सायकलवरून परदेशात टुर करायच्या हे तरुणांचं काम, असा जर कुणाचा समज असेल तर तो फिनलंडमध्ये सायकलिंग करून या यंग सीनिअर जोडप्याने खोडून काढला आहे.
माझ्या योगसाधनेच्या वर्गात आमच्या इन्स्ट्रक्टरने सहज म्हणून सायकलिंगविषयी काही माहिती पुरवली- की त्यांच्या माहितीतले एक ६०-६२वर्षांचे दाम्पत्य कसे रोज सायकल चालवते, त्यासाठी ते स्वत:ला कसे फिट ठेवतात, योगसाधना त्यांना कशी मदत करते वगैरे वगैरे. मी घरी येऊन हे सगळे सहज म्हणून माझ्या नवऱ्याला, प्रणयला सांगण्याचाच अवकाश- हा पठ्ठय़ा दुसऱ्याच दिवशी स्वत:साठी गिअरची सायकल घेऊन आला! वर आठ दिवसांनी माझ्यासाठीसुद्धा घेऊन आला!
मला खरंतर दडपणच आलं. जमेल का आपल्याला या वयात सायकल चालवायला आणि तेसुद्धा पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये? पण ऐकेल तो नवरा कसला? ‘मी तुला कव्हर करतो, पण तू सुरू कर’ या त्याच्या हट्टापुढे मी हात टेकले आणि मनाचा हिय्या करून रोज सायकल चालवायला सुरुवात केली. प्रणयने रोज माझ्याबरोबर, माझ्या उजव्या बाजूला राहून त्याने माझी रस्त्यावर सायकल चालवण्याची भीती घालवली. मी वर्षभरात रोज एकवीस किलोमीटर सायकल चालवू लागले. प्रणय तर चाळिशला पोहोचला होता!
कधीतरी असंच क्लासमध्ये बोलबोलण्यात परदेशातील सायकल टुर्सबद्दल कळले आणि आम्हा दोघांना या दोन चाकावरच्या सफरीची स्वप्नं पडायला लागली. फिनलंडमध्ये गेली कित्येक र्वष राहत असलेल्या हेरंब कुलकर्णी यांचं नाव आम्हाला कळलं. त्यांना आयोजनाबद्दल मेल केला. महिना सव्वा महिना उलटला. अचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे. आम्हाला तर आकाशाच ठेंगणे झाले.
आमच्या अपेक्षा काही फार नव्हत्या. हॉलंड (नेदरलँड) या देशाची सफर, टय़ुलिप फुलांची शेती (क्युकेन हॉफ बागेबरोबर) आणि तेथील लोकांचे त्यांच्या रोजच्या जीवनाचे, निसर्गाचे दर्शन घेत घेत केलेले सायकलिंग.
तारीख ठरली, व्हिसा झाला. जॅकेट्स, गॉगल्स, सॉक्स, ग्लोव्ह्स बॉटल्सची खरेदी झाली. सायकल चालवताना डिहायड्रेशन होऊ नये म्हणून लेमनड्रॉप्स, खजूर, बदाम, सुक्या अंजिरांनी भरलेले छोटे छोटे पुडे तयार केले. औषधांचे किट तयार केले. २६ एप्रिलला आम्ही प्रयाण केले!
अॅमस्टरडॅमच्या विमानतळावर – स्किफॉलला आमचा टूरगाइड दर्शन लोहाडे आम्हाला घ्यायला आला होता. जर्मनीत शिक्षणासाठी राहात असलेला, पण पुण्याचा रहिवासी असलेला दर्शन पाहता क्षणी आपला वाटला.
