किल्ल्यावरच्या तटबंदी, बुरुजाइतकेच महत्त्व असते ते आतील वास्तूंना. किल्ल्यावर राहणाऱ्यांच्या गरजा, सोयीसुविधा या सगळ्यांचा विचार करून आतमधल्या राहण्याच्या वास्तू, बाजार या सगळ्याची रचना केल्याचे दिसते. या बांधकामाची शैलीही काळागणिक बदलत गेली आहे.
तटबंदी, बुरूज बांधून किल्ला अभेद्य केल्यावर त्याच्या आतील वास्तूमुळे किल्ल्याला जिवंतपणा येतो. सह्य़ाद्रीत चार प्रकारचे किल्ले पाहायला मिळतात. राजधानीचे किल्ले, लष्करी ठाणे असलेले किल्ले, प्रशासकीय सोयीकरिता बांधलेले किल्ले, चौक्या म्हणून बांधलेले किल्ले. या किल्ल्यांच्या प्रकाराप्रमाणे त्यावर कुठल्या वास्तू असतील ते ठरते. राजमहाल फक्त राजधानीच्या किल्ल्यावर असतो. तो इतर प्रकारच्या किल्ल्यांवर हे आढळणार नाही. तसेच दारूकोठार, धान्यकोठार, चौकी म्हणून बांधलेल्या किल्ल्यांवर आढळणार नाही. आज महाराष्ट्रात, सह्य़ाद्रीतल्या किल्ल्यांवर मध्ययुगीन वास्तू बोटावर मोजण्याइतक्याच उरल्या आहेत. त्या वास्तूंचे आराखडे, चित्रे आज उपलब्ध नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या किल्ल्यांवर आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून त्या वास्तूंची आपण केवळ कल्पना करू शकतो. कल्पना करतानाही अनेक बंधने पाळणे आवश्यक आहे. कल्पनेचा वारू उधळू न देता त्या परिसराचा, भौगोलिक रचनेचा, तेथील पर्जन्यमान आणि राजकीय स्थर्य यांचा विचार करून वास्तूचा आराखडा कसा असेल, ती कशी दिसत असेल याची आपण कल्पना करू शकतो. राजस्थान किंवा उत्तर भारतातले किल्ले पाहून बरेच जण त्यावरून महाराष्ट्रातील किल्ल्यांकडून अपेक्षा ठेवतात आणि त्यामुळे त्यांची घोर निराशा होते. राजस्थान किंवा उत्तर भारतातील किल्ले, त्यावरील वास्तू टिकण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना असलेले राजकीय स्थर्य. मोगल साम्राज्य, त्यानंतर आलेले इंग्रज यांच्यासमोर शरणागताची भूमिका स्वीकारल्यामुळे ते किल्ले टिकून राहिले. याउलट इंग्रजी साम्राज्य भारतभर पसरण्यापूर्वी त्यांचा मुख्य संघर्ष भारतभर पसरलेल्या मराठी सत्तेशी झाला. त्यामुळे मराठय़ांकडून पुन्हा उपद्रव होऊ नये यासाठी त्यांनी मराठय़ांचे किल्ले उद्ध्वस्त केले. त्यावर जाण्याचे मार्ग, वास्तू नष्ट केल्या. किल्ल्यांवर वस्ती होणार नाही याची काळजी घेतली. यापुढचे काम निसर्गाने केले. सह्यद्रीत पडणाऱ्या बेफाम पावसाने, वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याने उरलेल्या वास्तूंची झीज केली. त्यातूनही उरलेल्या वास्तूमधल्या उपयोगी असणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ, लाकडी वासे, तुळया, दगड इत्यादी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी नेल्या. त्यामुळे आधार हरवलेल्या किल्ल्यावरील या वास्तू वेगाने नष्ट होत गेल्या आणि आज आपल्याला केवळ वास्तूंचे अवशेष आणि चौथरे पाहून अंदाज बांधावा लागतो आहे. एखाद्या नांदत्या किल्ल्यावर कुठल्या वास्तू असाव्यात, त्यांचे स्थान कोठे असावे याचे काही निश्चित संकेत असतात. राजवाडे, घरे, दारूखाना, धान्यकोठार, अंबरखाना, राजसभा, सदर इत्यादी अनेक वास्तू आपल्याला राजधानीच्या किल्ल्यावर पाहायला मिळतात.
घरे, वाडे, राजवाडे
किल्ल्यांवर सनिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची घरे, सरदार, मंत्र्यांसाठी वाडे, तर राजपरिवारासाठी राजवाडे बांधले जात. महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील वास्तूंबाबत बोलायचे तर यादव पूर्वकालीन वास्तू आणि इस्लामी आक्रमणानंतर बांधलेल्या वास्तू यात बदल होत गेला. इस्लामी आक्रमकांनी आपल्याबरोबर मध्यपूर्वेतील स्थापत्यशास्त्र आणले. त्यातील कमानी, घुमट आपण स्वीकारले आणि आपल्या पारंपरिक स्थापत्यशास्त्राशी ते जोडून टाकले. त्यामुळे आपल्या वास्तूंमध्ये दोन्ही शैलींचा संगम दिसून येतो.
किल्ल्यांवर असणारी घरे, वाडे, राजवाडे कसे असतील हे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या वाडय़ांचा, गढय़ांचा अभ्यास केला तर आपल्याला सांगता येईल. पुणे, वाई, चांदवड तसेच अनेक जुन्या शहरांमध्ये, बाजारपेठांमध्ये आजही काही जुने वाडे तग धरून आहेत. त्यातील सर्वच वाडे मध्ययुगीन कालखंडातील नसले तरी त्यावरून वाडय़ांचा अंदाज येऊ शकतो. मध्यभागी उघडा असलेला चौक आणि त्याभोवती चौरस किंवा आयताकृती आकारात केलेले बांधकाम अशी साधारणपणे वाडय़ांची रचना असते. दुसऱ्या प्रकारच्या रचनेत वाडय़ाच्या इमारतीच्या पुढे आणि मागे अंगण ठेवलेले असते. दोनही प्रकारांमध्ये वाडय़ातील खोल्यांमध्ये हवा आणि प्रकाश खेळण्यासाठी मध्ये किंवा पुढे आणि मागे मोकळी जागा ठेवलेली असते. वाडे बांधताना मुख्यत्वे करून दगड आणि लाकडाचा वापर केलेला पाहायला मिळतो. वाडय़ाचा चौथरा दगड-मातीने भरून जमिनीपासून तीन ते चार फूट वर उंच उचललेला असतो. त्या चौथऱ्यावर उभे लाकडी खांब आणि आडव्या तुळया वापरून वाडय़ाचा सांगाडा बनवलेला असतो. खांब आणि तुळयांसाठी लाकूड वापरल्यामुळे जेवढे सलग आणि सरळ लाकूड मिळेल तेवढय़ा अंतरावर खांब रोवावे लागत असल्यामुळे दोन खांबांमधील अंतरावर बंधन येते. त्यामुळे वाडय़ात पाच ते दहा फुटांवर खांब पाहायला मिळतात. किल्ल्यांवरील वाडय़ांचे आज केवळ चौथरे उरले असले, खांब नसले तरी खांब रोवण्यासाठी बनवलेल्या तळखडय़ांवरून आपण अंदाज बांधू शकतो. खांबाचा पायथा पाणी, जमिनीतला ओलावा यामुळे कुजू नये यासाठी दगड कोरून त्यात खांब बसवलेला असतो, त्याला तळखडा म्हणतात. आजही रायगडावरील महाराजांच्या निवासस्थानावर अशा प्रकारचे तळखडे पाहायला मिळतात.
खांब रोवून झाल्यावर त्यावर आडव्या तुळया टाकल्या जातात. एका खांबांवर दोन तुळयांचा भार असतो. या तुळयांना आधार देण्यासाठी खांबांवर दोन आडव्या पट्टय़ा लावून आधार दिलेला असतो. त्यांना हस्त म्हणतात. या हस्तांवर अनेक ठिकाणी सुंदर कोरीव काम केलेले पाहायला मिळते. चांदवड शहरातील रंगमहालाचे खांब आणि नक्षीदार हस्त आवर्जून पाहाण्यासारखे आहेत. वाडय़ाचा मजला वाढवण्यासाठी खालच्या खांबाच्या वर वरच्या मजल्याचे खांब उभारले जात. या रचनेमुळे खालच्या खांबांवरच सर्व भार येत असल्यामुळे दोन ते तीन मजल्यांपेक्षा उंच वाडे नसत. लाकडी वासे आणि पट्टय़ा यांनी या वाडय़ांचे छत बनवलेले असे. त्यावरील आच्छादन हे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ठरत असे. कोकणातील वाडय़ांच्या छपरावर कौले किंवा नळे (अर्धगोल कौले) घातली जात. यातही राजवाडे, मंत्र्यांचे वाडे यावर कौल आणि इतर वाडय़ांवर नळे घातले जात. कमी पावसाच्या प्रदेशात धाब्याचे छप्पर असे. वाडय़ाच्या मधल्या चौकात पाण्याचा हौद किंवा विहीर असे. वाडय़ाच्या िभती भाजलेल्या विटांच्या आणि मळलेल्या मातीपासून बनवलेल्या असत. िभतींची जाडी तीन फुटांपर्यंत असे. भिंतींना बाहेरच्या बाजूने चुन्याचा गिलावा केलेला असतो. िभतीत उभ्या खिडक्या असत. अशा प्रकारे गरजेप्रमाणे आणि कुटुंबाच्या आकाराप्रमाणे वाडय़ातील चौकांची संख्या वाढवून वाडा पाच ते सात चौकांपर्यंत वाढवता येत असे. वाडय़ांना तळघरही असे. तळघरासाठी दगडी कमानींची रचना केलेली पाहायला मिळते. वाडय़ाच्या बाहेरच्या ओवरीत कारकून बसत. त्यांना फड असे म्हटले जाई. वाडय़ात राहण्याच्या खोल्यांव्यतिरिक्त देवघर, सदर, रंगशाळा, चित्रशाळा, आरसेमहाल इत्यादी पाहायला मिळतात.
राजगड आणि रायगडावरील महाराजांचे निवासस्थान, राजसभा यांची रचना वर म्हटल्याप्रमाणे असावी. कोकणातील पावसाचे प्रमाण पाहता त्यावर कौलारू छप्पर होते असे म्हणता येईल.
या पारंपरिक भारतीय वाडय़ांच्या रचनेत इस्लामी शैलीमुळे फरक पडला. त्यातील कमान आणि घुमट या रचनेमुळे सलग लाकडी/ दगडी खांब आणि तुळयांमुळे येणाऱ्या मर्यादेवरील बंधन निघून गेले. त्यामुळे दालनांची उंची आणि रुंदी विनासायास वाढवता येऊ लागली. त्यामुळे भव्य वास्तू बांधणे शक्य झाले. ज्या मध्यपूर्वेतून हे स्थापत्यशास्त्र आले, त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत तशी लाकडे किंवा सलग दगड उपलब्ध नव्हते. त्यामुळे दगड-मातीचे खांब बांधल्यावर ते एकमेकांना जोडून त्यावर छप्पर घालण्यासाठी ज्या मजबूत आधाराची गरज होती तो कसा तयार करायचा, हा मुख्य प्रश्न होता. या गरजेतूनच कमानीचा शोध लागला. या कमानीमध्ये साधी कमान (corbel arch,/false arch) आणि पाचरीची कमान (True arch) हे दोन प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळतात. या दोनही प्रकारच्या कमानी महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या प्रवेशद्वारासाठी वापरलेल्या पाहायला मिळतात. आकाराप्रमाणे या कमानींचे मुख्यत: तीन भाग पडतात. त्रिकोणी कमान, अर्धवर्तुळाकार कमान आणि पाकळी कमान. यातील त्रिकोणी कमानी चच्रेसमध्ये वापरलेल्या पाहायला मिळतात, तर अर्धवर्तुळाकार कमान आणि पाकळी कमान प्रवेशद्वार आणि महालांमध्ये पाहायला मिळतात.
पाचरीच्या कमानीत एका बाजूला निमुळते होत जाणारे पाचरीसारखे दगड वापरण्यात येतात. हे दगड चुन्याने एकमेकांना जोडून सर्वात शेवटी मध्यभागी कळीचा दगड (की स्टोन) बसवला जातो. चुन्याचे बांधकाम सुकेपर्यंत कमानीला बांबूची परांची बांधून आधार दिला जातो. पाचरीच्या कमानीत बांधकामावर येणारे सर्व ताण कमानीभर विखुरले जातात, त्यामुळे साध्या कमानीच्या तुलनेत या कमानीसाठी कमी जाडीच्या िभती आणि खांबांचा वापर करता येतो. यातील कळीचा दगड अतिशय महत्त्वाचा असतो. आज आपल्याला किल्ल्यांची अनेक प्रवेशद्वारे कमानीचा कळीचा दगड निसटल्याने उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात. साध्या कमानबांधणीच्या पद्धतीत खालच्या दगडापेक्षा वरचा दगड थोडा पुढे सरकवून कमान बांधली जाते. या रचनेला इंग्रजीत “false arch” म्हटले जाते. कारण या रचनेत सर्व भार पायावर येत असल्यामुळे िभती/ खांब जास्त जाडीचे बनवावे लागतात. घुमट बनवण्यासाठी भाजलेल्या विटा किंवा दगड यांचा वापर केला जात असे. हे दगड चुन्याने एकमेकांशी सांधले जात. घुमट बांधताना पहिल्या दगडांच्या किंवा विटांच्या रांगेच्या किंचित बाहेर पुढची रांग बांधली जात असे. घुमट बांधून पूर्ण झाल्यावर त्याच्या आत-बाहेर चुन्याचा गिलावा केला जात असे. घुमटाच्या आतील बाजूस छतावर फुले, पाकळ्या यांची नक्षी कोरली जात असे. घुमट, कमान या रचनेला इस्लामी रचना म्हणत असले तरी त्या पíशयात अशा प्रकारच्या रचना ख्रिस्तपूर्व काळातही पाहायला मिळतात. तिथूनच हे स्थापत्यशास्त्र रोमन साम्राज्यांनी आणि इस्लामी आक्रमकांनी जगभर पोहोचवले. भारतीय स्थापत्यकलेत इस्लामी आक्रमणापूर्वीही कमानी होत्या. उत्तर भारत, ओडिशातील मंदिरे, हम्पीचा लोटस महाल तसेच अनेक देवळांमध्ये आपल्याला साध्या कमानी पाहायला मिळतात. यादवांनंतर आलेल्या शाह्य़ांनी गाविलगड, नरनाळा, नळदुर्ग, उदगीर, धारुर, नगर, जंजाळा (वैशागड), वेताळगड, देवगिरी, इत्यादी किल्ल्यांवर जे महाल बांधले त्यात कमान आणि घुमट शैलीचा वापर पाहायला मिळतो.
इस्लामी स्थापत्यकारांनी अजून एक गोष्ट इथे रुजवली ती म्हणजे दूर अंतरावरून पाणी आणून किल्ल्यात/ नगरात खेळवणे. हे राज्यकत्रे ज्या मध्यपूर्वेतून आले होते त्या ठिकाणी (पर्शियात) ‘कनात’ (Qanat) या नावाने पाणीपुरवठा योजना अनेक शतके पूर्वापार चालत आली होती. या पाणीपुरवठा योजनेत वाळवंटात डोंगराच्या पायथ्यापासून जमिनीखाली बोगदे खोदून केवळ गुरुत्वाकर्षणाने दूरवरून पाणी गावात आणले जात असे. या बोगद्यांना पाण्याच्या साठय़ापासून गावापर्यंत सौम्य उतार दिला जात असे. या बोगद्यात मध्ये ठरावीक अंतरावर उभे खड्डे (उच्छ्वास) खोदले जात. या उच्छ्वासांचा उपयोग विहिरीसारखा केला जात असे. अशा प्रकारे बोगदे खोदून पाणी आणणे हे धोकादायक आणि जिकिरीचे काम असे. त्यासाठी पिढय़ान्पिढय़ा काम करणारे तरबेज लोक असत. त्यांना ‘मुक्कानिस’ (ट४०ंल्लल्ल्र२) म्हणतात. हीच पद्धत इस्लामी स्थापत्यकारांनी किल्ले बांधताना, शहरे वसवताना थोडेफार बदल करून इथे वापरली. बुऱ्हाणपूर, बीदर, गुलबर्गा या ठिकाणी त्या काळच्या शाह्य़ांनी ही पाणीपुरवठा योजना राबवली. महाराष्ट्रात ही पाणी खेळवण्याची योजना रुजवण्याचे श्रेय मलिक अंबरला दिले जाते. यात किल्ल्यापासून/ शहरापासून दूर अंतरावर, पण उंचावर असलेल्या पाणीसाठय़ापासून जमिनीखाली बोगदे खोदून पाणी किल्ल्यापर्यंत आणले जात असे. पाण्याचा योग्य दाब ठेवण्यासाठी मध्ये-मध्ये जमिनीत किंवा जमिनीच्या वर उच्छ्वास बांधले जात. पाण्याचे बोगदे साफकरण्यासाठी ठरावीक अंतरावर निचराखोल्या बांधल्या जात. किल्ल्यात आणलेले पाणी भाजलेल्या मातीचे, तांब्याचे नळ वापरून महालातून, कारंजातून, बगिचातून फिरवले जात असे. या पाणीपुरवठा योजनेमुळे पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झाली. त्यामुळे अपुऱ्या पाणीसाठय़ांमुळे किल्ल्यांवर, गावांवर येणारी लोकसंख्येची मर्यादा कमी झाली. महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे यांसारख्या गावांत तसेच धारूर, कंधार, उदगीर इत्यादी किल्ल्यांवर अशा प्रकारे पाणी खेळवलेले आजही आपल्याला पाहायला मिळते. रायगडावरील मनोऱ्यांमध्येही तांब्याचे पाइप (नळ) वापरून पाणी खेळवलेले पाहायला मिळते. या पाणीपुरवठा योजनेत पाणी जमिनीखालून येत असल्यामुळे शुद्ध, थंड आणि कचराविरहित असे; परंतु या पाणीपुरवठा योजनेतली महत्त्वाची त्रुटी म्हणजे यात वाहत्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे पाण्याचा निचरा करणे, त्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यासाठी मूळ किल्ल्याच्या रचनेत केलेले बदल, घातलेली भर कंधार किल्ल्यात पाहायला मिळते.
किल्ल्यांवर सनिकांसाठी तात्पुरती घरे बांधलेली असतात. त्यासाठी जमिनीवर चौथरा बांधून त्यावर चार खांब रोवले जातात. या खांबांभोवती कुडाच्या किंवा मातीच्या िभती तयार केल्या जात. छतासाठी आडव्या लाकडांनी आधार देऊन त्यावर बांबूच्या चटया किंवा माडाच्या झावळीच्या चटया अंथरून गवत पसरले जात असे. ज्या ठिकाणी कातळ असे त्या ठिकाणी कातळातच भोक कोरून त्यात खांब रोवले जात. आजही किल्ल्यावर आपल्याला बांबू रोवण्यासाठी केलेली भोके पाहायला मिळतात. याशिवाय टेहळ्यांसाठी मोक्याच्या जागी गुहा कोरलेल्या पाहायला मिळतात. टेहळ्यांनी टेहळणीच्या ठिकाणी कायम हजर राहणे आवश्यक असे. त्यासाठी या गुहांमध्ये किंवा गुहांना लागून पाण्याच्या टाक्याची व्यवस्था केलेली पाहायला मिळते.
राजधानीचा किल्ला सोडून इतर किल्ल्यांवरही आपल्याला एकापेक्षा अधिक पक्क्या घरांचे चौथरे पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडावर किल्लेदार(हवालदार), सरनौबत हे दोन लष्करी अधिकारी व कारखानीस आणि सवनीस हे दोन मुलकी अधिकारी नेमलेले असत. त्यांना राहण्यासाठी ही पक्की घरे बांधलेली असावीत. याशिवाय गडाला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एखादे पक्के घर बांधून ठेवत असण्याची शक्यता आहे. हे घर नेहमी वापरात नसले तरी त्याची झाडलोट आणि सडािशपण नित्य नेमाने केली जात असावी. किल्ल्यावरील या महत्त्वाच्या व्यक्तींची घरे बालेकिल्ल्यात असत. त्या ठिकाणी पाण्याचे एखादा स्त्रोत आपल्याला पाहायला मिळतो.
पुढील भागात किल्ल्यावरील इतर वास्तूंचा आढावा घेऊ या.
(पूवार्ध)
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com