ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचं असलेलं कोल्हापूर एरवी चटकदार मिसळीसाठी आणि मटणाबरोबरच्या पांढऱ्या-तांबडय़ा रश्शासाठीही प्रसिद्ध आहे. खवय्ये कोल्हापूरला जातात ते खाण्यापिण्याच्या चैनी करण्यासाठीच..
कोल्हापूरच्या नावातच एक प्रकारचा रांगडेपणा दडलेला आहे. त्यामुळे उगा कुचकुचत जेवणाऱ्यांनी कोल्हापूरच्या वाटेलाच जाऊ नये. मुंबईच्या आणि पुणेकरांच्या हिशेबी वृत्तीनुसार वाटीभर ‘एक्स्ट्रा’ रस्सा आणि एक्स्ट्रा चटणीचा हिशेब येथे केला जात नाही. ‘अजून घे की रं मर्दा’ म्हणत बादलीनंच रस्सा वाढणारेदेखील आहेत या शहरात. त्यामुळे कोल्हापुरात जायचं तर भरपूर खावं-प्यावं आणि भरपूर फिरावं. भले आपण पैलवान नसू पण पैलवानांच्या गावात गेल्यावर शहरी कोतेपणा बाजूलाच ठेवावा. अर्थात त्याआधी आणखी एक ध्यानात घ्यावं. महाराष्ट्रातच नाही तर देशभरात उडपी हॉटेल अथवा अन्यांनी कोल्हापुरी जेवण म्हणून मिरची पावडर आणि गरममसाला टाकून जे काही लालभडक पदार्थ खायला लावले आहेत ते म्हणजे कोल्हापुरी नाही. कोल्हापुरी म्हणजे चमचमीत, पण उचकी लावणारं नाही. त्याची चव न्यारीच.
स्वातंत्र्यलढय़ातील योगदान ते सामाजिक चळवळीचा भलामोठा वारसा या शहरास लाभला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या रुपाने एक प्रचंड मोठा सामाजिक बदल त्यांनी अनुभवला आहे. भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर अशा अनेक चित्रतपस्वींनी येथे कलेचा वारसा निर्माण केला आहे. सहकाराच्या क्षेत्राने सर्वात मोठी झेप घेतली ती याच जिल्ह्य़ात. संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता महालक्ष्मी आणि कुलदैवत जोतिबा असा कायमचा वरदहस्त लाभलेलं हे कोल्हापूर. आणि पंचगंगेच्या पाण्यावर पोसलेली येथील खाद्यसंस्कृती.
किमान दोन ते तीन दिवस तरी हातात ठेवून कोल्हापुरी प्रस्थान करावं. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील हे शहर रेल्वे आणि रस्तामार्गाने व्यवस्थित जोडलेलं आहे. सकाळी सकाळी शहरात प्रवेश करते व्हावे. साताठशे रुपयांपासून ते दोन-तीन हजारांपर्यंत आपल्या खिशाला परवडेल असं लॉज/हॉटेल स्टेशन आणि एसटी स्टॅण्ड परिसरात सहज मिळून जातील. लांबून येणार असाल तर रेल्वे उत्तम. शहरात दोन-चार दिवसांसाठी गाडी मिळू शकते. रस्तामार्गे गाडी करून आलात तरी हरकत नाही. स्नानादी आन्हिकं उरकून महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं आणि खाद्य-भटकंतीचा श्रीगणेशा करावा तो कोल्हापुरी मिसळने. (आधी पोटोबा करून मग दर्शनाला जायचं असेल तरी हरकत नाही.)
अस्सल कोल्हापुरी मिसळ. बारीक फरसाण, त्यात गरजेनुसार पोह्य़ाचा वगैरे चिवडा, एखादा महाभाग गोल भजी चुरूनदेखील घालतो. वर मटकीची उसळ. हो मटकीचीच. मुंबईसारखी वाटाण्याची नाही. कट हवा असेल मारून, नको असेल तर नुसतीच उसळ, डबल कट हवा तर तोदेखील मिळेल. उसळ करतानाच त्यात पाण्याचं प्रमाण अधिक ठेवून तो कट म्हणून वापरला जातो, तर काही ठिकाणी कट वेगळा करायचीदेखील पद्धत आहे. येथे पाव म्हणजे जाडा स्लाइस असतो. त्याला पेटी पाव म्हणतात. मुंबईच्या वडापावच्या गोल पावाला येथे किंमत नाही. पेटी पाव त्यातही साइडच्या पावचा (हा जरा जाड असतो) आग्रह धरणारा तो म्हणजे कोल्हापुरी.
कोल्हापुरी मिसळ मिळणारी ठिकाणं अनेक आहेत. पण उद्यमनगरातली फडतरे आणि महालक्ष्मी मंदिराजवळचे चोरगे ही दोन ठिकाणं आवर्जून भेट देण्यासारखी. येथे शुद्ध मिसळ मिळते. म्हणजे पोस्टाच्या स्टॅम्पपासून शाम्पूच्या सॅशेपर्यंत सारं काही मिळणाऱ्या जनरल स्टोअरसारखं येथे नाही. फक्त आणि फक्त मिसळच, पोट आणि मन भरेपर्यंत. हवा तेवढा रस्सा मागून घ्या. फडतरेंचं अख्खं कुटुंबंच मिसळीत गर्क असतं. सुट्टीचा दिवस असेल तर तुम्हाला रांगेतदेखील उभं राहवं लागू शकेल याची नोंद घ्यावी.
तर हे मिसळपुराण आवरतं घेऊन, तुडुंब भरलेल्या पोटाने गाडी जोतिबाकडे वळवावी. हा खरा रांगडा देव. त्याचं स्थान डोंगरातच. वपर्यंत गाडी जाते. पुन्हा काही पायऱ्या उतरून देवळात जाता येतं. सुट्टी सोडून गेलात तर शांतता असते. आरामात दर्शन घ्यावं, भंडारा माथी लावावा आणि त्या डोंगरावरून उतरून दुसऱ्या डोंगराच्या चढावर म्हणजे पन्हाळ्याला गाडी न्यावी. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून शिलाहारांच्या काळापासून ते थेट आताआतापर्यंतचा ताजा इतिहास. चार हजार फूट उंचीचा हा गिरिदुर्ग अत्यंत प्रशस्त आहे आणि वपर्यंत गाडी जाते. गाडीने संपूर्ण गड फिरता येतोच, पण पायी फिरलात तर इतिहासाची चार अधिक पानं वाचता येतील. पण आता येथील गाइडनाच गाडीतून किल्ला फिरवायची सवय झाली आहे. तुमच्या सुदैवाने एखादा जुना जाणता अथवा नवा हौशी तयार झाला तर पायी फिरता येईल. फार काही कष्ट पडत नाहीत.
वेशीवरच शिवा काशिद यांचा भव्य पुतळा तुमचे स्वागत करतो. सिद्दी जौहारच्या वेढय़ाच्या वेळी हे प्रतिशिवाजी बनून सिद्दीला भेटायला गेले आणि गुंगवत ठेवलं. त्या संधीचा फायदा घेऊन महाराज वेढा तोडून निसटले. शिवा काशिदना वीरमरण आलं. त्याच्या समाधीकडे जाण्यासाठी पुतळ्यापासून थोडं खाली उतरून जावं लागेल. जाणकार असेल तर लगेच पाहता येईल. तीन दरवाजा, सज्जा कोठी, पुसाटीचा बुरूज, अंबरखाना, अंधारबाव, बाजीप्रभूचा पुतळा, सज्जा कोठी, चार दरवाजा असं सारं पाहवं, ऐकावं (दुर्गावरचं एखादं पुस्तक सोबत असेल छानच). दमून भागून मग मध्येच कधी तरी तीन दरवाजापाशी मस्त चुलीवरची भाकरी, झुणका आणि खर्डा (म्हणजे ठेचा) मनसोक्त खावी. ही इथली खासियत. आता पन्हाळ्याची पार दुदर्शाच झाली आहे. पर्यटनासाठी साऱ्या सोयी करण्याच्या नावाखाली अनेक गोष्टी येथे चालतात. अनेक दुर्गप्रेमी त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करत असतात. असो.
पुनश्च कोल्हापूर गाठावं. एव्हाना सायंकाळ दाटून आलेलीच असते. मग रंकाळ्यासारखं दुसरं ठिकाण नाही. त्यापूर्वी केशवराव भोसले नाटय़गृहाजवळच्या राजाभाऊंची भेळ बांधून घ्यावी, किंवा खाऊन परत बांधून घेतली तरी चालेल. अस्सल कोल्हापुरी चुरमुरे वापरून केलेली चटकदार भेळ ही राजाभाऊंची तीस वर्षांची परंपरा आहे. भेळेची रेडीमेडी पाकिटंदेखील मिळतात.
कोल्हापुरी मटण हा दिवसाचा उत्कर्षबिंदू. आता तुम्ही म्हणाला दिवसभर तर चरतोच आहोत. म्हणूनच सांगतो की, कोल्हापूरच्या पर्यटनासाठी मस्त हिवाळाच निवडा. त्या आल्हाददायक हवेत कितीही खाल्लं तरी पचतं. तर मटणासाठी अक्षरश: असंख्य पर्याय तुमच्यापुढे आहेत. पण अस्सल मटण खायचं असेल तर मात्र शहरातील काही नामवंतांकडेच जावे लागेल. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो मंगळवार पेठेचा. मटणाचं जेवण ही या पेठेची परंपराच आहे म्हणा ना. अनेक घरी मटणाची खानावळ असाच प्रकार आहे. पेठेच्या मेन रोडला तब्बल ७२ हॉटेल्स असल्याचं जाणकार सांगतात. त्यातदेखील स्पेशलायझेशन आहे. पाण्याच्या खजिन्याजवळचं महादेव प्रसाद म्हणजे एकदम ऑथेंटिक मटन. पण येथे गर्दीच एवढी असते की साडेआठ – पावणे नऊलाच जेवण संपतं. आधीच नंबर लावावा लागतो. दिवसभराच्या दमणुकीमुळे इतक्या लवकर शक्य नसेल तर मग बुधवार पेठेतलं हॉटेल नीलेश, पद्मा टॉकीजजवळचं पद्मा गेस्ट हाऊस आहेच. किंवा जरा लांब जात आवर्जून खाल्लंच पाहिजे असं रुईकर कॉलनीसमोरचं परख.
आपण अट्टल मांसाहारी असाल तर येथे येऊन उगाच चिकन खाण्याचा करंटेपणा करू नये आणि तसंही इतर फालतू पर्याय येथे नसतातच. मटण फ्राय, मटण रस्सा, चिकन, अंडाकरी थाळी आणि व्हेज थाळी इतपतच मेन्यू कार्ड असतं. काही ठिकाणी तर मेन्यू कार्डदेखील ठेवायची गरज नसते. ऐसपैस बसावं. थाळी लावायला घेतली की भाकरी थापायला सुरुवात होते, मस्त टम्म फुगलेली भाकरी, सुकं मटण, तांबडय़ा-पांढऱ्या रश्शाच्या वाटय़ा आणि सोबतीला कांदा-दही मिक्श्चर. रश्शाच्या वाटय़ावर वाटय़ा रिचवणं हा अस्सल कोल्हापुरी रिवाज. आपणपण रिचवाव्या. किती वाटय़ा प्यालात याचा कोणी हिशेब मागणार नाही. (तुमचा तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवा बापडे). भाकरी नको असेल तर पोळीचा पर्यायदेखील असतो. पण तीदेखील घडीची आणि थाळीभर मोठी. जे पचेल ते घ्यावं. फुकटचे शहरी रीतिरिवाज न बाळगता मटणाची नळी चाटून पुसून चोखावी. भाकरी संपली की येतो तो मसालाभात. लग्नाच्या पंगतीतला नाही. पण साधारण तसाच. त्यावर मस्त परतलेला चुरचुरीत कांदा भुरभुरलेला असतो. वेटरशी सलगी करून तो आणखी मागून घ्यावा. तट्ट भरलेल्या पोटाने निवासाचं ठिकाण गाठावं आणि झकास ताणून द्यावी.
