ज्यू, मुस्लीम तसंच ख्रिश्चन बांधवांसाठीचं पवित्र शहर म्हणजे जेरुसलेम. धार्मिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या शहराला असलेला ऐतिहासिक वारसा बऱ्यापैकी जतन करून ठेवला गेला आहे.

जशी आपली काशी, अयोध्या ही पवित्र क्षेत्रे, तसेच ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम बांधवांचे मक्का मदिनानंतरचे पवित्र शहर जेरुसलेम. मेडिटेरिअन समुद्र आणि मृत समुद्र यांच्यामध्ये पसरलेल्या ज्युडिअन डोंगररांगांवरील मोराया डोंगरावर हे वसलेले आहे. जुने जेरुसलेम पूर्वेला नॅशनल हायवेच्या अलीकडे, तर आताचे पसरलेले नवे शहर पश्चिमेला, हायवेपलीकडे आहे. असे सांगितले जाते की देवाने जाफा येथे ज्यू धर्म संस्थापक अब्राहम याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्याच्या मुलाचा बळी मागितला. अब्राहम बळी देण्यास तयार झाला आणि मुलाला या डोंगरावर घेऊन गेला. पण ऐन वेळी देवाने त्याच्या मुलाला बाजूला करून हातात बकरा ठेवला. देवाने दृष्टांत देऊन तेथे वस्ती करावयास सांगितले. या डोंगरावर ज्यू राजा सॉलोमन याने पहिले देऊळ, सेनेगॉग बांधले होते. येशूचा सर्व इतिहास इथेच घडला, शिवाय ख्रिश्चन धर्माचे पहिले चर्च, पुढे मुस्लीम धर्माची पहिली मशीद येथेच बोधली गेली. तसेच प्रेषित महंमदांनी स्वर्गात जाण्यापूर्वीच्या रात्री येथेच देवाबरोबर संवाद साधला होता, असे मानले जाते. त्यामुळे ओल्ड जेरुसलेममधील टेम्पल माऊंट हे तीनही धर्मातील तीर्थक्षेत्र आहे.
जेरुसलेम हे जगातील सर्वात जुने शहर मानले जाते. अब्राहम याच्या ज्यू धर्मातूनच पुढे ख्रिश्चन व मुस्लीम धर्म अस्तित्वात आले. ओल्ड सिटीत डंग गेटमधून आपण ज्यूईश क्वार्टरमध्ये येतो. सर्वात प्रथम या ठिकाणी ज्यू राजा डेव्हिड याचे राज्य होते, म्हणून ती लँड ऑफ डेव्हिड किंवा सिटी ऑफ डेव्हिड म्हटली जाते. डेव्हिडचा मुलगा किंग सोलोमन याने तेथे टेम्पल माऊंट डोंगरावर पहिले देऊळ बांधले. ते बॅबेलिअन लोकांनी तोडले. त्यानंतर जे देऊळ बांधले ते रोमन राज्यकर्त्यांनी तोडले. पुढे सहा शतकं ही जागा दुर्लक्षितच राहिली. ख्रिस्ताअगोदर १९ शतके राजा हेरॉड याने टेम्पल माऊंट बराचसा सपाट केला होता. त्याने चारही बाजूंनी भक्कम भिंत बांधून शहराभोवती तटबंदी केली. त्याने बांधलेल्या देवळाच्या पश्चिमेकडील भिंतीचा भाग वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल म्हणून परिचित आहे. ४८५ मी. लांबी असलेल्या या भिंतीचे पहिले दगड हेरॉड राजाच्या काळातले, तर पुढच्या शतकात त्यावर खलीफ उमेदच्या कारकीर्दीतले बांधकाम झाले आणि आता जो भाग आहे ते दगड ऑटोमन काळातले आहेत असे उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून सांगितले जाते.
वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे वेगवेगळ्या राजवटीत तत्कालीन वस्त्या होत गेल्या. त्यामुळे टेम्पल माऊंटवर ज्यूईश, आर्मेनिअन, ख्रिश्चन व मुस्लीम असे चार विभाग आढळतात. पण आता सर्व जण मिळूनमिसळून असतात. ज्यूईश क्वार्टर्समध्ये वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल आहे. ती हेरॉड राजाच्या काळात बांधलेल्या सिटी वॉलचा राहिलेला भाग आहे. इथल्या होली लँडचा हा ५७ मी. लांबीचा दर्शनी भाग असल्याने ज्यू बांधवांसाठी तो अतिपवित्र भाग आहे. मागील बाजूला डोम रॉकवर अल् अक्सा ही मुस्लीम काळातील निळ्या रंगाची अष्टकोनी मशीद आहे. मुस्लीम काळात त्यांच्या इमारतीपेक्षा कोणतीही वास्तू उंच असता कामा नये, असा नियम होता. त्यामुळे ज्यूंचे प्रार्थनास्थळ सेनेगॉग कमी उंचीवर आहे. येथे जगभरातील ज्यू बांधव प्रार्थना करून आपली मनोकामना कागदावर लिहून वॉलच्या दगडांमध्ये असलेल्या फटीत अडकवतात. येणारे पर्यटकही यात सामील होतात. असं म्हणतात की, रोज रात्री ज्यू धर्मगुरू, रबाय सर्व चिठ्ठय़ा गोळा करून एका बॉक्समध्ये ठेवतात. ठरावीक दिवशी त्या सर्व वाचतात व सन्मानाने त्या पुरतात.
मुस्लीम क्वार्टरमध्ये आपण ओल्ड सिटीच्या जाफा गेटमधून प्रवेश करतो. रस्त्यापलीकडे डेव्हिडस् पॅलेस आहे. शत्रूला सिटीमध्ये सहज प्रवेश करता येऊ नये यासाठी गेट काटकोनाकृती आहे. कारण वेगाने येणारे घोडेस्वार आत शिरल्याबरोबर समोरच्या भिंतीवर आपटून जखमी होणार, शिवाय वॉलमध्ये असलेल्या भोकांतून शत्रूवर तोफा व गरम तेलाचा मारा होत असे. आत आल्यावर आपल्याला राजा डेव्हिडचा हार्प वाजवत असलेला पुतळा दिसतो. जरा वरच्या बाजूला एका इमारतीत ‘लास्ट सपर’ घेऊन आपल्या अनुयायांबरोबर चर्चा करीत असलेल्या येशूला इथे धर्मगुरूंनी अटक केली होती.
त्या काळी अरब देशातील सीरिआअंतर्गत जॉर्डन, इस्रायल, येमेन हे देश होते, पण इंग्रजांनी हे सर्व भाग वेगवेगळे केले. येशूचे जन्मस्थान बेथेलहॅम हे इंग्रज कारकीर्दीतल्या करारानुसार आताच्या सीरिआमध्ये आहे. सीरिआमध्ये अरब मुस्लिमांचे प्राधान्य आहे. तेथे जाताना आपल्याला पासपोर्ट घेऊन जावे लागते. बेथेलहॅम हेदेखील जेरुसलेमसारखेच विविध धर्माच्या राज्यकर्त्यांकडे होते. त्या वेळी तिथे देवळं बांधली गेली, मशिदी होत्या, तर कधी राजांनी जागेला भेट दिली, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ख्रिश्चन व मुस्लीम बांधवांसाठी पवित्र स्थळ आहे. सीरिआमधील ज्युडिअन डोंगरावरील एका गुहेत येशूचा जन्म झाला होता. चर्च ऑफ नॅटिव्हिटीच्या ग्रीक भागात थोडय़ा पायऱ्या उतरून वाकूनच गुहेकडे जावे लागते. गुहेच्या तोंडावर जमिनीवर १४ कोनी चांदणी आहे. शेजारीच येशूचा पाळणा तसेच गाईगुरांचा गोठाही आहे.
त्या गुहेवर कॉन्स्टन्टाइन राजाची आई हेलेना हिने ३२७ साली ‘चर्च ऑफ नॅटिव्हिटी’ हे पहिले चर्च बांधले होते. पुढे काही वर्षांनी ते आगीत जळाले. पुढे ग्रीक ऑथरेडॉक्स राजांनी आपले चर्च बांधले. त्यानंतर बायझांटिन राज्यकर्ते आले, पण अधिकाऱ्यांनी वास्तूला धक्का लावू नये अशी ताकीद दिल्याने चर्च अबाधित राहिले. सध्याचे जे चर्च आहे ते १८व्या शतकातले आहे. या चर्चमध्ये ग्रीक ऑथरेडॉक्स, रोमन कॅथलिक, आर्मेनिअन असे तीन विभाग आहेत. तीनही पंथांचे लोक एकमेकांच्या भावना जपतात आणि प्रार्थनावेळेस मान देतात. रोमन भागात राणी हेलेनाच्या काळातील जमिनीवरील मोझेकचे डिझाइन आवर्जून दाखवले जाते. बाहेर चर्चचा मोठा बेल टॉवर आहे. या आवारात ख्रिसमस ट्री दोन महिने ठेवला जातो. तीनही पंथांतले लोक वेगवेगळ्या महिन्यात नाताळचा सण साजरा करतात.
येशू बेथेलहॅम येथे जन्मला असला तरीही तो आपले विचार, मतं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सीरिआ, जॉर्डन, इस्रायल परिसरात फिरत होता. त्याची शिकवण रोमन धर्मगुरूंना अजिबात पसंत नव्हती. त्याचा सर्व इतिहास इथेच जेरुसलेमच्या ओल्ड सिटीमध्येच झाला. डोलारोसा हा मुस्लीम क्वार्टर्समधला भाग. येथून त्याच्या खडतर अशा शेवटच्या प्रवासाला सुरुवात झाली असं म्हटलं पाहिजे. इथल्या जजमेंट हॉलमध्ये त्याला देहदंडाची शिक्षा फर्मावली गेली. तिथे त्याला जड लाकडाचा क्रॉस देण्यात आला. याची चित्रे जजमेंट हाऊसमध्ये आहेत. जिथे सुळावर चढायचे होते त्या डोंगरापर्यंत त्याला क्रॉस घेऊन जायचे होते. तो नेताना तो दोन-तीन वेळा पडला त्या जागा दाखवल्या जातात. वाटेत एके ठिकाणी त्याची आई मेरी आपल्या लेकाची दयनीय अवस्था पाहून खिन्न झाली.
सॉलोमन या रहिवाशाला त्याची दया येऊन त्याने क्रॉस वाहून नेण्यास थोडी मदत केली. पुढच्या टप्प्यावर वेरोनिका नावाच्या मुलीने आपल्या स्कार्फने त्याचा घाम पुसला होता. तिला स्कार्फ उघडल्यावर येशूचा चेहरा त्यावर दिसला. त्या दिव्य शक्ती स्कार्फचा उपयोग तिने पुढे रुग्णांचे आजार बरे करण्यासाठी केला. असं म्हणतात की, ख्रिस्तानंतर रोमन धर्मगुरूंनीही त्याचा उपयोग केला. तिथून पुढे त्याच्या अंगावर फक्त कमरेचे वस्त्र, पाठीवर शालीसारखा रोब दिला व डोक्यावर खिळ्यांचा मुकुट दिला. अशी त्याच्या प्रवासाची नऊ ठिकाणे नंबरानिशी मुस्लीम क्वार्टरमध्ये आहेत.
नंतरचे ठिकाण म्हणजे सुळावर चढवलेले टेकाड. नंतरच्या काळात तेथे वस्ती वाढत गेली, त्यामुळे ती जागा जरी ख्रिश्चन क्वार्टर्समध्ये असली तरी तिथल्या वस्तीमुळे आपल्या पटकन लक्षात येत नाही. ज्या दगडावर येशू सुळावर चढला त्याला स्पर्श करण्यासाठी क्रॉसखाली असलेल्या खिडकीपर्यंत वाकावे लागते. खिळे ठोकून मरण पावल्यानंतर त्याला खाली उतरवून मेरीने संगमरवरी चौथऱ्यावर ठेवले. स्वच्छ केलेल्या त्या पवित्र फरशीवर लोक फुलं, एखादी वस्तू ठेवून आशीर्वाद घेतात.
सुळावर मरण पावल्यानंतर त्याला पांढऱ्याशुभ्र वस्त्रात गुंडाळून जवळच दफन करण्यात आले. राणी हेलेना हिने दफन स्थानावर चर्च बांधले. ते २१०० वर्षांपूर्वीचे चर्च अजूनही व्यवस्थित आहे. मृत्यूनंतर तीन दिवसांनी ईस्टरला देवदूतासह स्वर्गात जाण्यासाठी येशू परत जीवित झाला ते आपणा सर्वानाच माहीत आहे. आपण या सर्व ठिकाणी भेट देऊ शकतो. अखेरच्या प्रवासातील शेवटची चार ठिकाणं, म्हणजे सुळावर चढवल्यापासून ते दफनाची जागा या सर्व जागा आता चर्च ऑफ होली सेप्शर या वास्तूत ख्रिश्चन क्वार्टर्समध्ये आहेत. लेना चर्चमध्ये वेळेअभावी जाता आले नाही. या क्वार्टर्समध्ये जास्त करून वेगवेगळी चर्चेस, म्युझियम्स आहेत आणि पाद्री व नन्स यांची निवासस्थानं आहेत.
कुराणाप्रमाणे अल् अक्सा म्हणजे अतिदूरची मशीद. या ठिकाणी महंमदला अल्लाचा साक्षात्कार झाला होता म्हणून तो डोंगर पवित्र मानला जातो. हारम् अश् शरीफ आणि ही मशीद त्या डोंगरावर आहे म्हणून तिला डोम ऑफ रॉक म्हटले जाते. आधी ती संपूर्णतया लाकडी होती. आठव्या शतकात खलीफ राशिदने बांधली होती. ही नेमक्या कोणत्या मुस्लीम खलिफाच्या काळात बांधली गेली हे नक्की सांगणे कठीण आहे असे म्हणतात. नंतर दोन-तीन वेळ झालेल्या भूकंपात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती व प्रत्येक खलिफाच्या काळात नव्याने बांधली गेली. साहजिकच आपली शान दाखवण्यासाठी कधी मिनारे, कुठे बगिचा, तर मोठे प्रार्थनागृह असे प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार त्यात वाढवत गेले.
आताची अष्टकोनी मशीद २०व्या शतकाच्या सुरुवातीला बांधली गेली. दर्शनी भागावर निळ्या, हिरव्या रंगाच्या प्लास्टरवर तशाच मोझेक टाइल्स, आरसे लावून डिझाइन्स् केलेली आहेत. खिडक्या व दरवाजे स्टेनड ग्लासचे असून ते पाहण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढून चौथऱ्यावर जावे लागते. पण तत्पूर्वी खाली हातपाय धुण्यासाठी एका हौदाभोवती नळांची व्यवस्था आहे. मशिदीमध्ये मुस्लिमेतर लोकांना जाता येत नाही. या डोंगराच्या ऑलिव्ह माऊंटनच्या बाजूलो रोमन काळातील कमानी आहेत.
ओल्ड सिटीमध्ये एकटेच फिरायचे असल्यास टुरिस्ट सेंटरमधून व्यवस्थित माहिती घेऊन गेलेले बरे. कारण अरुंद बोळ, उजवी डावीकडे वेडीवाकडी वळणे, भरपूर दुकानं अशा भूलभुलैयामध्ये हरवण्याची शक्यता बरीच असते. रात्रीच्या वेळेस झगमगती वेस्टर्न वॉल छान दिसते. शिवाय बाहेर किंग डेव्हिड पॅलेसमध्ये साऊंड अँड लाइट शोसाठी गाइडबरोबर जाणे उत्तम. रात्री दिव्यांच्या झगमगाटात जेरुसलेम छानच दिसते. येशूचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे.