किल्ल्याच्या प्रवेशद्वारांवरील विविध शिल्पकृती या केवळ कलाकृती नसतात. तत्कालिन शासकांच्या राजवटीच्या राजकीय, धार्मिक आणि आर्थिक बाबींचं प्रतिबिंब त्यात दिसून येतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
किल्ल्यांची प्रवेशद्वारं ही त्यांच्या अभेद्येतची द्योतक असतात. आक्रमण परतवून लावण्याच्या दृष्टीनेच त्यांची रचना केलेली असते. तेथे कलाकुसरीला तसा वाव कमीच. पण याच प्रवेशद्वारावरील शिल्पांमध्ये बरीच विविधता आढळते. त्यात प्रतिकांचा वापर तर असतोच, पण किल्ल्यावरील तत्कालिन राजवटींचा प्रभावदेखील पडलेला असतो.
चिखलदरा या मेळघाटातील थंड हवेच्या ठिकाणाजवळ गाविलगड हा प्रचंड मोठा किल्ला आहे. त्याचा पडकोट पार करून आपण गाविलगड किल्ल्याच्या मुख्य व भव्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हा दरवाजा ‘शार्दूल (वाघ) दरवाजा’ किंवा ‘गंडभेरुंड दरवाजा’ या नावाने ओळखला जातो. या दरवाजाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यावर कोरलेली द्वारशिल्पं. दरवाजाच्या दोनही बाजूंना शरभ शिल्पं आहेत. या शिल्पांमध्ये शरभाने चार पायांत चार हत्ती, तसेच तोंडात एक व शेपटीत एक असे एकूण सहा हत्ती पकडलेले दाखवले आहेत. या शरभांच्या वरच्या बाजूला गंडभेरुंडाचे शिल्प कोरलेले आहे. गंडभेरुंड हा काल्पनिक पक्षी आहे. त्याला दोन डोकी असून त्याने प्रत्येक चोचीत एक शरभ पकडलेला दाखवण्यात आला आहे. या दोन शिल्पांच्या मध्ये फळांनी लगडलेलं खजुराचं झाड कोरलेलं आहे. खरं तर गंडभेरुंड हे विजयनगरच्या िहदू शासकांचं राजचिन्ह होतं, तर शरभ व खजुराचं झाड हे मुस्लीम शासकांचं राजचिन्ह होतं. मग या ठिकाणी ही दोन्ही चिन्हं एकत्र कशी? याबाबत असा उल्लेख सापडतो की, इमादशाही घराण्याचा मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राह्मणाचा मुलगा होता. बहामनी राज्याच्या बेरार (वऱ्हाड) प्रांताचा सेनापती खान-ए-जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहामनी राज्याचा सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या काळात त्याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली. त्याची आठवण/कृतज्ञता म्हणून त्याने शरभ आणि खजुराचे झाड या मुस्लीम राजचिन्हांबरोबर विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह ‘गंडभेरुंड’ दरवाजावर कोरले असावेत.
किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर एका बाजूला, दोन्ही बाजूंना किंवा मधोमध एखादं चिन्ह किंवा शिल्प कोरलेलं दिसतं त्यालाच द्वारशिल्पं म्हणतात. या द्वारशिल्पांतून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. द्वारशिल्पं म्हणजे ते प्रवेशद्वार किंवा किल्ला बांधणाऱ्या, जिंकणाऱ्या राजसत्तेचे राजचिन्ह असते. किल्ला बांधणारा राज्यकर्ता मुख्य प्रवेशद्वारावर आपले राजचिन्ह बसवतो. किल्ला दुसऱ्या राजसत्तेच्या हातात गेल्यावर नवीन प्रवेशद्वार किंवा वास्तू बांधल्यास त्यावर नवीन आलेली राजसत्ता आपले राजचिन्ह असलेलं शिल्प बसवते. अनेकदा राजसत्ता बदलल्यावर जुनी द्वारशिल्पं तशीच ठेवून नवीन राजसत्तेचे राजचिन्ह प्रवेशद्वारावर बसवलेले पाहायला मिळते. नागपूरकर भोसले या पेशव्यांच्या सरदाराने नागपूरजवळील नगरधन किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मधोमध गणपतीची स्थापना केलेली आहे, तर दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेले शरभ आणि हत्तींची शिल्पं तशीच ठेवलेली आहेत.
महाराष्ट्रातील किल्ल्यांपुरता विचार केला तर शरभ, कमळ (फूल), गणपती, गंडभेरुंड, हत्ती इत्यादी द्वारशिल्पं प्रामुख्याने पाहायला मिळतात.
गंडभेरुंड:- दोन डोकी आणि एक धड असलेल्या गरुड म्हणजे गंडभेरुंड. िहदू संस्कृतीव्यतिरिक्त इतर अनेक पुरातन संस्कृतींत दोन डोकी आणि एक धड असलेल्या पक्ष्याचा उल्लेख आढळतो. आपल्याकडे दक्षिणेत असलेल्या विजयनगर साम्राज्याचं गंडभेरुंड हे राजचिन्ह होतं. त्यांच्या नाण्यांवर, किल्ल्यांवर, मंदिरांवर गंडभेरुंड कोरलेला पाहायला मिळतो. या गंडभेरुंडच्या पायाच्या धारदार नखांमध्ये एक किंवा दोन हत्ती पकडलेले दाखवलेले असतात. काही शिल्पांमध्ये गरुडाने चोचीत हत्ती पकडलेले दाखवलेले असतात. हत्ती हे दक्षिणेतल्या छोटय़ा राजांचे, पाळेगारांचे प्रतीक असावेत. त्यांच्यावर मिळवलेला विजय गंडभेरुंडाने चोचीत, पायात पकडलेल्या हत्तींच्या माध्यमातून दाखवण्यात आला असावा.
महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर फक्त गंडभेरुंड फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या गाविलगडाच्या प्रवेशद्वारावर गंडभेरुंड आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या समोर किनाऱ्यावर असलेल्या गोवा किल्ल्याच्या दर्या दरवाजावर एक आणि खालच्या बाजूला दुसरे गंडभेरुंडाचं शिल्प आहे. या गंडभेरुंडाने आपल्या दोन चोचीत दोन हत्ती आणि पायात दोन हत्ती पकडलेले दाखवलेले आहेत. हा दरवाजा सध्या बंद केलेला असल्याने हे शिल्प पाहाण्यासाठी समुद्राच्या बाजूला उतरून जावं लागतं.
तालिकोटच्या लढाईत पाच शाह्यंनी मिळून विजयनगर साम्राज्याचा दारुण पराभव केला. त्या विजयाचं प्रतीक म्हणून गंडभेरुंड शरभच्या पायात दाखवण्यात येतो. शिवनेरी किल्ल्यावरच्या परवानगी दरवाजावरील द्वारशिल्पात शरभाने आपल्या पुढच्या पायात गंडभेरुंड पकडलेला आहे, तर मागच्या दोन्ही पायांत दोन हत्ती पकडलेले दाखवलेले आहेत. रायगड किल्ल्यावरील नगारखान्याच्या दरवाजावर आतील बाजूस अशाच प्रकारचं शिल्प आहे.
याशिवाय विजयनगर साम्राज्यातील सामंतांनी कोकणात बांधलेल्या कुणकेश्वर, लक्ष्मी नारायण मंदिरात गंडभेरुंड पाहायला मिळतो.
शरभ शिल्प:- महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ. सिंह आणि व्याल यांच्यासारखे विक्राळ तोंड, चार पाय आणि लांब शेपटी असणारा काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. हा शंकराचा अवतार मानला जातो. ‘कामिकागम’, ‘उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत. शरभाच्या कथेनुसार हिरण्यकश्यपूचा वध केल्यावरही नरसिंहाचा उग्रपणा काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी भक्तांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराने सिंहासारखी दोन डोकी, तीक्ष्ण नख्या, दोन पंख, आठ पाय आणि लांब शेपूट असलेल्या प्राण्याचं रूप घेतलं. त्याने नरसिंहाला ठार मारून त्याच्या मुंडक्याने आपला जटमुकुट सुशोभित केला आणि त्याचं कातडे स्वत: पांघरलं. शिवाच्या या कृत्यामुळे त्याला ‘शरभेशमूर्ती’ किंवा ‘सिंहघ्नमूर्ती’ असं संबोधण्यात येऊ लागलं.
िहदू पुराणातल्या या शरभाचा सर्व मुस्लीम शासकांनी आपलं द्वारचिन्ह म्हणून वापर केलेला पाहायला मिळतो. हा शरभ कधी एकटाच कोरलेला असतो, तर कधी त्याच्या पायात गंडभेरुंड दाखवलेला असतो. इ.स. १५६५च्या तालिकोटच्या लढाईतील विजयानंतर पाच मुसलमान शाह्य़ांनी अनेक पाळेगारांची छोटी राज्ये जिंकून घेतली त्याचे प्रतीक म्हणजे शरभाच्या पायात हत्ती दाखवण्याची प्रथा पडली असावी. शरभाच्या पायात एक हत्ती ते शरभाच्या चार पायांत चार, तोंडात एक आणि शेपटीत एक हत्ती असे जास्तीत जास्त सहा हत्तींवर वर्चस्व गाजवणारा शरभ दाखवलेला असतो. नरनाळा किल्ल्यावर जाताना शहानुर दरवाजा आहे. या दरवाजाच्या कमानीवर शरभ शिल्पं कोरलेली आहेत, त्यामुळे या दरवाजाला ‘शेर दरवाजा’ असेही म्हणतात. यावरून मुस्लीम शासकांनी शरभ म्हणजे जंगलाचा राजा सिंह या अर्थाने शरभ शिल्पाला प्रवेशद्वारावर स्थान दिले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी त्याला प्रवेशद्वारावर स्थान दिले असावे. याखेरीज रायगड, शिवनेरी, सिंहगड, उदगीर, औसा, सुतोंडा इत्यादी अनेक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर विविध रूपांतली शरभ शिल्पं पाहायला मिळतात. औरंगाबाद जिल्हय़ातील वेताळवाडी किल्ल्याच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर शरभ शिल्पं आहेत. त्यातील पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळील बुरुजावर असलेल्या शिल्पात दोन बाजूंना दोन शरभ असून मधे एकाच धडाला दोन तोंड असलेलं शरभाचं दुर्मीळ शिल्प आहे. जंजाळा किल्ल्यावर महालाच्या बाहेरील िभतीवर शरभ शिल्प पाहायला मिळतं. जंजिरासारख्या कायम मुसलमानी अमलाखाली असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या बुरुजावरही शरभ शिल्पं पाहायला मिळतं.
गणपती:- विघ्नहर्ता गणेशाचं शिल्पही काही प्रवेशद्वारांवर पाहायला मिळतं. पेशव्यांचं आराध्यदैवत गणपती असल्यामुळे त्यांच्या राजवटीत गणपतीला प्रवेशद्वारावर स्थान मिळालं होतं. वाकाटकांची राजधानी असलेला नगरधनचा किल्ला पेशव्यांचे सरदार नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात होता. त्यामुळे प्रवेशद्वारावर गजाननाची स्थापना केलेली पाहायला मिळते. पुरंदर, शिवनेरी इत्यादी किल्ल्यांवर गणेश दरवाजे आहेत, पण त्यावर गणेश शिल्प पाहायला मिळत नाही .
कमळ, फूल, कलश:- नरनाळा किल्ला, अंतूर, देवगिरी इत्यादी अनेक किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पूर्ण उमललेल्या कमळाचं शिल्प पाहायला मिळतं. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या द्वारपट्टीवर कलश कोरलेले पाहायला मिळतात.
कोर्ट ऑफ आर्म :- पोर्तुगीजांच्या ध्वजावर असलेले कोर्ट ऑफ आर्म वसई, कोर्लई, रेवदंडा इत्यादी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या किंवा त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर किंवा चच्रेसवर पाहायला मिळतो. या चिन्हात एका मोठय़ा ढालीच्या आत सात किल्ले आणि पाच ढाली दाखवलेल्या असतात. आतल्या बाजूस असलेल्या पाच ढाली, पोर्तुगीज राजा अल्फान्सो – एक याने पाच मूरीश राजांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून दाखवतात. या ढालींवर पाच उंचवटे कोरलेले असतात. ते येशू ख्रिस्ताला झालेल्या पाच जखमांचं प्रतीक म्हणून दाखवतात. पाच ढालींच्या बाहेरच्या बाजूला सात किल्ले दाखवलेले असतात. पोर्तुगीज राजा अल्फान्सो – तीन याने जिंकलेल्या सात मूरीश किल्ल्यांचे हे प्रतीक आहे. ढालीच्या बाहेरच्या बाजूला ऑलिव्हची पानं कोरलेली असतात. ढालीवर मुकुट कोरलेला असतो.
आर्मिलरी स्पियर:- नवीन भूमीच्या शोधात निघालेल्या पोर्तुगीज दर्यावर्दीच्या झेंडय़ावर असणारा आर्मिलरी स्पियर द्वारचिन्ह म्हणून कोरलेला आढळतो. या चिन्हात पृथ्वी गोलावर अक्षांश-रेखांश दाखवतात तशा रेषा कोरलेल्या असतात. त्या सर्वाना छेदणारा एक पट्टाही कोरलेला असतो. पोर्तुगीज राजा मॅन्युअल -एक याचं हे राजचिन्ह होतं. नंतरच्या काळात जगभर पसरलेल्या पोर्तुगीज सत्तेचं प्रतीक म्हणून हे वापरलं गेलं. बऱ्याचदा आर्मिलरी स्पियर हा कोट ऑफ आर्मच्या मागे कोरलेला असतो. आर्मिलरी स्पियर आणि कोट ऑफ आर्म यांना पोर्तुगीजच्या नकाशावर स्थान मिळालेलं आहे.
हनुमान:- संकटमोचन आणि शक्तीचं प्रतीक असलेल्या हनुमानाचं शिल्प प्रवेशद्वारावर पाहायला मिळत नाही, पण सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या बुरुजावर हनुमानाचं शिल्प आहे. पुरंदर किल्ल्याच्या दिल्ली दरवाजाच्या बाजूच्या बुरुजावरही हनुमानाचं शिल्प विराजमान आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या गोमुखी प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस हनुमानाची मूर्ती आहे.
याशिवाय काही वेगळी आणि दुर्मीळ द्वारचिन्हंही पाहायला मिळतात. नळदुर्ग किल्ल्याला लागून असलेल्या पुरातन रामदुर्ग (रणमंडळ) किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या बुरुजावर सहा माशांचं एकमात्र शिल्प पाहायला मिळतं. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर कासवाचं शिल्प कोरलेलं पाहायला मिळतं. समुद्रावर असलेल्या आधिपत्याचं ते चिन्ह असावं. वर उल्लेख केलेलं वेताळवाडी किल्ल्यावरचं दोन डोकं असलेल्या शरभाचं शिल्पही एकमेव आहे.
बऱ्याच प्रवेशद्वारांवर मधोमध फारसी आणि देवनागरी लिपीतील शिलालेख कोरलेले असतात. फारसी शिलालेख कोरताना अनेक ठिकाणी त्यांची कॅलिओग्राफी एवढी सुंदर केलेली आहे की, ते एखाद्या नक्षीसारखे दिसतात आणि त्यामुळे प्रवेशद्वाराची शोभा वाढवतात. नरनाळा किल्ल्याच्या महाकाली प्रवेशद्वारावर इ.स. १४८७ मध्ये कोरलेला फारसीत कोरलेला चार ओळींचा शिलालेख आहे. हा अक्षरांकन कलेचा (कॅलिग्राफीचा) अप्रतिम नमुना आहे. दुरून पाहिल्यास हा शिलालेख न वाटता पानाफुलांची (वेलबुट्टीची) नक्षी वाटते.
थोडक्यात काय तर प्रवेशद्वारं ही गडरचनेतील संरक्षणार्थ असली तरी त्यावरील शिल्पातून राजकीय, आर्थिक आणि धार्मिक घटकांचा प्रभाव हा द्वारशिल्पातून असा विविध प्रकारे जाणवत राहतो.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com