तुमच्या आमच्यासारख्या घरातलीच एक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते- एकटीने..
अगदीच लहान म्हणजेच पाच-सहा महिन्यांची असल्यापासून आई-बाबांनी मला डोंगरदऱ्यांमध्ये भटकवलं. तेवढेच नाही तर सायकल चालवता येत नव्हती तेव्हा तर जुन्या घोडासायकलच्या मागे किंवा पुढच्या छोटय़ाशा सीटवर बसवून पनवेलच्या ३०-४० किमीच्या आसपास असलेल्या गावात किंवा ठिकाणी फिरवलं आणि याच सगळ्याबरोबर मला निसर्गात कसं वागावं, कसं राहावं हे सगळं शिकवलं. या सगळ्या गोष्टींमुळे मला निसर्ग समजला. मुळात फिरायला प्रत्येकाला आवडतं. तसंच आमचं एक कुटुंब. त्यामुळे मला आपल्या देशातल्या काही ठिकाणांबद्दल तर चांगलंच माहिती होतं. कारण ते फिरून झालं होतं.
या सगळ्या आवडींमुळेच माझे मग माउंटेनिअरिंगचे बेसिक व अॅडव्हान्स कोर्स पूर्ण झाले आणि मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन, पण या काळात माझं थोडंफार सायकलिंगसुद्धा चालू होतं. पनवेलच्या आसपासच्या ठिकाणी जाणं रोजचे ७०-८० किमी सायकलिंग करणे. सर्वात पहिलं मी मनाली ते खारदुंगला हा ६०० किमीचा प्रवास केला. वायएचएआयने (यूथ होस्टेल) २०११ मध्ये आयोजित केलेला. तेव्हा कळालं की आपण जास्त किमीचं सायकलिंगपण करू शकतो. मग २०१५ मध्ये आम्ही सहाजण, मी एकटी मुलगी ग्रुपमध्ये असे निघालो. पनवेल ते ओडिसा एकूण २२०० किमी झाले. त्यात सायकलवरून. या सगळ्या गोष्टी करताना माझा स्वत:वरचा विश्वास वाढत होता. माझ्यातल्या बारीकसारीक गोष्टी मला कळत होत्या आणि हे सगळं करताना मला समजलं की माझ्या ओळखीतल्या दोन जणांनी सोलो सायकलिंग केलंय. एकाने भारत परिक्रमा तर दुसऱ्याने पनवेल ते सियाचीन बेसकॅम्प. आणि काही परदेशी मुलींनीपण केलंय. मग सगळी चक्रं फिरायला लागली. आपण असा प्रवास करू शकतो का? कसा करायचा आणि का करायचा हे सगळं चालू असताना ठरलं, पनवेल ते कन्याकुमारी असा एकटीने प्रवास सायकलवर आणि कुठलीही मदतनीस गाडी न घेता हा प्रवास करायचा. नाव दिलं ‘आय प्राइड’.
आता हे नुसतं ठरवून चालत नाही. कारण एकटय़ाने बाहेर पडणं म्हणजे मागे बऱ्याच गोष्टी लागतात. ते म्हणजे नियोजन करणं. स्वत:ची मानसिक आणि शारीरिक तयारी करणं. त्यातूनपण सर्वात महत्त्वाचं घरच्यांची परवानगी मिळणं आणि हे सगळं करणारी मुलगी असेल तर अजून बऱ्याच गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी माझ्या प्रवासाची तयारी करत होते. पण घरातून सगळ्यांचा होकार मिळणं महत्त्वाचं होतं आणि तो पूर्ण होकार मला दिवस अगोदर मिळाला. मुळात प्रवासाची तयारी मी दोन महिने अगोदरच चालू केली होती. तयारीत महत्त्वाचा म्हणजे रस्ता. दिवसाचं गणित जुळवणं, एका दिवसात किती किमी जायचं ठरवणं, प्रॅक्टिस हे सगळंच. गोष्टींची जमवाजमव हे सगळंच आणि मग आला तो निघायचा दिवस. घरातून बरीच माणसं होती. मित्रमंडळी, सगळीच तयारी चालू होती, त्यामुळे आई-बाबांशी बोलायला मिळत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत सगळे होते आणि मग मिळाला तो वेळ बोलायला. नेहमी गप्पा मारणारे माझे आई-बाबा खूप शांत होते. पण शेवटी भावना व्यक्त करणं गरजेचं होतं. बोलणं चालू झालं आणि बाबांच्या डोळ्यांत पटकन अश्रू आले. मलाही राहवलं नाही. कारण हे सगळं करताना मला काही झालं तर याची भीती होती. पण मानसिक तयारी पूर्ण होती. झालेल्या प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडून परत आयुष्य जगायची! मुळात हा सगळा प्रवास कम्फर्ट झोन सोडून काहीतरी वेगळं करण्यासाठी होता. स्वत:ला शोधण्यासाठी होता. त्यामुळे निघणं भागच होतं. मनावर दगड ठेवून पहिल्या दिवशी पॅडलिंग करायला सुरुवात केली आणि मी जीवनाला नवीन अर्थ देत गेले. आता वाटेत येणाऱ्या गोष्टींवर मात करत मला पुढे जायचं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा