नेपाळमधला भीषण भूकंप, उत्तराखंडमध्ये दोनेक वर्षांपूर्वी आलेला पूर, आर्थिक मंदी अशा घटनांचा पर्यटनावर नेमका काय परिणाम होत असतो? या वर्षभरातले पर्यटनाच्या क्षेत्रातले ट्रेंड्स काय सांगतात?
अन्न-वस्त्र-निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा. पण या मूलभूत गरजा मिटल्या की मग तो हौसेमौजेच्या गोष्टींकडे वळतो. मनाला छान वाटणाऱ्या गोष्टी. त्यामध्ये पर्यटनाचा समावेश अगदी प्राथमिकतेने होतो. पर्यटन हा विषय बरं वाटण्याशी निगडित असतो. केवळ पैसे आहेत म्हणून कोणी पर्यटनाला जात नाही. तसं असतं तर यापूर्वीदेखील अनेकांनी भटकंती केलीच होती ना. पण गेल्या काही वर्षांत पर्यटन एक कम्पलसिव्ह विषय झाला आहे. वर्षांतून कुटुंबीयांना घेऊन एखादी ट्रिप झाली पाहिजे हा ‘सोशिओ इकॉनॉमिकल फॅक्टर’ झाला आहे. केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येत असे हे आता काहीसं मागे पडत चाललं आहे याचंच द्योतक म्हणावे लागेल.
गेल्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांचे सरळ सरळ दोन भाग पडले आहेत. वर्षांतून एकदा कुटुंबाला कोठे तरी घेऊन जावं असं स्वप्न असणारा वर्ग. हा वर्ग शक्यतो देशांतर्गत पर्यटनाला प्राथमिकता देतो. तर वेळ आहे, पैसे आहेत आणि जाण्याची इच्छा आहे, असा वर्ग देशांतर्गतपेक्षा दक्षिण-पूर्व आशियातील थायलंड, हाँगकाँग, कंबोडिया, सिंगापूर अशा देशांना पसंती देताना दिसून येतो. त्याचबरोबर दुबईदेखील तितकेच लोकप्रिय ठरते आहे. याचं अगदी साधं-सोपं कारण म्हणजे देशांतर्गत पातळीवर एखादी जरा बरी असणारी टूर करण्यास येणारा खर्च आणि दक्षिण-पूर्व देशातील टूरचा खर्च एकच आहे. उलट अशा ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा या देशांतर्गत सुविधांपेक्षा अधिक चांगल्या असल्याचं अनेक पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक नमूद करतात. पण देशांतर्गत पर्यटनातील एक वेगळा पैलू मांडताना यशोधन ट्रॅव्हल्सचे प्रकाश मोडक सांगतात की तुलनेनं देशांतर्गत पर्यटनाला येणारा पर्यटक हा अधिक चोखंदळ आणि चिकित्सक असतो. त्यांच्याकडे त्याची स्वत:ची प्राथमिकता यादी असते. तो केवळ एक पर्याय म्हणून याकडे पाहत नाही तर त्याला देशातील ही ठिकाणं पाहायचीच असतात म्हणून तो येतो. त्यामध्ये केरळ, राजस्थान यांचा वरचा क्रमांक आहे. त्यामुळे देशाबाहेरील पर्यटन जरी खर्चाची तुलना करून वाढत असलं तरी देशांतर्गत पर्यटनाला कसलाही फटका बसला नसल्याचे मोडक नमूद करतात.
या वर्षी रुपयाचे मूल्य घसरणे आणि औद्योगिक वाढ खुंटली असल्यामुळे कॉपरेरेट क्षेत्राने बऱ्यापैकी नाडय़ा आवळल्या आहेत, त्यामुळे व्यावसायिक पर्यटनाला काहीशी खीळ बसली असल्याचे मॅगो हॉलीडेजचे मिलिंद बाबर सांगतात. तुलनेने रुपयामधील सकारात्मक बदल आणि इतर अनेक आशादायी घटनांमुळे, पण पर्यटनाचा जो मेन सीझन, म्हणजे एप्रिल-मेचा मोसम असतो तो या वर्षी चांगला गेला असल्याचे बाबर नमूद करतात. पण ज्या पर्यटकांनी पुढील दहा वर्षांचे नियोजन केलेले आहे, अशांना याचा फरक पडत नाही, ते आजदेखील ठरवल्याप्रमाणे पर्यटनात व्यस्त असल्याचे गुरुनाथ ट्रॅव्हल्सचे धनंजय पांढरे सांगतात. मग ती युरोप टूर असो की अमेरिका. हा वर्ग प्रामुख्याने पन्नाशीच्या पुढचा आहे.
आर्थिक मंदी अथवा अन्य अनेक कारणांचा फटका जसा इतर पर्यटनाला बसतो तसा धार्मिक पर्यटनाला फारसा बसत नसल्याचे बहुतांश पर्यटक व्यावसायिकांचे मत आहे. किंबहुना संकटाच्या पाश्र्वभूमीवर धार्मिक पर्यटनात वाढ होण्याची शक्यता अधिक असते. पण यंदाच्या वर्षी दोन ठिकाणांच्या धार्मिक पर्यटनाला जबरदस्त फटका बसला तो म्हणजे उत्तराखंडातील बद्रिनाथ, केदारनाथ आणि नेपाळमार्गे केली जाणारी कैलास मानसरोवर यात्रा. दर वर्षी शेकडो पर्यटक घेऊन जाणारे अमित कुलकर्णी सांगतात की, यंदाच्या मोसमात नेपाळमार्गे मानसरोवरास जाणाऱ्या सुमारे २५ हजार भाविक पर्यटकांना या यात्रेला मुकावे लागले आहे. नेपाळमार्गे मानसरोवराकडे जाणारा रस्ता खचला असल्याने आणि पुढे सुरक्षेच्या कारणास्तव चीनने परवानगी नाकारली. त्यामुळे उत्तराखंड आणि नथुलामार्गे भारतीय परराष्ट्र मंत्रालयामार्फत पारंपरिक यात्रामार्गाने जाणाऱ्या केवळ १६०० भाविकांनाच याचा लाभ घेता आला.
गेल्या काही वर्षांतील तंत्रज्ञानाचा प्रसारामुळे स्वत:च स्वत:चे नियोजन करून भटकंती करणाऱ्यांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. पण अशा वेळी ते जे काही नियोजन करतात त्याला तेच सर्वस्वी जबाबदार असतात. अशा वेळी एखाद्या अनवस्था प्रसंगाला तोंड द्यावे लागले तर तो वर्ग पुन्हा ट्रॅव्हल एजंटकडे येत असल्याचे सिमास (Simas) ट्रॅव्हल्सचे विश्वास केळकर नमूद करतात. आणि हा वर्ग सध्या पुन्हा पर्यटन व्यावसायिकाकडे परावर्तित होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे ते सांगतात. अशा वेळी अनेकांना गर्दी नको असते. त्यामुळे स्वत:च्या ग्रुपपुरती वेगळी टूर आखून घेण्याकडे कल अधिक असल्याचे क्वेस्ट टूरचे केदार साठे सांगतात. पण धार्मिक पर्यटनात सहभागी होणाऱ्यांचा वयाचा विचार केला तर तेथे यापैकी कोणताच पर्याय लागू होत नसल्याचे विश्वास केळकर नमूद करतात.
एकांडी शिलेदारी हा हळूहळू आपल्याकडे रुजू पाहत असलेला आणखी एक पर्यटनाचा प्रकार. परदेशातील बॅकपॅकिंगच्या धर्तीवर आज कोणी भटकू इच्छित असेल तर तशा सुविधा आपल्याकडे नाहीत. नेमकी हीच उणीव हेरून काही तरुणांनी एकत्र येऊन झोस्टेल सुरू केले आहे. दिल्ली, वाराणसी, जयपूर, जोधपूर, गोवा, आग्रा अशा ठिकाणी त्यांच्या शाखा सुरू झाल्या असून वातानुकूलित डॉर्मेटी ते स्वतंत्र खोल्या अशा साऱ्या सुविधा दिल्या जातात. त्यादेखील अगदी वाजवी दरात. खरे तर या प्रकाराच्या सुविधांची गरज खूप मोठी आहे.
असाच दुसरा पर्याय म्हणजे साहसी पर्यटन. त्याचादेखील विस्तार वाढला आहे. नव्याने रुजणारे सायकल टुरिझम बऱ्यापैकी जोर पकडू लागले आहे. पण अजून तरी आपली व्यवस्था त्याकडे फार काही पूरक नजरेनं पाहत नाही. ही गरज ओळखून काही पावले उचलावीत असे सध्या तरी शासकीय यंत्रणेला वाटत नाही. पण आपल्या देशात येऊन सायकल पर्यटन आणि साहसी खेळांत सहभागी होण्याचा मुद्दा मांडत थायलंडच्या पर्यटनमंत्र्यांनी मध्यंतरी भारतात येऊन जोरदार बॅटिंग केली होती.
प्रसिद्धी माध्यमे ही पर्यटनाला पूरक असतात पण गेल्या चार-पाच वर्षांत आपल्याकडे अतिवेगाने विकसित झालेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी केल्या, तेवढय़ाच वाईटदेखील केल्याचे पर्यटन व्यावसायिक नमूद करतात. गुरुनाथ ट्रॅव्हल्सचे ध्यानेश पांढरे सांगतात, ‘‘तेजी-मंदी, रुपयाचं मूल्य कमी जास्त होणं हे सारे काही आम्ही अपेक्षित धरलेले असते. नैसर्गिक संकटाचादेखील व्यवसायावर होणारा परिणाम गृहीत धरलेला असतो. पण माध्यमातून एखाद्या घटनेला मिळणारी प्रसिद्धी ही कधी कधी अतिरेकी होते आणि पर्यटनाला मोठा फटका बसू शकतो.’’ नेपाळ आणि उत्तराखंड ही त्याची सर्वात मोठी उदाहरणे आहेत. नेपाळमधील सुधारणाऱ्या परिस्थितीवर भाष्य कोणीच करत नाही. तोच प्रकार उत्तराखंडच्या बाबतीत. रस्ता खचून गेल्याची ब्रेकिंग न्यूजच इतके वेळा दाखवली जाते की पर्यटकाला धास्तीच भरते. पण सुरक्षा जवानांनी तोच रस्ता युद्धपातळीवर काम करून दुरुस्त केल्याचे दाखविण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. पांढरे सांगतात की, कैलास मानसरोवर यात्रेबाबत हेच घडले आहे. नेपाळच्या भूकंपाचा विपरीत परिणाम आणि भविष्यात असे होईल तसे होईल असे चित्र रंगविल्यामुळे अनेकांनी नेपाळकडे पाठ फिरवली. पण आता नेपाळ हळूहळू सावरत असून सप्टेंबरपासून येणाऱ्या मोसमासाठी आमच्याकडे अनेक पर्यटक उत्सुक असल्याचे काठमांडू येथील एबीसी अॅडव्हेंचर या एजन्सीचे ईश्वर क्षत्रिय यांनी सांगितले. भूकंपाच्या धक्क्यानंतर पुन्हा उभे राहिलेले नेपाळ सर्वाना पाहायला मिळेल याबद्दल त्यांना ठाम विश्वास वाटतोय.
पर्यटनाच्या क्षेत्रात सध्या कितीही चढ-उतार असले तरी एक इंडस्ट्री म्हणून बऱ्याच अंशी विकसित होत आहे. पण या पाश्र्वभूमीवर आपण कोठे आहोत हेदेखील पाहावे लागेल. भारतीय पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी सध्या चढाओढच सुरू आहे. थायलंडमध्ये भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या वार्षिक संख्येत लाखभराने फरक पडल्यामुळे त्यांचे पर्यटनमंत्री काही महिन्यांपूर्वी भारतात आले होते. तर हाँगकाँगचेदेखील संपूर्ण पर्यटन खाते भारतात आले होते. त्यांनी घेतलेली भूमिका आणि केलेले बदल हे महत्त्वाचे आहेत. आज थायलंडमध्ये डेस्टिनेशन मॅरेज आणि चित्रपट अथवा सिरीअल चित्रीकरणासाठी खूप मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. भारतातून त्यांना मोठा प्रतिसाद आहे. हे पाहता आपण अजून तरी अशा उपक्रमात फारसे आघाडीवर नाही आहोत.
धार्मिक पर्यटनात अनेक राज्ये पुढाकार घेत असताना आपल्या राज्यात मात्र उदासीनता कायम आहे. अगदी सध्या सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात हे कटाक्षाने जाणवले. नाशिक येथील सर्व ट्रॅव्हल एजंट्सनी एकत्रित येऊन वर्षांपूर्वीच देशभरातील महत्त्वाच्या ट्रॅव्हल एजंट्सना नाशिकमध्ये बोलावून नाशिकची माहिती, नाशिकमधील हॉटेल्सची माहीत दिली होती. परिणामी आज नाशकातील एकही हॉटेल रिकामे नाही. एमटीडीसीसारखी सरकारी यंत्रणा मात्र यात सहभागी होण्यास मागे राहत आहे.
देशाच्या पातळीवर एक सकारात्मक बाब जाणवते ती परदेशी पर्यटकांचा वाढलेली संख्या. व्हिसा ऑन अरायव्हल आणि ऑनलाइन व्हिसा या दोन सुविधा गेल्या दोन वर्षांत तब्बल ७७ देशांसाठी आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे जानेवारी ते जुलैच्या काळात मागील वर्षांतील याच काळातील संख्येत तब्बल एक लाख तीस हजारांनी वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल ९२४ टक्के इतकी आहे. सध्या तरी यावरच समाधान मानावे लागेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com