lp45राणीच्या बागेतून बाहेर पडून एक वाघोबा निवांत फिरत फिरत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. या प्रवासात त्यांनी अनुभवलेल्या मुंबईची धम्माल कथा…

सगळी राणीची बाग चिडीचूप झोपली होती. दूरच्या एका पिंजऱ्यातून कुठल्या तरी प्राण्याचा कण्हत असल्याचा आवाज येत होता. आणि पोपटाच्या पिंजऱ्यात बसण्याच्या जागेवरून सुरू झालेले भांडण अजूनही मिटलेले नव्हते. बाकी सर्व राणी बाग शांत झोपेत होती. पिंजऱ्यात एकटय़ाच झोपलेल्या राजा नावाच्या बंगाली वाघाला मात्र मध्यरात्री तीन वाजताच जाग आली होती. कंटाळा घालविण्यासाठी त्यानं अंगाला आळोखेपिळोखे दिले, दोन-तीनदा जबडा आ वासून मोठी जांभई दिली आणि वेळ घालवण्यासाठी तो पिंजऱ्यामध्ये ह्य टोकापासून त्या टोकापर्यंत येरझाऱ्या घालू लागला. चालता चालता आपली शेपटी बाजूच्या गजावर आपटत गेल्यास गजावर आघात होऊन आवाज होतो तो त्याला आवडत असे. त्यानं आता तसाच आवाज काढत आणि ऐकत येरझाऱ्या घालायला सुरुवात केली.

चार-पाच फेऱ्या झाल्या आणि एकाएकी बाजूचे दोन गज त्याच्या शेपटीच्या फटकाऱ्यांनी पलीकडच्या बाजूला धारातीर्थी पडले. मग त्याला आठवले त्यांची महिन्याभरापूर्वी दुरुस्ती करून महापालिकेचे कामगार गेले होते. त्या फटीतून त्यानं सहज डोके काढून पाहिले तो काय आश्चर्य, तो सगळाच्या सगळा त्यातून बाहेरच्या मोकळ्या जागेत येऊन पोहोचला. त्यानं बाहेरच्या संग्रहालयाच्या टॉवरवरच्या मोठय़ा घडय़ाळात पाहिले, जेमतेम साडेतीन वाजून गेले होते. तो तेथून चालत चालत गेटजवळ आला. गेट नीट लागत नसल्याने महापालिकेने दोन खासगी पहारेकऱ्यांचा खडा पहारा तेथे ठेवला होता. दुपारच्या पाळीचा पहारेकरी रजेवर असल्याने सकाळचा पहारेकरी ओव्हर टाइमसाठी थांबला होता. आणि दुसऱ्याला पहाटेची गाडी पकडून गावी जायचे असल्याने आणि मित्राला सोबत होईल अशा विचाराने रात्रभर तेथेच थांबला होता. दरवाजा नीट बंद होत नसल्याने एकाने दरवाजाबाहेर आणि एकाने दरवाजाच्या आत आडवे राहून खडा पहारा करण्याचे ठरविले आणि प्लास्टिकचे तुकडे अंथरून दोघांनी तो विचार अमलात आणला होता. रात्री भटकी कुत्री फार त्रास देतात त्यासाठी त्यांनी लहान लहान दगडांचा साठा हाताशी ठेवला होता. वाघोबांनी अंदाज घेतला आणि त्यांना अलगद ओलांडून तो मोठय़ा चौकात आला. कोणी तरी आपल्याला ओलांडून जात आहे ही गोष्ट त्यातील एका कर्तव्यकठोर पहारेकऱ्याच्या लक्षात आली आणि त्यानं भटका कुत्रा असेल ह्य समजुतीने त्या दिशेला अंदाजाने दोन-चार दगड भिरकावले आणि एक सणसणीत शिवी हासडून तो कर्तव्यदक्ष पहारेकरी एका कुशीवर दोन्ही हातांच्या बेचक्यात तोंड घालून शांत झाला.

राजा वाघ हळूहळू चालत मुख्य रस्त्यावर आला. टॉवरच्या घडय़ाळात आता नुकते चार वाजत होते. रस्त्यापलीकडच्या दूध डेअरीवाल्याने नुकतीच डेअरी उघडली होती. आणि त्यांनी बाहेर झोपलेल्या पोऱ्याच्या कमरेत लाथ घालून त्याला उठवला आणि भल्यामोठय़ा कढईत दूध ओतून मोठय़ा शेगडीवर तापत ठेवले. आणि तोंडात दातवणाची काडी घालून दात घासता घासता रस्त्यावर थुंकायला सुरुवात केली. राजा रस्ता ओलांडून डेअरीसमोर जाऊन जिभल्या चाटत, शेपटी हलवत बसला. त्याला पाहून डेअरीवाल्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सातव्या मुलीनंतर मुलगा व्हावा म्हणून त्यांनी कालच जोगेश्वरीला माँ शेरोवालीचा आपल्या खर्चाने दणक्यात उत्सव साजरा केला होता. त्याला वाटले नव्हे, खात्रीच पटली. प्रसन्न होऊन वाघाच्या रूपात त्याला माँचे दर्शन झाले होते. त्यांनी पटकन काडी फेकून दिली. जवळच्या बादलीतील पाणी नोकराकरवी आपल्या डोक्यावर ओतून घेतले आणि ओलेत्यानं त्यानं वाघोबाला लांब नमस्कार घातला आणि नैवेद्य म्हणून परात भरून मलईदार दूध वाघोबापुढे ठेवले. लांबलचक जिभेने वाघोबाने ते लपालपा lp46आवाज करत गट्ट करून टाकले. परत एकदा डेअरीवाल्याने आणि त्याच्या नोकरांनी वाघोबाला साष्टांग दंडवत घातला व आशीर्वाद घेतले. हा सगळा व्याघ्रदर्शन सोहळा होईपर्यंत पहाटेचे पाच वाजले. तृप्त मनाने डेअरीवाला गल्ल्यावर जाऊन बसला आणि वाघोबा सात रस्त्याच्या दिशेने चालू लागले.

त्यांनी पाहिले की, सेन्ट्रल जेलच्या आजूबाजूला धडक कृती दल, बेधडक कृती दल, धडाधड कृती दल, धडधाकट कृती दल वगैरेच्या चिलखती गाडय़ांमध्ये, शिवाय दुसऱ्या पोलीस गाडय़ांमध्ये अत्यंत तत्पर असे पोलीस अत्यंत जागृत अवस्थेत डोळे मिटून पहाटे पहाटे योग केल्यासारखे ध्यानस्थ बसले होते. एक संगीनधारी पोलीस मात्र चक्क जागता पहारा देत उभा होता. त्याचे लक्ष समोरच्या फुटपाथवरून जाणाऱ्या वाघोबाकडे गेले. तो मराठी असल्यामुळे ‘टायगर टायगर’ करून ओरडला. आजूबाजूला उभ्या गाडय़ांमधील सर्व पोलीस शिपाई आपल्या बंदुका सावरत, टोप्या ठीकठाक करत एकदम पवित्रा घेऊन उभे राहिले. आज येरवडा जेलमधून खतरनाक गुन्हेगार टायगर मुंबईत आणला जाणार होता. म्हणून तर एवढा कडक बंदोबस्त रात्रीपासूनच तैनात करण्यात आला होता. त्या गडबडीत आपले वाघोब्बा मात्र तेथून पुढे गुपचूप सटकले. तेथून ते बकरी अड्डय़ाजवळ येऊन पोचले. सगळीकडे बकऱ्यांचा उग्र वास भरून राहिला होता. पण बकऱ्यांचा मात्र कुठे पत्ता नव्हता. आजूबाजूच्या फुटपाथवर ओळीने असंख्य माणसे मात्र आडवी तिडवी कशीही झोपली होती. बकऱ्या नसल्या तरी बैलगाडीचा एक बैल मात्र तेथल्या एका दिव्याच्या खांबाला बांधला होता. तो एकदम धडपडत उठला. बैलाने वाघोबाला ओळखले आणि दोरीला जोरात हिसडा मारला. दोरी सुटताच बैल पळू लागला, वाघोबांनी असल्या धावत्या जनावराचा पाठलाग कधीच केला नव्हता. त्यामुळे तो बुचकळ्यात पडला, जागच्या जागीच तो विचार करत थांबला. तोपर्यंत बैल दिसेनासा झालादेखील. वाघोबा लोअर परळच्या दिशेने चालू लागला. एक शाळकरी मुलगा आपल्या वडिलांबरोबर सकाळच्या शिकवणीला लवकर उठून रडतरडत चालला होता. त्यांनी वाघोबाला बघताच तो वडिलांना म्हणाला, ‘‘बाबा, मागे वाघ येतोय.’’ वाघ हे नाव ऐकले मात्र वडिलांचा पारा एकदम चढला. वडिलांनी मुलाच्या पाठीत धपाटा घातला, म्हणाले, ‘‘त्या नतद्रष्ट साहेबाचे सकाळी सकाळी नावसुद्धा काढू नको, गेले वर्षभर त्यांनी कामावरून माझा छळ मांडला आहे. इथेही त्याचा छळवाद आला वाटतं. पुढल्या जन्मी साला शेळी होऊन मरेल. पुढे बघून नीट चल बघू. परत मागे बघू नको.’’

वाघोबा बिचारा पुढे चालू लागला. सकाळी एक शिक्षक कधी नव्हे ते शाळेत लवकर पोचत होते. त्यांनी वर्ग उघडता उघडता वाघोबाला पाहिले आणि त्यांनी खिशातला मोबाइल काढला आणि शंभर नंबर फिरवला.

‘‘हॅलो, मी पूर्व प्राथमिक शिक्षक, शिकारखाने बोलतोय.’’

‘‘बोला. मी इन्स्पेक्टर वाघमारे बोलतोय. शाळेचे नाव सांगा..’’

‘‘पूर्व प्राथमिक लोअर परेल शाळा.’’

‘‘खासगी की महापालिकेची, प्रायव्हेट असल्यास अनुदानित की विनाअनुदानित?’’

‘‘साहेब, मी एक वाघ बघितला.’’

‘‘मग मी काय करू?’’

‘‘कोणाला तरी पाठवा.’’

‘‘कोणाला पाठवून काय करू?’’

‘‘वाघाला पकडून न्या.’’

‘‘आम्ही येईपर्यंत त्याला तुम्ही पकडून ठेवा. पंचनाम्यासाठी दोन प्रौढ व्यक्तीही पकडून ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत वाघाला कुठलीही इजा होणार नाही ह्यची जबाबदारी तुमची हे लक्षात ठेवा. बरं, तो वाघ आहे की वाघीण?’’

‘‘साहेब, मी मुन्सिपाल्टीला फोन करतो, कारण तो वाघ नसून कुत्रा किंवा कुत्री असावी. तेव्हा तुम्ही येण्याची तसदी घेऊ नका.’’

‘‘आम्ही येत नाही, पण महापालिकेला सांगून तुमच्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवतो, मेंटल हॉस्पिटलला तुम्हाला ते घेऊन जातील. पूर्ण पत्ता सांगा.’’

मास्तरांनी त्वरित फोन कट केला आणि ते दूर जाणाऱ्या वाघोबाकडे मागून पाहू लागले. वाघ की वाघीण त्यांना काहीच दिसले नाही.

वाघोबा माहीम दग्र्याजवळ पोचले, समोरच्या चाळीच्या लांबलचक गॅलरीत म्हातारबुवा पेपर वाचत खाली पाहत होते. त्यांनी वाघोबाला पाहताच बायकोला हाक मारली, म्हणाले, ‘‘पैशाकरता लोक काय काय करतील नेम नाही, कुत्र्याच्या कातडीवर काळे पट्टे काढून वाघाचे नकली कातडे विकणारी टोळी पकडली आहे.’’ ते पेपरमधील बातमी वाचून म्हणाले. ‘‘तसला खोटा वाघ समोरून चाललाय बघ, बाहेर ये लवकर.’’

आजी म्हणाली, ‘‘रात्रीची गोळी घेतली नाहीत का? तुमचा भ्रमिष्टपणा वाढत चाललाय हो. श्रीधरला सांगून औषध बदलून आणायला सांगायला हवं.’’

तो गरीब बिचारा म्हातारा अधिक वाद नको आणि बायकोशी तर अजिबात नको म्हणून परत पेपरमध्ये डोके खुपसून बसला. आता वाघोबाला न्याहारीची आठवण होऊ लागली. सकाळचे दूध कधीच पचून गेले होते. माहीम किनाऱ्यावर बरीच माणसे ओळीने समुद्राकडे तोंड करून बसलेली दिसत होती, परंतु त्यांचा एकंदर lp47आविर्भाव पाहून ती जेवायची पंगत नसून जेवण्यासाठीची पूर्वतयारी ते करून ठेवत असावेत एवढे कळण्याइतका वाघ निश्चितच हुशार होता. तितक्यात एक हॉटेलवाल्याचा टेम्पो तेथे आला आणि रात्रीचे अन्न मोठमोठय़ा भांडय़ातून तेथे उतरले. आसमंत मटणाच्या वासाने भरून गेला. वाघोबा पुढे झाला. ते उतरवून टाकणारी माणसे इतकी घाईत होती की त्यांनी ते मटण इकडे तिकडे पाहून कोणी पाहत नाही याचा अंदाज घेतला आणि एका कोपऱ्यात त्या मटणाचा मोठा ढीग ओतून आल्या चाकी ते परत गेले. वाघोबाची न्याहारीची सोय मात्र छान होऊन गेली.

आता वाघोब्बा हायवेवर बांद्रा जंक्शनवर आले. तेथे एक प्रचंड आकाराचा फॅमिली फोटो लावला होता. एक गॉगल लावलेले दाढीवाले म्हातारे गृहस्थ एका सिंहासनावर विराजमान झाले होते. त्यांच्या बाजूला चष्मेवाली, भरघोस मिशावाली, कपाळावर ठळक दिसेल असा भगवा टिळा लावलेली मध्यमवयीन व्यक्ती होती, त्याच्या बाजूला एक चश्मेवालाच, पण नुकताच कॉलेजमध्ये जाऊ लागलाय असा वाटणारा त्यानेही दोन भुवयांच्या मध्ये कपाळावर टिळा लावला होता आणि त्यासोबत छायाचित्रकाराने आपला पण डरकाळी देणारा फोटो काढलेला पाहून वाघोबांना छायाचित्रकाराच्या कल्पकतेची कमाल वाटली. पण तो एकंदरच मामला खासगी असावा हे जाणून वाघोबा वेस्टर्न एक्प्रेस हायवेकडे वळले. मोटारी दोन्ही बाजूंनी भयंकर वेगानं धावत होत्या. तेवढय़ात त्याचे लक्ष रस्त्याच्या दुभाजकाकडे गेले. त्यावर काळे-पिवळे पट्टे काढले होते. वाघोबा त्या पाश्र्वभूमीवर पुढे पुढे जाऊ लागले. आता त्यांना चटकन कोणी ओळखण्याची भीती राहिली नाही. अर्थात सर्व जनता इतकी घाईगर्दीत होती की कोणालाही इतरत्र पाहण्याची फुरसतच नव्हती. वाघोबा तसेच पुढे पुढे जात राहिले. ते आता चित्रनगरीत येऊन दाखल झाले. एका मोठय़ाशा झाडाआड उभे राहून ते अंदाज घेऊ लागले. तेथे चांगदेवाचे गर्वहरण या फिल्मचे चित्रीकरण सुरू होते. एका बाजूला भलामोठा, भुसा भरलेला वाघोबा उभा करून ठेवला होता. आणि चांगदेवाची भूमिका करणारा कोणी दाढी-मिश्या आणि जटाधारी आडदांड अभिनेता एका हाताने खेळण्यातला सर्प हातात गरागरा फिरवत आणि एका हातातील मोबाइल कानाला लावून बोलत बोलत फेऱ्या मारत होता. आजूबाजूला नटून थटून बसलेल्या एक्स्ट्रा नटय़ांच्या खोडय़ा काढत होता. तेवढय़ात गॉगल लावलेल्या, टोपी घातलेल्या एका ढेरपोटय़ाने शिट्टी वाजविली आणि तो भला मोठा भुसा भरलेला वाघ मध्ये आणून ठेवायला सांगितले आणि खूण करताच त्यावर येऊन कसे बसायचे हे त्या अभिनेत्याला तो दाखवू लागला. असे दोन-तीनदा त्या वजनी माणसाने करताच त्या भुसा भरलेल्या वाघाची नाजूक ठिकाणची शिवण उसवली आणि तेथून भुशाचे स्प्रे उडू लागले. ते विनोदी दृश्य पाहताच बघ्यांची हसता हसता पुरेवाट झाली आणि शेवटी तो वाघ खालच्या बाजूनं टर्रकन उसवून धारातीर्थी पडला. छायाचित्रण कसे पुरे करणार या चिंतेत असतानाच त्या ढेरपोटय़ा माणसाचे लक्ष या वाघोबाकडे गेले. त्यानं डोळ्यावरचा गॉगल काढून आपले डोळे चोळले आणि त्याची खात्रीच पटली. त्याच्या डोक्यात कल्पना सुचली आणि त्यानं खास हिरोईनसाठी आणलेला पांढरा रस्सा मटणाचा डबा बाहेर काढून वाघोबासमोर धरला वाघोबाचे डोळे आणि मिश्या एकदम तरतरीत झाले आणि तो पुढे झाला. तेवढय़ात त्यानं नटाला खूण केली. तो पटकन वाघावर स्वार झाला. मसालेदार मटणाच्या वासामागे वाघोबा हळूहळू चालू लागले आणि कॅमेरामनने शॉट पूर्ण केला. एका झडपेत मटणाचा डबा वाघोबाच्या तोंडात आला आणि बघता बघता रस्सा अदृश्य झाला. मग वाघोबा एका झाडाच्या सावलीत जाऊन मस्त झोपून गेले. तेवढय़ात काही प्राणिप्रेमी हजर झाले आणि त्यांनी ढेरपोटय़ाला झापायला सुरुवात कली.. तो म्हणाला, ‘‘मी मद्रासवरून खरा वाघ मागवला होता. मला वाटले तोच आलेला आहे.’’ प्राणिप्रेमी, प्रेमाने डोळ्यांत अश्रू आणून त्या मुक्या जनावरावरून हात फिरवू लागले. वाघोबा भडकला. त्याची झोप उडविणाऱ्या त्या प्राणिप्रेमींवर जाम वैतागला. तो उठून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागला. तेवढय़ात लोकांची गर्दी वाढत गेली आणि कोणी तरी म्हणाले, ‘‘‘आजोबा’नंतर ‘पणजोबा’ सिनेमा येत आहे. त्याचेच शूटिंग सुरू आहे. गर्दी वाढत गेली आणि वाघोबा घाबरून गेला. तितक्यात एक लांबलचक आलिशान गाडी येऊन उभी राहिली. त्यातून अगदी चवळीच्या शेंगेसारखी एक नाजूक कन्या उतरली आणि सर्व गर्दी तिच्याभोवती आकर्षित झाली. आता वाघोबाकडे पाहायला कोणालाही वेळ नव्हता, तिने गर्दीला उद्देशून छोटेसे भाषण दिले आणि आपल्या पुढल्या सिनेमाची घोषणा करून टाकली. त्याचे नावही जाहीर करून टाकले- ‘पणजोबा.’ ती कमीत कमी कपडय़ातील कन्या जास्तीत जास्त सह्य देत गाडीत बसून निघून गेली. वाघोबा आता खाऊन-पिऊन झोप काढून तरतरीत झाले होते. ते भरभर बोरिवलीकडे चालू लागले. तोपर्यंत बरीच दुपार टळून गेली होती.

तिकडे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मात्र खूप गोंधळाची परिस्थिती तयार झाली होती. वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. वनमंत्र्याच्या मते हा त्यांच्या विभागाशी संबंधित प्रश्न नव्हता. तो जरी वाघ असला तरी महापालिकेच्या ताब्यात होता आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नव्हता. विरोधकांनी मुंबई बंद करण्याची धमकी दिली होती. वाघोबा कांदिवलीला पोचल्यावर बऱ्याच लोकांनी त्याला ओळखला, पण मानवी वस्तीत वाघ दिवसा उजेडी वावरतात ह्यचे त्यांना काही वाटेनासे झाले होते. अशी व्याघ्रदर्शने त्यांनी अनेक वेळा घेतली होती. बऱ्याच लोकांनी ते अवर्णनीय दृश्य आपल्या मोबाइलमध्ये साठवून ठेवले. वाघोब्बा नॅशनल पार्कच्या मुख्य दरवाजातून आत गेले. गेटवरील तिकीट खिडकीतील माणूस विचारात पडला. त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली. ते म्हणाले, ‘‘तू लक्ष देऊ नको. वनखात्याचे लोक काय ते बघून घेतील. तू महापालिकेचा कर्मचारी आहेस. सरकारी कर्मचाऱ्यांच्या लफडय़ात लक्ष घालू नको.’’

वाघोबा आत मोकळ्यावर आले. तेथे एका बाजूला दुरुस्तीला आणून टाकलेले पण अजून निविदा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेले वन खात्याचे मोडके पिंजरे आणून टाकले होते. वाघोबा त्यात सहज जाऊन आरामात बसले. आणि दिवसभराच्या घडामोडींचा विचार करू लागले. मुंबईत लोक कामात इतके व्यस्त आहेत की कोणाकडेही ढुंकूनही बघायला त्यांना वेळ नाही. उद्या अक्राळविक्राळ डायनासोर जरी मुंबईभर फिरून गेला तरी त्याला कोणी भाव देणार नाही. आणि इतके चांगले अन्न येथे हवे तेवढे अगदी फुकट मिळत असताना वन्य प्राण्यांनी माणसावर हल्ले करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घ्यायला काय हरकत आहे. कुत्र्या-मांजरासारखे त्यांच्या घरी दारी नव्हे अगदी अंगाखांद्यावरदेखील आरामात खेळावे. पण त्याच्या अशा वावरामुळे मुंबईत काय काय रामायण घडले त्याची त्याला कुठे कल्पना होती?

महापालिकेचे रखवालदार निलंबित झाले. दुधवाल्याच्या बायकोचे ह्यपुढे रोजचे हाल वाढले. त्या लहान शाळकरी मुलाच्या पाठीत मारलेल्या बुक्कीमुळे त्याची पाठ दुखू लागून डॉक्टरांचे बिल वाढले. गाडीवाल्या भय्याचा बैल शोधूनही सापडेनासा झाला. महापालिकेने पूर्व प्राथमिक शिक्षकाला शाळेत वेळेआधी आला ह्य सबबीवर मेमो दिला आणि वेळेपूर्वी शाळेत येण्याचे कारण काय याबद्दल शो कॉज नोटीस दिली. पोलिसांना चुकीची माहिती दिली म्हणून आणि वन्य प्राणी जपण्यात कुचराई केली म्हणून निलंबित केले. माहीमच्या म्हाताऱ्याची रात्रीची एक गोळी वाढली. सिनेमाच्या दिग्दर्शकाला आणि अभिनेत्याला वन्य जिवाला त्रास दिला म्हणून अटक झाली. विनापरवाना रस्त्यावर गर्दी केली म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीवर कारवाईचे आदेश निघाले. आणि वनमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई बंदचा आदेश विरोधी पक्षांनी जाहीर केला. वाघोबा मात्र त्या मोडक्या पिंजऱ्यातून कधीही बाहेर पडायचे नाही हे ठरवून झोपून गेले. त्यांच्या पिंजऱ्यासमोर बच्चे कंपनी ‘वाघोबा, वाघोबा किती वाजले?’ हा खेळ खेळण्यात दंग झाली होती. वाघोबांनी सहज डोळे किलकिले करून पाहिले. त्यांच्या ओळखीचे राणीच्या बागेतील म्युझियमवरील घडय़ाळ दिसत नव्हते.

मात्र, ज्या कंत्राटदाराने राणीच्या बागेतील वाघाच्या पिंजऱ्याचे दोन गज गेल्या महिन्यात दुरुस्त करून दिले होते त्यालाच वन खात्याच्या पिंजरे दुरुस्तीचे कामही देण्यात आले होते. वाघोबाला मात्र आता कसलीच चिंता नव्हती. किती का वाजेनात! तो त्या लहान मुलांचे खेळ पाहात शांत पडून राहिला.

Story img Loader