एकटय़ाच्या प्रवासात असे अजून अवलिया पण बऱ्याच जणांना भेटतात. पण असा ‘मी’ वेळ आवडायला लागल्यानंतर इतर लोकांपासून दूर जाणं मात्र बरोबर नाही. परंतु आपल्याला मिळालेल्या अनुभवाचा, स्वत:ला स्पेस दिल्यामुळे आपल्या शांत झालेल्या मनाचा फायदा आपल्या इतर नात्यांसाठी, कामासाठी कसा करता येऊ शकतो हे बघणं जास्त उचित ठरतं. ‘‘सॉलिटय़ूड इज अॅडिक्टिव्ह. वन्स यू सी हाऊ पीसफूल इट इज, यू डोन्ट वॉन्ट टू डील विथ पीपल’’ हे जरी खरं असलं तरी यात आयुष्यात उगाच गर्दी केलेल्या, आपल्या आयुष्याशी खरंतर काही संबंध नसलेल्या’ अशा व्यक्तींना उद्देशून दुसरं वाक्य आहे हे विसरता कामा नये. माणसांची सोबत, साथ, प्रेम, मदत तर सगळ्यांनाच हवी असते, तीच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध करत असतात. तरी या जगात स्वत:वर प्रेम करणं ही तितकच महत्त्वाचं आहे कारण ‘कुणी कुणाचे नसतं’ हे शाश्वत सत्य या जगाचा जणू अलिखित नियम आहे!! आता असेच एकटीने कॉफी पित माझे विचार लिहून काढताना माझ्या विचारांची गती मंदावत गेली आणि कुठेतरी मनात गाणं वाजायला लागलं..‘‘तोबे एकला चालो रे..’’
तेजाली कुंटे