‘मेरा भारत महान’, ‘माझा देश माझे गाव’ यापलीकडे कधी लांब जायची वेळ आली तरीही मी, ‘‘मला परदेशवारीची क्रेझ नाही,’’ अशा शब्दांत तो विषय उडवून लावीत असे. अगदी माझ्या गावची बरीच मंडळी व नातेवाईक सिंगापूर- मलेशिया- युरोपला जाऊन फिरून आली. यात्रा कंपनीबरोबर गेल्यावर परदेशी वावरण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात आलेला मी स्वत: बघितला. मात्र मला जावे-जावेसे, हवे-हवेसे वाटतच नव्हते. परदेशवारी न करण्याचे कारण सांगताना अगदी अमेरिकेहून मला माहेरगावी जाण्याचा आनंद अधिक काळ होईल असे मी म्हणत असे. त्यावर इतर नातेवाईक हसत असत. माझ्या माहितीतील एक व्यक्ती २७ देशांना भेट देऊन आली व मला म्हणाली ‘‘कोल्ह्यला द्राक्षे आंबट म्हणून तू परदेशाचे आकर्षण दडवतेस. अगं, हल्ली केजीतली मुलेसुद्धा ए फॉर अमेरिका म्हणतात. तू तुझ्या ‘भारत छोडो’ लेखात लिहिले होतेस ना. परदेशी पळायची स्वप्ने अनेकांना कळत्या वयापासून अस्वस्थ करतात.’’ ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘कोकणातले लोक मुंबईला येतात, मुंबईचे बंगलोरला, बंगलोरचे अमेरिकेला पळतात. बिहारी मुंबईतल्यांना नकोसा, भारतीय व्यक्ती परदेशी नकोश्या असतात. देश सोडून परदेशी जाण्यातली काहीशी गूढ अगतिकता मी जाणते.’’ मी स्थलांतराबद्दल विचार करीत म्हणाले, ‘‘मग जाऊन बघना परदेशी, असे काय आहे जे या लोकांना भारतात परत येण्यापासून थांबवते. कोणते आकर्षण असे स्थलांतरितांचे जीवन जगायला भाग पाडते.’’ ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘मला पर्यटनाची खूप हौस कधीच नव्हती. पण कधी काळ बदलतो. रिकामा वेळ खायला उठतो.’’
अपरिहार्य बदल सामोरे येतात. सहलीची नशा चढते. आपल्याच घरात ‘परदेसी’ वाटू लागते. मग आपण टूर अॅडिक्ट होतो. मी अमेरिकन व्हिसाला अर्ज केला व टूर बुक केली. घाबरतच मी घरचा उंबरठा ओलांडला.
अमेरिकेत जायला नेताना चालतात त्या मोठमोठय़ा चाके असलेल्या बॅगा आणल्या. कपडे स्वेटर्स, मफलर, कानटोप्या, पायमोजे, शाल वगैरे सामान भरले. परदेशी खर्चासाठी दोनशे डॉलर्स विकत घेतले. टूर जेवणखाणसहित होती. अगदी जाहिरातीत खिशात हात घालावा लागणार नाही असे सांगितले होते. पण अशा जाहिराती विधानांवर आंधळा विश्वास ठेवून चालत नाही, खर्च होतोच.
अमेरिकावारी हे महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय पर्यटकांचे स्वप्न असते. माझे ते स्वप्न पूर्ण झाले आहे. न्यूयॉर्क विमानतळावर जेव्हा मी पोहोचले, तो माझ्या जीवनातील आनंदाचा परमोच्चबिंदू होता.
परदेशवारीची सुरुवात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-टू टर्मिनलवरून झाली. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की टी-टू टर्मिनल खूप सुंदर आहे. कला व म्युरल्स, खांबांची नक्षी, झुंबरे, ऐसपैस जागा, हे सगळे पाहून मस्त वाटते. झाडाची हिरवीगार भिंतसुद्धा आवडली. हा परिसर खूप मोठा आहे, पण व्हील चेअर्स, बॅटरी ऑपरेटेड सिक्स सीटर्स गाडय़ा या सगळ्या सोयी असल्यामुळे वृद्ध तसंच आजारी व्यक्तींची गैरसोय होत नाही. विमान प्रवास व्हाया दुबई होता. विमानात कंटाळा येतो म्हणतात, पण मला आला नाही, डोळ्यात झोप नव्हती. स्वप्ने होती.