सकाळी लवकर उठून आम्ही रोजचा व्यायाम करून घेतला. या व्यायामाच्या जोरावरच रोजचे सायकलिंग करणार होतो. मनात प्रचंड उत्सुकता आणि थोडेसे दडपणदेखील होते. आज आम्ही अॅमस्टरडॅम शहराला भेट देणार होतो म्हणून दर्शनने हेल्मेटविना सायकलिंग करण्याची परवानगी दिली. सायकली वजनाला खूप हलक्या होत्या. आम्ही आमच्या सोयीप्रमाणे सीट्स अॅडजस्ट करून घेतले. मला डाव्या ब्रेकची सवय आहे, पण येथे उजवा ब्रेक थांबवण्यासाठी वापरायचा होता. थोडी तिथल्या तिथे चालवून बघावी म्हणून मी सायकलवर टांग मारली आणि वळवायला म्हणून वेग कमी करण्यासाठी सवयीप्रमाणे डावा ब्रेक दाबला आणि काही कळायच्या आत अस्मादिक जमिनीवर! धडपडत उभी राहिले आणि मनाचा निग्रह केला, घाबरायचं नाही, उजव्या ब्रेकची सारखी आठवण ठेवायची आणि नियमांचे काटेकोर पालन करायचे. ‘तसे न केल्यास खूप मोठा दंड भरावा लागतो’ – इति दर्शन.
प्रणय, मी, दर्शन आणि बेंगलोरचे विपुल, आम्ही सगळे सज्ज झालो. धडपडल्याने मनाच्या कोपऱ्यात थोडी भीती निर्माण झाली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करत, उजवा ब्रेक आणि उजवीकडून चालवायचे याची उजळणी करत या अनोख्या हटके सफरीसाठी सायकलींवर टांग मारली!
फक्त सायकलींसाठी असलेल्या रस्त्यांवर सायकल चालवायला खूप गंमत वाटली. संपूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात, दाट हिरवाईतून, सुंदर, स्वच्छ तळ्याच्या काठाकाठाने रमत गमत आम्ही भर शहरात कधी पोहोचलो ते कळलंच नाही. आता परदेशातल्या शहरात सायकल चालवण्याची पहिलीच वेळ पण ट्राम्स, बसेस, गाडय़ा इतक्या नियमांनुसार रस्त्यांवरून धावत असतात की अपघाताची चिंताच वाटत नाही. कोणीही हॉर्न वाजवत नाही, की एकमेकांना हूल देऊन, कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. या सगळ्याची आपल्याला भरपूर सवय. तेव्हा उगीचच चुकल्याचुकल्यासारखे वाटते. तेथे अगोदर पादचाऱ्यांना, त्यानंतर सायकलींना व शेवट गाडय़ांना प्राधान्य देतात.
जागोजागी सायकल तळ दिसतात. अॅमस्टरडॅम शहराच्या सेंट्रल स्टेशन भागात तर चक्क तीन मजली सायकल तळ आणि तोही खच्चून भरलेला बघायला मिळाला. येथे सायकली फार चोरीला जातात. त्यामुळे कोठेही सायकल ठेवायची झाल्यास जाड जाड साखळदंडांनी जेरबंद करूनच ठेवाव्या लागतात. येथील रहिवासी आपापली सायकल लगेच ओळखू यावी यासाठी त्यावर काहीतरी स्पेशल खूण करून ठेवतात.
आकाशात ढग दाटून आले होते. हवामान खात्याने सकाळी दहा वाजता पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले आहे असे दर्शनने सांगितले. ही भाकितं अगदी तंतोतंत खरी ठरतात, त्यामुळे लोकंना नियोजन करायला बरे पडते. आम्हाला व्हॅन गॉग म्युझियम बघायचे होते. तिकीट काढले तेवढय़ात पावसाला सुरुवात झाली. घडय़ाळात बघितलं तर बरोब्बर दहा वाजले होते!
हे म्युझियम बघायला आम्हाला दोन तास लागले. व्हिन्सेंट व्हॅनगॉग- हा डच चित्रकार फक्त ३७ र्वष जगला. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने बऱ्याच गोष्टींमध्ये असफल झाल्यावर चित्रकलेला हात घातला. सत्तावीस ते सदतीस या दहा वर्षांत त्याने शेकडो चित्रं रंगवली. त्या काळी किती कमी सोयीसुविधा होत्या. तंत्रज्ञानाचा तर पत्ताच नव्हता. पण या सगळ्यांवर मात करून त्याने अजरामर कलाकृतींची निर्मिती केली. प्रत्येक चित्र रंगवण्याच्या आधी त्याने त्याबाबतीत केलेला अभ्यास आपल्याला रोमांचित करतो. खरेतर प्रणयला अशा म्युझियम्समध्ये फारसा रस नसतो, पण व्हॅनगॉगचा इतिहास (जो येथे मोजक्या शब्दांमध्ये एका बोर्डवर लिहिलेला आहे) वाचल्यावर आणि प्रत्येक चित्राचा इतिहास ऑडिओ सिस्टीमवर ऐकायला मिळाल्यामुळे त्याचा पाय काही तेथून निघेना. व्हॅनगॉगला जगातल्या अप्रतिम रंगमकर्मीमध्ये अव्वल स्थान लाभलं- पण कधी? त्याच्या मृत्यूनंतर! जिवंतपणी तो आपलं एकच पेंन्टिंग विकू शकला!!
दुपारी रोड साइड कॅफेमध्ये खूप गप्पा मारत मारत जेवलो. हे असले रोड साइड कॅफेज येथे रस्तोरस्ती आहेत. हसण्या खिदळण्याच्या आवाजाने, तुडुंब गर्दीने भरलेले हे कॅफेज पहिले की एरव्ही शांत गंभीर वाटणाऱ्या शहराचं एक वेगळंच रूप आपल्या समोर येतं. इथले वेटर्स हसतमुखाने तुमचे स्वागत करतात, खाणे पिणे देताना जोक्स करतात, त्यामुळे वातावरण हलके फुलके होते. या देशात प्रत्येक जण आपल्याला दिलेले काम अत्यंत सचोटीने, आनंदाने आणि हसतमुखाने करत असतो. दुर्मुखलेल्या चेहऱ्याने, पाटय़ा टाकत काम करताना कोणीही दिसत नाही. कामाच्या वेळी काम आणि मजेच्या वेळी फक्त आणि फक्त मजा हा त्यांचा जीवनमंत्र आहे.
परतीच्या वाटेवर थोडा पाऊस व सोसाटय़ाचा वारा लागला. पहिल्या दिवशी येऊन जाऊन २६ किमीचा प्रवास अगदी मजेत झाला. त्यामुळे दडपण नाहीसे झाले. रस्त्याचे नियम, उजवा ब्रेकदेखील अंगवळणी पडला.
टूरचा दुसरा दिवस उजाडला. आज एकूण ४५ किमी सायकल चालवायची होती. बाहेरचे तापमान पाच अंश सेल्सियस होते. पावसाळी वातावरण असल्यामुळे हवेत प्रचंड गारठा होता. क्युकेन हॉफ या टय़ुलिप्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बागेला भेट देऊन आम्हाला आमच्या पुढच्या मुक्कामी पोहोचायचे होते. आज आमची कसोटी लागणार होती, कारण उलटय़ा वाऱ्याशी लढत लढत आम्हाला अंतर कापावे लागणार होते व रस्ता फक्त सायकल ट्रॅक नव्हता तर गाडय़ांच्या रहदारीचासुद्धा होता. पुण्यात सायकल चालवताना रहदारीची सवय तर खूपच होती, पण त्या सोबतीला उलटा वारा आणि दोन फुटांवर गच्च वाहणारा कॅनॉल म्हणजे खूपच झालं! वारा पुढे जाऊ देत नव्हता, डावीकडे भरधाव गाडीखाली येण्याची भीती तर उजवीकडे पाण्यात पडण्याची भीती! पण मी नेटाने पेडल मारतच रहिले, कारण अर्जुनाला जसे फक्त माशाचा डोळाच दिसत होता तशी मला आता फक्त टय़ुलिप्सची बाग दिसत होती!