जरा वेगळं काही ट्राय करायचं असेल तर अट्टल खवय्यांसाठी रक्ती-मुंडी हा प्रकार आहे. शाहुपुरी सहावी गल्लीतलं हॉटेल केशव हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय. कोल्हापुरातील जुनेजाणते खाद्यप्रेमी येथे आवर्जून येत असतात. बोकड कापतानाचं पहिलं रक्त गोठून जातं ते आणि भेजा असं एकत्र शिजवलं जातं. हवं असेल तर वेगवेगळंदेखील मिळतं.
कोल्हापूरच्या मटणाचं इतकं काय ते अप्रूप असं तुम्ही म्हणत असाल. मुळातच कसंय की, मुंबईसारखं अथवा इतर शहरांसारखं इथलं जनावर कृत्रिम अन्न खाऊन वाढत नाही. बोकड, मेंढय़ा ही हिरवा पाला खाऊन मोठी झालेली असतात. त्यात येथील हवामान आणि पाणी हे दोन घटकदेखील महत्त्वाचे. दुसरं अस की मुंबईतल्या मटणात कोथळा आणि आतडी वेगळी काढून विकली जाते. येथे तसं नाही. हे सारं काही एकत्रच शिजवलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाला हा मर्यादित असतो. खरा फरक आहे तो करण्यातला. या जेवणाला घरगुती चव असते. पाककला या शब्दाला न्याय देणारा. बहुतांश ठिकाणी बायकाच कामावर असतात. भाकऱ्या तर बायकाच करतात. अर्थात हे झालं वर नाव घेतलेल्या हॉटेलांसाठी.
तुम्हाला जर हाय फाय स्टायलिश जेवायची सवय असेल तर मात्र मग हीच चव मिळेल याची खात्री देता येणार नाही. पर्याय आहेत. स्टेशन आणि एस.टी. स्टॅण्ड परिसरात अनेक हॉटेल्स आहेत, त्यात कॉन्टिनेंटलपासून सारं काही मिळेल. अर्थात ते सारं काही एटीकेट्सवाल्यांसाठी. पण कोल्हापुरात आल्यावर जरा एटिकेट्स बाजूला ठेवणंच उत्तम.
आता इतकं वर्णन मांसाहाराचंच केल्यावर शाकाहारींनी कोठे जायचं हा प्रश्न खरं तर तुमच्यापेक्षा मलाच पडला आहे. पण कसंय की कोल्हापुरी जेवण म्हटलं की मांसाहारीच असा एक गृहीतक इतकं पक्कं रुजलंय की मी तरी काय करणार. असो, शाकाहारींसाठी मंडईतलं जोरबा हॉटेल आणि लक्ष्मीपुरीतलं खवय्या ही शाकाहारी थाळी मिळणारी ठिकाणं.
दुसरा दिवस केवळ कोल्हापूर दर्शनासाठी राखून ठेवावा. कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि कला वारसा समजून घेण्यासाठी.
काल मिसळ खाऊन तृप्त झाला असाल तर आज कटवडय़ाकडे वळू या. नसेल तर पुन्हा एकदा मिसळीचा राऊंड करायला हरकत नाही. कटवडा मिळणारी ठिकाणं अनेक आहेत पण राजाराम पुरीतल्या दहाव्या गल्लीत अंबिकाचा कटवडा म्हणजे एकदम जाऊं दे झाडून या कोल्हापुरी स्टाइलनं जाणारा आहे. मिसळीचाच कट किंवा वेगळा केलेला नुसता कट मारलेला वडा आणि पाव. अर्थातच पेटी पाव, जाडा स्लाइस. हा वडा म्हणजे बटाटावडाच असतो पण मुंबईच्या वडापावसारखा नाही. मुळात त्याचा आकारच एकदम सणसणीत. गरम गरम वडा आणि बाजूला पाव. पावात वडा घालायची पद्धत येथे नाही. शाहू स्मारकाजवळचा दीपकचा वडा, नाही तर राजाराम कॉलेजच्या कंपाऊंडला लागूनच असलेला श्यामचा वडा. शहरात कोणालाही विचारा. अगदी थेट नेऊन सोडणार. कायम गरम वडा. समोरासमोर वडा सोडून मिळणारी अशीच अनेक ठिकाणं फक्त याच शहरात सापडतील.