न्यूयॉर्कच्या विमानतळावर पोहोचल्यावर काहीतरी वेगळे दिसेल असे वाटले होते. प्रत्यक्षात मुंबईतच असल्यासारखे वाटत होते. कफ परेड, व्हीटी या भागात वावरल्यामुळे मला न्यूयॉर्कला ‘न्यू’ काही वाटत नव्हते. अर्थात ही सुरुवात होती. सहलीची नशा हळूहळू चढणार होती. हवा अजिबात थंड नव्हती. बाहेर विमानतळावर उतरल्याबरोबर डंकीनडोनट्सची कॉफी पिऊन मस्त वाटले. मात्र आपल्या भारतीय चहाची आठवण आलीच. शक्य असते तर संपूर्ण ५२ लोकांच्या कंपूला चहा पाजला असता मी! भारतीय हॉटेलच्या रूममध्ये शिफ्ट झालो. जेटलॅग वगैरे काही जाणवला नाही.
भारतीय वेळेत व या वेळेत फरक होता. आयएसडी फोनसाठी कार्डे घेतलेली होती. पण कुणाचेच मोबाइल फोन सुरू झाले नव्हते. हॉटेलातून फोन केला की नीट पोहोचले, तर ‘काळजी न करणाऱ्यांना’ फोन करायचे एक हजार रु. (१५ डॉलर्स) बिल आलेले बघून मलाच काळजी वाटू लागली. हॉटेल चांगले होते. सहप्रवाशांच्या ओळखी झाल्या.
संध्याकाळी न्यूयॉर्कची सहल केली. टाइम्स स्क्वेअरमधील रोशनाई बघितली. ज्या गोष्टी दुसऱ्या दिवशी बघायच्या आहेत त्या ओझरत्या दाखवल्या. न्यूयॉर्कची माहिती सांगितली. न्यूयॉर्कला बिग अॅपल म्हणतात, कारण ते बिझनेस सेंटर आहे व सर्वाना हवेहवेसे वाटणारे शहर आहे. न्यूयॉर्क व न्यूजर्सीत खूप भारतीय लोक राहतात. रात्री भारतीय जेवण मिळाले. तुम्ही या रस्त्यावर फिरा, रोषणाई बघा असे आम्हाला सांगितले गेले होते. मात्र मांजराच्या पिलाप्रमाणे आम्ही बसभोवती घोटाळत होतो. परक्या देशात चुकायची भीती वाटत होती.
सभोवतीच्या दुकानांमध्ये ‘मेड इन चायना’ व इतरही वस्तू होत्या, श्रीमंती शहर जाणवत होते. अमेरिकेबद्दल उत्सुकता होती. अमेरिकेत भारतीय, चिनी लोकसुद्धा खूप होते.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजेच स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहण्यासाठी गाडी दूर अंतरावर पार्क करून वॉटर टॅक्सीने किंवा क्रुझने बेटावर जावे लागते. फक्त तीन हजार तिकिटे रोज विकली जातात. क्रुझने जाऊन म्युझियम व मुख्य पुतळा अशा दोन स्टॉप्सवर उतरून स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा संपूर्ण अनुभव मिळतो. रिमझिम पाऊस पडत होता. या बेटावर पुतळ्याच्या वरच्या चौथऱ्यापर्यंत जायचे असेल तर ऑनलाइन तिकीट आठवडाभरापूर्वीच बुक करावे लागते, कारण इथे सुरक्षाव्यवस्था कडक असते. त्यामुळे तसे बुकींग केले नसेल तर बाहेरून फेरी घालून (चालत जाऊन) ही मूर्ती बघता येते. भव्य निळसर रंगाची आहे.
न्यूयॉर्कमधील वॉलस्ट्रीट, न्यू स्टॉक एक्स्चेंज, ब्रुकलीन ब्रीज, मॅनहॅटन ब्रीज, मॅडिसन स्क्वेअरचे बसमधूनच दुरून दर्शन घेतले. ग्राऊंड झीरो म्हणजेच २६/११च्या ट्विन टॉवर्सवरच्या हल्ल्याच्या ठिकाणी एक मोठा तलाव बांधला आहे. जिथून चारही बाजूला पाणी पडून खाली दिसेनासे होते. सर्व बाजूच्या भिंतींवर हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींची नावे ग्रॅनाइटमध्ये कोरलेली आहेत. (ट्विन टॉवर्सची जागा मोकळीच सोडली असली, तरी मूळ टॉवर्सच्या मागे दुसरे अधिक उंच टॉवर्स तयार झालेले आहेत. काही होत आहेत. या हल्ल्यांत इतका संहार झाला, तरीही त्यातूनही टिकाव धरलेले एक झाड जीवनाचा प्रवाह कसा अखंड सुरू असतो हाच संदेश देत उभे आहे. या जागेला ग्राऊंड झीरो म्हणतात. तिथे खरंच झीरो स्टेट अनुभवता येते. संपूर्ण शांतता असते. न्यूयॉर्कमध्ये बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत, पण वेळ कमी पडतो.
व्हाइट हाऊस व एम्पायर स्टेट बिल्डिंगला जाऊन ८६व्या मजल्याच्या वॉशिंग्टन डीसीला ???प्रवास सुरू झाला. नासा स्मिथसोनियम इन्स्टिटय़ुशनला भेट दिली. शास्त्रज्ञ होणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते, त्यामुळे इथली भेट खूपच छान होती.
कॅपिटॉल हिलला भेट देऊन नंतर व्हाइट हाऊसचे दर्शन घेतले. ग्रुप फोटो काढला. व्हाइट हाऊसला कडेकोट सुरक्षा असते. कधी ताटकळत बसावे लागते. व्हाइट हाऊसला भेट देणे म्हणजे ते कंपाऊंड बाहेरून बघणे होते.
वॉशिंग्टन मोन्युमेंट, दुसऱ्या महायुद्धाचे स्मृतिस्तंभ बघितले. जेफरसन मेमोरियल व शेवटी अब्राहम लिंकन मेमोरियल बघून ते भव्य अशा त्या इमारतींचे राज्य बघून उगीचच यहुदी चित्रपटाची आठवण झाली. उंच असे राजवाडे, श्रीमंत साम्राज्य, तरीही असफल होणारे प्रेम व खूप देशभक्ती!
ऐसे विराने में इक दिन
घुटके मर जायेंगे हम
जितना जी चाहे पुकारो
फिर नहीं आयेंगे हम
ही स्मारके म्हणजे अमेरिकन लोकांच्या त्याग, देशभक्तीची प्रतीके आहेत. सर्व मोन्युमेंट्स उत्तम स्थितीत आहेत.
सकाळी हॉटेलमधून प्रवास सुरू केला. डाव्या बाजूला समुद्र सोबतीला होता. नायगाराच्या दिशेने जात असताना हर्शे चॉकलेट वर्ल्डला भेट दिली. मनात आलं,
‘‘चॉकलेट, लाईमज्यूस,
आईस्क्रीम, टॉफिया,
पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ
ये कौनसा मोड है जिंदगी का’’
अर्थात कवितेत असं म्टलं तरी प्रत्यक्षात चॉकलेट ‘न’ आवडणारी व्यक्ती शोधून दाखवा. कोकोची दुनिया न्यारीच आहे. कोकोच्या बियांना पूर्वी मंकी बीन्स म्हणायचे, कारण माकडे या बिया खाऊन विचित्र वागायची. या मंकी बीन्सनी जगाला आज वेड लावले आहे.
नायगारा धबधब्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडतात. मॉरिशसला जशी सातरंगी पृथ्वी आहे, तसे या धबधब्यातील पाणी सातरंगी आहे. शिवाय तुषारांमुळे तयार झालेली सुंदर इंद्रधनुष्ये केव्हाही बघता येतात. कॅनडा साइडकडचा (टोरेंटोकडून) नायगारा अमेरिकन बाजूनेही बघता येतो. जीवन कृतार्थ होणे व डोळ्याचे पारणे फिटणे त्यामुळे अनुभवता येते. वारा, पाणी व आपण, बाकी काहीही जाणवत नाही. ‘मेड ऑफ मिस्ट’ नावाच्या एका क्रुझवरून धबधब्याच्या अगदी जवळ जाता येते. व्हर्ल ऑफ विण्डसने अगदी धबधब्याखालीसुद्धा जाऊन तो अनुभव घेता येतो.
समुद्रकिनारे, जलचरांसाठी मियामी हे प्रसिद्ध शहर आहे. गोव्यासारखे भासणारे व तरीही खडकांनी भरलेले मियामी हे बहुतांशी अमेरिकन लोकांचे सेकंड होम शहर आहे. इतर अमेरिकन भागात बर्फ पडत असतानाही येथील वातावरण उबदार असते. श्रीमंतांच्या बोटी व क्रूझ येथे आहेत. लॉस वेगास एपकॉट सेंटर, क्रुकेड स्ट्रीट, मियामी सर्व बघून तृप्त झाले. अमेरिकेचा अनुभव विसरता येणे शक्यच नसते. माझ्या दृष्टीने त्यातला नायगारा फॉल्स हा सर्वोत्तम अनुभव आहे.
शुभांगी पासेबंद – response.lokprabha@expressindia.com