कधीकधी स्वत:लाच वेळ देण्यासाठी, नव्याने ओळखण्यासाठी ठिकठिकाणी केलेली भटकंती महत्त्वाची ठरते. रोजच्या व्यग्र आयुष्यात आलेला कंटाळा, थकवा चटकन नाहीसा होतो ते ठिकठिकाणी केलेल्या भ्रमंतीमुळेच.
भटकंतीची आवड मला लहानपणापासून. आई-बाबांनी लावलेली ही फिरण्याची सवय नंतर आवडच बनली. बाबा वर्षांतून एकदा एखाद्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचे. पण, ते फिरणं फक्त फिरणंच राहू नये; तर तिथलं राहणीमान, संस्कृती, आजूबाजूची स्थळं, लोक यांचा अभ्यास करावा. हा अभ्यास पुस्तकी नसावा तर निरीक्षणातून तो घडला पाहिजे, असा सल्लाही ते द्यायचे. म्हणूनच हॉटेलमध्ये बसून राहाण्यापेक्षा खोलीबाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी फिरा असं ते सांगायचे. त्यांचा हा सल्ला तेव्हा ऐकल्यामुळे अभ्यासू भटकंतीची आवड आपसूकच निर्माण होत गेली. शूटिंग आणि नाटकाच्या दौऱ्यांमुळे विविध ठिकाणी फिरणं होत असतं. अशा वेळी त्या त्या ठिकाणांची मी तिथे जाण्याआधी माहिती काढतो. तिथल्या आजूबाजूच्या चांगल्या प्रेक्षणीय स्थळांविषयी जाणून घेतो. तिथल्या परिसराविषयीही जुजबी का होईना पण, माहिती ठेवतो.
मला वाइल्ड लाइफची फार आवड आहे. त्यामुळे शक्य तिथे मी अभयारण्यात जाण्याला प्राधान्य देतो. प्राणी, पक्षी यांचं निरीक्षण करण्याची माझी आवड मला स्वस्थ बसू देत नाही. ‘हसवा फसवी’ या नाटकाचा नुकताच नागपूरमध्ये एक प्रयोग झाला. नागपूरपासून साधारण दोन तासांवर असलेल्या नागझीरा या अभयारण्यात मी नाटकाच्या टीमला घेऊन फिरायला गेलो. तिथे आम्हाला वाघ दिसले नाहीत. पण, इतर अनेक वन्य प्राणी आम्ही बघितले. अभयारण्याच्या गेटवरच एक नीलगाय आमच्या स्वागतासाठी उभी होती. किंगफिशर ते रॉबिनपर्यंत अनेक पक्षी दिसले. पण, त्या दिवसाचं आकर्षण ठरलं ते तिथले रानटी कुत्रे. वाघापेक्षाही क्रूर असणारे असे हे कुत्रे कळपाने फिरतात आणि शिकार करतात. त्यांच्या शिकारीची पद्धत वेगळी असते. ज्याची शिकार करायची त्याला हे कुत्रे जोडी-जोडीने दमवतात. एका हरणाच्या पिल्लासोबत (स्पॉटेड डिअर) असंच करताना आम्ही प्रत्यक्ष बघितलं. हा प्रसंग बघताना त्या पिल्लाला वाचवण्याबाबत आमच्यात चर्चाही झाली. पण, एकदा आपण जंगलात शिरल्यावर काहीही करू शकत नाही. कारण हे निसर्गचक्र आहे. त्या पिल्लाला वाचवण्यासाठी रानटी कुत्र्यांना पळवून लावणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे ती शिकार होताना बघणं एवढंच आमच्या हातात होतं. पण, शिकारीचा तो प्रसंग प्रत्यक्ष बघतानाचा अनुभव वेगळा होता.
वाइल्ड लाइफची आवड असल्यामुळे रानावनात फिरण्याचा मोह मला आवरता येत नाही. एकदा मी पश्चिम मेळघाटात गेलो. तिथे एक रात्र मला जंगलात घालवायची होती. टेकडीवर एका रेस्ट हाऊसला व्यवस्थाही झाली. रात्रीच्या जेवणासाठी टेकडीच्या पायथ्याशी यायचं होतं. खोलीतून बाहेर पडलो. तर ‘फूस-फूस’असा आवाज आला. बॅटरीच्या प्रकाशात काही दिसलं नाही. पण, कोणीतरी असल्याचा अंदाज मला आला. गाडीने खाली येत असताना गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात पाहिलं तर एक अस्वल तिथल्या बोराच्या झाडाजवळ बोरं खायला आलं होतं. मोठय़ा अस्वलाला बघण्याचा हाही एक अनुभव आनंद देणारा होता. जंगल सफारी करतानाची मजा औरच आहे. एरव्ही फक्त विशिष्ट वाहिन्यांवरच असे प्राणी-पक्षी बघता येतात. अशा भ्रमंतीतून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. कान्हा, बांधवगड, रणथंबोर इथे अनेक वाघांचं दर्शन झालं. जव्हार, वाडा, विक्रमगड या भागातही फिरलो. आदिवासी लोकांच्या ‘मुकणे’ या महाराजांचा राजवाडा अप्रतिम आहे. त्यांची आताची पिढी अजूनही तिथे आहे. वंशावळ, जुनी हत्यारं, शिकार केलेले प्राणी असं सगळं त्या राजवाडय़ात आहे.
कधीकधी खास वेळ काढून कुठे जाता येत नाही. म्हणूनच शूट करताना विविध ठिकाणी गेल्यावर तिथे फिरण्याची संधी मी कधीच सोडत नाही. लंडनमध्ये मी अनेकदा गेलो आहे. तिथे गेलो की मी नियमित रोज एक नाटक आणि एक म्युझिअम असं बघतोच. ‘माऊस ट्रॅप’ या नाटकाच्या साठाव्या वर्षांतला २४ हजार सहाशे ७२ वा प्रयोग मी बघितला. ‘लायन किंग’, ‘थर्टी नाइन स्टेप्स’, ‘डान्सिंग इन द रेन’ या नाटकांचा अनुभव विलक्षण होता. जागतिक पातळीवर रंगभूमीवर केल्या जाणाऱ्या प्रयोगांविषयी एक कलाकार म्हणून मला माहिती असायला हवी असं वाटतं. म्हणूनच मी गुजराती, हिंदी नाटकंही बघतो. फिरण्याच्या आवडीमुळेच विविध ठिकाणच्या कलेशी निगडित असलेल्या कलाकृती बघण्याचीही आवड माझ्यात निर्माण झाली. विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. दुबई, मकाऊ, सिंगापूर अशा काही देशांमध्ये फिरलो. ‘इम्फा’ या पुरस्कार सोहळ्यासाठी क्रूझवर जाण्याचा योग आला. तेव्हा हाँगकाँग, व्हिएतनाम, चीन अशा ठिकाणी भ्रमंती करता आली. विशेष म्हणजे या सोहळ्याचं अँकरिंग करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे संपूर्ण क्रूझ सगळ्यात जास्त मलाच फिरता आली. शिवाय ती क्रूझ प्रेक्षकांना दाखवण्यासाठी त्याभोवती स्पीड बोटने फिरण्याची संधीही मला मिळाली. ज्या देशात जाईन तिथली खाद्य संस्कृती अनुभवायला मी प्राधान्य देतो. ‘इथे एक मस्त भारतीय हॉटेल आहे’, असं कोणी मला सुचवलं तर मी त्याला थेट नकार देतो. परदेशात जाऊन पुन्हा भारतीय पदार्थ खाण्यात काय अर्थ आहे?
परदेशात फिरताना माझ्या लक्षात आलं की तिथले लोक पर्यटकांना खूप महत्त्व देतात. त्यांच्या देशात पर्यटकांनी यावं, राहावं, फिरावं अशी त्यांची इच्छा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येते. याविषयीचा एक अनुभव सांगतो. एकदा मलेशियात गेलो होतो. तिथे मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्यासमोरच आणखी एका मोठय़ा हॉटेलचं बांधकाम सुरू होतं. तिथे अनेक ट्रक ये-जा करायचे. ते ट्रक बाहेर रस्त्यावर येण्याआधी तिथली दोन माणसं त्याची चाकं धुवायची. असं ते प्रत्येक ट्रकचं करायचे. मला काही कळेना. मी बराच वेळ हे बघत होतो. शेवटी राहावलं नाही म्हणून त्या दोन माणसांना याबाबत विचारलं. तर ते म्हणाले, ‘आतमध्ये बांधकाम चालू आहे. त्यामुळे तिथे बरीच माती, धूळ, सिमेंट आहे. ती या ट्रकच्या चाकांना लागते. हे ट्रक तसेच बाहेर रस्त्यावर आले तर रस्ते खराब होतील आणि मग तुमच्यासारखे पर्यटक आमच्या देशाला नावं ठेवतील. असे रस्ते अस्वच्छ ठेवले तर तुम्ही याल का आमच्या देशात परत?’ त्याचं हे उत्तर ऐकून मला काहीच सुचेना. मी फक्त त्याच्याकडे बघितलं, हसलो आणि तिथून निघालो. यावरून त्यांच्यालेखी पर्यटकांचं असलेलं महत्त्व, देशावरचं प्रेम आणि माणुसकी दिसून आली.
विविध ठिकाणी भटकंती केल्याने रोजच्या व्यग्र आयुष्यात आलेला कंटाळा, थकवा चटकन नाहीसा होतो. वेगळ्या वातावरणात, लोकांमध्ये गेल्यामुळे एक वेगळाच ताजेपणा येतो. काही वेळा केवळ आराम करण्यासाठीही अशा नव्या ठिकाणी जावं. गेल्या उन्हाळ्यात मी माझ्या कुटुंबासह फक्त आराम करण्यासाठी, शांततेसाठी कुर्गला गेलो होतो. कधीकधी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठीही विविध ठिकाणी भेट द्यावी. तर कधी कधी स्वत:ला वेळ देण्यासाठी, एकटेपणा अनुभवण्यासाठी तर स्वत:लाच नव्याने ओळखण्यासाठी अशी भटकंती महत्त्वाची ठरते..!
पुष्कर श्रोत्री
शब्दांकन: चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com