गडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती. डावीकडून नाणेमावळ्याच्या सदाबहार नाणेघाट घाटघरची बाजू.. समोरून दिसणारी देवदांडय़ाची जणू अंगावर येणारी रांग..अंजनावळ्याचे वऱ्हाडी .. उजवीकडे लांबवर पसरत गेलेला हरिश्चंद्र, कलाडगड, रोहिदास, कळसुबाई.. न्हापता.. काय काय नि काय काय..
माळशेज घाटाने जुन्नरकडे जाताना चहुबाजूला उंचच उंच डोंगरमाथे दिसतात. सह्यद्रीचं रूपडं हळुवारपणे कोकणापासून ते उत्तुंग धुरंधर बेलाग कडय़ांपर्यंत हा हा म्हणता पालटून जाताना दिसतं, मुरबाड मागे जातं तसा उजवीकडे नाणेघाटचा नानाचा अंगठा खुणावू लागतो. त्याच्या पाठोपाठ जीवधन व खडापारशी हळूच प्रकट होतो. टोकावडे, वैशाखरे पाठीमागे गेल्यावर उजवीकडून आत गेलेल्या छोटय़ाशा वाटेला एक कमान दिसायला लागते.. ‘किल्ले भैरवगड गुंफा मार्ग’ या नावाची.
माळशेजातून जाता-येता मान वळवून दुखत राहिली तरी एसटीच्या खिडकीतून दिसेनासा होईपर्यंत डोकावून या भैरवदादाला पाहिल्याखेरीज लक्ष लागायचं नाही..
खूप दिवसांपासून हा ट्रेक करायचं मनात होतं आणि विशालने प्लान केल्याने आयती संधी पण मिळाली होती. रात्री अकराला मुंबईहून निघालो आणि रात्री दोन-अडीचच्या सुमारास भैरवगडाच्या पायथ्याच्या मोरोशी या गावात येऊन पोहोचलो. किल्ले भैरवगड गुंफा मार्ग अशा नावाने एक कमान इथे दिसते. खरं नाव भैरमगड असलेल्या या किल्लय़ाला इथपर्यंत आपण भैरवगड म्हणूनच ओळखत असतो. भैरवगडावर जायला आपल्याला इथूनच आत जावे लागते. सुरुवातीला एकदम सरळ चालीची पाऊलवाट लागते आणि डावीकडे वळून पुढे जाऊन जंगलात शिरली की खरी चढाई चालू होते. हा रस्ता पूर्ण जंगल व पठारावरून जातो. एक सुकलेला ओढा, पाऊलवाट बऱ्यापैकी मळलेली आहे. पण ती बिनचूक व नीट पकडली गेली नाही तर चुकून लांबलचक तंगडतोड व्हायलाही वाव भरपूर आहे. आख्खा एक डोंगर पार करून यावं लागतं मूळ वाटेवर यायला. रात्री अडीचच्या सुमारास आम्ही मोरोशीला पोचलो. आणि तडक ट्रेकला सुरुवात केली.
किर्र शांतता. ती एकसुरात भेदणारा रातकिडय़ांचा आवाज. जंगलाच्या झाडीतून दिसणारं टिपूर चांदणं. वातावरणासोबत हलकेच जाणवणारी थंडी. हे सगळं एकत्र जमून येतं तेव्हा क्या बात है!!
विशाल भैरवगडाच्या वारीचा मुरलेला गडी. त्यामुळे अंधाऱ्या रात्रीत पण त्याने अगदी बरोबर वाट पकडून वर माचीपर्यंत आणलेलं होतं. इथे काही वर्षांपूर्वी वस्ती होती. पण इथे पाणी कमी-जास्त उपलब्ध होऊ लागलं किंवा रोजगाराची इतर ठिकाणी सोय झाली या ना त्या काही कारणांमुळे इथलं गाव गडाच्या पायथ्याशी स्थलांतरित झालं. तिथल्या वस्तीच्या उद्ध्वस्त झोपडय़ांचे वासे अजूनही तिथेच आहेत. असो.