पण आज फार काही मसालेदार नको असेल तर मग थेट शिवाजी पेठेतील शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याजवळ जाऊन दावणगिरी लोणी डोसा चाखू शकता. कोल्हापुरातील दावणगिरीचा हा आद्य प्रवर्तक म्हणावं लागेल. अगदी हलकाफुलका प्रकार. स्पंजसारखे छोटे छोटे डोसे. वर लोणी सोडून केलेले. हा पदार्थ कर्नाटकातला. पण कोल्हापुरात अगदी फेमस झाला आहे. त्याच जोडीला गरमागरम अप्पे विकणारे अनेक गाडे महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात दिसतील. दोन्ही पदार्थ पचायला एकदम हलके असल्यामुळे दोन्ही ठिकाणी गेलात तरी हरकत नाही.
पोटोबा व्यवस्थित झाला की कोल्हापूर दर्शनाला बाहेर पडावं. सुरुवात टाऊन हॉल म्युझियमपासून करावी. ब्रह्मपुरी ते कोल्हापूर हा प्रवास उलगडून दाखविणारं हे म्युझियम पाहिलं की कोल्हापूरच्या अथपासून इतिपर्यंतचा इतिहासाचं आकलन होतं.
कोल्हापूर म्हटलं की, शाहू महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्याच्या अनेक खुणा आजदेखील त्यांचा वारसा सांगताना दिसतात. अर्थातच महाराजांच्या जन्मस्थानाला आवर्जून भेट द्यावी. साधारण चार किलोमीटरवर बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस हे त्यांचं जन्मस्थान. शाहू महाराजांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींच येथे जतन करण्यात आला आहे.
त्यानंतर जवळच्या कण्हेरी मठाला भेट द्यावी. वाटेवरच गोकुळ शिरगाव एमआयडीसी लागते. येथील गोकुळ दूध प्रकल्प आहे. रीतसर परवानगी घेऊन हा सारा व्याप पाहता येतो. कण्हेरी मठात बारा बलुतेदार, अनेक थोर भारतीय ॠषी मुनी यांची म्युरल्स आहेत. हे सारं पाहावं आणि पुन्हा कोल्हापुरात येऊन पोटोबाच्या मागे लागावं. काल सांगितलेल्या हॉटेलपैकी जेथे जाता आलं नाही तिकडे जावं. काल सुकं मटन खाल्लं असेल तर आज रश्श्यातलं खावं. मटण खर्डा नावाचा आणखी एक प्रकार सध्या खूप फेमस आहे. तो खावा आणि थोडा वेळ आराम करून पुनश्च बाहेर पडावं. दुपारी शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, कैलासगडची स्वारी मंदिर, चंद्रकांत मांडरे कलादालन असे पर्याय आहेत.
खासबाग मैदानजवळ असणारं कैलासगडची स्वारी मंदिरात कलायोगी जी. कांबळे यांची अनेक चित्रं जपलेली आहेत. त्यातील महत्त्वाचं चित्र म्हणजे जॉर्ज व्हॅलेंटाइन यांनी डच चित्रकाराकडून तयार करून घेतलेल्या रेखाचित्रावरून जी. कांबळे यांनी तयार केलेलं शिवाजी महाराजांचं तैलचित्र येथे आहे. १९७० साली राज्य शासन प्रमाणित केलेल्या या चित्रावरून पुढे सर्वत्र प्रती काढण्यात आल्या. कांबळे यांनी चितारलेली राज्याभिषेक, गंगावतरण, विश्वरूप दर्शन अशी चित्रं आहेत. हे मंदिर सकाळी पाच ते नऊ या काळात खुलं असतं.
असाच एक दुसरा वारसा म्हणजे चंद्रकांत मांडरे यांचं चित्रदालन. मांडरे यांची शे-दोनशेहून अधिक चित्रं आणि त्यांनी काढलेली छायाचित्रं त्यांच्या राहत्या घरी प्रदर्शित केलेली आहेत. त्यांचं घरच त्यांनी या संग्रहालयासाठी दिलेलं आहे.
त्यानंतर आता शाहू महाराजांचे निवासस्थान असणारे न्यू पॅलेस पाहायला जावं. कसबा बावडा रस्त्यावरील ही इमारत १८८४ साली बांधण्यात आली. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या या इमारतीत उत्तम संग्रहालय आहे. नाना प्रकारची शस्त्रे, तैलचित्रं, छायचित्रे अशा प्रकारे ही वास्तू सजलेली आहे. मराठेशाहीचं वैभव असणारी वास्तू आवर्जून पाहावी अशीच आहे.
कोल्हापूर म्हटल्यावर पैलवानांचा शड्डू आपोआपच कानात घुमू लागतो. कोल्हापुरात आलो आणि मिसळ, मटण खाल्लं नाही तर उणीव राहते. तसंच तालिमीत किमान डोकावावं तरी लागेलच. शाहुपुरी गंगावेस तालीम मंडळ, मोतीबाग तालीम मंडळ अशा काही तालमी आजदेखील कार्यरत आहेत. सायंकाळच्या वेळी गेलात तर आजदेखील तेथे अनेक पैलवान घुमत असतात. कुस्ती खेळणार नसलो तरी इकडे जाऊन लाल माती आणि कोल्हापूरच्या रांगडेपणाचं मूळ नक्कीच पाहावं. खासबाग मैदानाच्या आसपासच आहे, हे सर्व काही.
अर्थात तालमी पाहल्यानंतर आपणासदेखील चार जोर बैठका काढाव्याशा वाटल्या तर काढून घ्याव्यात आणि मग एक भन्नाट प्रकार अनुभवण्यासाठी दूधकट्टय़ावर जावं. केवळ कोल्हापुरातच पाहायला मिळेल असा हा प्रकार. गंगावेस, मिरजकर तिकटी आणि खासबाग मैदानाजवळ हे दूध कट्टे आजदेखील अस्तित्वात आहेत. ‘दूधकट्टा गंगावेशी काळ्याभोर उभ्या म्हशी’, असं शाहीर कुंतीनाथ करके यांनी कोल्हापूरच्या पोवाडय़ात याचं वर्णन केलं आहे. रात्री सात ते अकरा या वेळेत येथे म्हशी बांधलेल्या असतात. त्यांचे मालक त्यांना चारा-वैरण देत असतात. तुमच्या मागणीप्रमाणे अर्धा लिटर, लिटर असं धारोष्ण दूध तुम्हाला प्यायला मिळते. अर्थात हे पचवायची ताकद हवी हे मात्र नक्की.
दुसरा पर्याय आहे तो जोतिबाच्या वाटेवरचा, उसाच्या गुऱ्हाळांचा. कालपरत्वे इतर ठिकाणची गुऱ्हाळं बंद झाली असली तरी येथे तुम्हाला ती पाहता येतील. उसाचा रस आटवून, त्यापासून गूळ तयार करण्याची सारी प्रक्रिया येथे पाहता येईल. चवदेखील चाखता येईल. मात्र डिसेंबर-जानेवारी या गुऱ्हाळाच्या मोसमात गेलात तरच.
काल आणि आज भरपूर मटण खाऊन झालं असल्यामुळे आता आजच्या रात्री शाकाहाराचा प्रयोग करायला हरकत नाही. सध्या कोल्हापुरात गल्लीबोळात अख्खा मसूर आणि तंदूर रोटीचं पेव फुटलं आहे. पण याची सुरुवात करणारा आद्य पुरुष म्हणजे इस्लामपूर रोडवरचा पाटील धाबा. कोल्हापूरपासून सुमारे २५ किलोमीटरवरचे हे ठिकाण. मात्र उशिरा म्हणजे नऊनंतर गेलात तर रिकामं बॅरल – पिंप पाहावं लागेल. येथे अक्षरश: बॅरल भरून मसूर शिजवले जातात आणि सारे फस्त होतात. याची ख्यातीच इतकी की कोल्हापुरातील अट्टल मांसाहारी माणूसदेखील येथे जेवायला येतो.
अशा खाण्या-पिण्यात भटकण्यात दोन दिवस भुर्रकन उडून जातात. आता परतीच्या प्रवासासाठी तिसरा दिवस आपण कोठे जाणार, कोणत्या मार्गाने कसे जाणार यावर ठरवावा. म्हणजे कोकणात उतरायचे असेल तर आंबा घाट, गगनबावडा घाट, भुईबावडा घाट असे पर्याय आहेत. हे तीनही घाट म्हणजे निसर्गसौंदर्याची मुक्त उधळणच म्हणावे असे आहेत. गोव्यात जायचे असेल तर अंबोली घाटाने उतरण्याचा पर्याय आहे. कर्नाटकात जायचे तर हायवे आहेच. आंबा घाटाने जात असाल तर वाटेत मलकापुरजवळील लव्हाळे गावातील नागराज हॉटेलमधील चुलीवरच्या मटणाचा आनंद घेता येईल.
देशावरच जायचे असेल तर मग पुण्याच्या दिशेने हायवे पकडा, जयसिंगपूर-सांगलीवरुन पुढे सोलापूर, उस्मानाबाद, बारामतीला जाता येईल. सांगलीला जाताना थोडी वाट वाकडी करून इचलकरंजी मार्गे खिद्रापूर गाठावं किंवा कोल्हापुरातूनच येथे जाऊन परत यावं असंदेखील करता येईल. कृष्णेच्या तीरावरील खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर पाहावं. शिलाहारांच्या काळात साधारण ११ व्या शतकातील हे पुरातन असं हे शंकराचे मंदिर पाहून मग पुढे २० किलोमीटरवरील नृसिंहवाडी या दत्त स्थानाला भेट देता येतील. वाटेत इचलकरंजीमध्ये पुन्हा मांसाहारींसाठी अनेक घरगुती खानावळी आहेत. अख्खीच्या अख्खी एक गल्लीच या खानावळींनी व्यापली आहे. घोडके आणि बुगड या दोन प्रसिद्ध खानावळी. पण त्या रात्रीच सुरू असतात.
खिद्रापूर नृसिंहवाडी वाटेवर कुरुंदवाडला भेट द्यायची ती केवळ तेथील पेढय़ांसाठी. कंदी पेढय़ांसाठी आज जरी साताऱ्याचं नाव प्रसिद्ध असलं तरी एकदा कुरुंदवाडचे कंदी पेढे एकदा खाऊन पाहाच. दूध घोटून बासुंदी, ती घोटून खवा, तो घोटून कुंदा आणि तो आणखी घोटून घोटून त्यातील पाण्याचा संपूर्ण अंश नाहीसा झाल्यावर त्यापासून तयार केलेला पेढा. दोन-चार खाल्ले की शहरी माणसाचा नाश्ताच व्हायचा. या पेढय़ात वरून एक चमचाभरदेखील साखर मिसळली जात नाही. फ्रिजमध्ये न ठेवतादेखील किमान आठवडाभर तरी टिकतो. मार्केटिंगच कसलंच तंत्र नसल्यामुळे हा केवळ कुरुंदवाडपुरताच मर्यादित राहिलेला. नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडची बासुंदीदेखील प्रसिद्ध. ग्लासभर बासुंदी प्यावी किंवा जेवणात घ्यावी आणि दत्तदर्शन करून तृप्त होत घरच्या वाटेला लागावं.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com