अमेरिकेत शिकागो इथं कंपनीच्या कामासाठी गेलेलो असताना मी तिथं गाडी चालवण्याचा अनुभव घेतला आणि लक्षात आलं आपल्याकडे गाडी चालवणं अगदी सोप्पं आहे.. कारण उघड आहे, नियमच पाळायचे नसतात ना!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझी पहिलीवहिली परदेशवारी २००५ सालच्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या आठवडय़ातच सुरू झाली. त्याचा हा किस्सा.
कंपनीच्या खर्चानं कंपनीच्या कामासाठी जायचं होतं त्यामुळं आनंदीआनंद आणि थोडीशी धाकधूकही. अट अशी होती की २५ मैलांवर (जवळपास ४० किमी) कामाच्या ठिकाणी रोज आपलं आपण गाडी चालवत जायचं. त्यासाठी ५०० रुपये भरून तात्पुरता आंतर्देशीय वाहनपरवानाही (परमिट) काढला होता.
अमेरिकेत शिकागोला राहण्या-जेवण्याचं स्थिरस्थावर होऊन योग्य ते प्रशिक्षणही झालं आठवडाभर. हे त्यांच्याकडं नमनाला घडाभर तेलासारखं असतंच असतं. त्याशिवाय कामाला सुरुवात नाही म्हणजे नाही. त्यांची कार्यपद्धती किती नियोजनबद्ध असते आणि कार्य निर्विघ्न आणि निदरेष कसं पार पडतं याचाच तो सुरुवातीचा धडा होता.
आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी टॅक्सी करून गेलो तिथल्या कामाच्या ठिकाणी. ती कंपनी २५ मैलांवर. द्रुतगती मार्गावरून जाऊन कुठे कुठे वळायचं हे कचेरीतून मिळालेल्या नकाशावरून समजून घेतलं. आता उद्यपासून स्वत: गाडी चालवत जायचं होतं. त्यासाठी ‘रेंट अ कार’ एजन्सीकडं जाऊन योग्य ती कागदपत्रं दाखल करून आपल्याकडच्या होंडा सिटीसारखी दिसणारी एक गाडी ताब्यात घेतली. म्हणजे त्या एजन्सीच्या चालिकेनं हातात फक्त किल्ल्या सोपवल्या आणि एका माणसाला मला ती गाडी तळघरातल्या पार्किंगमध्ये उभी असलेली दाखवायला सांगितलं.
त्या माणसानं अक्षरश: त्याच्या बसल्या जागेवरून त्या गाडीकडे बोट केलं. गाडी उघडून बघितली आणि म्हटलं, चालकचR डावीकडं आणि रस्त्याला राहायचं उजवीकडं, आपल्या देशापेक्षा एकदम उलटं. त्याचा सुरुवातीला गोंधळ होणारच आहे. पण हे काय गाडीच्या गिअरच्या कांडय़ा कुठेत? त्या माणसाला विनंती केली, बाबा रे, जरा सांग तरी या गाडीच्या सगळ्या ‘कळा’. मग त्याला माझा कळवळा आला आणि त्यानं चालकाच्या आणि शेजारच्या सीटमध्ये असलेली एक छोटी मागेपुढे होणारी कांडी हलवून सांगितलं, गाडी पुढे, मागे कशी न्यायची आणि एका जागीच थबकून (पार्किंग)कशी ठेवायची. रस्ते आणि या गाडय़ा एकमेकांशी इतके संवेदनशील की ती कांडी पार्किंग अवस्थेत नेली नाही तर गाडी मागे किंवा पुढे घरंगळत गेलीच म्हणून समजा. मग त्या माणसाचे आभार मानून देवाचं नाव घेऊन मी ती गाडी तळघराबाहेर काढली आणि लागलो मार्गाला.
नंतर मला कळलं की दिल्लीहून आलेल्या आमच्याच कंपनीच्या एका सहकाऱ्यानं अशी गाडी तळघरातून बाहेर काढतानाच तिथल्या एका खांबावर आदळली. सुरुवातच अशी खराब झाल्यानं त्याचा आत्मविश्वास पार कोलमडून पडला. त्यानं जाहीर केलं की तो सार्वजनिक परिवहन व्यवस्था वापरून कामाच्या ठिकाणी जाईल, पण अमेरिकेतवाहन चालवणार नाही. हे ऐकून माझं मराठी मन माझ्याच अभिमानानं उचंबळून आलं.
पण पहिल्याच दिवशी टॅक्सीचालकानं दाखवलेली द्रुतगती मार्गाची सुरुवात सापडेना आणि मला वाटलं कशाला या भानगडीत पडलो. बस किंवा मेट्रो वापरतो म्हणून सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पण आता परतीचे मार्ग बंद झाले होते. भाडय़ाची गाडी ताब्यात आली होती आणि ती वापरणं R मप्राप्त होतं. चR व्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखा मी त्या द्रुतगती मार्गाच्या भवती न् भवती करत बसलो कितीतरी वेळ. एके ठिकाणी कोणाला तरी विचारावं म्हणून गाडी कडेला एका मोठय़ा ट्रेलरट्रकच्या मागे थांबवली अन् उतरून विचारायला माणूस शोधेतोपर्यंत गाडीवर गाडी आपटल्यासारखा मोठा आवाज झाला. तो ट्रेलर मागे येऊ न माझ्या गाडीचाच चुराडा झाला या कल्पनेनं घामाघूम झालेला मी धावतच गाडीपाशी आलो तर लक्षात आलं की रस्त्यावरून त्याच्या गोदामाकडे वळताना ट्रक केबिन आणि ट्रेलर यांच्यातला ‘खडखडीत’ संवाद झाला होता. माझ्या गाडीपासून तो पुढे गेला होता.
‘नो पार्किंग’ वगैरे असेल तर भानगड नको म्हणून सरळ गाडीत बसून निघालो, पण जायचं कुठे? शेवटी शेजारून डाव्या बाजूनं जाणाऱ्या एका काळ्या (ब्लॅक) टॅक्सीचालकाला समांतर थांबवून विनंती केली की बाबा रे त्या द्रुतगती मार्गाचं तोंड दाखव. त्यानंही जराही आढेवेढे न घेता मला ‘फॉलो मी’ असं म्हणत केवळ २० सेकंदांत त्या द्रुतगती मार्गाच्या तोंडाशी नेऊन सोडलं. आपण ‘मुंगसा मुंगसा तोंड दाखव’ म्हटल्यावर ते दिसल्यावर व्हावा तसा आनंद माझ्या चेहऱ्यावर ओसंडत असावा. कारण मी दहांदा म्हटलेलं ‘थँक्यू’ हसत हसत स्वीकारून तो टॅक्सीवाला अंतर्धान पावला. तो माझ्याकडून सहज दहा डॉलर कमवू शकला असता. पण तो भला माणूस होता. आता रस्ता वळत जाईल तसं जायचं होतं आधी समजून घेतलेल्या मार्गावर. कामाचं ठिकाण, तिथला गोरा साहेब आणि नवीन सहकारी यांच्याबरोबर कामाची सुरुवात तर छान झाली.
येण्याजाण्याचं जमलं. रस्त्यांवरची तारांबळ कमी झाली. पाहिल्या, समजल्या त्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. रहदारीचे नियम पाळणं हे तिथला प्रत्येक माणूस आपलं धार्मिक कर्तव्य समजतो हे जाणवलं. कुठल्याही निर्मनुष्य चौकात ‘स्टॉप’ हा फलक बघितल्यावर ठरावीक सेकंद थांबणारे तिथले वाहनचालक बघून आपले लोक त्यांना ठार वेडे समजतील, कारण आपल्या इथे रहदारीच्या भरचौकात ‘थांबा’ सिग्नलला थांबलेल्यालाही वेडय़ात काढण्याची प्रथा आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायला प्राधान्य असताना एकही वाहन उजवीकडेही सुसाट जात नाही. उलट आपल्याला ‘जा’ असेल आणि एखादा पादचारी लांबून रस्ता ओलांडताना दिसला तर वाहनचालक नुसता वेग कमी करत नाही तर तो रस्ता ओलांडेपर्यंत थांबतोही.
आपल्याकडे पादचाऱ्यांसाठी न थांबता त्यांच्या पुढून जाण्याची स्पर्धा करण्याचा प्रघात आहे. पोलीसही बघ्याच्या भूमिकेत असतात. किंबहुना डावीकडे वळण्याचा सिग्नल नसतानाही वाहनांना जायला तेच सांगतात. मग पादचारीही वाहनं येत-जात असोत, धोका पत्करून रस्ता ओलांडत राहतात.
आणखी एक, जिथे सिग्नल व्यवस्था तात्पुरती बंद असेल तिथल्या चौकात दुसऱ्या बाजूच्या वाहनांना जाऊ देणं किंवा प्रत्येक दिशेनं एक एक गाडी पुढे जाण्याचं साहचर्य पाळणं हे विलक्षण दृश्य तिथं अनुभवायला मिळतं. आपल्याकडे दुसऱ्या दिशेनं चौकाकडे येणारी दुचाकी दिसली तरी आपला वेग वाढवून तिच्या पुढून चौक ओलांडण्याची शिकस्त केली जाते.
अमेरिकेतल्या, द्रुतगती असो वा गावातला असो, कुठल्याही रस्त्यावरून आपली रस्तावाहिनी (आपण ‘लेन’च म्हणू) सांभाळूनच सगळी वाहनं जात असल्यानं बेफाम वेगानं जाऊ शकतात. एकदा द्रुतगती मार्गावरून असाच मी मधल्या लेनमधून जात असताना दोन्ही बाजूंच्या लेनमधून दोन मोठे ट्रेलरट्रक भोंगे वाजवत सुईसटॅक् असे गेले की क्षणभर माझ्या गाडीचाही किंचितसा थरकाप उडाला पण कुठलीही आपत्ती नाही. आपल्याकडच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरच्या रात्रीच्या गाडय़ांच्या मोठय़ा ट्रक आणि बसेसबरोबरच्या आटय़ापाटय़ा पाहिल्या की जीव मुठीत धरून देवाचा धावाच सुरू होतो ते अगदी घरी पोहोचेपर्यंत. कुठल्याही मार्गावर समांतर जाणाऱ्या वाहनांमध्ये असलेलं अंतर भरून काढून जाण्याचा रहदारीचा अलिखित नियम पाळण्याची शिकस्त केली जाते ना आपल्याकडे!
तर असा रहदारीचा अनुभव घेत, डावं सुकाणू आणि रस्त्याची उजवी बाजू ही कसरत सांभाळत वाहन चालवण्याचा आनंद घेत असतानाच एके दिवशी रस्त्यावरच्या परीक्षेला सुरुवात झाली.
त्याचं झालं असं की आदल्या रात्री ८ ते १० इंचाचा बर्फ पडला होता. त्यामुळं रस्त्यावर बर्फच बर्फ. द्रुतगती मार्गावर गाडी आली आणि कडेला पडलेल्या बर्फाच्या चिखलात गाडीचं इंजिन थंड पडून गाडी रुतून आणि रुसून बसली. हो, चिखलातच, कारण भुरभुर पडताना दिसणारा पांढराशुभ्र बर्फ कितीही लोभस दिसत असला, तरी रस्त्यावर पडला की रेंदा.
जवळ मोबाइल नाही. गाडय़ांशिवाय त्या मार्गावर माणूसच नाही. भर थंडीत घाम फुटला. पण थोडय़ाच वेळात गाडीच्या ‘डॅशबोर्ड’वर अक्षरं झळकली, ‘स्टार्ट इंजिन.’ म्हटलं गाडीला माझी दया आलेली दिसतेय. तिनं सांगितलं तसं केलं. जरा ‘वॉर्मिग अप’ झाल्यावर गाडी रेटा देऊन त्या चिखलाबाहेर काढली आणि देवाचे आभार मानून नेहमीसारखा पुढे निघालो.
अपेक्षेप्रमाणे, जेथे रस्त्याच्या ४ वाहिन्या ३ वाहिन्यांमध्ये एकत्र येतात तेथे चाकं एकदम हळू झाली. सगळी वाहनं गोगलगायीच्या वेगानं पुढे सरकत होती. डावीकडच्या लेनमधून जाणाऱ्या गाडीतल्या चालिकेनं तर वाचायला पुस्तकच धरलं होतं पुढय़ात. खूप गंमत वाटली. पण कुठलीही गाडी आपली लेन सोडून दुसरीच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्नही करत नव्हती.
जरा वेळानं नेहमीचा वेग पकडता आला आणि आता वेळेत पोहोचू असं वाटायला लागलं. पण सगळीकडं कडेला बर्फच बर्फ पसरलेलं आणि ते काढणाऱ्या गाडय़ा मागेपुढे करताना दिसत होत्या कुठेकुठे.
अरे बापरे, द्रुतगती मार्गावरून जेथे मला आत वळायचं होतं तो रस्ताही बर्फानं भरल्यानं माझ्या लक्षात आलंच नाही की मी चुकून २०० मीटर पुढंच आलोय. सर्वात कमी वेगाच्या उजव्या लेनमध्येच असल्यानं मी गाडी थांबवली. ‘एक्झिट’ चुकली म्हणून पुन्हा थंडीत घाम फुटायला लागला. आता? पण माझं भारतीय मन जागं होतंच. खिडकीचं तावदान खाली केलं, हात बाहेर काढून सावधपणे जाण्याचा इतरांना इशारा करत सरळ गाडी मागे मागे नेऊ लागलो.
माझ्या दुर्दैवानं जेथे मला वळायचं होतं बरोब्बर त्याच कोपऱ्यावर पोलीस उभा होता त्याची भोंग्याची गाडी घेऊ न. मला गाडी मागे घेताना पाहून तो ओरडत धावत माझ्याकडे आलाच. आता मात्र माझी पाचावर धारण बसली. अमेरिकन ‘सरकारी पाहुणचारा’ची चित्रं डोळ्यांपुढे फेर धरू लागली.
‘काय करतोस काय तू हे?’ अर्थातच इंग्रजीत खेकसल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ तो काळा उंचापुरा कॉप.
‘एक्स्ट्रिमली सॉरी.. पण माझी एक्झिट चुकल्यामुळं आणि पुढचा रस्ता माहीत नसल्यामुळं..’ मी सपशेल शरणागती पत्करून गयावया सुरू केली.
‘तुझं परमिट?’ मी परमिट दाखवलं. ‘ओ! तू या देशातला नाहीस तर!’ त्याचा माझी कीव करणारा चेहरा सगळं सांगून गेला.
‘मी भारतीय आहे.’ चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना कायम.
‘तुला पुढे गेल्यावर अध्र्या मैलावर अशीच एक्झिट लागेल. तिथून गेलास की डावीकडे वळ मग तुला तुझ्या ठिकाणाचा सरळ रस्ता मिळेल. पण पुन्हा असं करू नकोस. द्रुतगती मार्गावर गाडी मागे चालवणं हा गुन्हा आहे.’ त्याक्षणी तो इतका वेळ पाहिलेला काळा दैत्य देवदूतासारखा भासला.
भारतीय मानसिकतेचा त्याचा अभ्यास बहुतेक दांडगा असावा. नाहीतर आपले तुरुंग अशा भारतीय नागरिकांनीच भरून जातील अशी धास्ती त्याला वाटली असेल, असा सोयीस्कर विचार करून आणि ते परमिट हस्तगत करून मी शतश: आभार मानून पुढे रवाना झालो.
पुढे पाहतो तर तसंच सर्वत्र बर्फ साठलेलं. एक गाडी जात होती आतल्या दिशेला, दामटली माझी गाडी तशीच तिरकी तिरकी मार्गक्रमणा करत त्या गाडीमागे. कसाबसा त्या पोलिसानं सांगितल्याप्रमाणं, विचारत विचारत कसा मी माझ्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो माझं मला माहिती. दीड एक तास उशीर झाला होताच. पण करता काय माझंच कर्म.. क्रियापदापर्यंत जाणं क्रमप्राप्त होतं ना!
आलं लक्षात आपल्या भारतात गाडी चालवणं किती सोप्पं आहे ते? पण ते सुरक्षित करण्यासाठी आपण केलेले रहदारीचे नियम धर्मकार्यासारखे आपण पाळले तर? प्रत्येकानं सुरुवात स्वत:पासूनच केलेली बरी नाही का?
चला तर मग वाचक मित्र-मैत्रिणींनो, संकल्पच सोडूया की मी स्वत: रहदारीचे नियम पाळीनच, पण माझ्या संपर्कातल्या मंडळींनाही प्रवृत्त करेन.