आमची ब्रॅन्सनची ट्रिप मिझुरीमधल्या सेंट लुईसपासून सुरू झाली. ‘ट्रिपल ए’च्या आणि इंटरनेटच्या मदतीने चार दिवसांची ट्रिप आखून झाली होती. ठरलेल्या दिवशी आम्ही आठ जणांनी दोन व्हॅन्समधून सकाळी आठला प्रस्थान ठेवलं. आमच्या ग्रुपमध्ये माझी ९४ वर्षांची व्हील-चेअर (जास्ती चालायला) वापरणारी आई, १३ वर्षांची माझी नात आणि तिची मैत्रीण आणि अधेमधे आम्ही पाच माणसं होतो. प्रवास ४-५ तासांचा.

अमेरिकेतल्या मिझुरी राज्यात ओझार्क पर्वतांच्या रांगांमध्ये चिमुकलं ब्रॅन्सन वसलेलं आहे.

रूबेन ब्रॅन्सन नावाच्या पोस्ट मास्टरच्या नावावरून १८८० मध्ये या शहराचं ब्रॅन्सन नाव पडलं. ओझार्क्‍सचं हृदय मानलं जाणारं ब्रॅन्सन आपलं छोटेखानी, हिलस्टेशनचं रूप जरी सांभाळून असलं, तरी येणाऱ्या प्रवाशांचे लोंढे सहजपणे, आपलेपणाने झेलत आहे. १०-१५ हजार लोकवस्तीचं हे छोटंसं शहर वर्षांला साधारणपणे आठ, दहा लाख प्रवाशांचं हसत, हसत स्वागत करतं.

ब्रॅन्सनच्या १८ होल्सच्या अ‍ॅवॉर्ड-विनिंग गॉल्फ कोर्सच्या बॉर्डरला लागून असलेल्या ‘थाउजंड हिल्स गॉल्फ रिसॉर्ट आणि कॉन्फरन्स सेंटर’च्या दोन लॉग केबिन्स आम्ही बुक केल्या होत्या. प्रत्येक केबिनला दोन सेल्फ कंटेन्ड बेडरूम्स, किचन, डायनिंग हॉल, आणि फॅमिली रूम. फॅमिली रूममध्ये आतून दोन्ही केबिन्स वेगळ्या करणारं सरकतं पार्टिशन. किचनमध्ये डिश वॉशर (साबणासहित), मोठी कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह ओव्हन, टोस्टर ओव्हन, ब्लेंडर, कुकिंगची भांडी, क्रोकरी, कटलरी, फळं, भाज्या, दही, दूध यांनी भरलेला फ्रिज, जरा बाजूला वॉशर त्याच्या डोक्यावर ड्रायर, साबण, डायनिंग टेबलावर कोस्टर्स, मधोमध जॅम, जेली, बटर,  ब्रेड, ताज्या फळांनी भरलेला फ्रूट बोल असं सारं काही. बेडरूम्स, बाथरूम्सही सुसज्ज. पुढचे तीन दिवस त्या दोन्ही केबिन्स आमची घरंच झाली होती. केबिन्सच्या व्हरांडय़ात बसलं की मोठे मोठे वृक्ष, पक्ष्यांचा किलबिलाट मनाला आल्हाद देई.

ब्रॅन्सनचा टूरिस्ट आकर्षण  म्हणून उदयकाल १९८३ पासून सुरू झाला. रॉय क्लर्क सेलेब्रिटी थिएटर उघडलं आणि वेगवेगळे कंट्री म्युझिक स्टार्स तिकडे कार्यक्रमासाठी जाऊ  लागले. १९९२ मध्ये अ‍ॅन्डी विलियम्स, १९९४ मध्ये ग्लेन कॅम्पबेल, १९९८ मध्ये टोनी ओलँडो आणि बॉबी व्हिन्टोन यांनी आपापली थिएटर्स उघडली. १९९१ मध्ये इंटरनॅशनल टी.व्ही. वर ब्रॅन्सन कंट्री म्युझिकचं कॅपिटल म्हणून उल्लेखिलं गेलं. म्युझिकच्या शोजमध्ये एल्विस प्रेसली, मेरेलिन मन्रो, फँ्रक सिनात्रा, ब्ल्यू ब्रदर्स यांची नक्कल करीत गाणारे कलाकार मूळ कलाकारांपेक्षा कुठेही कमी पडत नाहीत. बॉल्ड्नॉबर्स जंबोरी शो आणि प्रेसलीज कंट्री ज्यूबिली शो सगळ्या फॅमिलीला आवडण्यासारखे आहेत. डटन्स हा फिडल वादकांचा एक फॅमिली ग्रुप आहे. घरातल्या तीन पिढय़ा अत्यंत कुशलतेने फिडल वाजवतात. त्यांच्या शोमधला एक गमतीचा अ‍ॅक्ट म्हणजे शेजारी बसून ते एक-दुसऱ्याकडचं फिडल वाजवतात. चित्रविचित्र विग वापरून केलेले विनोदी अ‍ॅक्ट्स त्यांच्या प्रोग्रॅमला खूप गर्दी खेचतात.

गाण्यांबरोबर या सगळ्या शोजमध्ये कधी कॉमेडी अ‍ॅक्ट्स, कधी फूड, कधी नृत्य अशी पुरवणी नक्की असते.

२००५ मध्ये न्यू शांघाय थिएटर या चायनामधल्या थिएटरने आपला चायनीज अ‍ॅक्रोबॅट्सचा शो ब्रॅन्सनला आणला.  ब्रॅन्सनचा हा पहिला इंटरनॅशनल शो. चायनीज डान्सेस, अ‍ॅक्रोबॅट्सनी केलेले वेगवेगळे अ‍ॅक्ट्स बघून आपण अगदी थक्क होतो. उत्तम साऊंड सिस्टीम आणि अतिउत्तम लायटिंग, सुंदर वस्त्र-प्रावरणं आणि बघण्यासारखे एकापेक्षा एक अ‍ॅक्ट्स! खुच्र्या एकावर एक रचून केलेला विशिष्ट अ‍ॅक्ट, प्लेट-स्पिनिंग, डान्सिंग ड्रॅगन, बायसिकलवर केलेलं बॅलिन्सग, असे सगळे अ‍ॅक्ट्स शब्दांनी वर्णन करण्याच्या पलीकडचे आहेत. हा शो दोन तासांचा असतो. रोज दोन शोज असतात.

व्हील-चेअरमध्ये असणाऱ्या प्रेक्षकांकरिता खास व्यवस्था असते. आमच्याबरोबर माझी वृद्ध आई व्हील-चेअरमध्ये असल्याने आम्हाला नेहमी तिची व्यवस्था आधी करावी लागत असे पण कधीच कुठलीही अडचण आली नाही. अ‍ॅक्रोबॅट्सच्या शोला फोटो काढण्याची परवानगी नसते. शो चालू असताना मोबाइलवर बोलणं, परवानगी नसताना फोटो काढणं अशा गोष्टी अमेरिकेत माझ्यातरी पाहण्यात नाहीत. ब्रॅन्सनमध्ये प्रत्येक शोच्या आधी प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना फोटो काढण्याच्या परवानगीबद्दल माहिती दिलेली असते.

डॉली पार्टनचा डिक्सी स्टँपीड शो बघायला अफाट गर्दी असते. मोठय़ा पटांगणाच्या बाजूने खूप बेंचेस असतात. तिकिटं सगळ्यांकडे असतात. फ्री सीटिंग असतं. व्हील -चेअरमधल्या लोकांना वेगळं प्रवेशद्वार असतं. जागा पकडायला धावाधावी मात्र अजिबात नाही. घंटा वाजली, की शो सुरू होतो. मधलं पटांगण म्हणजे एक लहानसं गाव. त्यात रहस्य उलगडत जातं. एक छानशी स्टोरी-लाइन असते.  शोमध्ये ३२ घोडे, शर्यतीत पळणारी डुकरं, त्यांच्या वेगवेगळ्या ट्रिक्स, गावातल्या सुंदऱ्या, धट्टे-कट्टे हिरोज असतात. सगळे प्रेक्षक हिरोजना चिअरअप करत असतात. शेवटी दुष्टांचा पराभव आणि हिरोजचा जयजयकार. दीड-दोन तास नुसती धमाल चाललेली असते.

इल्यूजनिस्ट रिक थॉमसचा शो हेही ब्रॅन्सनचं मोठंच आकर्षण आहे. याच्या शोमध्येही एका रहस्याचं निवेदन आणि त्याची उकल, नृत्य, मॅजिक, (हवेत तरंगणं), रहस्य उलगडायला मदत करणारे पक्षी, वाघ, कुत्रे असे प्राणी अशा सगळ्या थक्क करणाऱ्या गोष्टी असतात. रिकला उत्तम पर्सनॅलिटीची दैवी देणगी आहे, ती याचा शो अजूनच आकर्षित करते. शो संपल्यावर तो थिएटरच्या बाहेर येऊन सर्वाना भेटतो. शो साधारण दोन तासांचा असतो.

मर्डर मिस्ट्री डिनर शो

अमेरिकन जेवण आवडत असेल, तर छान एन्जॉय करता येतो. स्टेजवर एक नाटक चाललेलं असतं. त्यातले काही कलाकार प्रेक्षक म्हणून इतर प्रेक्षकांमध्ये मिसळून वेगवेगळ्या टेबलांशी बसलेले असतात.  सगळ्या प्रेक्षकांनी मिळून स्टेजवर चाललेल्या मिस्टरीमध्ये भाग घेऊन रहस्य भेद करायचा असतो. जेवणाचा आस्वाद घेत घेत प्रत्येक टेबल आपल्या रहस्याची उकल करण्याचा प्लॅन आखतं. अर्थात शेवटी एकच प्लॅन उपयोगाचा असतो. आमच्या ग्रुपमध्ये फक्त चार जण या कार्यक्रमाला गेले. उरलेल्या चार जणांनी ब्रॅन्सन लँडिंगमध्ये फेरफटका केला.

भरवशाचं वॉलमार्ट ब्रॅन्सनमध्ये कितीतरी शाखा उघडून बसलेलं आहे. १३ वर्षांच्या नातीने एक्साइट्मेण्टमुळे आपले रात्रीचे कपडे पॅक केले नव्हते. रात्रीचे ११ वाजायला आले, आणि कपडे  बदलून झोपायच्या तयारीला लागताना तिच्या लक्षात आलं. तिच्या आईचा आरडाओरडा सुरू होण्यापूर्वी तिच्या वडिलांची व्हॅन तिला घेऊन वॉलमार्टच्या दिशेने निघाली होती. अमेरिकेत कुठेही जा, वॉलमार्ट, मेसी अशासारख्या दुकानांमध्ये आपापली युनिफॉर्मिटी जपलेली असते, त्यामुळे मनाला निष्टिद्धr(१५५)ांतपणा येतो, पण प्रत्येक गावाची खासियत तिथल्या लहान दुकानांमध्ये, बाजारात, रेस्टॉरंट्समध्ये जाऊनच जास्त चांगली कळते.

ब्रॅन्सन लँडिंग हे टॅनिकोमो लेकच्या काठावरचं ‘शॉपिंग व्हिलेज’ सहा वेगवेगळ्या ‘जिल्ह्य़ांमध्ये विभागलेलं आहे. प्रत्येक भागातली रंगरंगोटी वेगळी आणि दुकानंही वेगळी. एकेका भागात १०० तरी दुकानं. यातल्या ब्रॅन्सन मिल कॅ्रफ्ट व्हिलेजमध्ये लोकल कारागीर आपल्या हस्तकलेचे अनेक नमुने विकतात. निळ्या रंगाची मॉलची बस ग्राहकांना वेगवेगळ्या भागांमध्ये नेत असते. अमेरिकेत सगळ्यांच्या परिचयाची असलेली सगळी मोठी दुकानं इथे आहेतच, जोडीला खास ब्रॅन्सनची दुकानंही आहेत. फास्ट फूडच्या प्रसिद्ध चेन्स आहेत, जोडीला ब्रॅन्सनची आपली खास फूडची दुकानंही. मॉलच्या सेंटरचा उताराचा भाग लेकचा बोर्डवॉक बनतो. मॉलमध्ये शॉपिंग करायचं नसलं, तरी बोर्डवॉकवरून बघता येणारा लेकमधला रोजचा डान्सिंग वॉटर फाउंटन शो कोणीही चुकवू नये इतका सुंदर असतो. सिल्वर डॉलर सिटी हा ब्रॅन्सनचाच भाग असलेला थीम-पार्क आहे. १८८० सालातलं खेडय़ासारखं असलेलं ब्रॅन्सन आणि २१व्या शतकातल्या सगळ्या राइड्स यांचं छानसं मिश्रण इथे बघता येतं. अगदी छोटय़ा मुलांपासून ते ५-६ वर्षांच्या  मुलांसाठी इथे खास राइड्स आहेत. या सिटीचं वैशिष्टय़ असं की खेडय़ात (पूर्वीच्या) दिसणारे सगळे लघुउद्योग-लोहार, चर्मकार, सुतार, ग्लास-ब्लोअर, वूड-काìव्हग, फर्निचर-मेकिंग इ. इथे प्रात्यक्षिकांसहित दाखविले जातात. ब्रॅन्सनमध्ये राहून एक दिवस सिल्व्हर सिटीमध्ये ट्रिप करणारे पुष्कळ प्रवासी असतात.

ब्रॅन्सनची एक खासियत म्हणजे येथे प्रवाशांना जमिनीवर, पाण्यात आणि आकाशात नेणाऱ्याचं तऱ्हेतऱ्हेच्या राइड्स आहेत.

‘राइड द डक्स’ ही अगदी अनोखी अशी ७० मिनिटांची राइड आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनी वापरलेल्या डक्सची (ऊवङह) प्रतिकृती अशी ही  अ‍ॅफीबियन राइड आहे. (जमिनीवर आणि पाण्यात -दोन्हीकडे संचार करणाऱ्या बसची राइड). दिसायला बससारखं दिसणारं हे वाहन तुम्हाला रस्त्यावरून कधी टेबल रॉक लेकमधे घेऊन जातं ते कळतच नाही. ब्रॅन्सन शहराच्या ग्रीन माउंटन ड्राइव्हपासून निघून ही बस कधी रस्त्यावरून तर कधी पाण्यातून प्रवाशांना टेबल रॉक लेक, ब्रॅन्सनचं डाउन टाउन, ओझार्क कॉलेज, टेबल रॉक डॅम, बेअर्ड माउंटन या सगळ्यांचं दर्शन घडवते. ७० मिनिटांची ही राइड आहे. आपापल्या स्टाइलनी प्रत्येक डकचा ड्रायव्हर कॉमेंट्री करतो आणि शहराची माहिती सांगतो. हे अनोखं वाहन ओपन साइडेड असतं. कधीकधी वाऱ्याचा त्रास होऊ  शकतो.

ओझार्क्‍स जवळून बघायला रेल्वे गाडीची ट्रिप हवीच. ब्रॅन्सन शहरात १९०५ साली बांधलेला डेपो म्हणजे रेल्वे स्टेशन आहे. तिकिटाची खिडकी, वेटिंग रूम, प्लॅटफॉर्म सगळं जुनं, पण व्यवस्थित मेन्टेन केलेलं आहे. बसनी, कारनी जिथे तुम्ही पोचू शकत नाही, तिथे ही गाडी तुम्हाला आरामात घेऊन जायला तुमच्या सेवेला हजर असते. दोन वेगवेगळ्या ट्रिप्स आहेत. एक फक्त अल्पोपहार देणारी, अडीच तासांची, आणि दुसरी लग्नाचं प्रपोजल, डिनर पार्टीची किंवा इतर सेलेब्रेशन्सची सोय करणारी साडेचार तासांची. दोन गाडय़ांमध्ये तिकिटांचे दर वेगवेगळे असतात. गाडीत बोगदेही लागतात. ओस पडलेली गावं, वस्ती असलेली गावं, इकडून तिकडे पळणारे वनचर सगळी दृष्य डोळ्यापुढून सरकत जातात. सगळं वर्णन सांगणारी कॉमेंटरी सुरू असतेच. गाडीचे डबे १९३० आणि १९६० काळात तयार केलेले आहेत (अर्थात उत्तम कंडिशनमध्ये).

ब्रॅन्सनमध्ये तीन सुंदर तलाव आहेत. टेबल रॉक लेकमध्ये बोटीनी साइट-सीइंग करायचा अनुभव अनोखा आहे. २७८ फूट लांब वल्हवायच्या बोटीनी केलेली तीन तासांची ट्रिप खाण्या-पिण्याच्या रेलचेलीमुळे, आणि करमणुकीच्या कार्यक्रमामुळे विशेष लक्षात राहाते. ७०० प्रवाशांच्या बसण्याची सोय असलेल्या बोटीत २००-३०० सहप्रवासी नक्कीच असतात.

१४ एप्रिल १९१२ला टायटॅनिक बोट हिमखंडावर आपटून बुडाली. ब्रॅन्सननी आपल्या म्युझियममध्ये तिला अजरामर केलं आहे.

खऱ्या टायटॅनिकच्या अध्र्या स्केलमध्ये टायटॅनिकच्या आकाराची या म्युझियमची बिल्डिंग आहे. हिचा नुसता जिना तयार करायलाच दहा लाख डॉलर्स खर्च झाला आहे.

टायटॅनिकवर प्रवेश करायला प्रत्येकाला एक तिकीट मिळतं. तिकीट म्हणजे बोटीत चढायचा बोर्डिग पास. प्रत्येक पासच्या वरच्या बाजूला बोर्डिग पास असं लिहिलेलं आणि त्याच्या खाली प्रवासाच्या वेळा- इंग्लंडहून निघायची, फ्रान्समधून निघायची, आणि आर्यलडहून निघण्याची. मागच्या बाजूला बोटीमधल्या एका प्रवाशाची माहिती. माझ्या बोर्डिग पासच्या मागच्या बाजूला ली अ‍ॅक्स नावाच्या तरुण पॅसेंजरची माहिती होती. ती आपल्या तान्ह्य़ा बाळाला घेऊन तिच्या नवऱ्याकडे अमेरिकेला येत होती. ली खाली थर्ड क्लासच्या केबीनमध्ये होती. तिचं काय झालं, तिच्या मुलाचं काय झालं, ही माहिती कार्डावर लिहिलेली नव्हती. प्रत्येकाने आपल्या पॅसेंजरबद्दलची उत्सुकता मनात दाबून ठेवली होती. आत गॅलरीमध्ये २,२०८ पॅसेंजर्सची माहिती भिंतींवर लावलेली आहे.  आम्हा आठ जणांपैकी सात जणांच्या पॅसेंजर्सचे प्राण वाचले होते. माझ्या नातीच्या बोर्डिग पासवर असलेला पॅसेंजर दुर्दैवाने बुडला होता .

बोटीवर अंधाराचा सीन तयार केलेला आहे. (काळ्याभोर अंधारामुळे खऱ्या टायटॅनिकला हिमनग दिसला नाही). आपल्याला २८ डिग्री (फॅ.) थंड पाण्यात हात घालता येतो, खऱ्या हिमनगाला स्पर्श करता येतो आणि उतरत्या डेक्सवर तोल संभाळत उभं रहाण्याचा प्रयत्न करता येतो.

झिपलायनिंगचा थरार अनुभवायची संधी वेगवेगळ्या झिपलाइन्स देतात. एका झाडाच्या शेंडय़ावरून दुसऱ्या झाडाच्या शेंडय़ावर, लेक्सवरून नुसतीच आकाशातली भ्रमंती. हा अनुभव सगळ्या वयाच्या प्रवाशांना घेता येतो, त्यामुळे खूपच लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या झिप्स (२०० ते २००० फूट लांबीच्या) आहेत. रात्रीचा झिपलायनिंगचा अनुभव बऱ्याच प्रवाशांना जास्ती आवडतो.

पॅरासेलिंग करायची सोयही ब्रॅन्सनला उपलब्ध आहे. जगातलं सगळ्यात मोठं खेळण्यांचं म्युझियम, डायनॉसॉर्सचं म्युझियम, वॅक्स म्युझियम (फक्त हॉलीवूडच्या नट, नटय़ांचं), रेनफॉरेस्ट अ‍ॅडव्हेंचर्स, अमेझिंग पेट्स, बटरफ्लाय पॅलेस, ही आणखीन काही ठिकाणंही बघायला छान आहेत. ब्रॅन्सन ख्रिसमसच्या वेळी जाता आलं, तर ती पर्वणीच. खूप शोज, रोषणाई, सुंदर गारवा ब्रॅन्सनची ब्यूटी जास्तीच वाढवतात.

एका ट्रिपमध्ये ( तीन, चार दिवसांच्या) ब्रॅन्सन बघणं, आणि एंजॉय करणं अशक्यच आहे. ट्रिप प्लॅन करताना प्रवाशांचं वय, त्यांच्या विशेष आवडी-निवडी, सीझन, आपली पैशाची तयारी- सगळं लक्षात घेणं जरुरीचं आहे. खास लहान मुलांना घेऊन फॅमिली ट्रिप असली तर सिल्व्हर डॉलर सिटीवर जास्ती भर देणं, कंट्री म्युझिकची आवड असली किंवा नसली तर वेगवेगळी पॅकेजेस घेणं जरूरीचं असतं. अर्थात वय, आवडी-निवडी, आर्थिक कुवत, फुरसत या सर्वातल्या फरकांना ब्रॅन्सन पुरून उरतं. एका ट्रिपहून परतत असतानाच पुढच्या ट्रिपचे बेत आखले जातात!

शशिकला लेले – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader