‘बोतस्वाना देशात वर्षभराच्या वास्तव्यात मला वारंवार ‘डय़ुमेला’ हा शब्द ऐकू येतो, बोलावा लागतो. ‘डय़ुमेला’ म्हणजे नमस्ते’.. येता-जाता अशा पद्धतीने अभिवादन करून या देशातल्या लोकांनी एक प्रेमाचे,

माणुसकीचे नाते लेखिकेशी कसे जोडले, त्याची गोष्ट-

मी  चालण्याच्या व्यायामासाठी माझ्या घराजवळच्या मैदानाकडे जात होते. ऑगस्ट महिना चालू होता. त्यामुळे वातावरण उबदार होते. मे, जूनमधली हाडे गोठवणारी थंडी पळाली होती. अंगावर गरम कपडय़ांचे ओझे न घालता मी आरामात त्या शांत, निर्मनुष्य रस्त्यावर चालत होते. आज रविवार असल्याने, इतर दिवशी तुरळकपणे दिसणारे सुरक्षारक्षक किंवा कामावर जाणाऱ्या मोलकरणी त्याही दिसत नाहीत. सुळकन निघून जाणाऱ्या गाडय़ाही आज रस्त्यावर नाहीत. अशा नीरव शांततेत रस्त्यातून एकटे चालण्याचा आनंद मी घेत होते.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांना बहर आला आहे. काही झाडे जांभळ्या तर काही झाडे पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पूर्णपणे रंगून गेलेली आहेत. सगळे गॅबरॉन शहर या बहरलेल्या झाडांनी सजलेय.

महिनाभराआधी गुलाबी पांढऱ्या पाकळ्यांच्या फुलांचा बहर होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात पूर्ण झाडच गुलाबी चंदेरी फुलांनी बहरलेले बघताना झाडाचे ते स्वर्गीय सौंदर्य डोळ्यांत साठवून ठेवावेसे वाटत होते.

काही दिवसांनी या पांढऱ्या व जांभळ्या फुलांचा बहर जाईल. मग जीव तोडून बहरतील शाईसारख्या गडद निळ्या रंगाच्या फुलांची झाडे! शहरातील रस्ते या निळ्याशार फुलांनी सजून जातील.

काटेरी आणि वाळवंटी, दगडी देशामधील फुलांचा असा उत्सव मी आनंदाने बघते, अनुभवते. ते दृश्य मनाच्या पेटीत जपून ठेवते.

मैदानावर शांत वातावरणात साळुंक्यांचा किलबिलाट जास्तच जाणवत होता. मंजुळेपेक्षा तो आवाज कर्कशतेकडे झुकत होता. हे पक्षी एकमेकांशी बोलत नाहीत तर भांडत आहेत असे वाटले. या मैदानावर खूप मोठय़ा संख्येने साळुंक्या आहेत आणि जिथे गर्दी वाढते तिथे जागेसाठी भांडणे होणारच! ‘वास्तव्यासाठी जागा’ हा प्रश्न भूतलावरच्या सर्व भूचरांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मग तो एखादा जंगली श्वापद असो, जे त्याच्या सीमेसाठी लढते किंवा गुहेतील आदिमानव! टोळीयुद्धापासून महायुद्धापर्यंत साऱ्या युद्धांचे कारण सीमाप्रश्न हेसुद्धा असते.

28-lp-animal

समोरून एक स्त्री चालत येत होती. त्या निर्मनुष्य रस्त्यात तिला बघून मला हायसे वाटले. डय़ुमेला मा! मी तिला म्हटले. माझ्या अभिवादनाला तिने तोंडभरून हसून उत्तर दिले. एंऽऽऽ! डय़ुमेला एंऽऽऽ म्मा! हसताना तिचे स्वच्छ निर्मळ डोळे लकाकले. तिचे हास्यही अगदी मनमोकळे, कुठेही कृत्रिमतेचा लवलेश नाही. तिच्या हास्याने तिच्या चेहऱ्यावर जो गोडवा आला होता तो मला मनमोहक वाटला. दक्षिण आफ्रिकेतील ती स्त्री मला त्या क्षणी सुंदर वाटली. केवळ उजळ वर्ण आणि चेहऱ्याची योग्य ठेवण म्हणजेच सौंदर्य ही संकल्पना योग्य आहे का, मनाला प्रश्न पडतो.

आम्ही एकमेकींना डय़ुमेला म्हटले आणि आपापल्या दिशेने चालू लागलो. कोण होती ती? कोण जाणे? माझ्यासाठीही अगदी अपरिचित होती ती! या देशात दोन व्यक्ती समोरासमोर आल्या की एकमेकांना अभिवादन करणारच! ओळखपाळख नसतानाही एकमेकांना अभिवादन करून हे लोक मानवतेचे नाते जपतात. कितीही घाईत असू देत, भ्रमणध्वनीवर बोलण्यात व्यस्त असतील तरी ते समोरून येणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणार नाहीत. क्षणभर वेळ काढून ते डय़ुमेला! म्हणणारच! अर्थात आपणाकडूनही ते अशीच रास्त अपेक्षा करतात.

बोतस्वाना देशात वर्षभराच्या वास्तव्यात मला वारंवार ‘डय़ुमेला’ हा शब्द ऐकू येतो, बोलावा लागतो. वर्षांपूर्वी नवऱ्याच्या नोकरीतील बदलीमुळे मी येथे आले तेव्हाही डय़ुमेला मा! या शब्दाने सर्वप्रथम माझे स्वागत केले.

होय! हे मी सर्व सांगतेय ते बोतस्वाना या एका छोटय़ा देशाबद्दल! ‘गॉड मस्ट बी क्रेझी’ या चित्रपटामुळे आपण या देशाचे नाव ऐकून असाल. दक्षिण आफ्रिका, नामेबिया, झिम्बाब्वे, जांबिया या देशांनी वेढलेला हा एखाद्या राज्याएवढा देश आहे. बोतस्वानातील ८० टक्के जमीन कलहारी वाळवंटाने व्यापली आहे.

या देशाचे हवामान कोरडे आहे. मकरवृत्ताची रेषा या देशाला छेदून जाते, त्यामुळे सूर्याची किरणे खूप प्रखर असतात. एप्रिल ते जुलै इथे थंड हवामान असते. कधी रात्री शून्य किंवा शून्याखाली तापमान जाते. ऑक्टोबरपासून उन्हाळा जाणवतो. डिसेंबरमध्ये ऊन अतिशय प्रखर, तापदायक असते. माझ्या अनुभवाप्रमाणे जानेवारी, फेब्रुवारी आणि ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये छान उबदार वातावरण असते. पाऊसराजा आपल्या लहरीप्रमाणे वर्षभरात अधूनमधून हजेरी लावतो आणि त्याचे आगमन होते ते विजेच्या चकचकाटात व ढगांच्या जोरदार ढोलताशांसह!

29-lp-animal

वर्षभर केवळ हिरवी किंवा काटेरी झाडे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये वेड लागल्यागत फुलतात. झाडांवर पाने नसतात तर केवळ फुलेच फुले असतात. या झाडांना, फुलांना बघून ‘सुंदर देशा, पवित्र देशा.. फुलांच्याही देशा’ हे लहानपणी शाळेत गायलेले गाणे गावेसे वाटते.

पण इतर वेळेस या फुले – पाने नसलेल्या अशा काटेरी झाडांतही मला सौंदर्य जाणवते. येथे प्रदूषण नसल्याने आकाश नेहमी निळेभोर दिसते. अशा निळ्याशार आकाशाच्या पाश्र्वभूमीवर ती निष्पर्ण झाडे आणि वेडय़ावाकडय़ा वाढलेल्या फांद्याच्या रेषांमधील सौंदर्य एखाद्या चित्रकाराला नक्कीच आकर्षित करेल.

या देशाला मला ‘दगडांच्या देशा’ असे म्हणावेसे वाटते. तसे तर हा देश सपाट जमिनीचा प्रदेश आहे. येथे उंच पर्वत, खोल दऱ्या मला दिसल्या नाहीत. पण इथे छोटय़ा टेकडय़ा बऱ्याच आहेत. या टेकडय़ा म्हणजे छोटय़ा मोठय़ा शिळांचा एक प्रचंड ढिगारा असतो. काही प्रचंड शिळा टेकडीच्या पायथ्याशी कधी काळी घरंगळू पडलेल्या तर काही कोणत्याही क्षणी पडतील अशा अधांतरी, थोडय़ाशा आधारावर टिकलेल्या! अशी प्रचंड शिळा खाली पडणे या देशात अपशकुन समजतात. शिळा खाली पडणे म्हणजे देशावर येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना अशी इथे समजूत आहे.

बोतस्वानातील ‘मोरेमी’ या गावाजवळच्या टेकडीवरही अशाच प्रचंड शिळा आहेत. बोतस्वानातील लोक या टेकडीला त्यांच्या पूर्वजांचे वसतिस्थान मानतात. त्यांच्यासाठी ही टेकडी पवित्र ऐतिहासिक स्थान आहे. इथल्या धबधब्याचे पाणी कधीही आटत नाही. उन्हाळ्यातही टेकडीवरच्या त्या पाषाणांवरून पाणी ओसंडत असते. ज्यावेळेस या टेकडीवरून एक प्रचंड शिळा खाली पडली त्याचवेळेस बोतस्वाना देशाचे पहिले अध्यक्ष सर खामा यांचे निधन झाले. त्यामुळे शिळा खाली पडणे हा अपशकुन असतो ही बोतस्वानावासीयांची समजूत अधिकच दृढ झाली. आजही ती आठवण मोरेमी टेकडीखालच्या शिळेजवळ फलकावर लिहून ठेवली आहे.

इथले काटेरी झाडे, प्रचंड पाषाण याशिवाय इथले विविध पक्षी, इथले प्राणिजीवन, जंगले या सर्व गोष्टी या देशाच्या सौंदर्यात भर घालतात. बगिच्यांमध्येही सौंदर्यनिर्मितीसाठी फुलांच्या ताटव्यापेक्षा विविध प्रकारचे निवडुंग आणि त्याभोवती रचून ठेवलेले विविध आकारातील दगड अशा रचना आढळतात.

बऱ्याच वेळा गोड आवाजातील पक्ष्यांचे आवाज मला ऐकू येतात. मी आवाजाच्या दिशेने जाते. तो सुंदर पक्षी शोधून काढते तरी कधी काही केल्या लपलेला तो पक्षी झाडांच्या गर्दीत दिसतच नाही. माझ्या घरामागे एका झाडावर सुगरण पक्ष्यांनी वसाहत केलीय. सकाळी या पिवळ्या राखाडी पक्ष्यांचा त्यांच्या घरटय़ांजवळ चिवचिवाट चालू असतो. झाडांना टांगलेली सुगरण पक्ष्यांची घरटी बघून मला बहिणाबाईंचे गाणे ‘‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’’ आठवते. मनाला एक अनामिक हुरहुर लागते. आपण आप्त, स्वकीय, आपली भाषा आणि मायदेशापासून फार दूर असल्याची भावना मनात दाटून येते.

भारतात दिसणारे पक्षी चिमण्या, साळुंक्या, बुलबुल, टिटवी आणि खंडय़ा, कबुतरे मला इथेही दिसतात. भारतात दिसणारा निळकंठ इथेही दिसतो. परंतु गॅबरॉन शहरात मला कावळे दिसले नाहीत. पण गॅबरॉनपासून जरा लांब पलापे, म्हालापे, फ्रान्सिसटाऊन या गावांकडे गेलात तर तुम्हाला कावळे दिसतील. पण हे कावळे बघून तुमच्या भुवया उंचावतील आणि चेहऱ्यावर पटकन हसू येईल. अरे! येथील कावळ्यांनी पांढरा सदरा घातला की काय? अशी तुमची प्रतिक्रिया असेल. या कावळ्यांची पाठ काळी पण मान, गळा व पोट पांढरेशुभ्र असते. हा काळीपांढरी बंडी घातलेला कावळा फारच मजेदार वाटतो. त्याला पाहून लहानपणी ऐकलेली कावळ्याची गोष्ट आठवते. गोष्टीतल्या त्या कावळ्याने गोरे होण्यासाठी किती बरे प्रयत्न केलेले, पण त्याला त्यात काही यश मिळाले नाही. त्यामानाने बोतस्वानातील कावळे भाग्यवान म्हणायचे, ज्यांना निसर्गानेच पांढरा गणवेश चढवून दिलाय.

बोतस्वानात मी एक असा पक्षी पाहिला. त्याची पाठ काळी तर गळा, पोट लालभडक! बुलबुलएवढय़ा आकाराचा हा पक्षी खूप छान दिसतो. झाडावर खूप सारे पक्षी बसले की वाटते लालभडक फुलांनी झाड बहरलेय. माझ्या घरामागील अंगणात झाडांवर बऱ्याचदा अनोळखी पक्षी येतात. एक चिमणीपेक्षाही लहानगा पक्षी, चिमणीच्या रंगांचा पण गळा आकाशी रंगाचा! गॅबरॉनमधील माझ्या मैत्रिणीने या पक्ष्याचे यथार्थ वर्णन केलेय, ती म्हणते हा पक्षी म्हणजे आकाश आणि धरतीच्या मीलनाचे प्रतीक आहे. पण या चिमुकल्या पक्ष्याची कृती मात्र अगदी उलटी आहे. खालच्या पृथ्वीचा, मातीचा रंग या पक्ष्याने वरच्या बाजूला पाठीवर धारण केलाय, तर वरच्या आकाशाचा निळा रंग खाली मान, गळ्याला लावून घेतलाय.

सरोवेच्या जंगलात झाडीत लपलेला एक छोटासा पक्षी पाहिला. जणू इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर गडाबडा लोळून आलाय असा! सारेच इंद्रधनुष्यी रंग लपेटून घेतलेय या पक्ष्याने आपल्या

इवल्याशा पंखांवर! इथे पाचशेपेक्षा जास्त, विविध जातीचे पक्षी दिसतात. त्यातले खूप पक्षी अनेकविध रंगानी रंगून गेलेले आहेत.

गॅबरॉन शहरात राखीव जंगल आहे. तिथे बहुसंख्येने शहामृग दिसतात. गाडीची चाहूल लागली की गाडीपुढे रस्त्यावरून आपल्या लांब टांगा टाकत आणि पिसांचा पसारा आवरत ते पळत रहातात. घराजवळच्या खुल्या मैदानावर मला सुतार पक्ष्यासारखा एक पक्षी दिसतो. जमिनीवरचे खाद्य टिपत असताना त्याच्या डोक्यावरचा तुरा हलत रहातो. इथल्या बऱ्याच पक्ष्यांना निसर्गाने डोक्यावर मुकुटासारखा तुरा बहाल केलाय. तपकिरी रंगाचा, डोक्यावर तुरा असलेला, घारीएवढा मोठय़ा आकाराचा ‘गो- अवे’ पक्षी माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून मला रोज दिसतो. झाडाच्या उंच फांदीवर तो बसलेला असतो. त्याच्या ग्वॉ..य, ग्वॉ..य अशा आवाजने त्यााल ‘गो- अवे’ पक्षी म्हणतात. त्याचा तो वेगळा आणि सततचा आवाज, का कोणास ठाऊक, माझ्या कानाला सुखावह वाटत नाही.

गॅबरॉन शहरानंतर फ्रान्सिसटाऊन हे बोतस्वानातील दुसरे मोठे शहर आहे. फ्रान्सिसटाऊनहून कसाने जंगलाकडे जाताना रस्त्यात जागोजागी धनेश पक्षी दिसतात.

बोतस्वानातील जग्ांले आणि प्राणिजीवन वन्य छायात्रिकारांचे आकर्षण केंद्र आहे. येथील कसाने, माऊंट जंगलात आफ्रिकी हत्ती, झेब्रे, जिराफ, तरस, सिंह, रानडुकरे, रानम्हशी, हरीण व काळवीट असे बरेच प्राणी आहेत. बोतस्वानातील ओकावांगो खोरे जगात प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या अस्पर्शित सौंदर्याचा निखळ आनंद तेथे अनुभवास येतो.

बोतस्वानातील सरोवे येथील जंगलात पांढरे एकशिंगी गेंडे आहेत. त्या प्रचंड आणि विचित्र प्राण्याला जवळून बघताना आपण श्वास रोखून धरतो. मनात भीती, आनंद दोन्ही भावना दबा धरून बसतात आणि तो जवळून निघून गेला की नकळतच तोंडातून दिलासेचा एक सुस्कारा निघतो. मग तो क्षण, तो अनुभव मनावर कायमचा कोरला जातो.

कसाने जंगलातील ‘चौबे’ नदीत पाणघोडे मजेत डुंबत असतात किंवा आपले भव्य जबडे उघडून आपल्याच भाऊबंदांशी भांडत असतात. मगरबाई नदीतून बाहेर येऊन सूर्यस्नान घेत निवांतपणे खडकावर पहुडलेल्या असतात. हत्ती आपल्या कुटुंबकबिल्यासह किनाऱ्यावरच्या गवताचा आस्वाद घेत असतात. नदीकाठचे गवत सोंडेने पाण्यात बुडवून, धुऊन मगच ते खातात हेही येथेच पाहिले. हे सर्व प्राणी स्वत:मध्ये इतके मग्न असतात की ते ‘चौबे’ नदीतील पर्यटकांच्या नौकांकडे चक्क कानाडोळा करतात.

कसानेला जातानाचा एक प्रसंग आठवतो. एका उंच जिराफाने आमच्या गाडीचा रस्ता अडवला. पूर्ण रस्त्यावर तो आडवा उभा होता. रस्त्यातच तो उभा असल्यामुळे सर्व गाडय़ा काही अंतरावरच थांबल्या. त्याच्याकडे पाहताना तो आम्हाला उंच इमारतीसारखा भासला. याच्यामागून त्याचे पिल्लू येत होते. त्याला सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून त्या जिराफ ‘आई’ ने गाडय़ांचा रस्ता अडवला होता. पिल्लाने रस्ता पार केल्यानंतर ही जिराफ आई त्यांच्यामागून जंगलात निघून गेली. प्राण्यांमधली ही मातृत्वाची भावना बघून ‘माता देऊन कृपाळा झाला’ अशा अर्थाची समर्थ रामदासांची दासबोधातील ओवी आठवली.

बोतस्वानातील झाडे प्रचंड विस्तार असलेल्या बुंध्यांचे, उंचच उंच अशी असतात. ‘बाओबब’ हे झाड अशापैकीच एक आहे. बाभळीसारख्या काटेरी झाडांबरोबरच मोफाने, मारूला, आवाकाडो ही झाडेसुद्धा इथे आहेत. आपल्याकडचा कडुलिंब इथे थोडय़ा वेगळ्या रूपात दिसतो. मारूलाचे फळ आंबट-गोड असे असते. हत्तींचे ते आवडते खाद्य आहे. माणसे ती फळे नुस्ती न खाता त्यापासून विविध पदार्थ बनवितात. मारूलाच्या फळात शरीरासाठी पोषक अशी महत्त्वाची खनिजे आढळतात. या फळापासून आमारूला चॉकलेट्स, आमारूला मद्य बनवितात. आमारूला चिक्की चवीला भारतीय आंबापोळीसारखी असते. ‘आवाकाडो’ हे कैरीसारखे हिरव्या रंगाचे पण लंबवर्तुळाकार असे हे फळ आजकाल सर्वाना माहिती झाले आहे. त्यातील अनेक पोषकसत्त्वांमुळे हे फळ जगभरात सर्वाचे लाडके आहे. इथे या देशात डिसेंबरमधील उन्हाळ्यात आंब्याचा आस्वाद घेता येतो. कलिंगड, खरबूज, आणि संत्री-मोसंबी याशिवाय अननससुद्धा येथे छान मिळतात.

बोतस्वानातील नागरिकांना मोत्स्वाना म्हणतात. त्यांच्या भाषेला सेतस्वाना म्हणतात. मोत्स्वाना हे गव्हाळ वर्णाचे, पसरट नाकाचे असतात. त्यांच्या भुवया फार विरळ, नसल्यासारख्या व डोळे मोठे असतात. डोक्यावर खुरटे केस आत वळलेले, कुरळे असे जणू साबणाचा फेस डोक्यावर सांडल्यासारखा! केस फारसे वाढत नसल्याने हे लोक डोक्यावर नकली केस लावून वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या वेण्या घालतात. विविध प्रकारच्या चित्रविचित्र केशरचना करवून घेतात. केसांचे नकली टोप घालून आपली केसांची हौस भागवून घेतात. इथे श्रीमंत व गरीबसुद्धा केसांसाठी, केसांच्या सौंदर्यप्रसाधनांसाठी भरपूर पैसे खर्च करतात.

बोतस्वाना देशाला १९६६ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्याआधी इथे ब्रिटिशांची राजवट होती. १८३५ साली इंग्रजांनी इथे वसाहती उभारल्या. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी ब्रिटिश येथे आले. त्यांनी मोत्स्वानांमध्ये शिक्षण, धर्म, भाषा आणि ब्रिटिश शिष्टाचार रुजवले. त्यांना आधुनिक जीवनशैली शिकवली. ब्रिटिशांनी रस्ते, रेल्वे, वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या. सेत्स्वाना स्थानिक भाषा असली तरी येथे कार्यालयीन भाषा इंग्रजी आहे. येथे ब्रिटिश कायदा लागू आहे.

इंग्रज १९६६ साली येथून निघून गेले. स्वातंत्र्यासाठी फार मोठा लढा या लोकांना द्यावा लागला नाही. १९६७ साली येथे हिऱ्यांच्या खाणीचा शोध लागला. जर हिऱ्यांच्या खाणीचा शोध इंग्रजांच्या राजवटीत लागला असता तर बोतस्वानाला सहजपणे स्वातंत्र्य मिळाले नसते असे बोलले जाते.

हिऱ्यांच्या खाणीसंदर्भात एक रोचक गोष्ट ऐकायला मिळाली ती अशी- बोतस्वानाची जंगले त्या काळातही जगभरातील पर्यटक आणि शिकारी यांच्यासाठी आकर्षण केंद्र होते. अशाच एका हौशी पर्यटकांच्या विमानाला अपघात झाला. त्यांच्या मदतकार्यासाठी द. आफ्रिकेतून एक वैद्यकीय पथक अपघातस्थळी, त्या जंगलात आले. त्या पथकातील एका अधिकाऱ्याला रंगीबेरंगी दगड गोळा करण्याचा छंद होता. त्यांनी येथून जाताना काही रंगीत, चमकदार दगड सोबत नेले. नंतर ते चमकदार दगड, दगड नव्हेत, बहुमूल्य असे हिरे आहेत असा निष्कर्ष समोर आला.

सिंदबादच्या साहसकथा अशा प्रकारे खऱ्या होऊ शकतात? ही गोष्ट ऐकल्यावर, सिंदबाद खोल दरीत पडलाय, दरीमध्ये सगळीकडे भयानक साप व चमचमणारे हिरेसुद्धा आहेत. सिंदबाद तेथून बाहेर निघण्यासाठी स्वत:ला प्रचंड पक्ष्याच्या पंजाला त्याच्या फेटय़ाने बांधून घेतोय, सोबत जमतील तेवढे हिरेही तो घेतो हे त्या साहसकथेतील दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले.

मग आपणही तेथे जेवून काही चमकदार दगड गोळा करून आणावेत का, अशी सुप्त इच्छा मनात जागृत झाली तर तो विचार मनातून काढून टाकावा लागेल. कारण आता तो परिसर सरकारच्या देखरेखीखाली आहे. तिथे इतरांना जाण्यास बंदी आहे. वरील घटना घडल्यानंतर तेथे हिऱ्यांच्या खाणीचा शोध घेण्यात आला. बोतस्वाना सरकारने द. आफ्रिकेबरोबर हिऱ्याच्या व्यापाराचा करार केला.

हिऱ्यांच्या खाणीमुळे या देशाची आर्थिक बाजू भक्कम झाली. इथले चलन ‘पुला’ आहे. येथील भारतीय आणि चिनी लोकांनी बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे.

मोतस्वाना नागरिक शांत प्रवृत्तीचे व अभिमानी आहेत. ते शांतपणे आपले जीवन व्यतीत करतात. कधीही, कोणत्याही वेळेस ते घाईगडबडीत नसतात. कामाचे दडपण, त्यामुळे मनावर येणारा ताण या गोष्टी त्यांच्या आयुष्यात नसतात. आपल्या क्षमतेनुसार आणि जमेल तेवढय़ा वेगानुसार ते आपली कामे हसतखेळत करत असतात. निसर्गत मुक्त वावरल्याने कसलेही दडपण किंवा बंधने या गोष्टींची त्यांना सवय नाही. आठवडय़ाचे पाच दिवस काम करून शनिवार – रविवार मित्र आणि कुटुंबीयांबरोबर संगीत, नृत्य आणि खाद्यपदार्थाचा आस्वाद ते घेतात. शुक्रवार दुपारपासूनच त्यांना सुटीचे वेध लागतात. संगीत आणि नृत्य हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचे चामडय़ापासून बनविलेले वाद्य, त्याच्या तालावर टाळ्या वाजवून त्यांनी धरलेला ठेका, पायांच्या वैशिष्टय़पूर्ण हालचाली, नृत्यात लहानांपासून थोरापर्यंत सर्वाचा सहभाग असे. त्यांच्या नृत्याची वैशिष्टय़े आहेत. इतर वेळेस इंग्रजांप्रमाणे वस्त्र परिधान करत असले तरी नृत्य करताना मोतस्वाना आपला पारंपरिक चामडय़ाचा वेश घालतात.

