क्रिकेटरसिकांसाठी एकीकडे आयपीएलचा थरार रंगतो आहे. फूटबॉलप्रेमींना फिफा फूटबॉल विश्वचषकाचे वेध लागले आहेत. तर दुसरीकडे टेनिसप्रेमींसाठी फ्रेंच ओपनचे पडघम वाजू लागले आहेत.

एखाद्या नवीन गोष्टीची ओळख होणं, ती गोष्ट आपल्या मनात रुजणं, त्या गोष्टीची सवय होणं, त्या गोष्टीसंदर्भातल्या कामावर आपली पकड बसणं, रुळणं, स्थिरावणं.. हा पहिला टप्पा झाला.. या गोष्टीतल्या खाचाखोचा उमजू लागणं, गोष्टीच्या सर्वसमावेशकतेची जाणीव होणं, गोष्टीचा परीघ किती विस्तारेल याबद्दलचं कळणं दुसऱ्या टप्प्यात.. तिसरा टप्पा असतो तो वर्चस्वाचा, प्रभुत्वाचा आणि मक्तेदारीचा. तुमचं जिंकणं, लीलया प्रतिस्पध्र्याचा धुव्वा उडवणं, तुमच्या विजयापेक्षा पराजयाची चर्चा होणं, स्पर्धा आयोजित केली आहे म्हणजे जेतेपद तुमचंच असा ठाम विश्वास तयार होणं, तुम्ही त्या विश्वासाला पात्र ठरणं आणि मग तो जेतेपदाचा झळाळता चषक उंचावणं, जेतेपदापर्यंतची घोडदौड, विक्रम-पराक्रम, आकडेवारी हे सगळं तिसऱ्या टप्प्यात येतं.
‘फ्रेंच ओपन टेनिस’ म्हटलं की राफेल नदालचाच विचार होतो. महिलांमध्ये सेरेना विल्यम्स तंदुरुस्त असेल तर हे सगळं समीकरण तिला लागू होतं. स्पर्धा म्हटली की चुरस, थरार, रोमांच, कट्टर मुकाबला, एकमेकांच्या कौशल्याचा कस पाहणारे खेळाडू, गॉसिप, फजित्या, पराक्रम हे सगळं ओघानं येतं. मे महिन्यात आपल्याकडेही सूर्यमहाराज आग ओकत असतात. घराबाहेर पडणं म्हणजे घामानं निथळणं. प्रेशर कुकरमध्ये शिजून निघावं अशी परिस्थिती असते. या काळात खेळाचा संबंध फक्त टीव्हीवर बसून किंवा लोळत पाहण्याची अ‍ॅक्टिव्हिटी इतकाच असतो. भारतात असं नैसर्गिक गॅसचेम्बरसदृश परिस्थिती असताना तिकडे दूरवर युरोपात फ्रान्समध्ये लाल मातीवर टेनिस विश्वातला सगळ्यात खडतर मुकाबला रंगतो. एरव्ही आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध फ्रान्समध्ये या काळात घामटय़ा काढणारं वातावरण असतं. कोकणातल्या लाल मातीशी साधम्र्य साधणारी लाल मातीचा कॅन्व्हास अंथरलेला असतो आणि त्यावर जगभरातले अव्वल टेनिसपटू आपल्या रॅकेटच्या फटकाऱ्यानिशी सुरेख चित्र रेखाटण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतात. यंदाही हा सगळा माहौल तयार झाला आहे. भारतात निवडणुका आणि आयपीएलचा थरार बरोबरीने रंगतो आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला फिफा फुटबॉल विश्वचषक अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. भारताला पहिल्यांदाच बॅडमिंटन विश्वातल्या विश्वचषक समजल्या जाणाऱ्या थॉमस आणि उबेर चषकाचा मान मिळाला आहे. क्रीडा रसिकांसाठी ही पर्वणी असतानाच फ्रेंच ओपनचे पडघम वाजू लागलेत.
एटीपी अर्थात पुरुषांचे टेनिस नियंत्रित करणाऱ्या सर्वोच्च संघटनेने जाहीर केलेले आकडे नदालशाहीची मातीवरची मक्तेदारी सिद्ध करणारे आहेत. कारकिर्दीतील ६२ पैकी ४३ जेतेपदे त्याने क्ले कोर्टवर मिळवली आहेत. यामध्ये फ्रेंच ओपनच्या विक्रमी आठ जेतेपदांचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याने खेळलेल्या ६० पैकी ५९ लढतींत त्याने विजय मिळवला आहे. त्याचा एकमेव पराभव २००९ साली झाला होता. दुखापतीच्या कारणास्तव त्याला सर्वोत्तम खेळ करता आला नाही आणि रॉबिन सॉडर्लिगने जेतेपद पटकावले. हा अपवाद वगळला तर क्ले कोर्टवर नदालला आवाज देण्याचं कोणालाच जमलेलं नाही.
उष्ण-दमट वातावरणात मातीवर खेळताना डावपेच बदलावे लागतात. अन्य सरफेसच्या तुलनेत चेंडूची हालचाल संथ असते. त्यानुसार फटके, त्यामागची ऊर्जा, टायमिंग सगळंच बदलतं. या सगळ्याशी जुळवून घेताना अडचणी येत असल्याने भलेभले खेळाडू या स्पर्धेत गाशा गुंडाळतात. मात्र राफेल नदाल या सगळ्याला अपवाद आहे. या सरफेसवर कसं खेळायचं हे नदालच्या धमन्यांतच भिनलं आहे. यंदाही जेतेपदासाठी तोच प्रबळ दावेदार आहे. मात्र परिस्थिती थोडी बदललेली आहे. वर्षभरापूर्वी नदालच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीतून तो आता सावरला असला तरी अद्यापही हे गुडघे त्याला वारंवार सतावतात. पाठीचे दुखणेही अचानक उचल खाताना दिसत आहे. पोटाच्या दुखापतीने त्याला बेजार केले होते. चॅम्पियन खेळाडूचे शरीर ही त्याची सगळ्यात मोठी संपत्ती असते. मात्र सध्या ही लक्ष्मी नदालवर काहीशी रुष्ट आहे. फ्रेंच ओपनच्या लाल मातीशी जुळवून घेण्यासाठी या स्पर्धेपूर्वी क्ले सरफेसवर काही स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. एरव्ही या स्पर्धा होतात आणि नदाल जेतेपद पटकावतो हेही नेहमीचंच- मक्तेदारीवालं. पण यावर्षी परिस्थिती किंचित बदलली आहे. वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत नदालने रॉजर फेडररला नमवत अंतिम फेरी गाठली. त्याच्यासमोर होता स्वित्र्झलडचा स्टॅनिलॉस वॉवरिन्का. अनेक र्वष दुसऱ्या फळीतला खेळाडू म्हणून गणना होणारा वॉवरिन्का जेतेपद पटकावेल अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. मात्र अफलातून सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्याने नदालला चीतपट केले. पाठीच्या दुखण्यामुळे नदाल पूर्ण फिट नसल्याचा फायदाही वॉवरिन्काला मिळाला. या अनपेक्षित पराभवामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धेतील आणि विशेषत: अंतिम फेरीतल्या नदालच्या कामगिरीला बट्टा लागला. पाठीच्या दुखापतीतून सावरत त्याने पुनरागमन केले. क्ले कोर्टवरच्या स्पर्धेच्या माध्यमातून तो दिमाखात पुनरागमन करेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र घडले वेगळेच. माँटे कालरे स्पर्धेत जिवलग मित्र डेव्हिड फेररने त्याला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळायला लावला, तर बार्सिलोना स्पर्धेत निकोलस अल्माग्रो या युवा खेळाडूने त्याला उपांत्यपूर्व फेरीत माघारी परतवलं. नदाल आणि त्याच्या चाहत्यांसाठी हे पराभव अनपेक्षित स्वरूपाचे होते. मात्र लौकिकाला जागत त्याने माद्रिद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रोम मास्टर्स स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने त्याच्यावर मात केली. फॉर्म आणि तंदुरुस्ती या दोन्ही आघाडय़ांवर त्याला हळूहळू सूर गवसतो आहे. त्यामुळे रविवारपासून सुरू होणाऱ्या मातीवरल्या टेनिसयुद्धात नदालकडूनच जेता होण्याची अपेक्षा आहे.
मात्र नदालची मक्तेदारी थोपवण्यासाठी अन्य टेनिसपटूंमध्ये चुरस आहे. गेल्या काही वर्षांत चिवट झुंज देण्याची तयारी, सर्व प्रकारच्या फटक्यांवरचे प्रभुत्व, जबरदस्त तंदुरुस्ती आणि ऊर्जा तसंच स्वत:च्या आणि प्रतिस्पध्र्याच्या खेळाचा सखोल अभ्यास याच्या बळावर नोव्हाक जोकोव्हिचने जेतेपदांचा सपाटा लावला आहे. आवडत्या हार्डकोर्टवर प्रभुत्व गाजवल्यानंतर जोकोव्हिचने ग्रासकोर्टवरही आपली अदाकारी पेश केली. मात्र अद्यापही क्ले कोर्टच्या ग्रँडस्लॅम जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली आहे. या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये तो सातत्याने धडक मारतो. परंतु नदालच्या झंझावातासमोर तो नामोहरम ठरतो. कारकिर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदाचे वर्तुळ पूर्ण करण्याची संधी जोकोव्हिचला मिळणार आहे. नदालच्या मागे लागलेला दुखापतींचा ससेमिरा आणि त्याच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव हे बघता जोकोव्हिच चमत्कार घडवू शकतो.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला विक्रमी कब्जा, तब्बल १७ ग्रँडस्लॅम जेतेपदे अशी भरभक्कम पुंजी असलेल्या रॉजर फेडररला सिद्ध करण्यासारखे काहीच उरलेले नाही. टेनिसचा अनभिषिक्त सम्राट अशी बिरुदावली मिळालेल्या फेडररचा विजयवारू रोखणं कठीण काम मानलं जायचं. मात्र वयोमानापरत्वे फेडररच्या कामगिरीत नजरेत भरेल अशी घसरण झाली आहे. २०१२च्या विम्बल्डन जेतेपदानंतर त्याला ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. या दोन वर्षांच्या कालखंडात नवख्या, अनुनभवी खेळाडूंकडून त्याचा पराभव झाला आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून परतण्याची वेळ त्याच्यावर ओढवलेली आहे. त्याच्या हरण्याची सवयच नसल्याने त्याच्याप्रती असलेल्या सन्मानाची आता स्पर्धेगणीक चाचपणी करावी लागत आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपदाच्या विजयपथावर परतण्याची त्याला संधी होती. मात्र राफेल नदालनेच त्याला रोखलं. अजूनही माझ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेनिस खेळण्याची क्षमता आहे हे त्याचं पराभवानंतरचं वाक्यही चाहत्यांना सरावाचं झालंय. नदालला रोखण्यासाठी कोणीतरी सव्वाशेर हवा आणि फेडरर हा सव्वाशेर असू शकतो याची टेनिस रसिकांना कल्पना आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विंटेज फेडररची झलक पाहायला मिळावी. सातत्याने हुलकावणी देणारे जेतेपद त्याच्या हातात विसावावे अशी प्रेमळ इच्छा आहे.
फेडरर-नदाल-जोकोव्हिच या त्रिकुटाची सद्दी मोडण्याचे काम इंग्लंडच्या अँडी मरेने केले. यंदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदासह स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने आपणही जेतेपदाचे हकदार आहोत हे सिद्ध केले. यश मिळवणे सोपे असते. मात्र ते टिकवणे आणखी कठीण असं म्हणतात. आपण केवळ एका जेतेपदाचे चमत्कार नाही हे या दोघांना सिद्ध करावे लागेल. नदालच्या बालेकिल्ल्यात या दोघांपैकी कुणी जेतेपदाला गवसणी घातल्यास टेनिसविश्वाला नवा सितारा मिळू शकतो. या दोघांच्या पलीकडे गुणी खेळाडूंची मोठी फौज जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. टॉमस बर्डीच, डेव्हिड फेरर, केई निशिकोरी, मिलोस राओनिक, जो विलफ्रेंड त्सोंगा हे सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहेत. प्रस्थापितांना धक्का देण्याची कुवत त्यांच्यात आहे का ते या स्पर्धेच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकेल.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्स आणि अन्य असा थेट मुकाबला रंगतो. वाढत्या वयानुसार आपला खेळ परिपक्व करणारी सेरेना तिशीतही जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. सेरेना स्पर्धेत नसेल किंवा तिला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला तर मुकाबला किती सपक होऊ शकतो हे यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या लि नाच्या जेतेपदाने स्पष्ट केले आहे. अव्वल २५ मानांकित खेळाडूंपैकी एकीचाही सामना न करता लि नाने जेतेपदावर नाव कोरले. फ्रेंच ओपनच्या निमित्ताने सेरेना नव्या दमाने, ऊर्जेने परतली आहे. तिला रोखण्यासाठी बाकी सगळ्या खेळाडूंना जिवाचे रान करावे लागणार आहे. महिला टेनिसमध्ये प्रकर्षांने जाणवणारी गोष्ट म्हणजे सातत्य. ‘नवीन स्पर्धा-नवी विजेती’ असे समीकरण जोपासण्यापेक्षा पुरुष खेळाडूंप्रमाणे महिला टेनिसपटूंची मक्तेदारी निर्माण होऊ शकलेली नाही. व्हिक्टोरिया अझारेन्का, लि ना, मारिया शारापोव्हा, अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का, जेलेना जान्कोविच, पेट्रा क्विटोव्हा, अ‍ॅना इव्होनोव्हिक या एखादा संस्मरणीय विजय मिळवतात आणि पुढच्याच फेरीत त्यांना एकही गेम जिंकता येत नाही. खेळातले हे ध्रुवीकरण टाळण्याची मोठी जबाबदारी या दुसऱ्या फळीच्या खेळाडूंवर आहे.
भारतासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे. अनुभवी लिएण्डर पेसने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य खेळाडूंमध्ये रोहन बोपण्णा पाकिस्तानचा साथीदार ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळणार आहे. इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीगचा प्रणेता असलेला भूपती टेनिसला अलविदा करण्यापूर्वी कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणारी सानिया मिर्झा महिला दुहेरीत जेतेपदाची दावेदार आहे. झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅकच्या साथीने ती नशीब आजमावणार आहे. एकेरीत सोमदेव देववर्मन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Story img Loader