सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी भालाफेकीत नीरज चोप्रा आणि कुस्तीमध्ये बजरंग पुनिया यांनी पदके जिंकली नसती, तर लंडनमधील सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती करणे किंवा ती ओलांडणे जवळपास अशक्यच होते. नीरज चोप्राने बरेचसे अपेक्षित असे सुवर्णपदक अ‍ॅथलेटिक्समध्ये आणि तेही फील्ड प्रकारात जिंकले, त्याच्या जरा आधी बजरंगने कांस्यपदकाची लढत जिंकली. त्यात झालेल्या जल्लोषात आपला पदकांचा आकडा अवघा सात(च) राहिला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या जल्लोषाला हॉकीतील बऱ्याचशा अनपेक्षित कांस्यपदकाची काहीशी भावनोत्कट किनारही आहे. खाशाबा जाधवांचे १९५२ मधील कुस्तीतले अत्यंत कौतुकास्पद कांस्यपदक वगळल्यास वैयक्तिक पदकासाठी आपल्याला १९९६ पर्यंत वाट पाहावी लागली. सन १९०० मध्ये पॅरिस येथे नॉर्मन प्रीचार्ड यांनी भारताच्या वतीने ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक (दोन रौप्यपदके अ‍ॅथलेटिक्समध्ये) जिंकले असे म्हटले जाते. याविषयी वाद आहे. कारण आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या नोंदीनुसार प्रीचार्ड यांनी त्या स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या मते मात्र प्रीचार्ड हे भारताकडून स्पर्धेत उतरले. गंमत म्हणजे, ज्या ऑलिम्पिकमध्ये आपण पहिल्यांदाच एक संघ म्हणून उतरलो, ते होते १९२० मधील अँटवर्प ऑलिम्पिक!

ही पाश्र्वभूमी नोंदवण्याचे कारण म्हणजे, नीरज चोप्राचे सुवर्णपदक हे तांत्रिकदृष्टय़ा अ‍ॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक ठरत नाही. परंतु या खेळातील आतापर्यंतच्या दोन हुलकावण्या (मिल्खासिंग – १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये चौथे; पी. टी. उषा – १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या) हॉकी आणि कुस्तीव्यतिरिक्त केवळ तिसऱ्याच खेळात भारताला पदकासमीप नेणाऱ्या होत्या. मिल्खासिंग ४०० मीटर्स अंतिम शर्यतीत फोटो-फिनिशमध्ये चौथे आले. उषा यांचे याच प्रकारातील कांस्यपदक एकशतांश सेकंदांनी हुकले. अ‍ॅथलेटिक्समध्ये गोळाफेक या प्रकारात कमलप्रीत कौर अंतिम फेरीपर्यंत पोहोचून सहावी आली. अविनाश साबळे, तसेच पुरुषांच्या रिले चमूने आपापली सर्वोच्च कामगिरी नोंदवूनही ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

ज्या मोजक्या खेळांमध्ये आपण पदक मिळवण्याची क्षमता बाळगून आहोत, त्यात आता अ‍ॅथलेटिक्सची भर पडली आहे. पण कुस्ती वगळता बाकीच्या खेळांमध्ये अधिक सातत्य आवश्यक आहे. कुस्तीमध्ये १९५६, २००८, २०१२, २०१६ आणि २०२० अशा पाच स्पर्धामध्ये आपण सात पदके मिळवलेली आहेत. मात्र या पदकांचा ‘रंग’ आता बदलण्याची गरज आहे. विनेश फोगटचे अपयश लक्षणीय आहे. सुशील कुमारचे नैतिक पतन दखलपात्र आहे. इतर कोणत्याही खेळापेक्षा या खेळात आपण अधिक सातत्याने पदके जिंकतो हे खरे. पण इतकी नैसर्गिक गुणवत्ता उपलब्ध असताना अधिक पदके मिळवणे ही सरकार आणि संघटनेचीही जबाबदारी ठरते. इराण, रशिया, मध्य आशियाई देश, काही प्रमाणात मंगोलिया यांच्याशी टक्कर घेण्यासाठी दीर्घकालीन आणि पद्धतशीर कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. कॉर्पोरेट पुरस्कर्त्यांचे पाठबळ या खेळाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ऑलिम्पिकमध्ये पदक किंवा पदके मिळवणे ही आता आपल्यासाठी नवलाई राहिलेली नाही. पण गेली दोन दशके आपल्या पदकांची संख्या दोन आकडय़ांपर्यंतही गेलेली नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अटलांटा १९९६ ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेसने टेनिसमध्ये अनपेक्षित कांस्यपदक जिंकले. टेनिसमध्ये त्याच्या अनेक विजयांपेक्षा त्या पदकाचे मोल नक्कीच अधिक. लिअँडर केवळ दुहेरीच खेळू शकतो, हा समज त्या वेळी या जिगरबाज टेनिसपटूने खोटा ठरवला होता.

सिडनी २००० ऑलिम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये मिळवलेले कांस्यपदकही बऱ्यापैकी अनपेक्षित होते. आज टेनिसमध्ये पदक मिळवून देऊ शकेल असा दुसरा टेनिसपटू भारतात तयार होऊ शकलेला नाही. मीराबाई चानूने यंदा वेटलिफ्टिंगमधील पदकदुष्काळ संपवला, पण याही खेळात मल्लेश्वरीच्या यशानंतर म्हणावी तशी कामगिरी होऊ शकलेली नाही.

अथेन्स २००४ मध्ये राज्यवर्धन राठोडने नेमबाजीत डबल ट्रॅप प्रकारात जिंकलेले रौप्यपदक हा सुखद धक्का होता. या खेळात अंजली भागवतसारख्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करायला सुरुवात केली होतीच. पण ऑलिम्पिक पदक ही त्या वेळी आपल्यासाठी नवलाईच होती. बीजिंग २००८मध्ये प्रथमच भारताला एकापेक्षा अधिक खेळांमध्ये पदके मिळाली. तब्बल ५६ वर्षांनी हे घडत होते. अभिनव बिंद्राला नेमबाजीत १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक, सुशील कुमारला कुस्तीमध्ये आणि विजेंदर कुमारला बॉक्सिंगमध्ये कांस्यपदके मिळाली. यापूर्वी हेलसिंकी १९५२ मध्ये हॉकीतील सुवर्ण आणि खाशाबांचे कांस्य अशी भारताची तोपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.

नेमबाजीमध्ये लंडन २०१२ मध्येही भारताला दोन पदके मिळाली. विजय कुमार (रौप्य, २५ मी. रॅपिड फायर पिस्तूल) आणि गगन नारंग (कांस्य, १० मी. एअर रायफल) हे पदकविजेते होते. यानंतरच्या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळू नये, ही नामुष्की खरीच. तिची चिकित्सा व्हायला हवी. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाज आणि भारतीय नेमबाजी संघटनेत काही मुद्दय़ांवर वाद झाले आणि त्यांची लक्तरे चव्हाटय़ावर आली. नेमबाजी हा तांत्रिक आणि खर्चीक खेळ. पण गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये अचानक या खेळात दुष्काळ कसा काय निर्माण झाला, असा प्रश्न सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना पडतो आणि त्याची उत्तरे खेळाडू, संघटना आणि क्रीडा खाते अशा सर्वानीच शोधायला हवीत. यंदाच्या विक्रमी पदकलुटीत एखाद-दोन किंवा अधिक पदके नेमबाजीत मिळती, तर दोन आकडी पदकसंख्याही ओलांडता येऊ शकत होती.

बॉक्सिंग या आणखी एका प्रकारात गुंतवणुकीची आवश्यकता आहे. २००८ (विजेंदर), २०१२ (मेरी कोम) आणि आता लव्हलिना बोर्गोहेन अशी तीन पदके आजवर मिळाली. पण अंतिम फेरीचे उद्दिष्ट ठेवले गेले पाहिजे. याही खेळात कुस्ती आणि नेमबाजीप्रमाणेच अधिक पदकांचे उद्दिष्ट ठेवणे शक्य आहे. तिरंदाजीमध्ये यंदा दीपिका कुमारी आणि अतनु दास या जोडप्याने काही मातब्बर प्रतिस्पध्र्याना हरवून दाखवले. पण जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या दीपिका कुमारीकडून ऑलिम्पिकमध्ये अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. गुणवत्ता आणि पदकपूर्ती हा मेळ या खेळात काही जुळून येऊ शकलेला नाही. गेली अनेक वर्षे विशेषत ऑलिम्पिकच्या काळात आपण आदिवासी पट्टय़ातील या खेळातल्या नैसर्गिक भारतीय गुणवत्तेविषयी ऐकतोय. उदा. लिम्बाराम. याही खेळात पदक मिळवण्याच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.

उपरोल्लेखित बहुतेक खेळांमध्ये संघटना आणि पायाभूत सुविधा, त्याचबरोबर गुणवत्ता अस्तित्वात आहेच. त्याशिवाय ऑलिम्पिकमध्ये पदकांपर्यंत जाता येत नाही. उलट या खेळांकडून स्फूर्ती घेऊन हॉकीमध्येही आधुनिक प्रशिक्षण, परदेशी प्रशिक्षक असे सगळे गेले दशकभर सुरू आहे. या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे सहा क्रीडाप्रकारांमध्ये भारताला पदके मिळाली, ही आजवरची सर्वाधिक संख्या. ही संख्याही वाढली, तर पदकांची संख्याही आपोआप वाढेल. जलतरण, जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी, गोल्फ, नौकानयन या खेळांमध्ये आपले अस्तित्व दिसू लागले आहे. गोल्फ वगळता इतर खेळांमध्ये पदकांपासून आपण बरेच दूर आहोत. बॅडमिंटन आणि टेनिसमध्ये भविष्यात पदके कोण मिळवणार, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. बॅडमिंटनमध्ये आपण सायना-सिंधूपुढे सरकताना दिसत नाही. गेल्या तीन ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये भारताला पदक मिळाले. सिंधू पुढील स्पर्धेत खेळली, तर आशा आहे. पण तिच्यावरच आशा टिकून राहणे हा आपल्या बॅडमिंटन गुणवत्तेचा आणि प्रशिक्षणाचा पराभव आहे! टेबल टेनिस या आणखी एका प्रकारात मनिका बात्रासारख्यांकडून आशा बाळगायला हरकत नाही. पण पॅरिस २०२४ मध्ये १५-२० पदकांचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. तरच आपला आकडा दहाच्या आसपास स्थिरावेल. पदकविक्रमाचे कौतुक आहे. पण हा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है!