वाऱ्यामुळे अंतर कापायला दुप्पट वेळ लागला, पण दोन-सव्वादोनपर्यंत पोहोचलो. क्युकेन हॉफ ही विस्तीर्ण बाग म्हणजे नेदरलँडचे अगदी हॉट टुरिस्ट स्पॉट!! ही बाग खास करून टय़ुलिप्स या अत्यंत मोहक फुलांसाठी प्रसिद्ध आहे. साधारण एक महिनाभर या फुलांचा सीझन असतो. त्यामुळे १५ एप्रिल ते १५ मेपर्यंत जगभराच्या पर्यटकांची येथे गर्दी होते. साडेतीनशे माळी या बागेची देखभाल करतात. रंगीबेरंगी टय़ुलिप्सच्या दमदार फुलांचे अगणित ताटवे बघून मन प्रसन्न होऊन जाते. संपूर्ण बाग बघण्यासाठी तीन-चार तासदेखील पुरत नाहीत. काय बघावं आणि किती फोटो काढावेत असं होतं. कोठेही अस्वच्छता नाही, पालापाचोळा नाही की बंद पडलेले कारंजे नाही. कोणीही फुलांना, लॉनला तुडवत नाही. एवढी प्रचंड गर्दी, पण गोंगाट नाही.
या बागेत एक भली मोठी पवनचक्की आहे. ती खूप जुनी असूनदेखील चालू स्थितीत होती. इंच न् इंच जागेचा सुयोग्य वापर करून, फुलांच्या नैसर्गिक सौंदर्यात भर कशी टाकता येईल याचा विचार केल्याने एक अलौकिक देखणी व विलोभनीय बाग आपल्याला बघायला मिळते. रंगांची ही उधळण बघून जीवनात दृष्टीचे, डोळ्यांचे महत्त्व जाणवते आणि ते देणाऱ्या आदिशक्तीचे आपण मनोमन आभार मानतो.
पाय निघता निघत नव्हता, पण संध्याकाळचे सहा वाजायला आले होते आणि मुक्कामाच्या हॉटेलला पोहोचण्यासाठी अजून दहा किलोमीटर सायकल चालवायची होती. निवलेल्या नजरेने आणि तृप्त मनाने आम्ही सायकलींवर स्वार झालो. खरे तर वाऱ्याविरुद्ध लढत सायकल चालवल्याने व त्यानंतर बागेत तीन तास चालल्याने शरीर दमले होते, पण या मोहक फुलांनी मन इतकं ताजंतवानं आणि पिसासारखं हलकं झालं होतं की दहा किलोमीटरचे काहीच वाटलं नाही.
मुक्कामाचे गाव अगदी छोटेसे पण टुमदार होते. आमचे हॉटेलदेखील छोटेखानीच होते. हॉटेलच्या स्वागतकक्षात एका शोकेसमध्ये खूप जुन्या वस्तू नीट जपून आकर्षकरीत्या मांडून ठेवल्या होत्या. त्या शोकेसच्या वर शंभरएक र्वष जुन्या बॅगा स्वच्छ पॉलिश करून हारीने मांडून ठेवल्या होत्या. सजावटीचा हा प्रकार आम्हाला खूपच आवडला.
छोटय़ा-मोठय़ा गावांतून जाताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की घर श्रीमंताचे असो, मध्यमवर्गीयाचे असो वा गरिबाची झोपडी असो- आवार स्वच्छ असतं, ऐपतीप्रमाणे दोन-चार शोभेच्या गोष्टी बागेत ठेवलेल्या असतात, पडदे साधे पण लेसचे असतात. घरामागून कॅनॉल जात असेल तर छोटीशी बोट खुंटीला बांधलेली दिसते आणि साध्या का होईना चार आरामखुच्र्या व टेबल मांडून ठेवलेले असते. या आणि अशा गोष्टींमधून या लोकांची जीवनाप्रति आसक्ती जाणवते.
