जर्मनीतलं साल्झबर्ग प्राचीन काळात प्रसिद्ध होतं ते तिथे असलेल्या सॉल्टमाइन म्हणजेच मिठाच्या खाणीसाठी. पहिल्या महायुद्धानंतर या खाणीचं रूपांतर एका म्युझियममध्ये केलं गेलं.
व्हिएन्नाहून युरेलनं साल्झबर्गला जाण्यासाठी गाडीत चढून आम्ही आमच्या नंबरच्या सीटस् शोधत होतो तेव्हा आम्हाला आम्ही युरेलनं प्रवास करतोय म्हणजे नेमकं काय आहे ते समजलं. आमच्या सीटस्ना आमच्या नावाच्या चिठ्ठय़ा लावलेल्या होत्या. त्यामुळे काहीही घोटाळा होण्याची शक्यताच नव्हती.
अक्षरश: दोन मिनिटांत गाडी सुरू झाली. माझी सीट खिडकीपाशी असल्यामुळे मी खिडकीच्या तावदानातून बाहेर पाहू लागले. गेल्याच आठवडय़ात बर्फ पडलं होतं. अगदी भरपूर हिमवृष्टी झालेली होती, त्यामुळे रुळांना लगटून बर्फाचा खच पडलेला होता.
साल्झबर्ग आलं ते अंधार घेऊनच. थोडा पाऊसही होता. स्टेशन तसं छोटं. मुळात हे शहर अलीकडच्या काळात लोकांच्या नजरेत आलं ते या शहराजवळ १९६५ मध्ये गाजलेल्या ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या सिनेमाचं शूटिंग झालं होतं आणि त्या शूटिंगमधूनच इथल्या निसर्गाचं अनुपम सौंदर्य जगाला दिसलं होतं. आणि मोझार्ट! त्याचं गावं हे!
इथं तशी गर्दी नव्हती. स्टेशनमधून बाहेर पडलो नि लगेच टॅक्सी मिळाली. हॉटेलवर सामान टाकलं नि आधीच बुक केलेली रॉकसॉल्ट माइन बघायला पळालो.
आम्ही साल्झबर्गला जाणार आहोत हे समजल्यावर माझ्या मत्रिणींनी सांगितलं होतं, ‘दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरात नसलेल्या याच ठिकाणी मौल्यवान पेंटिंग्ज, सोनं, आणि पसासुद्धा नाझी राक्षसांपासून लपवून ठवलेला होता. इथं लपवलेला पसा आणि सोनं या राक्षसांविरुद्ध लढायला उपयोगी पडला. शिवाय कलावंतांची ती अमूल्य अशी पेंटिंग्जदेखील वाचली ती या खाणीमुळे. तर जायलाच हवं तुम्हाला तिथं.’ एक विलक्षण उत्सुकता खोचली गेली होती. या टूरची सगळी आखणी माझ्या मुलीनं ऑनलाइन बुकिंग करून केलेली होती.
आम्हाला आता फक्त मिराबेला बागेजवळ पोहोचायचं होतं. हॉटेलमधून चौकात आलो तर समोर बाग दिसली. त्या बागेवर मोठा बोर्ड- मिराबेला गार्डन! हीच ती मिराबेला गार्डन जी ‘साऊंड ऑफ म्युझिक’ सिनेमात आपल्याला दिसते. त्या गार्डनसमोर बस उभी होती. बसमध्ये आम्ही फक्त दहा लोक होतो. त्यापकी तीन जर्मन, दोन अमेरिकन, दोन ऑस्ट्रेलियातून आलेले आणि आम्ही तिघं भारतीय होतो.
गाइडनं माहिती सांगण्यासाठी माइक हातात घेतला नि तो अस्खलित इंग्रजीत बोलू लागला. ‘आपण आता रॉकसॉल्ट माइन पाहायला चाललो आहोत. ती आहे ‘हालेन’ गावापासून काही अंतरावर. हालेन होतं पूर्वी बवेरिया या राज्यात आणि हे राज्य होतं अगदी ऑस्ट्रियाला चिकटून. पुढे युद्धंबिद्धं झाली नि बवेरिया जर्मनीत सामील केलं गेलं. त्यामुळे आता ही खाण भौगोलिकदृष्टय़ा जर्मनीत आहे. पण युरोपात सीमा या आता फक्त कागदावरच राहिल्या असल्यामुळे आपण ऑस्ट्रियातून काहीही कागदपत्रांचे सोपस्कार न करता जर्मनीत जाणार आहोत. जरी पहिल्या महायुद्धानंतर या खाणीचं रूपांतर एका म्युझियममध्ये केलं गेलं असलं तरीही ही खाण फार जुनी आहे. फार जुनी म्हणजे अक्षरश: सेल्टिक ट्राइबजच्या आधीच्या काळापासून ती वापरात होती. आणि त्या काळात मीठ ही एक अतिमौल्यवान वस्तू होती. साल्झबर्ग त्या काळात प्रसिद्ध होतं ते मिठाच्या व्यापारासाठी.
ही खाण बव्हेरिया-ऑस्ट्रियाच्या सीमेवर होती तरी त्या संस्कृतींनी युद्ध टाळण्यासाठी ही निसर्गाची दौलत आपसात करार करून वाटून घेतली होती, असं मानलं जातं. त्यामुळे या दोन देशांत या कारणानं तरी युद्ध झालं नाही. नाहीपेक्षा जगात केवळ मिठासाठी युद्धं झालेली आहेत. तसे इतिहासात दाखले आहेत.
‘सॅलरी’ हा शब्द कसा तयार झाला माहीत आहे कुणाला?’
कुणालाही माहीत नव्हतं. मग गाइडनं सांगितलं, ‘पूर्वी सनिकांना पगार म्हणून मीठ देत असत. त्यावरून सालरी हा शब्द पगारासाठी तयार झाला आणि तोच पुढे सॅलरी म्हणून वापरात आला.
आम्ही एव्हाना मिठाच्या खाणीजवळ पोहोचलो होतो. बस थांबली तसे आम्ही मुख्य गेटमधून आत गेलो. गाइडनं आमची तिकिटं काढली. आता जमिनीखाली असलेल्या खाणीच्या दर्शनासाठी आम्ही आणखी एक दार ओलांडून आत गेलो. तिथे आम्हाला संपूर्ण अंग झाकणारा निळ्या रंगाचा रेग्झीनचा ड्रेस देण्यात आला. तो घालून आम्ही सगळे तयार झाल्यावर आता आमच्याबरोबर दुसरा गाइड येणार होता, त्याची ओळख करून देण्यात आली. तो म्हणाला, ‘आपण सगळे आता जमिनीखाली जाणार आहोत. ही नव्वद मिनिटांची टूर असते. ती करीत असताना आपण एक किलोमीटरचा प्रवास करीत खाण पाहतो.’
आम्ही सगळे त्याच्यामागे गेलो. आम्ही एका रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलो होतो. तिथे एक छोटी गाडी उभी होती. गाइड म्हणाला, ‘आता आपण या इलेक्ट्रिकच्या गाडीतून १४०० फूट अंतर पार करून एका सपाटीवर पोहोचतो.’
ती एक टॉय ट्रेन होती. तिथं ओंडकासदृश लाकडाच्या फळ्या होत्या आणि त्यांच्यावर आम्ही तीन-तीनच्या ग्रुपनं बसणं अपेक्षित होतं. मग स्कूटरवर जसं दोन्हीकडे पाय सोडून बसतो तसे आम्ही एकामागे एक असे तीन-तीन एकेका फळीवर बसलो नि ट्रेन सुरू झाली. अंधाऱ्या बोगद्यातून वळणं घेत-घेत आगगाडी आपली झुकुझुकु चालली होती. मधेच पाणी वाहत असल्याचा आवाज आला. आम्ही हळूच बाजूला पाहिलं तिथं भिंतींवरून पाणी पडत होतं. सलग आठ मिनिटांत आम्ही आमच्या स्टेशनवर पोहोचलो होतो. तिथंही प्लॅटफॉर्म होता. गाडीतून बाहेर पडून आम्ही आमच्या पुढे चाललेल्या गाइडमागे चालू लागलो. आम्ही आता एका सपाट जागी आलो. इथून काही अंतर चालत गेलो तर समोर १३८ फूट खोल घळ होती आणि आम्हाला आता तिथं पोहोचायचं होतं. इथं तेवढं खाली नेणारी एक लांबच-लांब लाकडाची घसरगुंडी होती. पण ज्यांना घसरगुंडीवरून जायची भीती वाटत असेल त्यांच्यासाठी खास पायऱ्या उतरून खाली जाण्याचा मार्गदेखील होता.
अर्थात घसरगुंडीवरून घसरत गेलं तर केवळ काही मिनिटांत तुम्ही त्या घळीत पोहोचू शकत होतात. टूरमध्ये सामील झालेले आम्ही सोडून बाकी सगळेच्या सगळे एकामागोमाग एक असे त्या घसरगुंडीवरून घसरून खाली पोहोचले होते. आणि आम्ही तेवढे मागे उरलो होतो. आमचा इथून पुढे कोणत्या मार्गानं जायचं, याचा निर्णय होत नव्हता. कारण नाही म्हटलं तरी मी घाबरले होते. गेल्या कित्येक वर्षांत मी घसरगुंडीला पायही लावला नव्हता आणि इथं डोळे फिरतील एवढय़ा खाली घसरत जायचं होतं. भरीस भर म्हणून की काय, पण सिक्युरिटीचा तरुण गार्ड दोन वेळा म्हणाला, ‘स्लाइड राइड इज गुड बट टेक केअर ऑफ युवर लेग्ज!’ याचा अर्थ तुमचे पाय चुकूनसुद्धा जरी विशिष्ट ठिकाणी ठेवण्याऐवजी तुम्ही बाजूच्या फूटबोर्डला टेकवलेत तर वरून वेगानं घसरताना पायांना इजा होऊ शकते.’ जर पायऱ्या उतरून खाली जायचं ठरवलं तर अख्ख्या ग्रुपचा चांगलाच खोळंबा होणार होता. आम्ही घसरगुंडीकडे पाहत उभे होतो. आधीच खाली पोहोचलेली मंडळी माना वर करकरून आमच्याकडे पाहत होती. एका तरुण मुलानं मग म्हटलं, ‘कमॉन.. चिअर्स!’ तर एका मध्यमवयीन माणसानं खूण करून अतिशय सोपं आहे असं सांगायचा प्रयत्न केला.
मग पायदेखील साइडला न टेकवता विशिष्ट पद्धतीनं ठेवून आम्ही म्हटलं, ‘वुइ आर रेडी.’ आणि क्षणात सिक्युरिटीच्या त्या तरुण मुलानं व्हेरी गुड असं म्हणत वरून कळ दाबली आणि वेगानं घसरत आम्ही खाली पोहोचलो. खाली घसरत जात होतो तेव्हा सुरुवातीला मी भीतीनं डोळे गच्च मिटून घेतले होते, पण एक मिनिटभरात माझी भीती संपली नि मला फारच मजा आली.
आम्ही आमच्या आधी खाली जाऊन पोहोचलेल्या मंडळींत जाऊन सामील झालो. आता आम्ही सगळे गाइडच्या मागे पुढच्या टप्प्याकडे निघालो. पुढे मोठा बोगदा होता. थोडय़ाच वेळात आम्ही सगळे एका सपाटीवर पोहोचलो आणि समोर पाहिलं, तिथं पुन्हा खूप खोल दरी आणि त्या दरीला लागून असलेल्या सपाटीवर पुढे जाण्याचा वरूनही दिसणारा मार्ग होता. इथंदेखील १३८ मीटर खोल खाली नेणारी घसरगुंडी होती.
आता या खेपेला सराव असल्यासारखी मंडळी झटकी पट तीन-तीनचा गट करून एकापाठोपाठ सटासट घसरगुंडीवरून घसरून तळात पोहोचली. माझी भीती साफ मोडलेली असल्यामुळे मला त्या घसरगुंडीवरून घसरताना एकदम टाइम मशीनमध्ये बसून जातेयसा भास झाला.
असे तीन वेळा घसरगुंडीचा खेळ खेळत आम्ही शेवटी खाणीच्या तळात पोहोचलो. इथं बाजूच्या भिंतींमधून पाणी झिरपताना आम्ही प्रत्यक्ष पहिलं. खरं तर आता ही खाण वापरात नव्हती. हिचा उपयोग प्रवाशांना सॉल्टमाइन कशी असते ते दाखवण्यासाठी केला जात होता. मग तरीही भिंतींमधून पाणी का झिरपत होतं, याचं उत्तर गाइडनं दिलं नाही. आम्ही आता एका बोगद्यात शिरलो होतो. इथं बऱ्यापकी अंधार होता. गाइडच्या हातात विजेरी होती. तो माहिती देत होता. त्यानं आता आम्हाला सांगितलं, ‘या माणसानं पहिल्यांदा जी मीठ मिळवण्याची पद्धत शोधून काढली ती आजही वापरात आहे.. आम्हाला त्या व्यक्तीचं नाव नीट ऐकू आलं नव्हतं. माहितीपत्रकात असेल असं म्हणत मी पुन्हा विचारलंही नाही. पण नंतर माहितीपत्रकात ते नाव आम्हाला मिळालं नाही आणि इंटरनेटवरून ते शोधून काढणं शेवटी राहून गेलं.
गाइड सांगत होता, आज जगात यूकेमध्ये च्येशायर परगण्यात रॉकसॉल्ट मिळतं. तसंच अमेरिकेत डेट्रइटजवळ रॉकसॉल्टची खाण आहे.. तो इतर ठिकाणांबद्दल सांगू लागला, पण आम्ही तोपर्यंत थोडे पुढे पोहोचलो होतो. एका वळणावरून पुढे गेलो नि समोर एकदम तळंच आलं. इथून पुढचा रस्ता बोटीत बसून तळं पार केल्यावर मिळणार होता. एव्हाना सगळे जण तिथवर पोहोचलो होतो.
तळं फार खोलही दिसत नव्हतं, तरीही आम्हाला बोटीत बसताना लाइफ जॅकेटस् दिली गेली. प्रत्येकानं ती व्यवस्थित घातल्याची खातरजमा केल्यावरच ती स्वयंचलित यांत्रिक बोट सुरू करण्यात आली.
इथं प्रवास करताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली. सिक्युरिटीच्या बाबतीत कुठेही ‘चलता है!’ वृत्ती दिसली नाही. मला वाटतं याचं कारण इथल्या कायद्यांच्या कडक अंमलबजावणीला आणि त्यानंतर जर चूक आढळली तर बरं जाऊ दे, असं म्हणत दिली जाणारी चिरीमिरी मुळीच चालत नाही. भरमसाट दंड भरावाच लागतो, नाही तर धंद्याचं लायसेन्स जप्त केलं जातं.
त्या टीचभर तळ्यात लाइफ जॅकेटस् घालून आम्ही बसलो आणि अगदी थोडय़ा वेळात पलतीराला लागलो. समोर थेट रस्ता होता आणि आता आम्ही प्रत्यक्ष प्रदर्शन मांडलेल्या दालनात पोहोचलो होतो. तिथं जागोजागी फोटो लावलेले होते. त्यातले काही फोटो कामगार प्रत्यक्ष काम करतानाचे होते तर काही फोटो खाणीतून मीठ काढण्याचं तंत्र ज्यांनी ज्यांनी सुधारून प्रगत केलं त्यापकी काही जणांचे होते. शिवाय त्या फोटोंशेजारी खाणीतून मीठ काढण्याच्या पद्धतींमध्ये कसकशा सुधारणा होत गेल्या त्याबद्दलची माहिती लिहिलेले फलकदेखील होते.
सुरुवातीच्या काळात कामगार मीठ खणून काढण्यासाठी जी हत्यारं वापरत त्या हत्यारांच्या प्रतिकृती भिंतींवर लटकावलेल्या दिसत होत्या. अगदी सुरुवातीला क्रिस्टल फर्ममध्ये जे मीठ मिळायचं तेदेखील एका काचेखाली बाऊलमध्ये ठेवलेलं दिसत होतं. तसंच अशुद्ध मीठ कसं दिसतं ते समजावं म्हणून तेदेखील एका काचेखाली मुद्दाम बाऊलमध्ये घालून ठेवलेलं होतं. शिवाय उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मीठ उत्पादनाच्या तंत्रातील बदलांबद्दलचे बोर्डदेखील होते तिथे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा