नवीन देश, भाषा, संस्कृती, खाणेपिणे, लोकजीवन यांचा डोळस अनुभव घेण्यापेक्षा पैसे फेकून आराम आणि विरंगुळा विकत घेण्याची प्रवृत्ती बळावते आहे. म्हणूनच मुद्दा खिशाला काय परवडते हा नसून पर्यटनाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो हा आहे.

भल्या पहाटे आमच्या जीपने रूट नंबर दोनचा रस्ता पकडला होता. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात वाघोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे उजाडायच्या आधीच जंगलाच्या वाटांवर कान टवकारून निघावे लागते. चेकपोस्टवर कागदपत्रे तपासण्यासाठी आम्ही थांबलो होतो. सहा जणांच्या सफारी जीपमध्ये माझ्यासोबत एक ब्रिटिश फोटोग्राफर, चालक, गाईड आणि चार जणांचे एक कुटुंब होते. अगदी नमुनेदार भारतीय चौकोनी कुटुंब. तेवढय़ा दोन मिनिटांच्या ब्रेकमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या उघडल्या आणि नाश्ता सुरू झाला. अगदी हॉटेलपासूनच मुलांचा कोलाहल आणि आईबापांचा मोबाइल सुरू होता. त्यात वेफर्स, केक आणि कोल्ड्रिंकची मेजवानी सुरू झाली आणि आवाज टिपेला पोहोचला! पण आम्ही काही सांगणार इतक्यात चार काळतोंडी लंगूर माकडे आमच्या उघडय़ा जीपवर चढली आणि त्यांनी या कुटुंबाच्या नाश्त्यावर हल्ला चढवला. गाईड आणि चालकाने शांतपणे लंगुरांना टपल्या मारून हाकलले आणि एकदाची सफारी सुरू झाली. तोवर चांगले उजाडले होते! आज काही वाघोबाचे दर्शन झाले नाही! दोन तास मी आणि परदेशी पाहुणा हरणे, नीलगायी, विविध पक्षी टिपत होतो, पण या सुविद्य कुटुंबाची टकळी काही थांबेना. भारतात वाघ नामशेष झाले आहेत आणि प्रोजेक्ट टायगर एक फसवणूक आहे, पैसे फुकट गेले. त्यापेक्षा झू बरे, केनियामध्ये कशी सफारी भारतापेक्षा चांगली असते, अशी मुक्ताफळे उधळणे सुरूच होते. त्या सुसंस्कृत कुटुंबाला जवळजवळ तीनदा जंगलात प्लास्टिक फेकण्यापासून रोखावे लागले. भारतीय जंगलांची कदर करणाऱ्या त्या विदेशी फोटोग्राफरसमोर या कुटुंबाने देशाचा मानमरातब पार धुळीला मिळवला होता. हा एक प्रातिनिधिक अनुभव आहे. मग ते रणथंबोर असो, की बांधवगढ, की ताडोबा-अंधारी.. सगळे नाहीत पण अनेक पर्यटक असे वागताना दिसतात!
मी नुकताच दक्षिण कोरियात चार महिने राहून परतलो होतो आणि घरी ओळखीचे एक काका आले होते! त्यांनी सगळ्या गोष्टी आणि अनुभव चवीने ऐकले आणि मग चौकशी करू लागले की अबक टूर्सची कोरियासाठी पॅकेज टूर आहे का? मीसुद्धा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील असल्याने असल्या टूर्सची आमच्या घरीही चलती होती! पण एकदा हिमाचल घाईघाईत पाहण्याचा अनुभव घेऊन मी कानाला खडा लावला आहे! चुकून मी असल्या टूरमध्ये काय मजा आहे, असे मनोगत मांडले आणि अरिष्ट ओढवून घेतले. पुढील एक तास त्यांनी फक्त दोन लाखांत १५ दिवसांत सगळा युरोप कसा पाहिला याचे वर्णन केले! नंतर त्यांच्या स्वयंपाकी स्टाफने सतत अगदी शुद्ध- शाकाहारी- जैन- सोवळे- सोज्वळ इत्यादी जेवण कसे खाऊ घातले आणि स्विस आल्प्समध्ये पुलाव कसा खाल्ला याचे गोडवे गायले! सगळीकडे खरेदी कशी केली, गाईडला सगळी फोटो लोकेशन्स कशी ठाऊक होती हेही सांगून झाले. त्यांची सगळी हॉटेल्स तारांकित होती आणि वेळापत्रक आखलेले होते! एकदा सहकुटुंब टूरचे पैसे भरले, की आपल्याला कसा काहीही ताप नसतो ते त्यांनी अधोरेखित केले. शिवाय त्यांचा क्राऊडसुद्धा म्हणे हाय-क्लास होता. त्यामुळे ते अबकच्या टूर्स नेहमी घेतात हे कळले. त्यांच्या आठ वर्षांच्या नातवाने कसे पटापट फोटो काढले आणि बारा वर्षांच्या नातीने ते कसे पटापट फेसबुकवर अपलोड करून टाकले याची प्रशंसाही झाली! आणि हो.. विशिष्ट मराठी मालिकेचे स्टार अभिनेते टूरवर होते आणि त्यामुळे आजीसुद्धा खूश होत्या! थोडक्यात काय तर त्यांच्या प्रवासाच्या साऱ्या गरजांवर अबक टूरने व्यवस्थित टिकमार्क केले होते हे मान्य करावे लागणार होते! दोन लाखात युरोप सर झाला होता.
दक्षिण कोरियातील सर्वोच्च शिखर हालासान मी चढून उतरलो तो दिवस मला आठवला! मी जेजूच्या एका हॉस्टेलमध्ये राहिलो होतो. आदल्या दिवशी गेलेल्या पर्यटकांकडून मला बरीच माहिती मिळाली. एका दिवसात साडेसहा हजार फूट चढून उतरायचे आणि बर्फात बारा तास चालायचे हा अनुभव अजोड आणि अविस्मरणीय होता. शिखरावर लाव्हामुळे निर्माण झालेले कोन आणि क्रेटरचा देखावा अद्भुत होता! वय वर्षे पाच ते ऐंशी अशा सर्व वयोगटाचे स्त्रीपुरुष एकटे किंवा ग्रुपमध्ये चढाई करत होते. बरोबर अगदी मर्यादित सामान आणि फोटो काढण्यापेक्षा निसर्गाचा आनंद लुटण्याकडे लोकांचे लक्ष अधिक होते. सर्व विश्रांतीच्या टप्प्यावर आसरा होता. वैद्यकीय साधनसामग्री आणि पिण्याचे पाणी होते. लोक प्लास्टिक वापरत नव्हते आणि असलेच तर ते आपल्या सामानात बांधून घेत होते, या गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले! ग्वाने उम्सा मंदिराजवळ उतरलो तेव्हा बस उपलब्ध नाही असे कळले आणि पुढे हायवेपर्यंत तीन किलोमीटर चालू असा विचार करून निघालो, पण एका वयोवृद्ध जोडप्याने मला लिफ्ट दिली आणि हॉस्टेलच्या दारात सोडले.
त्या दिवशी होस्टेलमध्ये विविध देशांतील पंधरा-वीस जण होते. आमच्यात तेव्हा ज्या गप्पा झाल्या, जी मैत्री झाली आणि त्यातून जो आनंद मिळाला, तो मी अगदी ताज-लीला-ओबेरॉय-हयातमध्येही अनुभवलेला नाही! हॉस्टेल स्वच्छ होते, वातानुकूलित होते, तिथे कपडे धुवायला मशीन आणि संपर्कासाठी वायफायची सोय होती आणि महत्त्वाचे म्हणजे स्वत: स्वयंपाक करणार असाल तर अनलिमिटेड चहा-कॉफी, ब्रेड आणि अंडय़ांचा पुरवठा होता. विविध संस्कृती, देश, भाषांचे आम्ही, पण भटकंतीच्या धर्माने बांधले गेलेले! त्या संवादाची सर तारांकित हॉटेलच्या बंदिस्त खोलीला कशी येणार? दरही माफक होता. पंधरा हजार वॉन म्हणजे दिवसाचे जवळपास हजार रुपये फक्त!
तसाच हैन-सा मंदिरात केलेला मुक्काम! डोंगरांच्या कुशीत वसलेले शांत मंदिर. पहाटे तीनच्या नीरव शांततेत ऐकलेली प्रार्थना. संपूर्ण शाकाहारी पण चविष्ट जेवण. पारंपरिक कोरियन पद्धतीच्या ओंदोलनामक लाकडी जमिनीवर साधी चादर अंथरून केलेला आराम! असे अनुभव अबक टूर्सच्या घाईत घेता येत नाहीत. जेव्हा बुसानच्या अजस्र जगाल्ची फिश मार्केटमध्ये घासाघीस करून साशिमी आणि बार्बेक्यूवर ताव मारला आणि नाक बंद करून छोटा ऑक्टोपस खाल्ला तेव्हा मालवणी मित्र-मैत्रिणी आठवल्याच!
आपले मध्यमवर्गीय पर्यटन फारच तोलून मापून असते नाही? त्यामध्ये ‘केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार’ची खोली नाही किंवा समर्थ रामदास सांगतात त्याप्रमाणे – ‘सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक’चा उत्साह- कुतूहलदेखील नाही. सगळ्यांनाच बॅकपॅकिंग करून हिंडता येणे शक्य नाही हे मी मान्य करतो. पण अशी डोळस आणि बिनधास्त भटकंती एकटय़ा तरुण मुलांसाठीच ठीक आहे, हे मात्र खरे नाही. आम्हा भटक्यांची तक्रार थोडी वेगळी आहे. मी हल्लीच एमटीडीसीचे गणपतीपुळे रिसॉर्ट बुक करत होतो तेव्हा लक्षात आले, की एकेका खोलीची किमान किंमत दोन हजार रुपये रोज अशी आहे. वातानुकूलीत खोली असेल तर दुप्पट! आणि काही वर्षांपूर्वी आम्हा लोकांसाठी रोजचे दोनशे रुपये भरून तंबूची सोय होती ती बंद झालेली! महाराष्ट्र सरकारला आम्हा भटक्यांची जबाबदारी अशी झटकायची असेल तर मग खासगी हॉटेलकडून काय अपेक्षा ठेवावी! फक्त विदेशातून पर्यटक आकर्षित करण्यात मग्न असलेल्या सरकारला भरपूर भटकंती करणाऱ्या आम्हा बॅकपॅकर्सकडून अनेक पट अधिक महसूल मिळू शकतो. शेवटी प्रत्येकाने आपापला मार्ग आणि आराम निवडावा हे तत्त्व मान्य केलेच पाहिजे. पण मुद्दा खिशाला काय परवडते हा नसून पर्यटन आपण कोणत्या नजरेने करतो हा आहे. भरपूर पगार असणारे आणि तारांकित हॉटेलची सवय असणारे अनेक लोक बॅकपॅकर म्हणून हिंडतातच की! आणि हा संस्कार योग्य वयात झाला नाही, तर मग प्रवास करायची वेळ आली की हजार स्पीडब्रेकर उभे राहतात. आपण जाऊ तिथे आपले घर निर्माण व्हावे अशा हट्टाने मोठय़ा बॅगा भरल्या जातात. खाण्या-पिण्याची पार्सले केली जातात. नवीन देश, भाषा, संस्कृती, खाणेपिणे, लोकजीवन यांचा डोळस अनुभव घेण्यापेक्षा पैसे फेकून आराम आणि विरंगुळा विकत घेण्याची प्रवृत्ती बळावते. लोक जोडणे आणि खऱ्या अर्थाने ‘वसुधैवकुटुंबकम्’चे पालन करण्यापेक्षा आम्हीसुद्धा हे पाहिले हे सांगून कॉलर ताठ करण्याची अहमहमिका आता सोशल मीडियाच्या कृपेने वाढली आहेच! तारांकित हॉटेलमध्ये राहणे आणि तिथलं ऐश्वर्य अनुभवणे हा एक मजेदार अनुभव आहे आणि त्याची मजाही जरूर घ्यावी, पण त्याशिवाय प्रवासच जमत नाही यात मात्र गडबड आहे.
मला प्रश्न पडला की आपल्याला घाई तरी कसली आहे? रिटायर झालेल्या काकांना युरोप पाहायचा तर आहे, पण वेळ नाही! फक्त महाराष्ट्र नीट पाहायला सहा महिने पुरणार नाहीत, तर मग एक अख्खा खंड काकांना अबक टूर्सनी कोणती करामत करून पंधरा दिवसांत समग्र दाखवला हे कोडे माझ्या मती पलीकडचे आहे!
जैसलमेरच्या बस स्थानकावर मला गुरुमंत्र मिळाला! एक जर्मन माणूस तिथे चंपी करून घेत होता. त्याला एवढी कसली हौस असे विचारले तेव्हा त्याने सांगितलेले शब्द नेहमी माझ्या लक्षात राहतील. तो म्हणाला..‘इथल्या चावडीवरचा मेंबर होऊन मी जैसलमेरचा अनुभव घेतो आहे.. गोरा विदेशी म्हणून नव्हे!’
चिन्मय भावे

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
foreign universities loksatta news
दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede : तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी
Story img Loader