एव्हाना पहाटेचे साडेचार झाले होते.. दीड ते दोनच तासात भारी चढाई झाली होती. सगळ्यांनी दोन तास मस्त ताणून दिली. थोडंसं उजाडल्यावर आजूबाजूच्या पुसटलेल्या डोंगरांच्या आकृत्या हळूहळू स्पष्ट दिसायला लागल्या. इथे येईपर्यंत आपल्याला भैरवगड अजिबात नजरेत येत नाही.. वस्तीच्या पुढच्या वाटेवर सरळ जाऊन उजवीकडे वळालो आणि बस्स थोडंसंच पुढे जंगलातल्या कारवीतून जाणारी घसरणीची वाट चढून गेलो की ही भली मोठी भैरवगडाची कातळकाया नजरेसमोर आली.. आतापर्यंत लपून राहिलेल्या या अभेद्य भिंतीवजा गडाला पाहून आता खरा उत्साह वाटायला लागला. वाटेला उजव्या हाताला पाण्याचं टाकंही आहे.. खडे रॉकपॅचेस चढत जाताना आता आपल्याला वऱ्हाड आणि मागचा देवदांडय़ाचा डोंगर यामधल्या भैरवगडाच्या खऱ्याखुऱ्या रूपाचं दर्शन घडतं. आ वासून उभा असलेला तो कातळकडा खरोखरच किती अजिंक्य असावा याची कल्पना त्याच्या आयताकृती गुहेच्या पायथ्याशी उभा राहूनच करता येईल. इथून गडमाथा गाठायला पूर्वी व्यवस्थित पायऱ्या होत्या. पायथ्याला गुहापण होत्या. परंतु ब्रिटिश राजवटीत इतर दुर्गाप्रमाणे इथेही तोडफोड तंत्र वापरून गडावर जायची वाट बिकटपणे बंद करून टाकली गेली.. चाळीस ते पन्नास फूट चढावरच्या काही पायऱ्या व खोबणीवजा जागा वापरून वर गेलो की एक आयताकृती गुहा लागते. जवळपास रांगतच इथून आत जावं लागतं. पुढे या गुहेतून वर चढायला थोडं स्किल वापरावं लागतं. नंतर अजून काही पायऱ्या. इथून गडमाथा गाठायचा रस्ता वाईट पद्धतीने फोडून काढलेला आहे. आम्ही मागच्या गुहेमध्ये सगळं जास्तीचं सामान ठेवलं आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी छोटय़ा सॅकमध्ये घेऊन पुढील चढाईची तयारी केली.. पायऱ्या फोडून काढलेल्या ठिकाणी फ्री क्लाईम्ब करून विशाल वर चढला. आणि मी खाली बो लाइन अँकरिंग करून एकेकाला वर पाठवायला थांबले.. दगडाच्या बेचकीत स्वत:ला फक्कड अँकर करून विशालने बैठक मारली होती.. एकएक करत सगळे वर आले.. इतक्यात पुढे वर जाणाऱ्या वितभर पायऱ्या समोर आल्या.. पुन्हा निवडुंगाच्या काटय़ाकुटय़ाच्या घसाऱ्यातून वर जातजात गडमाथा गाठला. सूर्यदेवांची टळटळीत कडाक्याची वेळ होत आली होती.. गडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती. डावीकडून दिसणारी नाणेमावळ्याच्या सदाबहार नाणेघाट घाटघरची बाजू.. समोरून दिसणारी देवदांडय़ाची जणू अंगावर येणारी रांग.. अंजनावळ्याचे वऱ्हाडी .. उजवीकडे लांबवर पसरत गेलेला हरिश्चंद्र, कलाडगड, रोहिदास, कळसुबाई.. न्हापता.. काय काय नि काय काय.. आठवणींमध्येही मन अजून नाही भरत. चोहीकडे फक्त सह्य़कडे.. जणू आव्हान देणारे.. सांगावे देऊन अंगाखांद्यावर खेळवणारे.. दूरवर जाणारा मुरबाडपर्यंतचा कोकणपण दिमाखात चमकत होता.. खालच्या मुरबाड-माळशेज रस्त्यावरची वाहनांची लगबगही जाणवत होती आणि इथे माथ्यावर आजूबाजूची निसर्गाची निरवता मनात भरत होती. एकाच वेळी दोन भिन्न गोष्टींचा अनुभव शब्दांत न सांगता येणारा.
आता खाली उतरायची वेळ झाली होती. जिथे विशालने फ्री क्लाईम्ब केलं होतं तिथे आता रॅपलिंग करत एकेकाला उतरायचं होतं. उतरताना डावीकडे चढून पाण्याच्या टाक्यातून पाणी भरून घेतलं. पुन्हा एकदा सभोवतालच्या परिसराला डोळ्यात साठवून घेतलं, आणि झपझप चालीने वाट तुडवत खाली मोरोशीला आलो.. गावातच एका झोपडीवजा ‘हॉटेलात’ मस्तपैकी गरमागरम पोळी, शेवभाजी, खीर अशा मेनूवर ताव मारला आणि असंख्य आठवणी भिजलेल्या मनाने परतीच्या प्रवासाला लागलो.
ट्रेक संपला होता. पण मन अजूनही अजिबात भरलेलं नव्हतं. नानाच्या अंगठय़ावरून नेहमीच बघून कुतूहल देऊन जाणारी भैरवाच्या कडय़ाची वाट आत मनावर भुरळ पाडून गेली होती. पुन्हा पुन्हा ती बोलावत राहील. प्रत्येक सांगाव्याला मान देऊन मावळला वेडावलेली पावलेही मोरोशीकडे वळत राहतील.
शिल्पा बडवे – response.lokprabha@expressindia.com