या देशात सर्व थरांतील, सर्व वयोगटांतील लोक (अगदी जख्ख म्हातारेदेखील) रोजच्या येण्याजाण्यासाठी सायकलींचा किंवा मोटराइज्ड सायकलींचाच वापर करत असल्याने अगदी भर शहरातच राहण्याचा आटापिटा दिसत नाही. शेतातील घरांमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून शेती करणारे खूप लोक आम्हाला बघायला मिळाले. प्रत्येक जण काहीतरी करण्यात व्यग्र, व्यस्त दिसला. उगीच चकाटय़ा पिटत, तंबाखूचे तोबरे भरून बसल्या जागी पिंक टाकत लोक बसलेल आहेत असं दृश्य खरंच बघितलं नाही. व्यसने इथेदेखील असतीलच, पण त्याचे गलिच्छ दर्शन रस्तोरस्ती तरी होत नाही. निसर्गाचा मान राखून, निसर्गाची कास धरून, निसर्गाच्या सान्निध्यात तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत या लोकांनी प्रगती व विकास साधला आहे.
तिसरा दिवस उजाडला. आज आम्हाला टय़ुलिप्स फुलांची शेती बघून समुद्र मार्गाला लागायचे होते. टय़ुलिप्सची बाग बघणं आणि टय़ुलिप्सची शेती बघणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मैलोगणिक रंगीबेरंगी टय़ुलिप्सची व्यावसायिक लागवड, जलसिंचनाची व्यवस्था, जमिनीच्या मशागतीसाठी वापरली जाणारी आधुनिक यंत्रसामग्री, तोड न झालेल्या फुलांच्या पाकळ्यांचा खतासाठी केलेला उपयोग असं बरंच काही. बघत, समजून घेत आम्ही समुद्रमार्गाला कधी लागलो कळलंच नाही. हवेत गारवा असल्याने दोन-अडीच तास सलग सायकल चालवून देखील थकवा जाणवत नव्हता.
पावसाचे टपटप पडणारे थेंब आणि गार, झोंबऱ्या वाऱ्याने आम्हाला आमच्या कॉफी ब्रेकची आठवण करून दिली. आम्ही चटकन सायकलींना बेडय़ा घालून रस्त्यालगतच्या एका सुंदरशा कॅफेमध्ये प्रवेश केला. चोहीकडून काच असल्याने बसल्या जागी समुद्राचे फेसाळते पाणी दिसत होते. हाती चहा कॉफीचे मग्ज, पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि खळाळता समुद्र.. ‘चला, अजून बराच पल्ला गाठायचा आहे’ दर्शन म्हणाला आणि आम्ही भानावर आलो. रेनकोट अंगावर चढवले आणि सायकलींवर आरूढ झालो. वारा वेग घेऊ देत नव्हता. त्याच्याशी लढत, भांडत आम्ही अंतर कापत हातो. समुद्र आता पाठीशी पडला. शहराच्या खुणा दूरवर दिसू लागल्या. दोन-अडीचच्या सुमारास डेन हागला पोहोचलो.
शहरातल्या गल्ल्यांमधून, गर्दीतून सराईतांप्रमाणे सायकली चालवत आम्ही हॉटेलला पोहोचलो. सायकली एका मोठय़ा खोलीसदृश लिफ्टने तळघरात लॉक करून ठेवल्या.
आमच्या आधीच्या ट्रिपमध्ये मदुरोडॅम बघितल्याने आम्ही त्या दिवशी थोडा आरामच करायचा असं ठरवलं. मस्तपैकी आराम करून संध्याकाळी आम्ही सगळे डेनहागच्या खाऊगल्लीतील एका छोटेखानी, छानशा भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवलो अणि निवांत परतलो.
आज टूरचा चौथा दिवस. आज आम्हाला रॉटरडॅम गाठायचे होते. रॉटरडॅम हे युरोपमधील सगळ्यात मोठे पोर्ट आहे. या पोर्टचे कामकाज कसे चालते ते आपल्याला रॉटरडॅम मिनी वर्ल्ड हे प्रदर्शन बघून कळते. म्हणून आम्ही डेनहागहून डायरेक्ट मिनी वर्ल्डला गेलो. जवळ जवळ पाच तासांचा प्रवास होता. त्या दिवशी खूप उन होते. उन्हामुळे गरम होत नव्हते, पण या उन्हामध्ये युव्ही रेजचे प्रमाण जास्ती असल्या कारणाने त्वचा भाजल्यासारखी लाल काळी झाली. डोळ्यांना देखील या उन्हाचा त्रास होतो म्हणून आज पहिल्यांदा चष्म्यावर गॉगल चढवला.
‘मोठय़ा रस्त्याने तुम्ही फक्त गाडय़ाच बघाल, मी तुम्हाला आतल्या रस्त्याने नेतो, तुम्हाला मजा येईल,’ इति दर्शन. तो गुगल मॅप फॉलो करत होता. जोपर्यंत रस्ता बऱ्यापैकी मोठा होता तोपर्यंत आम्ही लाल-हिरवी झाडं, कॅनॉलचे पाणी, चढ-उतार एन्जॉय करत होतो. पण अचानक एक चढ चढून गेलो आणि रस्त्याची पायवाटच झाली! मला तर गांगरायलाच झालं. सायकलीचा सराव असला तरी एकदम कॅनॉलच्या बांधावरच्या पायवाटेने जाणे म्हणजे जरा जरा जास्तच झालं! अचानक माझा हाताचा पंजा, स्ट्रेस व भितीमुळे प्रचंड दुखू लागला. माझे पाय सायकलवरून जमिनीला पोहोचत नसल्यामुळे मला चटकन उतरता येईना व एवढय़ाशा पायवाटेने पुढे जाता येईना. एव्हढय़ा थंडीत घाम फुटला होता. खूप पुढे गेलेला दर्शन आम्हाला बघत बघत परत आला. माझी अवस्था बघून सॉरी म्हणायला लागला. ‘परत मला जर अशा पायवाटेने नेलंस तर बघ’ अशी तंबी देऊन मी ते अर्धा किलोमीटरचे अंतर चालूनच पार केले.
रॉटरडॅम आता अगदी काही किलोमीटर दूर होते. रस्त्यांवर शहरी वर्दळ वाढली होती. या देशात जवळ जवळ सगळे रस्ते सपाट आहेत. पण रस्त्यांवरचे कॅनॉल ओलांडायला, ट्रॅफिकचे नियमन करण्यासाठी खूप पूल बांधलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी चढ-उतार करावा लागतो. असाच एक चढ आम्ही सयाकली दामटत चढलो आणि लाल सिग्नल लागला. जरा आश्चर्य वाटले, रस्ता तर एकच आहे. मग सिग्नलचे काय प्रयोजन? तेव्हढय़ात रस्ता मधोमध दुभंगला आणि वरवर जाऊ लागला! रस्त्याच्या दोन्ही बाजू वर गेल्यावर जाऊन थांबल्या आणि खालच्या कॅनॉलमधून एक बऱ्यापैकी मोठी बोट पास झाली! दुभंगलेले दोन्ही रस्ते परत खाली होऊन जोडले गेले, सिग्नल हिरवा झाला आणि जसे काही घडलेच नाही अशी वर्दळ परत सुरू झाली! ‘घ्या काकू, फक्त हेच राहिले होते तुम्हाला दाखवायचे, ते पण तुम्हाला दाखवले’, इति दर्शन.
मिनी वर्ल्डला आम्ही तीन वाजता पोहोचलो. हे छोटेखानी प्रदर्शन रॉटरडॅम पोर्टचं कामकाज छोटय़ा छोटय़ा प्रतिकृतींद्वारे आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतं. रात्र आणि दिवस दाखवण्यासाठी केलेली प्रकाशयोजना खूपच आकर्षक होती.
मिनी वर्ल्डपासून मुक्कामाचे हॉटेल दोन किलोमीटर अंतरावर होते. शहराचा हा परिसर महत्त्वाचा समजला जातो. देशोदशीच्या टॉप बॅ्रण्डस्ची दुकानं, रेस्टॉरंटस, थिएटर्स या भागात आहेत. आमचं हॉटेल जुन्या शैलीचं होतं. बहुतेक एखाद्या संस्थानिकांचा वाडा किंवा छोटासा महाल असावा. खरे तर मस्त आंघोळ करून ‘पडे रहो’चा आमचा प्लॅन होता, पण तेवढय़ात दर्शन टूर मॅनेजरचा निरोप घेऊन आला- ‘जरा चांगलं ड्रेसअप होऊन संध्याकाळी साडेसातला खालच्या लाऊंजमध्ये या.’ इच्छा नव्हती पण त्यांचं मन मोडायचं नाही म्हणून तयार झालो.
हेरंब आम्हाला घेऊन निघाले पण कुठे, कशासाठी काही सांगत नव्हते. ते आम्हाला जवळच्याच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर घेऊन गेले. एक अत्यंत मोठे, पॉश इंडियन रेस्टॉरंट होते ते. भारतीय पद्धतीने सजवलेले, भारतीय संगीताची धून वाजत असलेले आणि भारतीय आदरातिथ्याने परिपूर्ण असलेले हे रेस्टॉरंट खूपच सुंदर होतं. पण अशा महागडय़ा रेस्टॉरंटमध्ये आपण का आलो आहोत? टूर तर पूर्ण अजून झाली नाही. मग हे कसले सेलिब्रेशन? तेव्हढय़ात हेरंब म्हणाले, ‘या खास डिनरचे आयोजन तुमच्यासाठी तुमच्या मुलीने वृषालीने केले आहे! ही खास संध्याकाळ तुमच्या लग्नाला पस्तीस र्वष पूर्ण झाली म्हणून वृषालीकडून तुम्हाला एक सरप्राइज गिफ्ट!! या अनोख्या देशात, या अनोख्या सफरीत ही अशी अनोखी गिफ्ट!
आज टूरचा शेवटचा दिवस. आज नव्वद किलोमीटर सायकल चालवायची होती. जरा दडपण आलं होतं. नाही जमलं तर? म्हटलं रोजप्रमाणे पन्नासेक किलोमीटर चालवू आणि मग ठरवू पुढे सायकलीने जायचं की गाडीचा आधार घ्यायचा. आम्ही शेवटचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज झालो आणि दर्शनने एक सुखद धक्का दिला, ‘शेवटचे अंतर नव्वद नसून अठ्ठय़ाहत्तरच आहे! नव्वदीची मानसिक तयारी असल्याने अठ्ठय़ाहत्तर तर आपण यूं मारू! त्याच्या बोलण्याने हुरूप आला आणि आम्ही अॅमस्टरडॅमकडे निघालो.
चहापानाचा पहिला ब्रेक आटपून आम्ही परत मार्गी लागलो. तासाला साधारण बारा ते चौदा किलोमीटरचे अॅव्हरेज पडत होते. मजल दरमजल करत आमच्या चौकडीने दुसरा टप्पादेखील गाठला. एका सुंदरशा तळ्याच्या किनाऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण घ्यायचे ठरले. आता या टप्प्यावर मला ठरवायचे होते की पुढे कसे जायचे, गाडीने की सायकलीवर? रोजच्या सवयीने पन्नास किलोमीटर तर मारले होते, पण अजून दोन तास सायकल चालवायची होती. मनात थोडी धाकधूक होती.
पण मला खरंच थकल्यासारखं वाटत नव्हतं. आणि आता अंतिम लक्ष्य नजरेच्या आवाक्यात असताना कच खायची? मी सायकलनेच जायचे ठरवले आणि सगळ्यांनी एकमेकांना थम्स अप दाखवत दुचाकी घोडय़ांवर स्वार झालो.
दर्शन आता माझ्या मागे-पुढे राहात होता. लांबवर आकाशात उड्डाण घेणारी विमानं दिसत होती. काकू ती विमानं दिसतात ना? बस्स तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. आहे की नाही जवळ? लांब असतं तर दिसली असती का विमान? असं काहीबाही पण उत्साहवर्धक बोलत त्यानं आम्हा सगळ्यांना गुंगवून ठेवलं.
अॅमस्टरडॅमचे एअरपोर्ट दिसू लागले. विमानाचे गाजर दाखवत दर्शनने खरंच आम्हाला तिथपर्यंत आणलं. थकवा असा जाणवत नव्हता. पण माकडहाड मात्र ‘मी आहे, मी आहे’ अशी जाणीव करून देऊ लागलं होतं. दर शंभर-दोनशे फुटांनंतर सीटवरून उठून त्याला आराम द्यायला लागत होता! पण आता कसलीच तमा न बाळगता आम्ही सायकली चालवत होतो.
या ट्रिपने आम्हाला खूप आनंद दिला. सगळ्या प्रकारांच्या रस्त्यांवर, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातून, फुलांच्या शेतांतून, गावांतून, शहरांतून आम्ही मस्त सायकलिंग केलं! हवामानानेसुद्धा आमची खूप साथ दिली. तब्येतही तब्येतीत राहिली! हॉटेलला पोहोचल्यावर आमच्या या स्वप्न सफरीची सांगता होणार होती.
सायकलींनी एक वळण घेतलं आणि हॉटेलची मोठ्ठी पाटी दिसली! सेलिब्रेशनची जय्यत तयारी करून ठेवली होती. सगळ्यांनी आपापल्या मोबाइल्सवर फोटो काढण्याचा सपाटा लावला. नाजूक, रंगबिरंगी वाईन ग्लासेसमध्ये फ्रुटीवाईनचे घोट घेत घेत आम्ही आमची दुचाकी स्वप्नसफर पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला. आमची व आमच्या आयोजकांची ही पहिलीच सायकल ट्रिप असल्याने आम्हा सगळ्यांना आनंदाचं उधाणच आलं होतं जणू. एकमेकांचे अभिनंदन करण्यात आणि निरोप घेण्यात वेळ कुठे पसार झाला कळलंच नाही. लक्ष्यपूर्तीमुळे जरासुद्धा थकवा जाणवत नव्हता. पाच दिवसांत सतत आमच्या सेवेत हजर असलेल्या, जरा पण त्रास न देणाऱ्या, न कुरकुरणाऱ्या आमच्या सख्या सोबतिणी- आमच्या सायकली, त्यांना निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. त्यांनी आम्हाला या देशाचे असे रूप दाखवले जे चार चाकीने फिरूनसुद्धा बघायला मिळालं नसतं.
या दोन दिवसांत एक गोष्ट, जी वारंवार आम्हाला हुलकावणी देत होती, ती करायचीच असं आम्ही ठरवूनच आलो होतो. ती गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर केला जाणारा फुलांचा लिलाव याची देही याची डोळा बघण्याची. जगातल्या बऱ्याचशा देशातून आलेल्या व या देशाच्या स्वत:च्या फुलांचा इथे रोज लिलाव होतो. आणि मग ती जगभर पाठवली जातात. रोज साडेतीन करोड फुलांचा इथे लिलाव होतो. करोडो फुलांची व्यवस्थित काळजी घेऊन, ती ताजी टवटवीत राहतील असं पॅकिंग करून कमीत कमी वेळेत त्यांचं वाटप करण्याची ही सिस्टीम बघून आपल्याला अचंबित व्हायला होतं. साडेतीन हजार कामगार बिनबोभाट काम करत असतात. एका सेकंदाची सुद्धा कोणाला उसंत नसते. एखाद्या रोबोसारखे हे कामगार आपापली डय़ूटी बजावत असतात. सगळे काही ऑटोमटाईज्ड आहे. २५० फुटबॉल ग्राऊंड्स एव्हढय़ा जागेत हा अचाट, अफाट कारभार चालतो. सकाळी सात ते अकरा ही त्याची वेळ. पण अकरानंतर पूर्ण शुकशुकाट. इंजिनीअिरगची कमाल इथे बघायला मिळते. इतकी फुले, इतके रंग, इतका व्यवस्थितपणा, इतकी शिस्त बघून आम्ही भारावून गेलो. निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा हा मिलाफ बघण्याचं आम्ही ठरवून आलो होतो. आमचं हेही स्वप्न पूर्ण झालं.
अंजली गुजर – response.lokprabha@expressindia.com