मला नवीन टॅटू करायचा आहे. त्याची डिझाइन निवडताना काही काळजी घ्यायची असते का? यंदा मी कॉलेजच्या फायनल वर्षांला आहे. पण पुढच्या वर्षी मी नोकरी करत असेन. त्या दृष्टीने काही काळजी घेतली पाहिजे का?
– सुयश पडते, २२
टॅटूजचे आकर्षण प्रत्येकालाच असते. तरुणांना तर विशेष. मुख्य म्हणजे कॉलेजमध्ये ‘कूल डय़ूड’ म्हणून मिरविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे टॅटू करणं. पण सुयश तू म्हणतोस तसं, टॅटू करून घेताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे असते. विशेषत: तू पुढच्या वर्षी नोकरी करायला लागशील, तर तुझ्या करिअरच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही मुलाखतीला जाताना तुमचे वक्तृत्व, शिक्षण यासोबतच तुमच्या पेहरावाकडेही विशेष लक्ष दिले जाते. त्या वेळी हा टॅटू तुझ्यासाठी अडसर ठरू शकतो. त्यामुळे डिझाइन निवडताना अती फंकी, आक्रमक स्लोगन असलेले डिझाइन निवडू नकोस. कित्येकदा मित्रांमध्ये बोलताना प्रसिद्ध असलेले स्लँग (मृदू शिव्या) शरीरावर कोरल्या जातात. अशा टॅटूजमुळे तुझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात. आपल्या प्रियकराचे टॅटू शरीरावर कोरणे आणि त्याभोवती आकर्षक नक्षी करण्याचे फॅड सध्या तरुणाईमध्ये आहे. पण ऑफिसमध्ये हा प्रकार तुमच्या बॉसला फारसा रुचणार नाही. त्यामुळे शक्यतो डिझाइन निवडताना साधी, सोप्पी डिझाइन निवड. तुझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा टॅटू निवडण्याला प्राधान्य दे आणि विशेष म्हणजे त्यातून तुझ्या स्वभावातील सकारात्मक बाजू लोकांसमोर येईल, याची काळजी घे. पण तरीही मोठे टॅटू करायची तुझी इच्छा असेलच तर ते कपडय़ांमध्ये झाकले जातील याची काळजी घे.
मला पिअर्सिग करायचं आहे. सध्या त्यात कोणते नवीन ट्रेंड्स आहेत. आणि स्टड्समध्ये कोणते नवीन प्रकार आलेत?
– किमया गुळवे, २१.
मध्यंतरीच्या काळात पिअर्सिग तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होतं, पण सध्या त्याची कुतूहलता काहीशी कमी झाली आहे. पण तरीही पिअर्सिग करून घेणारे काही जण आहेतच आणि त्यांना या ट्रेंड्सची फारशी फिकीर नसते. त्यामुळे किमया तुला जर पिअर्सिग करायचे असेल तर नक्कीच करू शकतेस. कान, नाक भुवया आणि बेलीवर पिअर्सिग करण्याकडे सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. पाश्चात्त्य देशात जिभेवर पिअर्सिग करणंही ट्रेंडमध्ये होतं, पण भारतात ते लोकप्रिय नाही. सध्या मुली कान दोन किंवा अधिकवेळा टोचून घेण्यास पसंती देत आहेत. विशेषत: मुलांमध्ये कानाच्या वरच्या भागात भिकबाळी घालण्यासाठी पिअर्सिग करणं ट्रेंडमध्ये आहे. एकाच प्रकारचे, पण वेगवेगळ्या आकाराचे तीन किंवा चार स्टड्स सध्या कानात घातले जातात. डायमंड स्टड्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. पूर्वीच्या ग्रंची किंवा स्कलसारख्या डार्क स्टड्सपेक्षा सध्या एलिगंट स्टड्सना पसंती दिली जात आहे. काहीजण पारंपरिक डिझाइन्सचे स्टड्ससुद्धा मिरवतात.
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत response.lokprabha@expressindia.com