lp12स्वप्नं दाखवण्यासह मुंबई खास आहे ती खाद्यभ्रमंतीसाठी. या वेगवान शहरात उसासा टाकताना ‘आधी पोटोबा’ करावाच लागतो. अशा वेळी या शहरात असंख्य कोपरे आहेत; जिथे तुम्ही पोटोबासाठी ‘जिवाची मुंबई’ आनंदाने करू शकता.

मुंबई. अनेक रंगांची, अनेक ढंगांची. साऱ्यांना सामावून घेणारी. या शहराची खाद्यसंस्कृती ही तशीच न्यारी. वर्षांनुवर्षे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेकांनी बहाल केलेली. आणि येथे असणाऱ्या, नव्याने आलेल्या सर्वानीच आपलीशी केलेली. असं म्हणतात की प्रत्येक गावाला, शहराचा स्वत:च एक खाद्य वारसा असतो. मुंबईलादेखील आहेच. पण येथे आलेल्यांनी त्यात आपल्यापरीने भरच घातली आहे. मराठी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, दाक्षिणात्य, बंगाली असं संपूर्ण भारताचं एकजिनसी चित्रच या मुंबईत उमटलं आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे रोजच्या रोज हजारोंच्या संख्येने लोक येत असतात. कोणाला रोजीरोटी हवी तर कोणाला जिवाची मुंबई करायची. अवाढव्य अस्ताव्यस्त पसरलेल्या मुंबापुरीत त्यांचा शोध सुरू असतो. मग रोजच्या कामासाठी भटका, नाहीतर पर्यटनासाठी, पोटोबा तर हवाच. अर्थात तुम्ही कशासाठी आणि कोठे जाणार यावर ते अवलंबून आहे. मग नाश्ता कोठे करायचा, जेवायचे कोठे, त्या त्या भागात गेल्यावर नेमकं काय खावं हे माहीत असणं अपरिहार्यच म्हणावं लागेल. किंवा केवळ खाण्यासाठीच म्हणू बाहेर पडायलादेखील हरकत नाही.
अर्थात मुंबईचे कोणते रूप पाहायचे आहे त्यावर तो बेत ठरू शकतो. देवाची मुंबई, सहलीची मुंबई, मुंबईकरांची मुंबई, खरेदीची मुंबई की बहुसांस्कृतिक मुंबई. कसं पाहायचं तुम्हीच ठरवा पण काय खायचं ते मात्र मी सांगतो.
मुंबाआई. मुंबईची आराध्य देवता. मूळनिवासी असलेल्या कोळ्यांची कुलदेवता. मुंबई दर्शनाची सुरुवात मुंबादेबीच्या दर्शनाने व्हावी. भल्या सकाळी मुंबादेवीचे दर्शन झाले आणि लगतच्या मुंबादेवी जिलेबीवाल्याकडची गरमागरम जिलेबी आणि पापडी खाल्ली की मग कसे मन प्रसन्न होऊन जाते. अजून भूक असेल तर मग नाश्ता करायला भुलेश्वरच्या नाक्यावरचे ‘सुरती’ आहेच.
मुंबादेवी, भुलेश्वर, माधवबाग, पांजरपोळ, काळबादेवी, क्रॉफर्ड मार्केट, मंगलदास मार्केट हा सारा परिसर म्हणजे देवदर्शन करणाऱ्यांसाठी आणि खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी जणू स्वर्गच. मुंबादेवी, काळबादेवी, भुलेश्वर, रामवाडी राम मंदिर (क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय स्मारक) अशी असंख्य देवळं या परिसरात आहेत. हे सारं पाहायचं असेल तर एक दिवस पुरेसा पडायचा नाही. आता सारा दिवस देवदर्शन म्हणा, खरेदी म्हणा, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने फिरायचे ठरवले की मग बाहेर पोटपूजा करणे आलेच. आणि साऱ्या देवळांत जायचे नसेल तरी पोटपूजेलादेखील येऊ शकता.
मुंबादेवी मंदिराच्या बाजूलाच असलेले बी. ताराचंद भगत, त्यांची दाल फ्राय, त्यात तळून घातलेला कांदा, स्पेशल शेव टोमॅटोची भाजी, खस्ता रोटी (बटर मारके) म्हणजे एकदम सॉलिड. मारवाडी देशी पद्धतीचे, पंजाबी पद्धतीचे खूप चविष्ट जेवण येथे मिळते. चविष्ट अस्सल गुजराती जेवण हवे असेल तर काळबादेवी मंदिराच्या समोरच्या अगदी साध्या, अजिबात भपका नसलेल्या आणि रुचकर जेवणाच्या ‘फ्रेंडस युनियन जोशी क्लब’ला पर्याय नाही. भुलेश्वरमधले वृंदावन भुवन ऊर्फ खिचडीसम्राट हाही जेवणासाठी एक चांगला पर्याय आहे. येथे दालबाटी, चुरमा लाडू, गरमागरम दाल ढोकली, जोधपुरी गट्टा साग, पापड मेथी का साग आणि जवळजवळ दहा प्रकारच्या मुगाच्या डाळीच्या खिचडय़ा, काठेवाडी खिचडी, स्पे. वृंदावनी खिचडी, मसाला खिचडी, हरियाली खिचडी, ड्राय फ्रुट खिचडी, मकाई खिचडी इ.इ.इ.. यापैकी काय खिचडी मागवाल ते खरे.
मंगलदास मार्केट आणि क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ या ठिकाणी आपले काहीच काम नसते. सोबतच्या महिला मंडळीची चाललेली खरेदी बघत राहणे आणि आपले खाली होत चाललेले खिसापाकीट सांभाळत राहणे बस्स एवढेच. मग खरेदी करून करून दमल्यानंतर ‘बादशहा’मध्ये जाणे आणि खाणे. पण त्यांचा जगप्रसिद्ध फालुदा पिणे जर का झाले नाही तर ती खरेदी व्यर्थच म्हणायची.
गिरगाव, ठाकुरद्वार हे दक्षिण मुंबईचे हे जणू हृदयच. अस्सल मराठमोळं खाणं मिळण्याची एक जागा. बालाजी मंदिर ज्या गल्लीत आहे त्या फणसवाडीच्या नाक्यावरचे ‘विनय हेल्थ होम’. साऱ्या मुंबईत सवरेत्कृष्ट, झणझणीत, तिखट, मिसळपाव, उसळपाव, पातळभाजी पाव कुठे मिळत असेल तर तो विनयकडेच. आणि साबुदाणा वडा, त्यावरचे कुरकुरीत कोटिंग, सोबत ती मिळणारी चटणी, बटाटे आणि शेंगदाणे घातलेली, त्याला तोड नाही. लाजबाब. विनयचे वाटाणा पॅटिस, बटाटावडादेखील मस्त असतात. ठाकुरद्वारच्या नाक्यावर असलेले पूर्वाश्रमीचे बी. तांबे आणि आताचे सुजाता. नाव बदलले मराठमोळ्या जेवणाची चव नाही बदलली. मुंबईमध्ये दर्जेदार महाराष्ट्रीय जेवण मिळणारी जी काही मोजकी ठिकाणं
आहेत त्या मधले हे एक. या भागात भागात आणखीन मराठी जेवण मिळणारी दोन उपाहारगृह आहेत. क्षुधा शांती भवन आणि कोल्हापुरी चिवडा.
lp13गिरगावातील खोताची वाडी. एक हेरीट्ज साइट. १७५ वर्षे जुन्या अशा या वाडीमध्ये, पुरातन घरं काही प्रमाणात का होईना; पण अजून टिकून आहेत. वाडीमध्ये भ्रमंती झाल्यानंतर गिरगावच्या बाजूला बाहेर आल्यावर समोरं येतं ते ‘पणशीकर’. पण पणशीकरांकडे जाण्यापूर्वी समोरच्या ‘विनायक केशव आणि कंपनी’ यांच्या दुकानात जरासे डोकावून पाहावे. कुणास ठाऊक नेमक्या त्याच वेळी त्यांनी पुरणपोळ्या, तेलपोळ्या, बेसनाचे लाडू, रवा लाडू, डिंक लाडू, अनारसे, चिरोटे, चिवडा, शंकरपाळे, गुळपोळी करायला घेतलेले असतील. ताज्या ताज्या, गरमागरम पुरणापोळी, तेलपोळी खाण्यासारखे सुख नसावे.
पलीकडे प्रार्थना समाजाकडे बाहेर पडल्यावर सिक्कानगरच्या समोरच फडकेवाडी गणेश मंदिर आहे. फडकेवाडी गणेश मंदिरात जाण्यामागे आणखीन एक उद्दिष्ट असावे. समोरच्या ‘प्रकाश दुग्धमंदिर’ मध्ये जावून समाधान होईस्तोपर्यंत पीयूष पिणे, मस्तपैकी वांगेपोहे घातलेली मिसळ, दही मिसळ, साबुदाणा वडा, बटाटय़ाची भाजी, बटाटापुरी, साबुदाणा खिचडी खाणं.. आपण ज्या दिवशी गिरगावात फिरत असतो त्या दिवशी नेमकी संकष्टी असणे हा एक उत्तम योग जुळून आला आहे असे समजावे. कारण एकच. प्रार्थना समाज जवळच्या माधवाश्रमात संकष्टीच्या रात्री मिळणारे अमर्यादित भोजन, अमर्यादित उकडीच्या मोदकांसह. स्वत: मालकांनी आग्रह करून करून खायला घातलेले उकडीचे मोदक. पोट तट्ट फुगून ओसंडून वाहीपर्यंत उकडीचे मोदक खावेत, असा जणू नियमच आहे असे मनाशी बाळगावे आणि चविष्ट उकडीच्या मोदकांची मजा भरभरून लुटावी.
दिवस दुसरा किंवा पहिलाही असू शकतो. मुंबई दर्शन खास पर्यटकांसाठी. ज्याला ज्याची आवड असेल त्याप्रमाणे त्याने मुंबईमधे भटकावे. मग ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, फोर्ट, बॅलार्ड पिअर, म्हातारपाखाडी या भागातला हेरिटेज वॉक असो की गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नरिमन पॉइंट, चर्चगेट, हुतात्मा चौक, सेंट थॉमस कॅथ्रेडल, राजाबाई टॉवर, मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, मणी भवन, बाबुलनाथाचे देऊळ, मलबार हिल, वाळकेश्वर, बाणगंगा तलाव, राणीचा बाग, महालक्ष्मीचे मंदिर, धोबीघाट आणि सिद्धिविनायक ही स्थळदर्शन असोत. आता दिवसभर भ्रमंती करायची म्हटलं तर पोटाची टाकीपण तशीच फुल्ल असायला लागते.
एकेकाळी मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर असलेला इराणी आता खूप दुर्मीळ होत चालला आहे. पण जे आहेत त्यांच्याकडे जावुन बनमस्का चहा, ब्रुनमस्का चहा खायलाच हवे. आजदेखील काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत का होईना असे इराणी शिल्लक आहेत. त्यांचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. ग्रँटरोड रेल्वेस्थानकाच्या समोर असलेला ‘बी. मेरवान’ मधला मावा समोसा, मावा केक एकदम टॉप. मस्कापाव खाण्यासाठी भायखळा रेल्वेस्थानकाबाहेर असलेले ‘कॅफे रिगल’, ‘भायखळा बेकरी’ किंवा मेट्रो चित्रपट गृहासमोरचे ‘कयानी बेकरी’मध्ये जाऊ शकता. कयानी बेकरीमधला प्रसिद्ध चहा आणि सोबत त्यात बुडवून खाल्लेली खारी बिस्किटं.
lp14फोर्टमधल्या ‘याझदानी बेकरी’मध्ये मिळणाऱ्या बनमस्का, ब्रुृनमस्काची सर ना आधी दुसरीकडे कुठे होती ना भविष्यात असणार आहे. अस्सल पंजाबी खाण्याची, छोलेकुलचे खाण्याची हुक्की आली असेल तर बाजूला असणारे ‘ओये काका’ हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र पंजाबी लस्सी प्यायची असेल तर येथे न पिता समोरच्या बाजूला असलेल्या पंजाबी मोती हलवाईकडे प्यावी. अगदी लाजबाब लस्सी. याच्याकडचे जेवण व नास्त्याकरता मिळणारे खाद्यपदार्थही तसेच छान असतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात फिरतांना
चविष्ट रस्सेदार पुरीभाजी खाण्यासाठी समोरच्या पंचम पुरीवालामध्ये जावून एक तर नुसती पुरीभाजी तरी खावी किंवा संपूर्ण जेवणाचे ताटच घ्यावे.
बॅलार्डपिअरमध्ये फिरताना जेवणाची वेळ झाली असेल तर मग मागचा पुढचा विचार न करता सरळ खुशाल ब्रिटानियामधे जाऊन बेरी पुलाव खावा. जेवणाच्या वेळेत जर का चर्चगेट, नरिमन पॉइंट भागात असाल तर मग सम्राट किंवा स्टेटसमधली गुजराती थाळी किंवा पंजाबी पद्धतीचे जेवण जेवावे, स्टेटसचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे दाक्षिणात्य पदार्थाबरोबर मिळणारे अमर्यादित सांबार व चटणी आणि हो चर्चगेटजवळ असलेले के. रुस्तुमकडचे आईसक्रिम हे तर खायला हवेच. दोन बिस्किटांमधे ठेवलेली आईसक्रिमची एक स्लॅब खाल्यानंतर जिव्हा तृप्त झालीच पाहिजे.
फिरता फिरता कधी संध्याकाळ होते ते कळतच नाही. संध्याकाळाची वेळ ही समुद्रकिनारी फिरण्याची उत्तम वेळ, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह व गिरगाव चौपाटी. आता मुंबईकरांचे फिरण्याचे हे आवडीचे ठिकाण असल्यामुळे तेथे अनेक तगडी उपाहारगृहे आहेतच. चौपाटी म्हटली की पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, रगडा-पॅटीस हे आलेच. पण हे खाताना समोर जाऊन सुखसागरमध्ये पावभाजी खायची आहे आणि बाजूला असलेल्या ए वन आइस्क्रीम कुल्फीवाल्याकडची मलई कुल्फी, पिस्ता कुल्फी, विविध फळांच्या कुल्फी किंवा समोरच्या बॅचलर्समध्ये जाऊन आइस्क्रीम खायचे आहे, फळांचा रस प्यायचा आहे हे भान राखलेले बरे. ठक्कर्समधली गुजराती थाळी, सेवपुरी, दही बटाटापुरी, पानकी, पट्टी समोसा, हांडवो, पात्रा आदी किंवा क्रीम सेंटरमध्ये मिळणाऱ्या छोलेभटुरेही आपली वाट बघत आहेत हेही लक्षात ठेवावे.
बाबुलनाथच्या समोरच्या रस्त्यावर असलेल्या गोविंदा हे इस्कॉन टेंपलमधले रेस्टॉरंट. येथले शुद्ध आणि सात्त्विक, कांदालसूण वर्जित असलेले पंजाबी पद्धतीचे प्रसादाचे जेवणही फार छान असते. पावभाजी हा प्रकार आणण्यामध्ये आणि लोकप्रिय करण्यामध्ये सुखसागरप्रमाणेच ताडदेवच्या सरदार पावभाजीचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याकडची पावभाजी चुकवून कसे चालेल? या भागात सकाळी नाश्ता करायचा असेल तर एक अनोखा खाद्यपदार्थ मिळणारे उपाहारगृह आहे. मणी भवनजवळच्या नाना चौकातले हिन्दू विश्रांतिगृह आणि मिळणारा तो खास पदार्थ म्हणजे पोळा मिसळ. आपण पोळा खाल्लेला असतो आणि मिसळ ती तर नेहमीच. पण जेव्हा वाटाण्याची झणझणीत उसळ, त्यावर खास तयार केलेलं मक्याचं फरसाण असलेल्या मिसळीबरोबर तो पोळा खाल्ला जातो ना तेव्हा त्याची चव काही निराळीच असते. ही जोडी अगदी भन्नाट. पोळा उसळ हा पदार्थदेखील येथे खाता येतो.
मुंबईची मजा लुटायची असेल तर ती रमतगमत पाहावयाला हवी, शहरामधल्या खाद्यसंकृतीचा आस्वाद चवीचवीने घ्यायला हवा आणि आस्वाद जर का लुटायचाच असेल तर शिवाजी पार्कला असलेल्या आस्वादमध्ये न जाऊन कसे चालेल. त्यात परत आस्वादमधल्या मिसळीला जगातील सवरेत्कृष्ट शाकाहारी पदार्थ हा पुरस्कार लंडनमध्ये झालेल्या एका खाद्यस्पर्धेत मिळालेला आहे. काळ्या वाटाण्याची उसळ व पोळा, त्यासोबत मिळणारे नारळाचे दूध, मसालेभात, कुर्मापुरी, कोथिंबीर वडी, थालीपीठ, भरली वांगी, डाळिंबी उसळ आणि उपवासाचे पदार्थ हे तर खायलाच हवे. आस्वादमध्ये उकडीचे मोदकही रोज मिळतात. याच भागात पुढे जवळच सुप्रसिद्ध प्रकाश आहे. प्रकाशचा साबुदाणा वडा, मिसळ, दही मिसळ, कुर्मापुरी, बटाटा सुकी भाजी-पुरी आणि हे खाऊन झाल्यावर रिचवलेले पीयूष. यांची तारीफ करावी तेवढी थोडीच. दादर lp15रेल्वेस्थानकाचा परिसर तर साडय़ा, कपडे खरेदीसाठी पर्वणी. मामा काणे यांचा किंवा छबिलदासचा बटाटावडा खाल्ल्याशिवाय येथील खरेदी पूर्ण व्हायचीच नाही. प्लाझा चित्रपटगृहासमोरच्या तृप्तीमध्ये मराठमोळं जेवण जेवल्यावर तृप्ती ही व्हायलाच हवी.
दाक्षिण्यात खाद्यपदार्थाची ज्यांना आवड असेल त्यांनी मुंबईत फिरताना मुद्दामहून वाट वाकडी करून माटुंग्याला जायला हरकत नाही. साऱ्या जगात जेवढे पारशी नसतील तेवढे मद्रासी लोक या विभागात राहतात असे एक माटुंग्यालाच राहणारा पारशीबाबा नेहमी बोलत असायचा. मग या सर्वाच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी येथे अनेक उडुपी उपाहारगृहे आहेत. रुईया महाविद्यालयाच्या मणीजपासून सुरुवात झालेली ही संस्कृती ‘डीपी’, ‘आर्य भवन’, ‘राम आश्रय’ करत करत पार शंकर मठाजवळील ‘मणी’पर्यंत पोहोचलेली. माटुंगा रेल्वे स्थानकासमोरचे ‘राम आश्रय’ तर या भागातले दादा उपाहारगृह. केव्हाही जा खाण्यासाठी गर्दी ही असतेच असते. आपला नंबर लागण्यासाठी वाट बघितल्याचे सार्थक. वातावरण निर्मितीसाठी नमनाआधी जरासे रसम पिऊन झाले की मग गरमागरम इडली, मेदुवडे, उपमा, शिरा, पोंगल अवियल, कोकोनट शेवई, सादा डोसा, रवा डोसा, कांदा उत्तप्पा व शेवटी नीर डोसा व सोबतची नारळाची चोय, लाल चटणी, खाऊन आणि वर फिल्टर कॉफी पिऊन झाल्यावरच सांगता होते. माटुंगा सर्कलमधले कॅफे मद्रास हेही तसेच भारी उपाहारगृह. येथे सेट डोसा, नीर डोसा, पिस्सारेटु डोसा, टुप्पा डोसा, रागी मसाला डोसा, रवा डोसा, रसम इडली, बेसीबेळी भात, पोंगल अवियल या सर्वावर ताव मारावा तेवढा थोडाच. शेजारचे मद्रास कॅफे, आनंद भवन, अंबा भवन कुठेही जाऊन खावे. चॉइस अपना अपना.
पण एक मात्र खरे या विभागातली दोन स्थळं कधीच चुकवू नयेत, त्यातले पहिले म्हणजे माटुंगा रेल्वेस्थानकाबाहेरच असलेले रामा नायक उडुपी श्रीकृष्ण बोर्डिग, शुद्ध सात्त्विक भोजन. येथे हमी दिली जाते की जेवण स्वच्छ वातावरणात बनवले आहे. स्वच्छतेबद्दल मनात काही शंका असेल तर स्वयंपाकघरात जाऊन पाहू शकता. केळीच्या पानावर मिळणारे अमर्यादित घरगुती चवीचे दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण. ताज्या कैरीचे लोणचे, दोन भाज्या, दही आणि दोन तवा चपाती. रसमभात, सांबारभात, वरणभात आणि दहीभात. वरती पायसम. मर्यादित जेवण जेवायचे असेल तर ते मात्र थाळीमध्येच जेवावे लागते. दुसरे म्हणजे किंग सर्कलचे महेश्वरी उद्यानाच्या समोरचे इडली हाउस. येथे मिळणाऱ्या विविध इडल्या पाहून काय खाऊ नि काय नाही असे होते. फणसाच्या पानात, केवडय़ाच्या पानात गुंडाळलेली इडली, रवा इडली, मसाला इडली, म्हैसुर रवा इडली, व्हे. इडली, कांचीपुरम इडली, तांदूळ आणि नारळ यांच्या संगतीत खुलून निघालेली इडली, काळीमिरी घातलेली इडली आणि त्यानंतर काकडीच्या रसात नटलेली, स्वाद घेऊन बहरलेली काकडी इडली आणि सोबत सांबार, नारळाची चटणी. मोल्गापुडी, लिंबडापुडी तिळाच्या, नारळाच्या तेलाबरोबर, रसमबरोबर, सांबारबरोबर आणि वर एक गरमागरम कॉफी.
धारावी. धारावी झोपडपट्टी. हे हल्ली मुंबईमधे फिरण्यासाठीचे नवे ठिकाण. या ठिकाणी असलेले लघुउद्योग पाहण्यासाठी. हे पाहून झाले की मग पोटपूजा करायला जवळच सायन रेल्वेस्थानकासमोरच्या रस्त्यावर असलेले गुरुकृपा गाठावे. फक्त सकाळीच मिळणारे दाल पकवान, तसेच छोलेपॅटीस, छोलेसमोसा, छोलेभतुरे, गुलाबजाम म्हणजे बेष्ट इन द वर्ल्ड. सायन सर्कलमध्ये असलेले ‘हनुमान’ व्हे. रेस्टॉरंट. हे पोहेउपमा, बन, डोसे, इडली खाण्यासाठी तसेच जेवणासाठी फार लोकप्रिय आहे.
अशी चार-दोन दिवस मुंबईत मनसोक्त खाद्य भटकंती, म्हणजे भटकंती करताना खाद्यगिरी करावी. तशीही दोन-चार दिवसांत काय मुंबई फिरून होत नाही. परत कधी आलाच तर जे आता खाल्लं नाही ते खावं. मुंबईचेच असाल तर वर्ष-दीड वर्षांची तरी बेगमी होईल इतपत साठा तुम्हाला दिलाच आहे.
प्रियदर्शन काळे – response.lokprabha@expressindia.com

Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mumbai Festival organized tourism department of maharashtra government
खर्चिक ‘मुंबई फेस्टिव्हल’वर पडदा; तिजोरीवरील भार हलका करण्यासाठी निर्णय
Stones pelted at hawker removal teams vehicle in G ward of Dombivli
डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
Devendra fadanvis review meeting for msrdc ambitious Pune Ring Road and Jalna Nanded Expressway projects
पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड महामार्गाच्या भूमिपूजनाला लवकरच मुहूर्त, उद्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता
Story img Loader