एखादा किल्ला पाहिल्यावर तक्रार येते की, इथे पाहण्यासारखं काहीच नव्हतं.. पण खरं तर तसं नसतं. त्या किल्ल्याचं वैशिष्टय़ पाहण्याची शोधक नजर आपल्याकडे नसते.
मार्च महिना सुरू झाला की वर्तमानपत्रात पाणीटंचाईच्या बातम्या यायला सुरुवात होते. गावागावांत टँकर फिरू लागतात. गेली काही वर्षे मराठवाडा पाणीटंचाईने त्रस्त आहे. जायकवाडी धरण या भागात असूनही त्यात वर्षअखेरीस पुरेसा पाणीपुरवठा उरत नाही. या सगळ्याचं खापर मात्र फोडलं जातं ग्लोबल वॉर्मिगवर. औरंगाबाद जिल्ह्य़ात अजिंठा, वेरूळ ही दगडात कोरलेली अजोड लेणी आहेत. त्याचप्रमाणे दगड तासून/ कोरून बेलाग बनवलेला देवगिरी किल्लाही सर्वाच्या परिचयाचा आहे. यांच्याच पंक्तीत बसणारे अनेक लहान-मोठे किल्ले या परिसरात आहेत. यादवांची राजधानी ‘देवगिरी’ असल्यामुळे त्याचे रक्षण करण्यासाठी या छोटय़ा किल्ल्यांची उभारणी करण्यात आली होती.
किल्ल्यावरील पाणीसाठे किल्ल्याबद्दल बरीच माहिती सांगून जातात. किल्ल्यावर किती शिबंदी होती, किल्ला बांधला त्या वेळेचे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, किल्ल्याचे महत्त्व वाढल्यावर पाणी साठवण्यासाठी केले गेलेले नवे उपाय यांचा अंदाजही या पाणीसाठय़ावरून करता येतो. किल्ला लढता ठेवण्यासाठी सैनिक, अन्नधान्याइतकेच किंवा त्याहून जास्तच पाणीसाठय़ाला महत्त्व होते. त्यामुळे हा पाणीसाठा वाढवण्यासाठी टाक्यात, तलावात जास्तीतजास्त पाणी साठवण्याच्या अनेक युक्त्या आपल्या पूर्वजांनी (त्या काळच्या स्थापतींनी) शोधून काढल्या होत्या.
औरंगाबाद-देवगिरी रस्त्यावर, औरंगाबाद शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परिसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर कातळात कोरलेला सुंदर भांगसी गड किल्ला आहे. भांगसाई देवीच्या मूळच्या भुयारी मंदिरावर नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. पायऱ्यांनी भुयारात उतरून भांगसाई देवीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन डाव्या बाजूच्या असलेल्या झरोक्यातून (भुयारातून) रांगत पुढे गेल्यावर आपण एका प्रशस्त गुहेत पोहोचतो. या कातळात कोरून काढलेल्या गुहेला २५ खांब आहेत. या गुहेचे तोंड दक्षिणेला आहे. ही गुहा दोन स्तरांत खोदलेली आहे. भांगसाई देवी मंदिरापासून गुहेच्या तोंडापर्यंत डाव्या बाजूला गुहेची उंची जेमतेम एक ते तीन फूट आहे, तर उजव्या बाजूस पाण्याचे विशाल टाके खोदलेले आहे. या रचनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत गडावरील शिबंदीला पाणी आणि थंडावा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असे. गुहेच्या आतील पाण्याचा सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क न आल्याने त्याचे बाष्पीभवनही कमी प्रमाणात होते. या गुहेच्या उजव्या कोपऱ्यात गणपतीची मूर्ती, शिवलिंग व नंदी ठेवलेले आहेत. पाण्याच्या ठिकाणाचे पावित्र्य, स्वच्छता जपण्यासाठी अशी योजना केलेली पाहायला मिळते.
औरंगाबाद-अजिंठा व औरंगाबाद-जालना या पुरातन मार्गाच्या मधून अजिंठा डोंगररांग या मार्गाना समांतर धावते. या दोन मार्गाना जोडणाऱ्या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी लहूगडाची निर्मिती करण्यात आली होती. अजिंठा डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर हा किल्ला अक्षरश: कोरून काढलेला आहे. या किल्ल्यावर दगडात कोरलेले गुहा मंदिर, कातळात कोरलेली वेगवेगळ्या प्रकारची १८ पाण्याची टाकी, दगडात कोरलेले प्रवेशद्वार, पायऱ्या, गुहा असे कोरीवकामाचे वैविध्य पाहायला मिळते. किल्ल्यावरील गुहा मंदिर आधी कळस मग पाया या प्रकारे कोरलेले आहे. त्याच्या पुढे कातळात खोदलेले रुंद व खोल पाण्याचे प्रचंड मोठे खांब टाक आहे. गुहा मंदिराच्या वर असणाऱ्या कातळावर पडणारे पाणी टाक्यात जमा होण्यासाठी कातळात पन्हाळी/ पाट कोरलेले आहेत. कातळात कोरून काढलेल्या छोटेखानी प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर आपल्याला कातळात कोरलेली १८ पाण्याची टाकी पाहायला मिळतात. गडाचा वर्तुळाकार माथा फिरायला जास्तीतजास्त दहा मिनिटे लागतात, पण गडावरील पाण्यांच्या टाक्यांची संख्या २७ आहे. गडाचा आकार पाहता त्यावर फारशी शिबंदी असण्याची शक्यता नाही. हा काही लढाऊ गड नव्हे, जो शत्रू सैन्याशी महिना- दोन महिने लढू शकेल. हा तर टेहळणीचा साधा किल्ला तरी यावर एवढय़ा संख्येने पाण्याच्या टाक्या का खोदल्या असाव्यात, हा प्रश्न परत अनुत्तरित राहिला.
पेडका किल्ल्याखालील पेडकावाडीत आताच्या काळात बांधलेलं धरण होतं. पण धरणात पाण्याचा मागामूस नव्हता. पण किल्ल्यावरील तलावात मात्र पाणी होते. त्यामुळे किल्ल्यावर राबवण्यात आलेली पाणी स्थिरीकरणाची योजना नीटच पाहता आली. पाणी स्थिरीकरण म्हणजे काय? डोंगरावरून, जमिनीवरून वाहत येणारे पाणी आपल्याबरोबर माती, गाळ, कचरा घेऊन येते. हा गाळ टाकी, तलावात साठत जातो. या गाळावर पडणाऱ्या साठलेल्या पाण्याचा दाब पडल्यामुळे मातीचा थर सिमेंटसारखा घट्ट होतो. अशा प्रकारे दरवर्षी साठत जाणाऱ्या गाळामुळे अनेक तलाव व धरणं भरून जातात किंवा कायमची बाद होतात. पाण्याच्या दाबामुळे घट्ट झालेला हा गाळ काढणे ही मोठी खर्चीक व वेळकाढू बाब होते. त्यामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ खाली बसावा, मुख्य टाक्यांत, तलावांत येऊ नये यासाठी वाहते पाणी थोडा वेळ थांबवून (स्थिर करून) त्यातील गाळ खाली बसवण्यात येतो. यालाच पाण्याचे स्थिरीकरण म्हणतात. महाराष्ट्रातल्या बऱ्याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी अशा अनेक योजना राबवलेल्या पाहायला मिळतात.
पेडका किल्ल्यावर पाण्याचा मुख्य मोठा तलाव प्रवेशद्वाराच्या वरच्या अंगाला आहे. या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वाहत येणारे पाणी थेट मोठय़ा तलावात जाऊन तो गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर दोन छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर असलेल्या तलावात पठारावरून वाहणारे पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठय़ा तलावात जमा होते. यामुळे मोठय़ा तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. याशिवाय दोन अतिरिक्त पाणीसाठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या दोन छोटय़ा तलावातील गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येतो.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील हे छोटे किल्ले फिरताना त्या काळच्या समाजाने आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर गडाची रचना, उतार, पाण्याचे प्रवाह, उपलब्ध जागा यांचा उपयोग करून केलेले पाण्याचे नियोजन पाहता आले. ब्रिटिशांनी गेल्या १०० वर्षांच्या मान्सूनची नोंद केलेली आहे. त्यानुसार औरंगाबाद परिसरात सरासरी ७०० मि.मी. पाऊस पडतो. तर दर चार वर्षांनी दुष्काळ पडतो. केवळ शेतीवर आधारित व्यवस्था असलेल्या आपल्या पूर्वजांना पाऊस आणि दुष्काळाच्या या चक्राची जाण होती. यावर मात करून पाणीसाठा दुष्काळाच्या वर्षांतही उपलब्ध व्हावा यासाठीच मोठय़ा प्रमाणावर पावसाचं पाणी साठवण्याची योजना गडांवर अमलात आणली होती. छोटय़ा-छोटय़ा गडांवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाण्याच्या टाक्या, तलाव का बनवण्यात आले त्याचे हेच कारण असावे. केवळ भरपूर पाणीसाठे बनवून ते थांबले नाहीत तर ते गाळाने भरून जाऊ नयेत यासाठी पाण्याचे स्थिरीकरण करण्याच्या योजना राबवलेल्या पाहायला मिळतात.
बऱ्याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी उतारावर एकाखाली एक पाण्याची टाकी कोरलेली पाहायला मिळतात. या रचनेमुळे डोंगर उतारावरून येणारे गाळमिश्रित पाणी सर्वात वरच्या टाक्यात पडत असे. ते टाक भरल्यावर पाणी पुढच्या टाक्यात जात असे. अशा प्रकारे सर्वात वरच्या टाक्यातच जास्तीतजास्त गाळ साठत असे. त्यामुळे गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येत असे. अलंग- मदन- कुलंग हे किल्ल्यांचं त्रिकूट दुर्ग भटक्यांमध्ये सुपरिचित आहे. यातील अलंग गडावर खोदलेली टाकी वैशिष्टय़पूर्ण आहेत. उतारावर एकाखाली एक अशा एकूण ११ टाक्या कोरलेल्या आहेत, त्या टाक्यांच्या समूहाच्या पुढे कातळात एक धरण बांधल्यासारखी भिंत कोरून काढलेली आहे. त्या भिंतीला जास्तीचे पाणी बाहेर जाण्यासाठी एक भोकही ठेवलेले आहे. या रचनेमुळे आहे त्याच जागेत जास्तीचे पाणी साठवण्याची सोय झालेली आहे.
मनोहर-मनसंतोषगड हे तळकोकणातले किल्ले, या भागात महामूर पाऊस पडतो. पावसाळ्यात मनोहर गडावरच्या वाडय़ामागून एक ओढा वाहतो. आता गडाची तटबंदी जिथे कोसळलेली आहे, तेथून या ओढय़ाचे पाणी खालच्या दरीत पडते. किल्ला बांधतांना त्या वेळेच्या स्थापतींनी या ओढय़ातील पाण्याचा वेग कमी करण्यासाठी व पाणी साठवून त्याचा निचरा करण्यासाठी तटबंदीजवळ एक तलाव बांधला होता. तसेच तटबंदीत जागोजागी पाणी जाण्यासाठी मोऱ्या बांधल्या होत्या. आजही नीट पाहिले तर गाळात गाडल्या गेलेल्या तलावाचे अवशेष व ढासळलेल्या तटबंदीत पाणी जाण्यासाठी बांधलेल्या मोऱ्या पाहायला मिळतात. ओढय़ाचे पाणी आपल्याबरोबर भरपूर गाळ घेऊन येत असे. ते पाणी तलावात आणून त्याचा वेग कमी केला जाई व पाणी स्थिर केल्यामुळे त्यातील गाळही खाली बसत असे. तलावाच्या बांधावरून बाहेर पडणारे पाणी तटबंदीतील मोऱ्यांवाटे दरीत जात असे. अशा प्रकारच्या योजनेमुळे ओढय़ाच्या पाण्याचा अतिरिक्त दाब पडून तटबंदीला धोका होत नसे व गडावरील वापरासाठी अतिरिक्त पाणीसाठापण तयार होई.
ठाणे जिल्ह्य़ातील बोईसरजवळ असावा किल्ला आहे. या किल्ल्यावर एक प्रचंड मोठं पाण्याचं टाक आहे. या टाक्याच्या तीन बाजू कातळात कोरलेल्या असून एक बाजू दगडांनी बांधलेली आहे. डोंगरावरचे पाणी कातळ उतारावरून टाक्यात पडते. त्या पाण्याबरोबर येणारा गाळ टाक्यात जाऊ नये म्हणून येथे कातळात जागोजागी रुंद व खोल खळगे कोरलेले आहेत. त्यात वाहत्या पाण्यातला गाळ साठून राहात असे व शुद्ध पाणी तलावात जात असे. तसेच या खळग्यात साठणारा गाळ काढणेपण सोपे होते.
किल्ला पाहिल्यावर अनेक जणांची तक्रार असते की, किल्ल्यावर पाहण्यासारखं काही नव्हतं, पण किल्ल्यावरच्या पाणी साठवण्याच्या साधनांचा, पद्धतीचा अभ्यास केला तरी त्या ठिकाणची नैसर्गिक रचना, हवामान, पावसाचे प्रमाण यानुसार प्रत्येक किल्ल्याचं स्वत:चं असं एक वैशिष्टय़ असतं, तो ते आपल्याला दाखवत असतो, पण गरज आहे ती त्याच्याकडे शोधक नजरेने पाहण्याची.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com