‘मोतस्वाना’ आपल्या सेतस्वाना भाषेत खूप बोलतात. ते बोलके, बडबडय़ा स्वभावाचे असतात. सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या मनमोकळ्या गप्पा, विनोद, हसणे हे सर्व मोठय़ा आवाजात चालू असते. अशा वेळेस इतरांची दखल ते जरादेखील घेत नाहीत. खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद ते लुटतात. ते कामाचे दडपण घेत नाहीत, भविष्याची चिंता करत नाहीत. बचत करणे त्यांच्या स्वभावात नाही. पैसे सांभाळून वापरणे त्यांना जमत नाही किंवा पटत नाही. पैसे (पुला) आले की ते ‘जीवाची मुंबई’ (येथे गॅबरॉन म्हणू या!) करतात.

मोतस्वाना मुख्यत्वे मांसाहारी आहेत. शिकार करणे आणि ती खाणे या परंपरेतून तो आहार आला असणार. पाव व मांस ते खातात. मका व बाजरी ज्वारीसदृश धान्यसुद्धा ते खातात. मका किंवा धान्याच्या भरडची उकड काढून शिजवलेल्या मांसाबरोबर ते खातात. पालक व उपलब्ध पालेभाज्यासुद्धा ते खातात. बटाटे, रताळीशिवाय कमंडलूच्या आकाराच्या बटरनटचा मोठय़ा प्रमाणात ते वापर करतात. इथली पालक खूप मोठय़ा पानांची तर पानकोबीचे गड्डेसुद्धा आठ – दहा किलोचे भल्या – मोठय़ा आकाराचे असतात. अन्नामध्ये मसाले, मिरची न वापरता फक्त मीठ टाकून ते शिजवले जातात.

बोतस्वानातील जमीन रेताड असली तरी सुपीक आहे. कसलीही लागवड केली तरी धरती माता भरभरून देत असते. तरीसुद्धा शेती फारशी केली जात नाही. संत्री, मोसंबी व लिंबूवर्गीय फळे येथे मोठय़ा प्रमाणावर आहेत. आम्रवृक्षाला एक एक कैरी नव्हे तर कैऱ्यांचे घोस लगडलेले बघायला मिळतात. येथील भारतीयांच्या परसबागेत कढीलिंब, केळी, शेवगा, लिंबू, आंबा ही झाडे हमखास असतात. येथे जागेचा प्रश्न नसल्याने मोठ्ठी, पसरट, बैठी व कौलारू घरे व त्याभोवती बागेत फुलझाडे बहरलेली असतात.

मोतस्वाना निसर्गाच्या खूप जवळ आहेत. पक्षीप्राण्यांची भाषा ते समजून घेतात. हे माझ्या लक्षात आले ते एका प्रसंगामुळे! एके दिवशी अंगणात एक सरपटणारा, खूप पायांचा, ‘गोम’सारखा पण त्याहून आकाराने मोठा किडा आला. त्याला पाहून मी घाबरून गेले. त्या किडय़ाला दूर करण्यासाठी मी सुरक्षारक्षकाला बोलावले. किडय़ाला पाहताच तो आनंदित झाला, तो म्हणाला आत्ता खूप पाऊस पडणार! त्यावेळेस आकाशात पावसाचे कोणतेही लक्षण नव्हते. पण त्या दिवशी संध्याकाळी खू पाऊस पडला.

एके सकाळी पांढरा व तपकिरी रंगाचा एक पक्षी सतत ओरडत होता. तेव्हा माझी ब्रिटिश शेजारीण मला म्हणाली हा रेनबर्ड आहे, आज पाऊस पडेल असे सांगतोय ओरडून! आणि दोन तासातच भरपूर पाऊस पडून गेला. आता अशा काही गोष्टींमध्ये मीही तज्ज्ञ झालीय. आज पाऊस पडणार बरं का! अशी भविष्यवाणी मीही करते.

आता सेतस्वाना भाषेतील काही गमतीजमती ! इकडे ‘पुला’ हे चलन आहे. पण पुलाचा आणखी एक अर्थ, सेतस्वाना भाषेत ‘पावसाचा थेंब’ असाही होतो. या वाळवंटी प्रदेशात पाऊस कमी म्हणून तो पैशांप्रमाणे मूल्यवान वाटत असेल का येथल्या लोकांना?

‘परनारी मातेसमान’ ही आपली हिंदू संस्कृतीची शिकवण मला आठवते, जेव्हा कार्यालये, उपाहारगृह आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना उद्देशून ‘मा’ हेच संबोधन मी ऐकते. ‘मा’ या शब्दाचा अर्थ इथे ‘बाईसाहेब’ असा असला तरी ‘मा’ म्हणजे माता हेच मनावर ठसलेय. त्यामुळे मला कुणी ‘मा’ म्हटले की मला ती हाक खूप छान वाटते, त्या शब्दाने मी विरघळून जाते. माझ्या कामात मदत करणारी ‘लेटवीन’, तिचे जे मी लाड करते, तिची मी काळजी घेते ती या एका हाकेमुळे! ती मला ‘मा’ म्हणते.

जसे स्त्रियांना ‘मा’ म्हणतात तसे पुरुषांसाठी ‘रा’ हा सन्माननीय शब्द म्हणून वापरतात. पुरुषांशी बोलतांना डय़ुमेला रा! अशी सुरुवात करूनच बोलले जाते. जेव्हा मी ‘रा’ हे संबोधन ऐकले तेव्हा मला गंमत वाटली, मला पत्रातील श्री. रा. रा. म्हणजे ‘श्रीयुत राजमान्य राजश्री’ ची आठवण झाली. आपणही पत्रात पुरुषांसाठी ‘रा’ अक्षर वापरत होतोच की!

‘‘एं ऽऽऽ एं’’ असा उच्चार त्यांच्या गप्पात हज्जारदा येतो. बाहेर, बाजारात आपल्याला सतत हा उच्चार ऐकायला मिळतो. कारण एं म्हणजे सेतस्वानातील ‘हो’ हो! मला पण असेच म्हणायचे आहे. संमतीदर्शक असा अर्थ ‘एं’ या उच्चारात आहे.

कधी कधी आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. बाजारात किंवा उपाहारगृहात मोतस्वाना व्यक्ती मला ‘डय़ुमेला’ न म्हणता ‘नमस्ते’ म्हणते. माझ्या वेशभूषेवरून त्याने मला ‘भारतीय’ म्हणून ओळखलेले असते. ‘नमस्ते’ हा शब्द काही मोतस्वांनाना माहिती आहे, कारण इथे बहुसंख्येने भारतीय राहतात.

या देशाची दुसरी बाजू म्हणजे वाढती गुन्हेगारी आणि काही वर्षांपूर्वी येथे ‘एड्स’ या रोगाने घातलेले थैमान! बोतस्वाना सरकारच्या अथक प्रयत्नाने, समाजप्रबोधनाने या रोगाला थोडय़ाफार प्रमाणात अटकाव घालता आला आहे.

येथे मला भलीमोठी मुंग्यांची वारूळे खूप ठिकाणी दिसतात. वारूळाच्या रूपातली ही शिल्पं कधी वृक्षांच्या उंचीपर्यंत वाढलेली, खाली विस्तारही तेवढाच मोठा! अशी शिखराकडे निमुळती होत जाणारी ही वारूळं मला सुंदर कलाकृतीप्रमाणे भासतात. त्याकडे बघताना,

‘‘वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ

कृमी कीटकांनी बांधिले देऊळ’’

या कवितेचे स्मरण होते. या भल्यामोठय़ा वारुळांकडे बघतांना वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋ षी हा प्रवास आणि त्या कथेतील वारुळाचा संदर्भ आठवतो.

शेवटी आपण पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली संस्कृती आपण आपल्या सोबत घेऊन जातो हेच खरे! त्यामुळेच परदेशातील सर्व गोष्टी जाणून, समजून घेतांना मला आठवतात माझ्या मायदेशातील संदर्भ, कथा, कविता आणि गाणी!

बोतस्वानातील मराठी मंडळाच्या सहलीमध्ये कधी लहान मुलांचा खेळ रंगत आलेला असतो आणि ‘‘माझ्या मामाचं पत्र हरवलं..तेच आम्हाला सापडलं’’ या आवाजाने द. आफ्रिकेचे ते जंगल दणाणून जाते तेव्हा, किंवा गुढीपाडव्याला हिंदू मंदिरात मराठी मंडळाची गुढी उभारली जाते तेव्हासुद्धा वाटते, माणसेही वृक्षाप्रमाणे असतात. वृक्ष जसे आकाशाशी स्पर्धा करत उंच उंच वाढत जातात, त्याचप्रमाणे माणसेही यशस्वी होण्यासाठी दूरवर जातात. पण वृक्षाप्रमाणेच आपली मुळं जिथे रुजली ती माती आणि ती संस्कृती कधीही विसरत नाहीत. ती जोपासत ते आपला मार्गसंक्रमण करत राहतात.
शुभांगी पाटील – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader