वर्षांऋतूची चाहूल लागली की भटक्यांचे पाय शिवशिवायला लागतात. पावसाळ्यात मनसोक्त हिंडायला मिळणार आहे या आशेवरच उन्हाळा सहन केला जातो. कधी एकदा काळे ढग बरसायला लागताहेत आणि कधी एकदा आपण ओलेचिंब होण्यासाठी घराबाहेर पडतो आहोत असं होऊन जातं. लोणावळा-खंडाळा-महाबळेश्वर-सिंहगड-शिवथरघळ इथे जाऊन जाऊन कंटाळा आलेला असतो. बाहेर तर पडायचंय पण नवीन ठिकाणं तर हवीत अशी आपली स्थिती होते. वर्षां ऋतूमध्ये बाहेर पडावं, भन्नाट वारा अनुभवावा, पावसात चिंब भिजावं आणि आंतरबाह्य़ ओलंचिंब होऊन जावं यासारखं दुसरं सुख नाही. भातलावणी चालू असते, धबधब्यांची मालिका सुरू झालेली असते, विविध रानफुलं डोकं वर काढायला लागलेली असतात, डोंगरमाथे ढगांनी झाकलेले असतात, त्यावरून लाल लाल पाणी खळाळत सुसाट वेगाने वाहत असतं, अशा वेळी आपणही या सगळ्याचा एक घटक होऊन जावं. त्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा.
सुदैवाने सह्य़ाद्रीचा सहवास आपल्याला लाभलेला असल्यामुळे अनेक सुंदर, आगळीवेगळी अशी भटकण्यासाठी मुबलक ठिकाणं आहेत. पर्यटकांची गर्दी आणि हुल्लडबाज लोक यांच्यापासून खूप लांब तरीसुद्धा अत्यंत नयनरम्य अशी ठिकाणं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचाच आज परिचय करून घेऊ या. यावेळचा वर्षांविहार जरा वेगळ्या, शांत ठिकाणी जाऊन करू या.
भोरगिरी-भीमाशंकर
पुणे जिल्ह्य़ाच्या खेड तालुक्यात एका टोकाला अत्यंत टुमदार, छोटंसं आणि निवांत गाव वसलेलं आहे ते म्हणजे भोरगिरी. पुणे-राजगुरूनगर-वाडा-टोकावडे-भोरगिरी असा फक्त ९० कि.मी.चा प्रवास. भोरगिरी गावात रस्ताच संपतो. एक सुंदर कोटेश्वर मंदिर आहे इथे. त्याच्या दारातच असलेली पाश्चिमात्य पेहेराव केलेली गणपतीची मूर्ती अगदी निराळी आहे. उजव्या बाजूला डोंगरावर भोरगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावर काही लेणी खोदलेली दिसतात. इथून पायवाटेने भीमाशंकर फक्त सहा कि.मी. आहे. चांगला रुंद मार्ग, वाटेत विविध ओढे, ओहोळ आडवे येतात. रस्ता छान वळत वळत भीमाशंकरच्या जंगलात जातो. आपण नेहमी जातो त्याच्या विरुद्ध दिशेने भीमाशंकरला जाऊन पोहोचतो. साक्षी विनायक वाटेत भेटतो. इथलं जंगल खूप सुंदर आहे. अगदी रमतगमत गेलं तरी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.
खूप पाऊस पडत असेल तर काहीसा वेळ जास्त लागेल, कारण वाटेत काही ओढे आडवे येतात ते पार करायला वेळ लागतो. वाटेत असंख्य धबधब्यांची मालिका पाहता येते. भीमाशंकराचं दर्शन घेऊन परत पुण्याला परतायचं. भीमाशंकराच्या मंदिरात पोर्तुगीज घंटा पाहण्याजोगी आहे. शक्यतो श्रावण महिना टाळावा कारण भीमाशंकर हे प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असल्यामुळे श्रावण महिन्यात अतोनात गर्दी असते.
खेड बस स्थानकावरून सकाळी आठ वाजता भोरगिरीसाठी बस आहे. तसेच खेड ते भोरगिरी जीप वाहतूक चालू असते. स्वत:चं वाहन असेल तर भीमाशंकरला जेवून परत भोरगिरीला यावं लागेल किंवा चालकाला टोकावडे मार्गे ते वाहन भीमाशंकरला घेऊन आणायला सांगावं. खेड ते भोरगिरीपर्यंतचा रस्ता चासकमान धरणाच्या जलाशयाच्या बाजूने जात असल्यामुळे सदैव पाणी आपल्या बाजूला असतं. भीमाशंकरला खाण्याची सोय आहे. त्यामुळे इथे ती चिंता नसते.
प्राचीन टोलनाका नाणेघाट
ऐन घाटमाथ्यावर असलेल्या ठिकाणी पावसाळ्यात चिंब भिजायची मजा काही वेगळीच असते. कधीअख्खा परिसर ढगांनी झाकून जातो आणि जेव्हा ढग बाजूला होतात तेव्हा आजूबाजूच्या डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबे डोळ्याचे पारणे फेडतात. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम टोकाला असलेला नाणेघाट परिसर हा अगदी असाच आहे. प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन साम्राज्याच्या काळातील पैठण ते नालासोपारा या मार्गावरचा हा घाटरस्ता आणि त्याचा परिसर अतिशय रमणीय असा आहे. पुणे-जुन्नर-आपटाळे-नाणेघाट हे अंतर १३० कि.मी. इतके आहे. मुंबईहूनसुद्धा इथे माळशेज घाट मार्गे ओतूर-गणेशखिंड-जुन्नर-नाणेघाट असे येता येईल. प्राचीन टोलनाक्याच्या खुणा आजही दगडी रांजणाच्या रूपाने तिथे पाहायला मिळतात. शेजारीच जीवधन किल्ला आणि त्याचा वांदरलिंगी सुळका आपल्याला खुणावत असतो. नाणेघाटात सातवाहनांची राणी नागनिका हिने कोरलेले एक अप्रतिम लेणे आहे. त्यात दोन बाजूंच्या भिंतींवर ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख कोरलेले आहेत. त्या राणीने केलेले यज्ञ आणि त्यामध्ये दिलेली दाने यांची खूप मोठी जंत्रीच त्या लेखात दिलेली आहे. या लेणीच्या डोक्यावर असलेल्या डोंगराला नानाचा अंगठा म्हणतात. वर जायला रस्ता लेणीच्या शेजारूनच आहे. पावसाळ्यात ही वाट निसरडी झाल्यामुळे जपून जावे लागते. मात्र खूप धुके असेल तर वरती जाणे टाळावे. कारण धुक्यामुळे दरीचा अंदाज येत नाही. आपली भटकंती ही कायमच सावध आणि सुरक्षित असायला हवी. कल्याणला गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारा नाणेघाटातून खाली जातात. जेव्हा सगळीकडे धुके पसरते तेव्हा या तारांच्या भोवती एक मंडल (करोना) दिसते. त्यावरून नाणेघाटाचा रस्ता शोधता येतो. परतीच्या वाटेत डावीकडे चावंड किल्ला आहे. वपर्यंत आता उत्तम लोखंडी जिना बांधलेला दिसतो. पाण्याची सात टाकी या किल्ल्यावर जमिनीलगत खोदलेली आहेत. इथून सर्व परिसर सुंदर दिसतो. चावंडच्या समोरच पूर गावचा रस्ता आहे. इथून दोन कि.मी. आत गेले की कुकडी नदीच्या उगमाशी असलेले कुकडेश्वराचे देखणे मंदिर समोर येते. अंदाजे १२-१३ व्या शतकात बांधलेले हे मंदिर स्थापत्यदृष्टय़ा उत्तम आहे. एका दिवसात मनसोक्त भिजून आणि काही नवीन ठिकाणं पाहून आपण परत येऊ शकतो. मांसवाडी नावाचा अस्सल शाकाहारी पदार्थ जुन्नर- नारायणगाव भागात मिळतो. हा लज्जतदार पदार्थ अवश्य खावा.
निव्वळ भिजायला-रायरेश्वर केंजळगड
महाबळेश्वर, कोळेश्वर आणि रायरेश्वर ही पठारे अगदी मांडीला मांडी लावून बसली आहेत. ट्रेकर्ससाठी हा सारा परिसर म्हणजे मोठीच पर्वणी आहे. रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड, पांडवगड, कमळगड अशी अफलातून ठिकाणं आणि जोर गावातून किंवा बलकवडी गावातून महाबळेश्वर चढून जाणे यासारखी दुसरी भन्नाट गोष्टच नाही.
शिवस्पर्शाने पुनीत झालेल्या रायरेश्वर पठारावर जायला बरेच मार्ग आहेत. लोहदरा, गणेशदरा, गायदरा अशी त्यांची सुंदर नावे. पुणे-भोर मार्गे कोर्ले या गावी पोहोचायचे. इथून वर चढणाऱ्या रस्त्याला गायदरा असे नाव आहे. आता हा रस्ता बराच वपर्यंत गेलेला आहे. परंतु सरकारी रस्ता असल्यामुळे ऐन पावसाळ्यात तो कितपत साथ देईल देव जाणे.
ऐन पावसात अगदी चिंब भिजायला इथे अवश्य यावे. आजूबाजूला असंख्य धबधबे, खूप खालीपर्यंत उतरलेले ढग, मधूनच दर्शन देणारा काळाकभिन्न केंजळगड. स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच. एक संथ चढाई चढून आलो की आपण रायरेश्वर-केंजळगड खिंडीत येतो. इथून उजवीकडे लोखंडी कठडे लावलेले दिसतात. इथून वर गेल्यावर पुढे ऐन पठारावर आपण येतो. एका मोठय़ा तळ्याला वळसा घालून हा रस्ता रायरेश्वर मंदिरापाशी जातो. धुके असेल तर रस्ता काहीसा शोधायला लागतो. परंतु धुके जरा कमी झाले की परिसराचा अंदाज येतो.
शिवरायांनी आपल्या सवंगडय़ांसह स्वराज्याची शपथ घेतलेले हे ठिकाण. आजूबाजूला रम्य निसर्ग. ऐन श्रावण भाद्रपदात रायरेश्वरला यावे. असंख्य फुलांची उधळण झालेली दिसते. हल्ली चहा-फराळाची सोय तिथे झाली आहे, पण त्याची खात्री नाही. कुठल्याही भटकंतीमध्ये आपल्याजवळ आपले खाणे असणे केव्हाही चांगलेच. इथूनच परत मागे खिंडीत येऊन केंजळगडावर जाता येते. रायरेश्वर ते केंजळगड ही डोंगरधारेवरून केलेली पायपीट फारच रमणीय आहे. केंजळगडाला असलेल्या दगडातल्या पायऱ्या अवश्य अनुभवाव्यात अशा आहेत. जरा ढग बाजूला झाले की खाली आणि आजूबाजूला दिसणारा रम्य परिसर आपल्याला खिळवून ठेवतो.
केंजळगडावरून एक रस्ता परत कोर्ले या गावी उतरतो अन्यथा दुसऱ्या बाजूला खावली या गावी वाईच्या परिसरातसुद्धा उतरता येईल. आपल्याला असलेला वेळ आणि ठरवलेले वेळापत्रक या नुसार निर्णय घ्यावा. पण पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांच्या सीमेवरील ही पावसाळ्यातली भटकंती कायम स्मरणात राहण्याजोगी आहे.
गर्द झाडीचे अंधारबन
वैशाख वणवा संपतो. मान्सूनची चाहूल लागते. भटकंतीप्रेमी मंडळींसाठी हे सुगीचे दिवस असतात. शांत ठिकाण, गर्द राई अशा ठिकाणी जावेसे वाटत असते. पण सध्याच्या जगात जंगले, वने यांची बेसुमार होणारी कत्तल पाहिली की अंधारबन नावाची काही गोष्ट अस्तित्वात असेल यावर विश्वासच बसत नाही. पण अशी गोष्ट पुण्याच्या अगदी जवळ आहे. मुंबईहूनसुद्धा सहज भेट देता येणारे असे हे ठिकाण आहे. गर्द झाडी आहे, दिवसा पण अंधार पडेल एवढी झाडे अजूनही आहेत. विविध पक्ष्यांची सोबत आहे. पुण्याहून माणगावला जायला लागले की ताम्हिणी घाटाच्या अलीकडे लोणावळ्याला जाणारा फाटा फुटतो. इथून उजवीकडे दोन कि.मी. अंतरावर एक बांधलेला तलाव दिसतो. आपले वाहन इथे ठेवून पुढे जाता येते. इथूनच सुरू होते अंधारबनची वाट. तो तलाव आणि अंधारबन यामध्ये असलेल्या दरीला म्हणतात कुंडलिका व्हॅली. समोरच्या डोंगरावरील अंधारबनची गर्द झाडी आपल्याला खुणावत असते. या दरीला वळसा घालून आपण अंधारबनच्या जंगलात प्रवेश करतो. वाटेतच एक ओढा आडवा येतो आणि तिथेच आहे वीर नावजी बलकवडे यांचे स्मारक. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात याच नावजींनी तानाजी मालुसरेंसारखा कडा चढून सिंहगड जिंकून घेतला होता. त्यांच्या समाधीपाशी एका देवीची मूर्ती, एक घंटा आणि एका दगडावर हातात ढाल तलवार घेतलेला एका पुरुषाचे शिल्प कोरलेले दिसते. शेजारीच दगडावर अगदी झिजलेला एक शिलालेखसुद्धा आहे. ही समाधी उजव्या हाताला किंचितशी उंचावर आहे. पुढे आपण निबिड रानातून चालत असतो. वाटेत बरेचसे रांजणखळगे पाहता येतात. इथे पण एक मोठा ओढा पार करावा लागतो. हाच ओढा पुढे कुंडलिका दरीमध्ये एका मोठय़ा धबधब्याच्या रूपात कोसळतो. जांभूळ-हिरडा-आंबा- उंबर-गेळ अशी मातब्बर वृक्ष मंडळी वाटेत भेटतात. तांबट, हळद्या, सुभग, बुलबुल असे पक्षी, निरनिराळी फुलपाखरे, महाकोळी यांचे दर्शन होते. ऐन पावसाळ्यात इथे असंख्य रानफुले, भूछत्रे यांची केवळ गर्दी दिसते. पुढे उजवीकडे एक चढण येते आणि मग हा रस्ता पुढे हिरडी गावात जातो.
सह्य़ाद्रीच्या ऐन खांद्यावर हे हिरडी गाव वसले आहे. छोटेसे शंकराचे मंदिर आणि जवळच थंड पाण्याचे कायम भरलेले कुंड इथे आहे. इथे पोटपूजा करून परत मागे फिरावे किंवा ज्यांना ट्रेक करायचा आहे अशांना पुढे गाढवलोट घाटाने भिरा किंवा नागशेतला उतरता येते. इथून कोकणात उतरताना बाजूला सुधागडचे सुंदर दर्शन होते. ऐन पावसात मात्र ही वाट काहीशी निसरडी होते. पूर्ण काळजी घेऊनच इथून उतरावे अन्यथा परत मागे आलेले चांगले. नागशेतला एक नैसर्गिक कोंड म्हणजे अनेक रांजणखळगे आहेत. चार तासांची ही पायपीट नितांत रमणीय आहे. कुंडलिका खोऱ्याचा परिसर इथून फारच सुरेख दिसतो. ज्यांना या अंधारबन घाटाने खाली कोकणात उतरायचे असेल त्यांनी आपले वाहन या नागशेतच्या कोंडाजवळ बोलावून घ्यावे.
कनकेश्वर
खरंतर कोकणात ऐन पावसात जाणं काही योग्य नाही. एकदा संततधार लागली की दोन दोन दिवस काही थांबत नाही. पण सरत्या पावसात कोकणात गेलं तर त्यासारखं सुख नाही. आकाशात ढग असतात, आसमंत हिरवागार झालेला असतो, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गावात उगवलेलं असतं, आणि सर्व वातावरण अक्षरश: टवटवीत आणि प्रफुल्लित झालेलं असतं. अशा वेळी अलिबागजवळच्या कनकेश्वरला आवर्जून जायला हवं. अलिबागपासून फक्त दहा किमी वर दोन हजार फूट उंचीच्या एका डोंगरावर कनकेश्वर वसलेले आहे. पायथ्याच्या मापगावपर्यंत उत्तम डांबरी सडक आहे. तिथून डोंगर चढाई सुरू होते. डोंगर चढायला अजिबात कष्ट पडत नाहीत. पायथ्यापासून ते थेट अगदी शेवटपर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत. माथ्यावरून दिसणारे दृश्य केवळ अप्रतिम असे हे ठिकाण आहे. याच्या समोरच रामदर्णेचा डोंगर आहे. त्यावरून धो धो कोसळणारे धबधबे पाहणे केवळ अप्रतिम असते. पावसाळी हवा असल्यामुळे चढायला काहीच त्रास होत नाही.
झिराड या गावावरूनसुद्धा एक वाट कनकेश्वरला जाते, मात्र ही वाट डोंगरातून जाते. तर मापगावपासून अंदाजे ८०० दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. वाटेत अनेक ठिकाणी विश्रांतीसाठी कट्टे बांधलेले आहेत. त्या ठिकाणांना गायमुख, व्याघ्रमुख अशी सुंदर नावे दिलेली दिसतात. पायऱ्या संपून वर गेल्यावर एक सुंदर पुष्करणी समोर येते. कनकेश्वर हे खरे तर शंकराचे स्वयंभू स्थान आहे. परंतु इथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. शंकराचे मंदिर आणि त्यावरील मूर्तिकाम मुद्दाम पाहण्याजोगे आहे. उंचावर असल्यामुळे इथे भन्नाट वारा असतो.
पश्चिम दिशेला मुंबईच्या कुलाबा भागातील टोलेजंग इमारती क्षितिजावर उगवलेल्या दिसतात. तसेच पायथ्याशी कुलाबा किल्ला आणि समोर समुद्रात खांदेरी-उंदेरी हे जलदुर्ग लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या शिखरावरील एक शिल्प पाहण्याजोगे आहे. शिखरावर चढणारा एक माणूस दाखवला आहे. त्याच्या पायात असलेला दगडी वाळा हा सुटा असून गोल फिरतो. कनकेश्वरला जेवणाखाण्याची सोय होते. एक सुंदर ठिकाण, उंचावर असल्यामुळे असलेला बेफाट वारा, आणि मुंबापुरीच्या वैभवाचे एका निराळ्या बाजूने होणारे दर्शन घेण्यासाठी कनकेश्वरला नक्कीच आले पाहिजे.
तिथूनच जवळ असणाऱ्या सासवने गावातील करमरकर शिल्प संग्रहालयसुद्धा असेच या भेटीमध्ये पाहून घेता येईल.
प्राचीन कोंडाणे लेणी
धुवाधार पावसामध्ये पायपीट करायची असेल, डोंगर चढायचा असेल आणि धबधब्याखाली भिजायचं असेल तर कर्जतजवळ असलेल्या कोंडाणे लेणींना भेट द्यायला हवी. लोणावळ्याजवळ असलेल्या राजमाची दुर्गाच्या पोटात आहेत ही कोंडाणे लेणी. परंतु इथे येण्यासाठी कर्जत गाठावे लागते. मुंबईहून नेरळ किंवा कर्जतला उतरले तर या दोन्ही स्टेशनवरून इथे येण्यासाठी सहा आसनी रिक्षा मिळतात. स्वत:चे वाहन असेल तर ते अगदी कोंदीवटे गावापर्यंत येते. इथे पावसाळी पर्यटन होते आणि आपला एक प्राचीन ऐतिहासिक ठेवा पाहिल्याचा आनंदसुद्धा घेता येतो. भारतामध्ये आजही अस्तित्वात असलेली सर्वात प्राचीन स्मारके म्हणजे कोरीव बौद्ध लेणी. भारतातील एकूण लेण्यांपैकी जवळजवळ ८० टक्के लेणी निव्वळ महाराष्ट्रात आहेत. कार्ले, भाजे, अजिंठा या तर सुप्रसिद्ध आहेतच, पण त्याचबरोबर पाले, कुडे, कोंडाणे या ठिकाणीसुद्धा सुरेख कोरीव काम असलेल्या लेणी पाहायला मिळतात. कर्जतवरून कोंदीवटे गावावरून इथे जाता येते. कोंदीवटेपर्यंत पक्का रस्ता आहे आणि पुढे अर्धा तास रमणीय पायवाट आपल्याला कोंडाणे लेण्यांमध्ये घेऊन जाते. ऐन श्रावण महिन्यात इथे आलं तर ऊन-पावसाचा खेळ अनुभवत या लेण्यांपर्यंत मजेत येता येते. डोंगरातून केलेली वाटचाल आपल्याला एकदम लेणींच्या तोंडाशी आणून सोडते. अत्यंत सुबक असे खडकातले कोरीव काम पाहण्याजोगे आहे. या ठिकाणी महायान संप्रदायाचे विहार आढळतात. या लेण्यांच्या प्रवेशावरील कोरीव काम विलक्षण देखणे आहे. बौद्ध भिक्षूंना वर्षांऋतूमध्ये निवास करण्याच्या हेतूने या लयनस्थापत्याची निर्मिती झाली. राजमाची किल्ल्यावरूनसुद्धा या लेण्यांमध्ये जाता येते. मात्र तो रस्ता सामान्यजनांसाठी नाही. ऐन पावसाळ्यामध्ये या लेण्यांच्या समोर मोठ्ठा धबधबा पडत असतो. त्याखाली भिजायचा मनसोक्त आनंद घेता येतो. कोंदीवटे गावात स्थानिक मंडळी जेवणाची सोय करतात. त्यासाठी लेणींकडे जाताना त्यांना आगाऊ कल्पना द्यावी लागते. अस्सल मराठी जेवणाचा ऐन पावसात आस्वाद घेण्याची ही मोठीच सोय उपलब्ध आहे.
नळदुर्गचा जलमहाल
जवळजवळ वर्षभर पाण्याचे दुर्भिक्ष असलेला धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्य़ाचा हा प्रदेश. परंतु ऐन पावसाळ्यात इथे मुद्दाम जावे आणि आवर्जून पाहावे असे एक मानवनिर्मित नवल आहे. ते म्हणजे नळदुर्गचा भुईकोट किल्ला. या परिसरात सोलापूर, तुळजापूर, नळदुर्ग, औसा, परांडा असे उत्तमोत्तम भुईकोट किल्ले पाहण्याजोगे आहेत. पण त्यात हा नळदुर्गचा किल्ला आणि त्यातला जलमहाल हा एक देखणा प्रकार आहे.
या किल्ल्याला लागूनच बोरी नदी वाहते आणि त्या नदीपलीकडे आहे रणमंडळ नावाचा अजून एक किल्ला. हे दोन किल्ले जोडणारा एक प्राचीन बंधारा या बोरी नदीवर बांधलेला आहे आणि या बंधाऱ्यातच आहे जलमहाल. साधारण ऑगस्ट महिन्यात जेव्हा मोठा पाऊस होतो तेव्हा या बंधाऱ्यावरून पडणारे पाणी जलमहालाच्या छपरावरून खाली पडते. आपण तेव्हा जर जलमहालात उभे असू तर आपल्या समोर वरून पडणाऱ्या पाण्याचा एक पडदा तयार झालेला दिसतो. हा देखावा खरोखर नयनरम्य असतो.
पूर्वी अनेक वेळा हे दृश्य पाहता यायचे परंतु आता बोरी नदीवर वरच्या बाजूला झालेल्या अजून एका बंधाऱ्यामुळे खूप मोठा पाऊस झाला की मगच हे दृश्य दिसते. नळदुर्ग किल्ल्यापाशी बोरी नदीचे पाणी वळवून एका अजस्र भिंतीने हे पाणी अडविले आहे. या भिंतीतील राजा कमान आणि राणी कमान अशा दोन प्रचंड धारांच्या रूपाने हे पाणी खाली कोसळते. या भिंतीतच पाणी महाल, गणेश महाल, पाताळमोरी, पाणचक्की अशा व्यवस्था केलेल्या दिसतात. जेव्हा आपण जलमहालात जातो तेव्हा आपल्या डोक्यावरून या राजा कमानीचे पाणी पडताना दिसते आणि त्याच वेळी आपल्या पायाखाली पाताळमोरीचा प्रवाहसुद्धा पाहता येतो.
पाणी महालात असलेल्या शिलालेखावरून याचे बांधकाम इ. स. १६१६ मध्ये मीर महंमद याने केल्याचे समजते. ऐन धो धो पावसाळ्यात या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा एक थेंबसुद्धा आत शिरत नाही हा उच्च दर्जाच्या स्थापत्याचा एक अजोड नमुनाच म्हणावा लागेल.
अज दीदन-ई-चश्म मुहिब्बान रोशने
मी गर्दद च चश्म दुश्मनान गर्दद कूर
म्हणजे त्या पाणी महालाकडे दृष्टी टाकताना, मित्रांचे डोळे प्रसन्नतेनी उजळतील, तर शत्रूच्या डोळ्यासमोर अंधारी येईल. अशा आशयाचा अजून एक शिलालेख तिथे आहे. धाराशिव जिल्ह्य़ातील या नळदुर्ग किल्ल्याला आणि तिथे असलेल्या या अद्वितीय जलमहालाला ऐन पावसाळ्यात नक्की भेट द्यायला हवी.
रमणीय पाटेश्वर
पावसाळ्यात भटकायला कुठे ठरावीक गावाच्या आसपासच जावे असा काही नियम नाही. आपल्या महाराष्ट्रात जरा आडबाजूला गेलं की हवी तेवढी ठिकाणं आपल्या स्वागताला तयार असतात. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सातारा हे असंच एक टुमदार गाव. गावाचा पसारा काही फार नाही परंतु गावाला इतिहास खूपच मोठा. अजिंक्यतारा किल्ल्याच्या मांडीवर पहुडलेल्या या सातारा शहराच्या जवळच एका डोंगरावर असलेलं हे भन्नाट आणि वैशिष्टय़पूर्ण असं ठिकाण म्हणजे पाटेश्वर. सातारा-रहिमतपूर रस्त्यावर देगाव इथे पाटेश्वरचा फाटा आहे. गाडीरस्ता पुढे जाऊन एका डोंगरावर चढतो आणि काही अंतर गेल्यावर हा रस्ता संपतो. तिथून पुढे सुरुवातीला काही पायऱ्या लागतात आणि नंतर आपण डोंगर सपाटीवर येतो. तिथून अंदाजे ४५ मिनिटे चालत जायचे. दोन्ही बाजूंनी येणारा पाऊस अंगावर घेत आणि अधूनमधून दरीतून येणारा भन्नाट वारा झेलत हे चालणे फारच आनंदाचे जाते.
चालताना आपण एकटे नसतो. असंख्य गोड आवाजात गाणारे पक्षी आपली साथ करत असतात. रानवाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या पाठीमागे जाऊन काही पायऱ्या चढून वर गेले की पुढे झाडीमध्ये लपलेले श्रीपाटेश्वराचे सुंदर मंदिर सामोरे येते. समोर नंदी आणि बाजूला असलेले वऱ्हाडघर मुद्दाम पाहण्याजोगे. इथेच काही दगडामध्ये लेणी कोरलेली आहेत आणि त्या लेण्यांमध्ये आजूबाजूला कोरलेली असंख्य शिवलिंगे अचंब्यात टाकतात. एका लेणीच्या तीनही भिंतींवर शिवलिंगाच्या माळा कोरलेल्या आहेत. शेजारच्याच लेणीमध्ये सहस्रलिंगी शिवपिंड, धारालिंग, चतुर्मुख लिंग, काही शिवलिंग नंदीच्या पाठीवर, काही पायाशी असा सगळा अप्रतिम परिसर. एका बाजूला एक समाधीवजा बांधकाम दिसते. त्याच्या बाहेर गरुडाचे आणि मारुतीचे एक शिल्प ठेवलेले दिसते. विविध पक्ष्यांचे गुंजारव कानी पडत असतात. अगदी रम्य परिसर.
इथून पाय काही निघत नाहीत. इथूनच जवळ जरंडेश्वर आणि नांदगिरी हा किल्लासुद्धा पाहता येईल. दोन्ही ठिकाणची चढाई सोपी आहे. नांदगिरी किल्ल्यावर एका गुहेत पाण्यातून चालत गेल्यावर एक दत्तमूर्ती आणि एक जैन प्रतिमा ठेवलेल्या आढळतात. सध्या या ठिकाणी सिमेंटचा रस्ता केला असून दोन्ही बाजूंनी रेलिंग बांधलेली आहेत. दोन दिवस भटकण्यासाठी काढले तर सातारा इथे मुक्काम करून एक दिवस जरंडेश्वर आणि नांदगिरी किल्ला आणि दुसऱ्या दिवशी सहस्रलिंगी पाटेश्वर अशी ऐन पावसाळ्यातली निराळीच भटकंती करता येईल.
धुक्यात हरवलेले गगनबावडा
घाटमाथ्यावरील कोणतेही ठिकाण खरंतर पावसाळ्यात जाण्याजोगे असतेच असते. काही ठिकाणं ही अतिपरिचयात अवज्ञा झालेली आहेत, तर काही अजूनही पर्यटकांची वाट पाहत आहेत. कोल्हापूरवरून कोकणात उतरण्यासाठी विविध घाटमार्ग आहेत. त्यातला गगनबावडामार्गे जाणारा करूळ घाट हा फारच निसर्गरम्य आहे. या घाटाच्या तोंडावर असलेले गगनबावडा गाव तर केवळ अप्रतिम. निसर्गसौंदर्याने नटलेले हे अगदी छोटेखानी गाव फारच देखणे आहे. इथून करूळ आणि भुईबावडा असे दोन घाटरस्ते कोकणात उतरतात. कोल्हापूर गगनबावडा हे अंतर जेमतेम ५५ किलोमीटर इतकेच आहे. वाटेत घरपण, कळे, साळगाव, असळज अशी खूप छान छोटी छोटी गावे लागतात.
ऐन पावसाळ्यात हा सगळा परिसर गार होऊन जातो. सर्वत्र धुक्याची चादर लपेटलेली असते. गगनबावडय़ाने आता हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीलासुद्धा मोहात पाडले आहे. अनेक सिनेमांचे चित्रीकरण या ठिकाणी केले जाते. गगनगड नावाचा किल्ला इथेच गावाच्या मागे उंचावलेला दिसतो. तिथे जायला पायऱ्यांची वाट केलेली आहे. मोठमोठी शिल्पे वाटेत आपल्याला पाहायला मिळतात. माथ्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या किल्ल्यावरून सभोवताल फारच अफलातून दिसतो. हिरव्यागर्द झाडीमधून वळणे घेत गेलेला करूळ घाटरस्ता केवळ अप्रतिम दिसतो. धुके बाजूला झाल्यावर दिसणारा रस्ता आणि त्यावरून येत असलेली एसटीची बस बघणे केवळ आनंददायी असते.
गगनबावडा इथे आता मुक्कामाला काही हॉटेल्स झाली आहेत. परंतु कोल्हापूरला मुक्काम करून एक दिवस मनसोक्त भिजायला गगनबावडा अवश्य गाठावे. इथे एसटी स्थानकावर कॅण्टीन आहे आणि त्या ठिकाणी कटवडा नावाचा एक भन्नाट पदार्थ मिळतो. कट म्हणजे रस्सा. धो धो पडणाऱ्या पावसात गरमागरम झणझणीत कटवडा खाणे आणि त्यावर स्पेशल चहा पिणे यासारखे दुसरे सुख नाही. मिसळ, वडा हे पदार्थ सर्वत्र मिळतात. पण या कॅण्टीनला मिळणाऱ्या कटवडय़ाची चव केवळ भन्नाट. हे सर्व अनुभवण्यासाठी एक ओला पावसाळी दिवस शोधून मुद्दाम गगनबावडय़ाला गेलेच पाहिजे.
इथेच वाटेत कोल्हापूरपासून ४० किमीवर असळज गावातून आत तीन किमी गेले की पळसंबे नावाचे गाव आहे. इथे एकाच दगडात कोरलेली म्हणजे एकाश्म मंदिरे पाहण्याजोगी आहेत. पावसाळ्यात इथे ओढय़ाला महामूर पाणी असते. ते पाहणे आणि त्या मंदिरांना भेट देणे या गोष्टी गगनबावडा सहलीमध्ये हमखास केल्या पाहिजेत.
पानशेत वेल्हा परिसर
सह्य़ाद्री ही महाराष्ट्राला मिळालेली एक अभूतपूर्व अशी देणगीच आहे. विविधतेने नटलेला सह्य़ाद्री वर्षांतल्या कोणत्याही ऋतूमध्ये आपलासाच वाटतो. त्याच्या सान्निध्यात केलेली भटकंती, घालवलेला वेळ आणि सह्य़ाद्रीचा घेतलेला अनुभव हा खरेच एक अनमोल ठेवा असतो. कुठल्याही ऋतूमध्ये मनाला भावणारा सह्य़ाद्री ऐन पावसाळ्यात तर फारच रांगडा, सुंदर आणि मोहक भासतो. सर्वत्र हिरवागार रंग आणि त्यामध्ये फुललेली असंख्य रानफुले, डोक्यावर पावसाळी ढग, आजूबाजूला डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि खाचरांमध्ये बळीराजाने केलेली पेरणी असे सर्वत्र आल्हाददायी वातावरण असते. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत धरणाच्या परिसरात अगदी असेच वातावरण असते. तोरणा किल्ल्याची पाश्र्वभूमी लाभलेला हा मावळातला सगळाच परिसर रमणीय आहे. पानशेत ते वेल्हा आता गाडीरस्ता आहे तो कादव्याच्या खिंडीतून वेल्ह्य़ाला जातो. पण त्याच्याच शेजारून डोंगरावरून जाणारी पायवाट ही ऐन पावसाळ्यात एकदा तुडवलीच पाहिजे. अतिशय सोपी आणि नेत्रसुखद अशी ही भटकंती दरवर्षी केली तरी प्रत्येक वेळेस काही नवीन अनुभव गाठीला जमा होतो. पुण्याहून पानशेतला जावे लागते. पानशेत गावाच्या अलीकडे आंबी या गावाचा फाटा लागतो. इथून आंबी गावावरून रस्ता पुढे कादवे गावी जातो. आंबीच्या फाटय़ावर डावीकडे वळून साधारण दीड कि.मी. अंतरावर शेतातून एक वाट सरळ समोर डोंगरात गेलेली दिसते. इथे गाडीरस्ता सोडायचा आणि पायवाट धरायची. ही पायवाट नाकासमोर एका डोंगराच्या पायथ्यापर्यंत गेलेली दिसते. तिथून ती सरळ डोंगरावर चढते. हा पहिला चढच जरा तीव्र आहे. वर गेल्यावर आपण एका डोंगर धारेवर येतो. इथून वाट सरळ समोर जात राहते. उजव्या बाजूला पानशेत धरणाचा जलाशय दिसू लागतो. त्याच्या पाठीमागे धरणाची भिंत आणि त्या भिंतीला काटकोनात असलेली वरसगाव धरणाची भिंत. त्याच्या मागे वरसगाव धरणाचा जलाशय असा विस्तीर्ण प्रदेश दिसू लागतो. आपल्या समोरची वाट परत एका डोंगरावर चढताना दिसते. इथे खूप पांढऱ्या रंगाची रानफुले सर्वत्र उगवलेली दिसतात. या ठिकाणी पाऊस आला तर त्यासारखे दुसरे सुख नाही. चिंब भिजणे म्हणजे काय हे इथे अनुभवायला मिळते. परत ही वाट अजून एका डोंगरमाथ्याकडे जाते. समोर दिसणारे डोंगराचे उंच शिखर डोळ्यासमोर ठेवून या वाटेने चालत राहावे. उजवीकडे एकुलते एक कौलारू घर दिसते. त्या शेजारून तसेच वर गेले की आपण काही खडकांमधून डोंगर माथ्यावर येतो. वाटेत विविध रानटी झाडे लागतात. काळ्या रंगाची करवंदाच्या आकाराची फळे असलेली झाडे दिसतात परंतु ही फळे खाण्यायोग्य नाहीत. डोंगरमाथ्यावरील ही जागा काहीशी लहान आहे, परंतु इथून दिसणारा देखावा अफलातून आहे. नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र हिरवेगार झालेले दिसते. बाजूच्या डोंगरावरून पडणारे धबधबे आणि खाली असलेल्या भातशेतीचे विलोभनीय दृश्य दिसते. तसेच दुसऱ्या बाजूला दरीत असलेले कादवे गाव, त्या गावातले मंदिर, गावापर्यंत आलेले पानशेत धरणाचे पाणी, गावाच्या पाठीशी असलेला डोंगर आणि त्यातली कादव्याची खिंड, अगदी चित्रात दाखवतात तसे दिसते. इथे काही काळ विश्रांती घेऊन पुढे निघावे. इथे एक टप्पा तीव्र उताराचा आहे. आता आपल्याला समोर तोरणा किल्ला सतत दर्शन देत असतो. इथे पण आजूबाजूला रानफुलांचे ताटवे सतत आपल्या सोबत असतात. आपल्या उजव्या बाजूला खाली गाडीरस्ता गेलेला दिसतो. तिथून जाणारी वाहने अगदी लहान दिसत असतात. समोर कानंदी नदीवर बांधलेले चापेट धरण दिसू लागते. त्या दिशेने उतरत आपण आता सपाटीवर येतो. इथून मग परत कादवे खिंडीतून आलेला गाडीरस्ता लागतो. या रस्त्यावरून जेमतेम एक कि.मी. चालत गेल्यावर उजवीकडे नदीचा प्रवाह उंचावरून खाली पडत असल्यामुळे तयार झालेला धबधबा लागतो. इथे आजूबाजूला भरपूर जागा आहे. धबधब्याच्या शेजारी जाऊन निवांतपणे वेळ घालवता येतो. आतापर्यंत झालेले श्रम सगळे विसरले जातात. इथेच डावीकडे धानेप गाव आहे. इथून पुढे दोन कि.मी. डांबरी सडकेने गेल्यावर आपण नसरापूर-वेल्हा या रस्त्याला येऊन मिळतो. या ट्रेकसाठी जर स्वतंत्र गाडी ठरवली असेल तर ती आपल्याला आंबी गावाच्या पुढे सोडते आणि परत आपल्याला घेण्यासाठी धानेप या गावापाशी, धबधब्याजवळ बोलावता येते. म्हणजे मग पुढची सगळी पायपीट वाचते. सहजगत्या होणारा, सोपा असा हा ट्रेक आहे. तीन ते चार तास डोंगरातून केलेली ऐन पावसाळ्यातली ही भटकंती पंढरीच्या वारीसारखी दरवर्षी न चुकता करावी अशीच आहे.
हाटकेश्वर
धुवाधार पाऊस, धो धो कोसळणारे धबधबे, ढग बाजूला झाल्यावर उंचावरून खाली दरीत दिसणारी टुमदार गावं, असंख्य रानफुलांनी फुललेले पठार अशा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहायच्या असतील तर हाटकेश्वरला जायलाच हवे. पुण्या-मुंबईपासून जवळ असलेले हे ठिकाण आहे पुणे जिल्ह्यतल्या जुन्नर तालुक्यात. पुणे-जुन्नर-गोद्रे-हाटकेश्वर असा प्रवास किंवा मुंबई-माळशेज घाट-अणे-गणेशखिंड-गोद्रे-हाटकेश्वर अशा मार्गाने इथे पोहोचता येईल. गोद्रे गाव हाटकेश्वरच्या अगदी कुशीत वसले आहे. तिन्ही बाजूंनी डोंगरामुळे बंदिस्त आणि एकाच बाजूने रस्ता. वस्ती जेमतेम हजार-बाराशे असेल. ऐन पावसाळ्यात गावाच्या तिन्ही बाजूंनी धबधबे कोसळत असतात. गोद्रे गावातून खडी चढण चढायला सुरुवात होते. एक खिंड चढून नंतर संपूर्ण डोंगराला वळसा (ट्रॅव्हर्सी) घातल्यावर आपण पहिल्या टप्प्यावर येतो. इथून लेण्याद्री डोंगराची पाठीमागची बाजू दिसते. पुढे एक छोटे पठार आहे. त्याच्याबरोबर समोरची सोंड धरली आणि पुन्हा चढाई सुरू केली की आता दुसरीकडे दरीत आल्मे नावाचे गाव दिसते. समोरची सोंडेवरील चढाई गिर्यारोहणाचा कस पाहते. सोंड संपल्यावर पुन्हा पठार आणि एक छोटीशी खिंड ओलांडून पलीकडे थोडेसे उतरावे लागते. तिथून समोरचे दृश्य मात्र अफलातून दिसते. पिंपळगाव जोगा धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि त्यामागे हरिश्चंद्रगड, आजोबा, घनचक्करची रांग आपल्याला जागेवर खिळवून ठेवतात. तिथून पुढे उजव्या बाजूला अनेक छोटय़ा दगडी नंदीच्या प्रतिमा आणि काही शिवपिंडी ठेवलेल्या दिसतात. काही पायऱ्या उतरून खाली गेले की आलेच हाटकेश्वर. इथे मोठे देऊळ असे नाहीये. अगदी साधी पत्र्याची शेड आहे. इथेच महाशिवरात्र आणि श्रावणातल्या सोमवारी मोठी जत्रा भरते. आजूबाजूच्या गावातले अनेक भक्त इथे शिवाच्या दर्शनाला आवर्जून येतात. महादेवाचा चांदीचा मुखवटा गावकरी या वेळी इथे आणतात. बाकी वर्षभर तो गावातच असतो. याच ठिकाणी एका खळग्यात पाणी आहे. हे पाणी मात्र अत्यंत थंडगार असते. आपण काही पाणी भरून घेतले तरी पुन्हा पाण्याची पातळी परत पूर्वीइतकीच होते. जवळच दगडात एक खोदलेले पाण्याचे टाके आहे, पण ते पाणी काही पिण्याजोगे नाही. या छोटय़ाशा मंदिराजवळून उत्तर दिशेकडे कडय़ातल्या काही पायऱ्या उतरून खाली आले की एक अर्धे निसर्गनिर्मित आणि काहीसे मानवनिर्मित भुयार आहे. पंधरा-वीस फूट सरळ गेल्यावर ते हळूहळू खाली उतरत जाते. भुयाराच्या दारात एक नंदीची प्रतिमा आणि एक शिवपिंडी आहे. समोरच्या डोंगरात काही गुहा आहेत. पण तिथे जायला मार्ग नाही. गावकरी या भागाला नवरा-नवरीची गाठ असे म्हणतात. इथली एक दंतकथा अगदी भन्नाट आहे. खरंतर हा सगळा डोंगर गोद्रे गावाचा. पण पूर्वी हाटकेश्वर हा गोद्रेकरांचा की आल्मेकरांचा यावरून मोठा वाद झाला. शेवटी असं ठरलं की दोन्ही गावांतील एक एक माणूस पोत्यात घालायचा आणि ती पोती इथून खाली दरीत फेकून द्यायची. ज्या गावाचा माणूस जिवंत राहील, देव आणि डोंगर त्या गावचा होईल ! मग काय अगदी तस्संच्या तस्सं केलं गेलं. दोन्ही गावांतला एकेक माणूस पोत्यात घालून पोती इथून खाली टाकून दिली. आल्मेगावचा माणूस लगेच मेला, आणि गोद्रेगावचा माणूस अर्धा तास जिवंत होता आणि नंतर त्याने प्राण सोडले. पण देव तेव्हापासून गोद्रेगावचा झाला. हाटकेश्वरची एवढीच काही संपत्ती नाहीये. हे शिखर खूप उंचावर असल्यामुळे इथून दिसणारे निसर्गसौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. ऐन पावसाळ्यात तर हा सगळा परिसर धुक्यात लपेटलेला असतो. किंचित ढग बाजूला झाले तर पायथ्याशी असलेला आळेफाटा माळशेज हा रस्ता, त्यावरून जाणारी वाहने, आजूबाजूची खाचरे, आणि पिंपळगाव जोगा धरणाचा जलाशय असे अत्यंत रमणीय दृश्य पाहता येते. हाटकेश्वरच्या पठारावर अनेक रानफुलांची जत्राच भरलेली असते. विविध आकाराची आणि रंगांच्या सुंदर फुलांमुळे सगळे पठार रंगीबेरंगी झालेले दिसते. माथ्यापर्यंत येताना एकूण तीन टप्पे लागतात. प्रत्येक टप्प्यावर विविध सुळके आपले स्वागत करीत असतात. आणि या प्रत्येक टप्प्यावर समोर डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबे आपल्याला खिळवून ठेवतात. हाटकेश्वरला पायथ्यापासून येण्यासाठी अंदाजे दोन ते अडीच तास लागतात. सरत्या पावसाळ्यात इथे आले तर कास पठारासारखेच असंख्य रानफुलांचे ताटवेच्या ताटवे इथे फुललेले दिसून येतात. इथूनच एक रस्ता लेण्याद्री डोंगरावर जातो जिथून आपण थेट लेण्याद्रीच्या डोक्यावरून खाली मंदिरापर्यंत उतरून येऊ शकतो. त्यामुळे ऐन पावसात किंवा सरत्या पावसात या हटके ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.
कातळधार धबधबा
राजमाचीच्या जुळ्या किल्ल्यांवर अनेकदा चढाई केलेली असते. मनरंजन आणि श्रीवर्धन हे दोन किल्ले किंवा बालेकिल्ले असलेला हा दुर्ग ऐन पुणे आणि ठाणे जिल्ह्य़ाच्या सीमेवर बोरघाटावर नजर ठेवून आहे. पुण्याकडून गेले तर लोणावळामार्गे आणि मुंबईकडून आले तर कर्जतमार्गे या किल्ल्यावर वाट येते. याच डोंगराच्या पोटात आहे एक रौद्र, भीषण असा कातळधार धबधबा. पुण्याकडून लोणावळामार्गे राजमाची या किल्ल्यावर जाण्यासाठी आता कच्चा गाडीरस्ता झालेला आहे. लोणावळ्यापासून अंदाजे पाच कि.मी. गेले की मुख्य रस्ता सोडून एक पायवाट डोंगरात खाली उतरते. ही पायवाट दोन टप्पे खाली उतरते. तिथून ती उजवीकडे वळते आणि डोंगराच्या पोटातून कडेकडेने पुढे सरकत राहते. काही अंतर पार केल्यावर परत एका छोटय़ाशा टेकडावर ही वाट चढते. इथे आल्यावर आपल्याला त्या जलप्रपाताचा गंभीर आवाज ऐकू येऊ लागतो आणि त्या धबधब्याच्या पाण्याचे तुषार उंच उडताना दिसू लागतात. तसेच पुढे गेले की आपले पाय थबकतात आणि नजरबंदी झाल्यासारखे आपण स्तब्ध उभे राहतो. समोर दिसणारे दृश्य हे खरेतर शब्दातीत आहे. डोंगरमाथ्यावरून एक प्रचंड मोठा धबधबा समोर दरीत कोसळत असतो. आपण साधारणत: या धबधब्याच्या मध्यावर एका बाजूला उभे असल्यामुळे संपूर्ण जलप्रपात आपल्या नजरेस पडतो. सुमारे सहाशे फूट उंचीवरून हे पाणी खाली कोसळत असते. ते जिथे पडते तिथे खूप मोठा डोह तयार झाला आहे. तो डोह संपूर्ण भरल्यामुळे तिथून ते पाणी पुढे अजून खाली वाहत त्याचे रूपांतर नदीमध्ये झालेले दिसते. अतिशय निसरडय़ा वाटेने या डोहापर्यंत जाता येते. परंतु इथे गिर्यारोहणाची काही साधने आणि कुशल मार्गदर्शक असेल तरच आणि केवळ तरच जावे. अन्यथा या ठिकाणी उभे राहूनसुद्धा कातळधार धबधबा आणि त्याच्या आजूबाजूचा निसर्ग अप्रतिम दिसतो आणि अनुभवता येतो. कुशल मार्गदर्शक आणि आवश्यक साधने असतील तर या डोहापर्यंत उतरता येते. डोहाच्याच शेजारी आणि धबधब्याच्या पोटात डोंगरात एक मोठी गुहा तयार झालेली आहे. त्या गुहेत गेले तर आपल्या समोर या कातळधार धबधब्याच्या पाण्याची सफेद भिंत तयार झालेली दिसते. गुहेत पाण्याचे तुषार उडत असतात आणि खूप निसरडे झालेले असते. वर डोंगरावर पाऊस वाढला तर मात्र हे सफेद पाणी गढूळ होऊ लागते आणि धबधब्याचा रंग मातकट होऊ लागतो. पाण्याबरोबर अनेक दगड, गोटे खाली कोसळू लागतात. त्यामुळे पाऊस पडत असेल तर इथे कधीही जाऊ नये. लांबून दर्शन घ्यायला ऐन पावसाळा उत्तम. परंतु इथे खाली डोहापर्यंत उतरायचे असेल तर पाऊस नसताना जावे. खाली उतरणे हे धाडसी गिर्यारोहण या श्रेणीमध्ये मोडते त्यामुळे या क्षेत्रातला अनुभव, कुशल नेता आणि गिर्यारोहणाची साधने नसतील तर चुकूनसुद्धा इथे उतरायच्या फंदात पडू नये. डोंगर आणि खडक हे फसवे असतात. इथे काय सहज उतरता येईल असे समजून ते धाडस करू नये. पावसाळ्यात खडकावर उगवलेले शेवाळ दिसत नाही आणि अपघाताची शक्यता असते. त्यामुळे आपण लांबूनच कातळधारचे दर्शन घ्यावे. तेसुद्धा तितकेच रमणीय आणि रोमहर्षक असते.
धारकुंड
पावसाळ्यातली भटकंती पुणे, मुंबई, कोकण इथेच करावी, असे काही नाही. उभा महाराष्ट्र आपली वाट पाहतो आहे. कुठल्याही भागात ऐन पावसाळ्यात गेलात तरीसुद्धा एकापेक्षा एक सरस अशी ठिकाणे आपल्याला जागोजागी सापडतील. अजंठा, वेरूळ, पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेला मराठवाडा हा खरेतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. छोटय़ा छोटय़ा गावातसुद्धा असलेली शिल्पसमृद्ध मंदिरे हा मराठवाडय़ाचा अनमोल ठेवा आहे. त्याचबरोबर इथे काही निसर्गनवलसुद्धा पाहायला मिळतात. धारकुंड हे त्यातलेच एक ठिकाण. चाळीसगाववरून बनोटीमार्गे इथे जाता येते. बनोटीपर्यंत एकदम चांगला रस्ता आहे. बनोटीला असलेले एक प्राचीन शिवमंदिर पाहण्याजोगे आहे. बनोटीपासून पुढे काहीसा कच्चा रस्ता असून काही अंतर मात्र चालत जावे लागते. या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडत नाही. मात्र हा प्रदेश अगदीच कोरडासुद्धा नाहीये. साधारण श्रावण-भाद्रपद महिन्यामध्ये इथे जावे. बनोटीपासून धारकुंडला अगदी आरामात चालत जाता येते. रस्ता पुढे डोंगरामुळे बंद होतो. आधी एक मोठा तलाव लागतो. त्या तलावाच्या काठाने डोंगराच्या अगदी पोटात जावे लागते. आपल्या समोर आता घोडय़ाच्या नालेसारखा आकार असलेला डोंगर येतो आणि नेमके इथेच आहे हे सुंदर ठिकाण धारकुंड. डोंगराचा एक भाग छज्जासारखा पुढे आला आहे आणि त्याला अनेक वर्षे पाणी येऊन येऊन एक भले मोठे नैसर्गिक छिद्र पडले आहे. इथे डोंगराची उंची अंदाजे शंभर फुटांपेक्षा जास्त आहे. या मोठय़ा छिद्रातून पावसाचे पाणी धो धो खाली कोसळत असते. एक मोठ्ठा धबधबा इथे तयार झाला आहे. खूप मोठय़ा प्रमाणावर आणि खूप उंचीवरून पडणारे पाणी खाली तयार झालेल्या एका मोठय़ा डोहात जमा होते. आजूबाजूला सर्वत्र या पाण्याचे तुषार उडत असतात. जर जोराचा वारा आला तर हे खाली पडणारे पाणी अधूनमधून वरच्या दिशेला पण उडते. ते दृश्य मात्र अफलातून दिसते. आजूबाजूचा सारा परिसर हिरवागार झालेला असतो आणि त्यात मधोमध हा अव्याहत कोसळणारा जलप्रपात सारे वातावरण गूढरम्य करून टाकतो. इथे अजून एक निसर्गनवल आहे. या ठिकाणी डोंगराच्या पोटात एक मोठ्ठी घळ तयार झालेली आहे. त्या घळीत शंकराची एक पिंड आहे. त्याच्या समोरच नंदीची एक प्रतिमा दिसते. त्या घळीची लांबी अंदाजे ३०० फूट असून खोली जवळजवळ ३० ते ४० फूट इतकी भरते. घळीला काही नैसर्गिक भिंती असून त्यामुळे विविध कप्पे तयार झालेले आहेत. आत घळीतले वातावरण कुंद असते. बाहेर खूप उंचावरून मोठा आवाज करत कोसळणारा धबधबा आणि त्यासमोर तयार झालेले मोठे कुंड हे या घळीतून पाहायला मोठे रम्य वाटते. हे कुंड भरले की त्याच्या काहीसे पुढे या पाण्याचा एक मोठा तलाव तयार झालेला दिसतो. ऐन श्रावण महिन्यात सोमवारी आजूबाजूच्या पंचक्रोशीमधले अनेक भाविक धारकुंड इथे शंकराच्या दर्शनाला येतात. खूप वेगळ्या ठिकाणचे आणि खूपच रम्य स्थळ आहे हे.
या ठिकाणी येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कन्नड या तालुक्याच्या गावावरून घाटशेंद्रा या गावी जायचे. घाटशेंद्रा गावावरून एक रस्ता शेताच्या कडेकडेने तळनेर या छोटय़ाशा खेडय़ाशी जातो. तळनेर या गावी आपले वाहन ठेवायचे आणि डोंगराच्या काठापर्यंत चालत जायचे. इथे एक शिवमंदिर दृष्टीस पडते. जुन्या पडलेल्या मंदिराचे अवशेष या ठिकाणी वापरलेले दिसतात. इथून डोंगर उतरून आपण धारकुंडला जाऊ शकतो. परंतु तळनेर गावातून कोणी वाटाडय़ा घेऊन जावा. डोंगरावरून खाली काहीसे जपून उतरावे लागते. पण इथे आपण धारकुंडला वरून खाली जात असल्यामुळे एक वेगळाच निसर्ग अनुभवता येतो. धारकुंडचा धबधबा खरोखर प्रेक्षणीय आहे. अगदी अनगड जागी वसलेले हे ठिकाण मुद्दाम जाऊन पाहता येईल. कन्नडला मुक्काम करून एक दिवस पितळखोरा लेणी आणि पाटणादेवी आणि दुसऱ्या दिवशी धारकुंड असे पावसाळी पर्यटन खूप वेगळा प्रदेश दाखवणारे आणि अर्थातच स्मरणीय होईल.
पावसाळ्यातल्या निसर्गाचा आनंद घेताना…
या काही ऑफ बीट ठिकाणांबरोबरच वरंधगावची घळ, ताम्हिणी-डोंगरवाडी, ठोसेघर-चाळकेवाडी, राजमाची किल्ला, लोहगड-विसापूर, कासचे पठार, महाबळेश्वर, कार्ले-भाजे-बेडसा लेणी, जरंडेश्वर-नांदगिरी, कोथळीगड, पाचनई, माथेरानजवळचा पेबचा किल्ला, त्रिंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची श्रावणात केलेली प्रदक्षिणा, माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेला थिटबीचा धबधबा, अशी भटकण्यासाठी एक ना अनेक ठिकाणे आहेत. फक्त या नेहेमीच्या ठिकाणची प्रचंड गर्दी, हुल्लडबाजी यांनी वैताग येतो. त्यामुळे मुद्दाम जरा वेगळ्या वाटेला गेले तर आपली पावसाळ्यातली भटकंती नक्कीच स्मरणीय होईल. काही पथ्ये मात्र जरूर पाळावीत. जिथे जाऊ तिथे स्थानिकांशी गप्पा मारून त्या ठिकाणच्या काही अडचणी आहेत का ते विचारून घ्यावे. धबधब्यामध्ये जाणे शक्यतो टाळावे. कारण त्यात शेवाळे असलेले निसरडे खडक रंगाचा बेरंग करू शकतात. एक कोरडा कपडय़ाचा संच आपल्या गाडीत किंवा सॅकमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कायम ठेवावा. पैसे, मोबाइल आणि कॅमेरा पाण्यापासून अगदी जपावे. फोटो काढताना आपण कुठे डोंगराच्या टोकावर तर जात नाही ना याचे भान असावे. कोणताही दगड सहजगत्या बाजूला करू नये. अनेक सरपटणारे जीव त्याच्या आश्रयाला आलेले असतात. पावसाळ्यात बरेचदा धुके असते. धुक्यात रस्ता हरवू शकतो. स्थानिक वाटाडय़ा बरोबर घेतला तर खूपच चांगले. त्या मंडळींना उंच सखल भाग, रानवाटा यांची नेमकी माहिती असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उगाचच अचाट साहस करायला जाऊ नये. मनसोक्त भटकावे पण सुरक्षित आणि जपून. सह्य़ाद्री आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला भरभरून देत असतो. पण वेडय़ा धाडसाला तिथे दयामाया नाही. पावसाळ्याची मजा अनुभवण्यासाठी चिंब भिजायला बाहेर पडा. ऐन पावसात अगदी धो धो भिजून घ्या. भरपूर फोटो काढा. वर्षांॠतूमधील निसर्ग आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही.
रंधा-रतनगड-भंडारदरा परिसर
मुद्दाम दोन-तीन दिवस वेळ काढून, खास पावसाळ्यातल्या भटकंतीला न्याय देण्यासाठी रतनगड आणि भंडारदरा परिसरात जायलाच हवे. हा परिसर इतका रमणीय आहे की इथे दहा दिवससुद्धा मजेत जातील. निसर्गाचे रौद्र रूप न्याहाळायचे, धबधब्यांची मालिका पाहायची, रानफुलांचे ताटवे बघायचे, आजूबाजूला उंचच उंच डोंगर-किल्ले आणि त्यातून जाणाऱ्या वाटेने मनसोक्त भटकंती करायची तर रतनगड-भंडारदरा इथे यायलाच पाहिजे. निसर्ग, गिर्यारोहण, पुरातन मंदिर, धबधबा अशा सर्व गोष्टींची इथे अगदी रेलचेल आहे. नगर जिल्ह्य़ातले हे ठिकाण असले तरीसुद्धा इथे धुवांधार पाउस पडतो. पश्चिमेला ठाणे जिल्हा अगदी लागूनच आहे.
गिर्यारोहण करायचे असेल तर रतनगडसारखा नितांतसुंदर किल्ला आपली वाट पाहत आहे. प्रवरा नदीचे उगमस्थान असलेला हा किल्ला अतिशय देखणा असून एक दिवस मुक्काम करावा असा आहे. इथे प्रचंड रानफुले पावसाळ्यात फुलतात आणि डोंगरउतार सगळा या फुलांनी बहरून जातो. किल्ल्यावरील नेढे, राणीचा बुरुज, साम्रद दरवाजा या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. मुक्कामाला किल्ल्यावर मोठय़ा गुहा आहेत आणि पाण्याची सोयसुद्धा मुबलक आहे. मात्र शक्यतो शनिवार-रविवार टाळून इथे जावे. पायथ्याला असलेल्या रतनवाडीत एक अनमोल कातळशिल्प वसलेले आहे. इ.स.च्या बाराव्या शतकातील अमृतेश्वर मंदिर. यादवकालीन मंदिर स्थापत्याचा एक अजोड नमुना. विविध शिल्पांनी अलंकृत असे हे मंदिर रतनगडाच्या पाश्र्वभूमीवर ठसठशीतपणे उठून दिसते. बाजूलाच असलेली भव्य पुष्करणी परिसराची अजून शोभा वाढवते.
पूर्वी इथे येण्यासाठी शेंडी गावापासून भंडारदरा धरणाच्या जलाशयातून होडीमधून यावे लागे. आता इथपर्यंत उत्तम गाडीरस्ता झाला आहे. हाच रस्ता आता पुढे साम्रद या गावावरून घाटघपर्यंत जातो. ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना दिसणारा आसमंत अतिशय मोहक असतो. सह्य़ाद्रीचे काळेकभिन्न कडे, त्यावरून कोसळणारे प्रपात आणि सर्वत्र हिरव्या रंगाची पखरण असे सगळे उत्साहित वातावरण असते. घाटघरला गेले की तिथून दिसणारा कोकण कडा आणि घाटघरचा विद्युत प्रकल्प, तसेच अलंग-मदन-कुलंग या दुर्गत्रयींचे अगदी जवळून होणारे दर्शन आपल्याला स्तिमित करते. अलंग-मदन-कुलंगचा ट्रेक हा सह्य़ाद्रीमधील सर्वात धाडसी आणि म्हणूनच अत्यंत प्रिय असा समजला जाणारा ट्रेक आहे. घाटघरवरून रस्ता थेट भंडारदरा इथे येतो. ब्रिटिशकालीन बांधलेले हे धरण आणि त्याचा विस्तीर्ण जलाशय आवर्जून पाहण्याजोगा आहे. इथेच पुढे प्रवरा नदी उंचावरून खोल दरीत उडी घेते आणि त्यामुळे निर्माण झालेला सुप्रसिद्ध रंधा धबधबा आहे. पावसाळ्यात रंधा आकाराने खूपच फुगलेला असतो. इथे एक काळजी मात्र आवर्जून घेतली पाहिजे. इथे पाण्यात एक बेट आहे आणि अतिउत्साही पर्यटक उगाच धाडस म्हणून त्या बेटावर जातात. वरती डोंगरात अचानक पावसाचा जोर वाढला तर नदीचा प्रवाह अकस्मात वाढत जातो आणि हे बेट हळूहळू पाण्याखाली जाऊ लागते. अनेकदा असे जिवावर बेतणारे प्रसंग इथे घडले आहेत आणि सर्व शासकीय यंत्रणांनी पराकोटीचे प्रयत्न करून पर्यटकांना वाचवले आहे. पावसाळ्यात या बेटावर जाणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. आपले सोबती, कुटुंबीय या सर्वाच्याच जिवाला घोर लावणारा हा प्रकार आहे. निसर्गाचा निखळ आनंद घेताना हे प्रकार लक्षात ठेवून टाळले पाहिजेत. तसेच काही तरी आचरटपणा करायचा आणि तो मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करायचा या नादापायी इथे अनेक अपघात झालेले आहेत. आपल्या पर्यटनाला असे गालबोट लागू नये याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. आपली वाट पाहणारे कोणी आहे याचा विचार जरूर करावा.
निसर्ग इथे भरभरून देतो आहे त्याचे निव्वळ निरीक्षण केले तरीसुद्धा भरपूर आनंद मिळतो, उत्साह मिळतो, एक नवीन ऊर्जा मिळते. भंडारदरा इथे एम.टी.डी.सी.चे विश्रामगृह अत्यंत मोक्याच्या जागेवर आणि राहायला उत्तम आहे. मात्र त्याचे आरक्षण करावे लागते. तसेच अजूनही काही हॉटेल्स आता इथे राहण्यासाठी उपलब्ध आहेत. खास ग्रामीण चवीच्या जेवणाचा आस्वाद इथे घेता येतो. इथे मुक्काम करून एका दिवसात महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाईलासुद्धा जाऊन येता येईल. फार पाऊस असेल तर मात्र वर चढून जाणे टाळावे. कारण धुक्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. परंतु सरत्या पावसात इथे आले तर त्यासारखी दुसरी पर्वणी नाही. वर्षां ऋतूमध्ये सारा आसमंत चैतन्याने भरलेला असतो. त्याचा निखळ आनंद घेण्यासाठी जरा सवड काढून रंधा-रतनगड-भंडारदरा या ठिकाणी नक्की यायला हवे.
आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com