पुणं म्हटलं की शनिवारवाडा, लाल महाल, पर्वती, परिसरातलं सिंहगड, पानशेत ही नावं जशी आठवतात तशीच लज्जतदार पुणेरी मिसळीची आठवण येते. पण या मिसळीशिवायही पुणं बरंच चविष्ट आहे…

पुणे शहरातील आणि पुण्याच्या परिसरातीलही अनेक पर्यटनस्थळं प्रसिद्ध आहेत. पुण्यातील शनिवारवाडा, पर्वती, राजा केळकर वस्तुसंग्रहालय, लाल महाल, आगाखान पॅलेस.. पुणे परिसरातील सिंहगड, राजगड, खडकवासला, लोणावळा, पानशेत.. अशी खूप मोठी यादी सांगता येईल. या ठिकाणांची भ्रमंती करत असतानाच पुण्यातील खाद्यपदार्थाचा आस्वाद हादेखील भ्रमंतीचा एक चविष्ट मार्ग आहे. पुण्यातील शेकडो ठिकाणं आणि परिसर असे आहेत की जिथल्या पदार्थावर पुणेकर मनापासून प्रेम करतात. या ठिकाणांचं आणि पुणेकरांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. अशाच काही ठिकाणांची ही धावती ओळख..
तुळशीबागेतील मिसळ,
मंडईतील बासुंदी
केवळ महाराष्ट्रातील नाही तर अन्य प्रांतांतील पर्यटक पुण्यात आले की हमखास भेट दिली जाते ते ठिकाण म्हणजे पुण्याची तुळशीबाग. तुळशीबागेतील खरेदी हा महिलांचा खास आवडीचा विषय. तुळशीबागेच्याच थोडं पुढे गेलं की पुण्याचं भूषण असलेली महात्मा फुले मंडईची वास्तू आहे. इंग्रजांच्या काळातील हे ‘रे मार्केट’. महापालिकेचे सदस्य असताना आचार्य अत्रे यांच्या पुढाकारानं या ‘रे मार्केट’चं नामकरण महात्मा फुले मंडई असं करण्यात आलं. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वास्तूची बांधकामशैली आणि तिचं सौंदर्य लगेचच नजरेत भरतं. मंडई आणि तुळशीबाग परिसरात खाण्याची दोन मस्त ठिकाणं आहेत. तुळशीबागेतील ‘श्रीकृष्ण मिसळ’ आणि मंडईतील ‘गोपाल विहार’ हे बासुंदीचं दुकान. या ठिकाणांना आवर्जून भेट द्यायलाच हवी. झणझणीत चवीचा लाल, र्तीदार रस्सा ही श्रीकृष्ण मिसळीची खासियत. शिवाय मिसळीचा आस्वाद घेतानाच इथली गोल कांदा भजी आणि शिरा हे पदार्थ नकळतच मागवले जातात. मंडईतील पार्किंग इमारतीजवळ असलेलं गोपाल विहार हे बासुंदी मिळण्याचं एक आगळं ठिकाण आहे. हल्ली बहुतेक सर्व ठिकाणी बासुंदी मशीनवरच तयार केली जाते. गोपाल विहारचं वैशिष्टय़ हे की इथली बासुंदी पारंपरिक पद्धतीनं कोळशाच्या शेगडीवर तयार केली जाते. वर्षांनुर्वष हे काम त्याच पद्धतीनं सुरू आहे. शेगडीवर तयार होणारी ही बासुंदी मस्त दाट आणि किंचित गुलाबी रंगाकडे जाणारी असते. शेगडीवर आटवल्या जाणाऱ्या दुधामुळे या बासुंदीची चव न्यारीच ठरते.
शतकी परंपरा: वैद्य मिसळ
मध्य पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, शनिवारवाडा, कसबा गणपती आणि लाल महाल या जवळजवळ असलेल्या तीन-चार ठिकाणांना पर्यटक भेट देतातच. इथूनच पुढे फडके हौद चौक लागतो आणि या चौकाजवळ असलेलं ‘वैद्य उपाहारगृह’ हे मिसळ मिळण्याचं पुण्यातलं एक अप्रतिम ठिकाण. वैद्य मिसळ या नावानं प्रसिद्ध असलेलं हे हॉटेल थेट जुन्या पुण्याची आठवण करून देतं. वैद्य मिसळीला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. जुनी लाकडी टेबल, त्याच्यावरचे संगमरवरी पाट, जुन्या वळणाचे आरसे, लाकडी कपाटं असा या हॉटेलचा पारंपरिक थाट आहे. कांदापोहे, मटकीची उसळ, बटाटा भाजी, जाड कुरकुरीत शेव, कांदा आणि रस्सा हे या मिसळीचे घटक पदार्थ. वैद्य मिसळीसाठी तयार केला जाणारा रस्सा आल्याचा असतो आणि हा आल्याचा पातळ रस्सा तुम्हाला हवा तेवढा दिला जातो. इथली शेवही फार प्रसिद्ध आहे.
मद्रासी गल्लीतील खाद्यजत्रा
पुण्यातील रास्ता पेठ, सोमवार पेठ हे बहुभाषकांचे रहिवासी भाग. त्यातही दाक्षिणात्य मंडळींचा भरणा या भागात अधिक. त्यामुळे स्वाभाविकच या भागातील रस्त्यांना आणि गल्ल्यांना मद्रासी गल्ली असंच म्हटलं जातं. तर या मद्रासी गल्लीत सकाळी साडेसहापासूनच दाक्षिणात्य मंडळींच्या खाद्यगाडय़ा लागायला सुरुवात होते आणि पाठोपाठ इडलीपात्रात इडल्या तयार व्हायला लागतात. तव्यावर पाणी मारल्याचे चर्र.. चर्र.. आवाज सुरू होतात आणि सकाळच्या नाश्त्यासाठी गाडय़ांवर गर्दी व्हायला सुरुवात होते. गाडय़ांवरचे कसबी कलाकार मग तव्यांवर भराभर डोसे, उत्तप्पे टाकायला लागतात. इथल्या गाडय़ांवर आकारने मोठय़ा आणि तरीही हलक्या अशा इडल्या मिळतात, अप्पे मिळतात आणि कुरकुरीत डोसा, कांदा उत्तप्पा, मेदूवडा यांचीही इथे रेलचेल असते. शिवाय इतर हॉटेलप्रमाणे चटणी, सांबारचा चार्ज वेगळा.. असा प्रकार इथे नाही. तुम्ही डिश पुढे करताच इथला अण्णा तुमच्या डिशमध्ये तुम्हाल हवे तेवढे सांबार आणि चटणी तुम्हाला हव्या तेवढय़ा वेळा देतो. डिशमध्ये इडली किंवा मेदूवडा त्याच्यावर सांबार आणि त्याच्यावरच चटणी अशी इथे डिश देण्याची पद्धत आहे. शिवाय सगळे पदार्थ वीस ते चाळीस रुपयांच्या दरम्यान मिळत असल्यामुळे पोटभर नाश्ता करूनही हे प्रकरण फार महागात पडत नाही. विविध चवींचे पराठे, पुरी भाजी, भजी, बटाटेवडे, छोले भटुरे असेही पदार्थ इथल्या गाडय़ांवर मिळतात आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठीही दिवसभर चांगलीच गर्दी असते.
चहाप्रेमींसाठी अमृततुल्य
चहाप्रेमींसाठीची ‘अमृततुल्य’ हीदेखील पुण्याचा एक पारंपरिक ठेवा आहे. लक्ष्मी रस्त्यावर असलेलं आद्य अमृततुल्य हे पुण्यातील पहिलं अमृततुल्य. ते १९२६ मध्ये सुरू झालं. कुटलेले वेलदोडे किंवा आलं घालून आटवून, आटवून तयार केल्या जाणाऱ्या अमृततुल्यच्या वाफाळत्या चहाला पर्यायच नाही अशी पुण्यातील परिस्थिती आहे. चहाची तल्लफ भागवायला अमृततुल्यचाच आसरा घ्यावा लागतो. या हॉटेलांच्या रचनेत, चहा तयार करण्याच्या पद्धतीत आणि चवीत गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत काहीही बदल झालेला नाही. राजस्थानातून चरितार्थासाठी पुण्यात आलेल्या श्रीमाळी समाजातील मंडळींनी ही अमृततुल्य सुरू केली. दवे, ओझा, जोशी, त्रिवेदी, ठाकूर ही मंडळी या व्यवसायात असून पुण्यात दोन-अडीचशे अमृततुल्यमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत चहा उकळत असतो. अमृततुल्य म्हणजे पुणेकरांचे कट्टे किंवा गप्पांचे अड्डे आहेत.
‘अजंठा’मध्ये बारा चवींची श्रीखंड
अलका चित्रपटगृहाकडून नवी पेठेकडे जाणारा जो शास्त्री रस्ता आहे त्या रस्त्यावर असलेलं ‘अजंठा’ हे मिठाई विक्रीचं दुकान कम हॉटेल हेही एक झकास ठिकाण. तिखटाबरोबरच गोडाची आवड असणाऱ्यांसाठी इथे एक से एक पदार्थ मिळतात. अजंठामधील इडली सांबार हा एक न चुकवण्याचा पदार्थ आहे. दाक्षिणात्य चवीचं सांबार आणि इथलं सांबार यात मोठा फरक आहे. फोडणी तयार करताना त्यात कोथिंबीर जाळून हे सांबार तयार केलं जातं. वाफाळती इडली आणि तूरडाळीचं झणझणीत सांबार खाताना तुम्ही इथे नकळतच शेव मागवता आणि इडली सांबारवर शेव पसरून मग घास घेताना जी काही चव लागते ती भन्नाटच. इथला चटकदार बटाटेवडाही प्रसिद्ध आहे. अजंठाची आणखी एक खासियत म्हणजे इथे मिळणारी निरनिराळ्या चवींची श्रीखंड. आपण नेहमी श्रीखंड किंवा आम्रखंड खातो; पण अजंठामध्ये वेलची, पायनापल, केशर, बटरस्कॉच, पिस्ता अशा वेगवेगळ्या चवींची श्रीखंड मिळतात. शिवाय इथले पाकातले गुलाबजामही मस्त असतात. श्रीखंड चाखल्याशिवाय अजंठाची खाद्ययात्रा पूर्ण होऊच शकत नाही.
पुणेरी चवीचं पोटभर जेवण
पुण्यात फिरता फिरता दुपारचे दीड-दोन किंवा रात्रीचे नऊ वाजून गेले की जेवणाचा विचार सुरू होतो. अशा वेळी पूर्ण ताट घेऊन साग्रसंगीत जेवणाऱ्यांसाठी पुणे ही एक पर्वणीच ठरते. श्रेयस, श्रेयससिद्धी, रसोई, ऋतुगंध, दुर्वाकुर, जनसेवा, थाटबाट असे दोनशे ते तीनशे रुपयांच्या रेंजमधले अनेक झकास डायनिंग हॉल पुण्यात आहेत. त्या बरोबरच साधारण शंभर ते दीडशे रुपयांच्या रेंजमध्येही तुम्ही पुण्यात पारंपरिक चवीच्या जेवणाचा आनंद घेऊ शकता. पूना बोर्डिग, बादशाही, आशा, स्वीकार, अतिथी, सिद्धिविनायक, सात्त्विक थाळी ही त्यासाठीची काही खास नावं. हे सगळे डायनिंग हॉल आपापली चव, वैशिष्टय़ आणि थाट वर्षांनुर्वष जपून आहेत.
सिंहगडावरील गावरान थाळी
पुणं पाहायला येणाऱ्यांना पुण्याजवळची काही ऐतिहासिक ठिकाणं नेहमीच साद घालतात. पुण्याजवळचा सिंहगड हे एक असंच ठिकाण. हा इतिहासप्रसिद्ध किल्ला आणि किल्ल्यावरील विविध वास्तू पाहात असतानाच गडावर मिळणाऱ्या दही आणि ताकाचाही आनंद पर्यटक लुटतात. इथली खासियत म्हणजे हे दही आणि ताक मातीच्या मडक्यात तयार केलेलं असतं. त्यामुळे दही अतिशय घट्ट असतं. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमधील महिला आणि मुलं गडावर रोज ताजं दही घेऊन येतात आणि गड चढणाऱ्या किंवा गड चढून आलेल्या पर्यटकांचा या दही किंवा ताकानेच श्रमपरिहार होतो. सिंहगडाची सफर गडावर मिळणाऱ्या गावरान जेवणानं अधिकच संस्मरणीय होते. अस्सल गावरान चवीची आणि अगदी आपल्यासमोरच चुलीवर तयार होणारी गरमागरम पिठलं-भाकरी हा सिंहगडावरचा एक चविष्ट विषय आहे. गड चढून आल्यानंतर अशी काही भूक लागलेली असते की दही, पिठलं-भाकरी, खर्डा, गरमागरम कांदा भजी असं ताट समोर येताच पर्यटक या गावरान जेवणावर तुटून पडतात. सिंहगडाची सफर करून परतताना खडकवासला जलाशयाच्या काठी पर्यटकांची पावले आपोआपच रेंगाळतात. धरणाकाठी पाण्याचा आनंद लुटतानाच शेगडीवर भाजलेल्या आणि लिंबू, मीठ लावलेल्या गरम कणसांचा आस्वाद आपल्या सहलीचा आनंद वाढवतो.
बाकरवडी, पॅटिस, आंबा बर्फी…
पुण्याची खाद्ययात्रा पूर्ण होऊ शकत नाही अशी अनेक ठिकाणं शहरात जागोजागी विखुरलेली आहेत. पुण्याबाहेरची कोणीही व्यक्ती पुण्यात आली की चितळ्यांची बाकरवडी आणि आंबा बर्फी यांची खरेदी अनिवार्य असते. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरचं माझरेरिन हे सँडविचसाठी प्रसिद्ध असलेलं असंच एक महत्त्वाचं ठिकाण. याच रस्त्यावर असलेल्या बुधानी यांचे वेफर्सही मोठीच ख्याती मिळवून आहेत. माझरेरिनच्या मागच्या रस्त्यावर असलेली कयानी बेकरी ही बिस्किटांसाठीची एक अग्रगण्य बेकरी. बेकरीच्याच व्यवसायातील आणखी काही महत्त्वाची नावं म्हणजे पूना बेकरी, शनिवारातील हिंदुस्थान बेकरी, आपटे रस्त्यावरची संतोष बेकरी, ग्रीन बेकरी. या सगळ्या बेकऱ्यांचे ब्रेड आणि पॅटिस यांचा पुण्यात मोठाच दबदबा आहे. भवानी पेठेतील लक्ष्मीनारायण चिवडय़ाचंही नाव कित्येक र्वष पुणेकरांच्या तोंडी आहे. वडापाव हा पदार्थ सगळ्याच शहरांमध्ये आता सर्वत्र मिळतो. तीच परिस्थिती पुण्यातही आहे. पण त्यातही जोशी वडेवाले, रोहित वडेवाले, भारती वडेवाले, सहकारनगरचा श्रीकृष्ण वडा, लक्ष्मी रस्त्यावर काकाकुवा मॅन्शनच्या दारात मिळणारा शंकररावांचा वडा, लष्कर भागातला गार्डन वडा, बालगंधर्व पुलावर मिळणारा खत्री बंधू वडा यांचा उल्लेख जाताजाता करायलाच हवा.. पुणं जसं विस्तारतंय, चहूअंगांनी वाढतंय तसं खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायालाही नवनवे आयाम मिळत आहेत. पारंपरिक चवीचा आनंद घेणाऱ्या पुणेकरांकडून या नवनवीन पदार्थाचं आणि नव्या हॉटेल्स व रेस्टॉरंटस्चंही मनापासून स्वागत होतंय. पुण्याची ही खाद्ययात्रा त्यामुळे अधिकच समृद्ध होत चालली आहे.
विनायक करमरकर – response.lokprabha@expressindia.com

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Tourists can now taste sweet honey along with tiger sighting at Tipeshwar Sanctuary
टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’
Shiv Pratap Din celebrated at Pratapgad Flowers showered from helicopter on Chhatrapati equestrian statue satara news
अलोट उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव
Tuljabhavani Devi, Shakambhari Navratri festival,
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारीपासून प्रारंभ
Story img Loader