lp23सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग बीच यांच्यामुळे मालवण हे शांत गाव पर्यटनाच्या नकाशावर आलंय. मालवण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा समज असतो, पण मालवणची भटकंती म्हणजे केवळ एवढंच नसून एक सुंदर खाद्य-भटकंतीसुद्धा आहे.

मालवण परिसर फिरायचा म्हणजे सामान्य पर्यटकासाठी कोकण रेल्वे हा सर्वात सोईस्कर पर्याय आहे. कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरून रिक्षा, जीप, एसटीने २६ किलोमीटरवरील मालवणला तासाभरात पोहोचता येतं. कोकण रेल्वेच्या ‘मांडवी’ आणि ‘कोकणकन्या’ या दोन गाडय़ा त्यातल्या केटिरंग सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध आहेत. भारतातल्या काही मोजक्याच गाडय़ांमध्ये असे विविध आणि दर्जेदार पदार्थ मिळतात. त्यामुळे आपली कोकणातल्या खाद्य-भ्रमंतीची सुरुवात कोकण रेल्वेपासूनच होते. कोकण रेल्वेत सकाळच्या नाश्त्यात शिरा-उपमा, ब्रेड-आम्लेट, इडली-वडा, कटलेट इत्यादीपासून दुपारच्या/ रात्रीच्या जेवणात सूप, चिकन लॉलीपॉप, फ्राइड राइस, बिर्याणी ते आईस्क्रीम, गुलाबजामपर्यंतचे ४५ वेगवेगळे पदार्थ मिळतात. हे लक्षात राहण्याचं कारण म्हणजे एकदा मालवणला जाताना दरड कोसळल्याने आम्ही तब्बल १९ तास प्रवास करत होतो. त्या वेळी मेन्यू कार्डमधल्या ४५ पदार्थातले ३२ पदार्थ आम्ही खाल्ले होते. तुम्ही जर ‘जनशताब्दी’ने जात असाल तर मात्र तुमची खाण्याच्या बाबतीत हेळसांड होईल. कारण या गाडीला पँट्रीकार नाही. पण निराश व्हायचं काहीच कारण नाही. कुडाळला ही गाडी दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास पोहोचते. रेल्वेतून उतरल्यावर तुमच्या गाडीवाल्याला गाडी थेट ‘भाऊच्या खानावळी’त घ्यायला सांगायची. कुडाळ स्टेशनपासून एक किमी अंतरावर असलेल्या या घरगुती खानावळीत अस्सल मालवणी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळतं. खानावळीत आडवा हात मारला की तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने गाडीत बसायचं. गाडीवाल्याला गाडी आरामात चालवायला सांगायचं. याचे दोन फायदे आहेत. एक तर खिडकीबाहेर दिसणाऱ्या कोकणाच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल आणि दुसरा म्हणजे कोकणातल्या वळणदार रस्त्यांचा पोटाला त्रास होणार नाही. कुडाळ-मालवण रस्त्यावर धामापूरचा तलाव हा प्राचीन तलाव आहे. तेथे थोडा वेळ थांबून मगच मालवणच्या दिशेने पुढे जावे.
मालवणात पोहोचल्यावर आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक तर तारकर्लीला जाऊन राहायचं किंवा मालवण गावात मुक्काम करायचा. मालवण ते तारकर्ली अंतर सात किमी आहे. जाण्या-येण्यासाठी रिक्षा, एसटी असे पर्यायही आहेत. त्यामुळे कुठेही राहिलात तरी फारसा फरक पडत नाही. पण तारकर्लीत राहिलात तर खाण्याचे पर्याय मर्यादित आहेत. तुम्ही ज्या हॉटेलात राहाल तिथलंच आणि जसं मिळेल तेच खावं लागेल. पण मालवणात राहाल तर तुमच्याकडे खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. मालवण, सिंधुदुर्ग, तारकर्ली, देवबाग परिसर पाहायचा असेल तर दोन दिवसांचा वेळ काढणं आवश्यक आहे. मालवण- कुडाळ- वेंगुर्ला- सावंतवाडी- आंबोली घाट ही ठिकाण पाहायची असल्यास चार ते पाच दिवसांचा वेळ काढावा लागेल.
मालवणचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘कुरटे’ बेटावर शुद्ध खडक, मोक्याची जागा व गोडय़ा पाण्याची सोय या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्याची आज्ञा केली. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्ताचा चिरा बसवला. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. गेली ३५१ वर्षे ऊन-वारा-पाऊस आणि लाटांचे तडाखे झेलत उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मालवणला पोहोचल्यावर पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजताच्या सुमारास निघावं. सिंधुदुर्ग किल्ला भर समुद्रातील बेटावर बांधलेला आहे. त्यामुळे तिथे आर्द्रता (ह्य़ुमिडिटी) प्रचंड असते. सकाळच्या चढत्या उन्हात किल्ला पाहायला गेल्यास घामाने आणि तहानेने हैराण होण्याची शक्यता असते. मालवण धक्क्यावरून बोटीने दहा मिनिटांत किल्ल्यावर जाता येते. किल्ला पाहण्यासाठी एक तास मिळतो. किल्ल्याचा गोमुखी दरवाजा, महाराजांच्या हाताचा आणि पावलाचा ठसा, शिवराजेश्वर मंदिर, राणीची वेळा, भवानी मंदिर या महत्त्वाच्या गोष्टी पाहण्यात एक तास पटकन निघून जातो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरून आलेला थकवा घालवण्यासाठी किल्ल्यातच मिळणारं कोकम सरबत किंवा शहाळं प्यायल्यानंतर मिळणारं सुख अनुभवण्यात मजा आहे. भर समुद्रात असलेल्या किल्ल्यातील दूधबाव, दहीबाव, साखरबाव या विहिरींच्या पाण्यामुळे कदाचित या सरबताला आणि शहाळ्यांना एक वेगळीच चव येत असावी.
सिंधुदुर्ग किल्ला पाहून झाल्यावर थेट ‘सुवर्ण गणेश’ मंदिराकडे मोर्चा वळवावा. मालवण धक्क्यापासून चालत १५ ते २० मिनिटांत मंदिरात पोहोचता येतं. या साध्याशा मंदिरातील स्वच्छता, प्रसन्न वातावरण आणि गणपतीची सोन्याची सुंदर मूर्ती आपल्या मनातील भक्तिभाव जागृत करते. सुवर्ण गणेश मंदिरापासून पाच मिनिटांवर ‘रॉक गार्डन’ आहे. या खडकाळ किनाऱ्यावर फुटणाऱ्या लाटांची गाज ऐकत, अंगावर तुषार झेलत सूर्यास्त पाहणं हा खूप सुंदर अनुभव आहे. आकाशात अनोख्या रंगांची उधळण पाहताना तिथं मिळणाऱ्या भेळपुरीला वेगळाच स्वाद येतो. लहान मुलांसाठी इथे टॉय ट्रेन आणि इतर खेळण्याचं साहित्य आहे. सूर्यास्तानंतर रॉक गार्डनहून निघून मालवण बाजारात फेरफटका मारण्यासाठी दाखल व्हावं. बाजारातल्या ‘वैशाली’तले गरमागरम बटाटेवडे खाणं आणि राणे कोल्ड्रिंगमध्ये जाऊन लिंबू-सोडा, फालुदा आईस्क्रीम खाणं ही चाकरमान्यांची ‘पॅशन’ आहे. गणपतीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मालवण बाजारात खरेदीला आल्यावर इथले वडे खाल्ल्याशिवाय आणि घरच्यांसाठी बांधून नेल्याशिवाय त्याची खरेदी पूर्ण होत नाही. त्यामुळे इथे कायम ताजे, गरमागरम वडे मिळतात आणि पटापट संपतातही. गरमागरम वडे खाऊन झाल्यावर आईस्क्रीम खाणं आलंच. वैशाली हॉटेलच्या समोरच आणि मच्छी मार्केटजवळ ‘राणे कोल्ड्रिंग’ lp24आहे. येथे मिळणारे विविध प्रकारचे ‘फालुदा विथ आईस्क्रीम’ चवीला अप्रतिम आहेत. याशिवाय टायटॅनिक इत्यादी आईस्क्रीमही खाऊन पाहायला हरकत नाही.
मालवणी खाद्यपदार्थ म्हणजेच खाजं, शेंगदाणा लाडू, शेवाचे लाडू (खटखटे लाडू), कुळथाचं पीठ, मालवणी मसाले, कोलंबीचं लोणचं, काजू आणि त्याचे विविध पदार्थ, फणसपोळी, आंब्याचे विविध पदार्थ इत्यादी एकाच ठिकाणी मिळणारी सिंधुदुर्गातली एकमेव बाजारपेठ मालवणात आहे. त्यामुळे मनसोक्त खरेदी करावी. त्यानंतर भूक लागणं अपरिहार्यच आहे. रात्रीच्या जेवणासाठी मालवण बाजारातलं ‘चैतन्य’ किंवा ‘अतिथी बांबू’ हे दोन चांगले पर्याय आहेत. मालवणात विविध प्रकारचे मासे उत्तम मिळतातच, पण मालवणात आल्यावर खायचा खास पदार्थ म्हणजे ‘मोरी मटण’ आणि वडे किंवा भाकरी. मोरी म्हणजे शार्कची पिल्लं. एवढय़ा खतरनाक माशाचं नाव ‘मोरी’ ठेवणं फक्त मालवणी माणसालाच जमू शकतं. तर या ‘मोरी’ माशाला काटे नसतात. त्यामुळे नवखा माणूसही आरामात खाऊ शकतो. याबरोबर तिसऱ्या मसाला (शिंपले), कर्ली फ्राय (हा प्रचंड काटे असलेला, पण खूप चविष्ट मासा असतो), कोलंबी मसाला आणि मालवण समुद्रात मिळणारा ताजा बांगडा यांची चव आवर्जून घ्यावी. त्याचबरोबर जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापल्या वकुबानुसार ताज्या सोलकढीचे ग्लास रिचवणं आवश्यक आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय आहेत. देवबागला जाऊन डॉल्फिन सफारी करायची आणि स्नॉर्केलिंग, वॉटर स्पोर्ट्सची धमाल अनुभवायची किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागे स्कूबा डायव्हिंग करायचं. कौटुंबिक सहलीला आलेल्यांनी पहिला पर्याय निवडावा आणि साहसी पर्यटकांनी दुसरा पर्याय.
डॉल्फिन सफारीसाठी सकाळी लवकर देवबागला पोहोचावं लागतं. एवढय़ा सकाळी मालवणमधली हॉटेलं उघडलेली नसतात. पण मालवण किनाऱ्यावर सिंधू बाजारसमोर असलेलं ‘भगवान हॉटेल’ उघडलेलं असतं. समुद्रावर मासे पकडणारे कोळी बांधव, बोटवाले आदी मत्स्य व्यवसायातल्या लोकांचा इथं राबता असतो. इथली आसन व्यवस्था आणि स्वच्छता यथातथाच असली तरी इथं मिळणारी मिसळ, वडा-उसळ, जिलेबी आणि बंगाली खाजा रांगडय़ा चवीचा आहे. खाऊन झाल्यावर काऊंटरवर विकायला ठेवलेली चिवडय़ाची पाकिटं बरोबर घ्यावीत. हा स्वादिष्ट चिवडा पुढच्या दिवसात अधूनमधून तोंडात टाकायला मस्त आहे. सकाळी नऊ वाजल्यानंतर मालवणच्या बाजारातली हॉटेल्स उघडतात. मालवणची खासियत असलेली गरमागरम आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी भंडारी हायस्कूलजवळचं हॉटेल गाठावं. त्यानंतर ‘विजया बेकरीत’ मिळणारा स्पाँज केक आणि शुबेरी बिस्किट बरोबर घेऊन भटकंतीसाठी बाहेर पडावं. तारकर्ली-देवबागला जाताना थोडीशी वाकडी वाट करून न चुकता ‘मोरयाचा धोंडा’ पाहावा. मालवण किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करून व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्ताचा चिरा बसवला होता. आजही कोळी लोक याची पूजा करतात.
सकाळचा वेळ समुद्राच्या सान्निध्यात घातल्यावर तुमच्यासमोर संध्याकाळसाठी दोन पर्याय उरतात. एक म्हणजे मालवणपासून १६ किमीवरील आंगणेवाडीचं मंदिर पाहून संध्याकाळी तारकर्ली बीचवर जाऊन आराम करणं. दुसरा म्हणजे मालवणपासून ३५ किमीवरचं प्राचीन कुणकेश्वर मंदिर पाहून परत येणं. कुणकेश्वर मंदिराला जाणारा रस्ता समुद्राच्या किनाऱ्याने, खाडय़ांवरचे छोटे-मोठे पूल ओलांडत कुणकेश्वरला पोहोचतो. कुणकेश्वरला जाताना वाटेत मालवणपासून चार किमी अंतरावर रस्त्यालगत असणाऱ्या ओझर येथील नैसर्गिक गुहा आणि पाण्याची टाकी पाहता येतात. कुणकेश्वर हे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेलं निवांत आणि सुंदर गाव आहे. या गावात इसवी सनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचं प्राचीन शिवमंदिर बांधलं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
मंदिर पाहून येताना आचरा तिठय़ावर थांबावं. आजुबाजूच्या गावातून रोजंदारीवर, खरेदीसाठी आलेले लोक संध्याकाळी एसटीची वाट बघत तिठय़ावर थांबलेले असतात. त्यांच्यासाठी इथल्या हॉटेलात गरमागरम कांदाभजी मिळतात. या हॉटेलात बनवलेली खमंग कांदाभजी खाऊन मगच उरलेला प्रवास करावा. कांदाभजी आणि चहा देणारी टपरीवजा हॉटेल आणि खाडी यांचं नातं आहे. पूर्वीच्या काळी पूल नव्हते तेव्हा खाडी ओलांडण्यासाठी होडय़ा असायच्या. या होडय़ा पलीकडच्या किनाऱ्यापासून अलीकडे येईपर्यंतचा वेळ या हॉटेलात कांदाभजी, चहा आणि गजाली (गप्पा) यात वेळ निघून जात असे. पूल झाले आणि कांदाभजी देणारी हॉटेल्स काळाबरोबर नामशेष झाली. पण दोन तीन गावच्या तिठय़ांवर असलेली कांदाभजींची हॉटेल्स आजही एसटीमुळे टिकून आहेत. तिथे कांदाभजी मिळण्याची वेळ मात्र सकाळी आणि संध्याकाळी. कुणकेश्वरहून येताना मालवणात शिरल्यावर त्याच रस्त्यावर लागणाऱ्या ‘अतिथी बांबू’ या हॉटेलात माशांचा यथेच्छ समाचार घेऊन दिवस संपवावा.
माझा एक शाकाहारी मित्र बरीच वर्षे मालवणला जायला कचरत होता. मालवण म्हणजे सगळीकडे माशाचा वास, सामिष आहार असं त्याला वाटत होतं. त्याच्या मातोश्रींनीही हीच चिंता व्यक्त केली. मी त्यांना म्हटलं निर्धास्त जा. मालवण सर्वाना आपलंसं करतं. (येवा, मालवण आपलाच आसा). मालवण बाजारात ‘वझे खानावळ’ ही अस्सल शाकाहारी खानावळ आहे. तिथे वरण, भात, भाजी, चटण्या, कोशिंबिर आणि तुपाची धार असं साग्रसंगीत जेवण मिळतं. याशिवाय बऱ्याच हॉटेलात सामिष आहाराबरोबर मालवणची खासियत असलेली आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचं सांबार (उसळ) मिळतेच. त्यामुळे शाकाहारी माणसांची कुठेही अडचण होत नाही.
दोन दिवस मालवण परिसर फिरून झाल्यावर मालवणचा निरोप घेऊन निघाल्यावर कुडाळ, सावंतवाडीमार्गे आंबोली गाठता येते. आंबोलीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास चालू करावा. मालवणहून सकाळी निघाल्यावर सागरी महामार्गाने कुडाळकडे जाताना रस्त्यात कर्ली नदीवरचा प्रशस्त पूल लागतो. गाडी पुलाच्या दुसऱ्या टोकाला पाठवून वाहनांची तुरळक वर्दळ असलेल्या या पुलावरून रमत गमत चालत, आजुबाजूचे निसर्गसौंदर्य पाहात पूल ओलांडण्यात खरी मजा आहे.
पूल ओलांडल्यावर चिपी विमानतळाच्या बाजूने रस्ता परुळे गावात उतरतो. या पुरातन गावात प्रथम आदिनारायण मंदिर आणि पुढे गेल्यावर वेतोबा मंदिर संकुल लागते. या दोन्ही मंदिरातील मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. वेतोबा मंदिर परिसरात अनेक वीरगळ पडलेल्या आहेत. वेतोबा मंदिराच्या समोरचा रस्ता वालावल गावात जातो. या गावातील प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्या मागचा जलाशय प्रसिद्ध आहे. मंदिर पाहून कुडाळ गावात शिरावं. जेवणाची वेळ झाली असेल तर ‘कोचरेकरांचं सन्मान हॉटेल’ गाठावं. अन्यथा मुंबई-गोवा महामार्गाने सावंतवाडी गाठावी. सावंतवाडी हे गाव तेथील लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील मोती तलाव, राजवाडा ही ठिकाणं पाहून घ्यावीत. एव्हाना पोटात कावळे ओरडायला सुरुवात झालेली असते. मासे आणि कोंबडी वडय़ांसाठी सावंतवाडी एसटी स्टँडच्या बाजूची गल्ली गाठावी. तेथील हॉटेलात अप्रतिम चवीचं जेवण मिळतं. शाकाहारींसाठी सावंतवाडीतली ‘साधले खानावळ’ मस्त आहे. जेवणावर ताव मारून झाल्यावर ३० किलोमीटरवरील आंबोली गाठावं.
आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे. तसंच सह्यद्रीतील जैवविविधतेनं श्रीमंत असलेलं जंगल येथे आहे. आंबोलीतील महादेव पॉइंट, कावळेसाद पॉइंट, नागरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम इत्यादी फिरण्याच्या जागा त्या दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी पाहून संध्याकाळी आंबोलीहून सावंतवाडी स्टेशन गाठावं आणि कोकण रेल्वेने अथवा बसने परतीचा प्रवास चालू करावा.
lp66घरगुती मालवणी स्पेशल
मालवण भागातल्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी राहणार असाल तर तुमची खायची चंगळ होऊ शकते. नाश्त्याला आंबोळी चटणी किंवा तांदळाचं घावण आणि चटणी हे स्पेशल मालवणी पदार्थ खायला मिळतील. नारळ दुधाच्या गूळ घालून केलेल्या रसात बुडवलेल्या शेवया हा खास प्रसंगी केला जाणारा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. उकडय़ा तांदळाची पेज आणि नारळाची चटणी किंवा उसळ हे मालवणी माणसाच्या रोजच्या नाश्त्यातील पदार्थ आहेत. तोही ट्राय करायला हरकत नाही. ‘रेडी टू कुक’ पदार्थाचा जमाना येण्यापूर्वी अनेक वर्षांपासून मालवणी जेवणात दोन ‘रेडी टू कुक /सव्‍‌र्ह’ पदार्थ आहेत. एक म्हणजे कुळथाची पिठी आणि दुसरी सोलकढी. कुळथाच्या पिठाचं मिश्रण, हळकुंड, धणे, मिरची यांच्या बरोबर योग्य प्रमाणत करून कुळथाची पिठी बनवली जाते. कुळथाच्या पिठात लसणाच्या दोन-तीन पाकळ्या ठेचून पाणी घालून उकळलं की कुळथाची पिठी तयार होते. कुळथाची पिठी आणि गरमगरम भात आणि जोडीला चुलीत भाजलेला सुका मासा असला की इतर कशाची गरज लागत नाही. (तसंच कुळथाची पिठी जाडसर केली तर तोंडी लावायलाही होते.) चुलीत भाजलेल्या सुक्या माशाचा वास नवीन माणसाला सहन होणार नाही. पण निखाऱ्यावर भाजलेल्या सुक्या माशाचे तुकडे घालून बनवलेली खोबऱ्याची चटणी आणि जोडीला नाचणीची भाकरी चवीला अप्रतिम लागते. मालवण परिसरात होणाऱ्या मोठय़ा काकडीला तवस म्हणतात. त्या तवसापासून बनविलेला धोंडास हा केकसारखा गोड पदार्थ बनवायला त्रासदायक असला तरी खायला मस्त लागतो. याशिवाय हळदीच्या पानात बनवलेल्या पातोळ्या, ओल्या खोबऱ्याची गूळ घालून केलेली काप (वडय़ा) हे गोड पदार्थ घराघरात उत्तम बनतात. मालवणी माणूस फार कमी वेळा हलवा, पापलेट, सुरमई या मोठय़ा माशांच्या वाटेला जातो. मच्छी बाजारात तारली, मोदक, खवळी, पेडवे, बांगुर्ले, इ. छोटे मासे मिळतात. या माशांचं आमसूल आणि मालवणी मसाला घालून केलेलं तिखलं (आंबट तिखट घट्ट कालवण) नाचणीच्या / तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्याची मजा काही औरच. दुसऱ्या दिवशी हे तिखलं उरलं असेल तर आटवून पेजेबरोबरही खायला चांगलं लागतं. मालवणी माणसाच्या परसात होणाऱ्या भाज्याही जेवणात आगळीच चव आणतात. शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची ओलं खोबरं घालून केलेली भाजी, केळफुलाची मोड आलेले वाटाणे घालून केलेली भाजी, शेवऱ्याची छोटी कोलंबी घालून केलेली भाजी, अळंबीची भाजी, उन्हाळ्याच्या दिवसात गेलात तर फणसाची, विलायती फणसाची भाजी, विलायती फणसाची तेलावर परतलेली काप अशा विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात.
अमित सामंत

Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला