पूर्वी प्रवासाला जायचे म्हटले की, बस किंवा आगगाडी (रेल्वे) हेच साधन. त्यातूनच ‘झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. मामाच्या गावाला जाऊ या’ यासारखी गाणी बनतात.
प्रवासात येणारे अनुभव कधी मजेशीर तर कधी थरारक असतात. आमच्या लहानपणी मी खोपोलीला जेव्हा चालू असलेल्या झेनिथ कंपनीत (जेथे माझे वडील कामाला होते) राहायचो. तेथून पुण्याला घाटातून (एक्स्प्रेस वे नंतर झाला) बसनं जायचं हे नेहमीचं. घाटातनं सकाळी व खासकरून संध्याकाळी रात्री दिसणारा नजारा अप्रतिम. त्यातून दरीत लांबवरून दिसणाऱ्या कुठल्याही घराला ‘ते बघा आपलं घर म्हणून स्वत:ला आणि बसमध्ये असलेल्या शेजाऱ्यांना ‘आमचं घर बघा’ म्हणून सांगत सुटायचो. थोडं मोठं झाल्यावर समजलं आपलं घर एवढय़ा लांबून नाही ओळखता येत. बरं, घाटात आम्ही वाट पाहायचो, कसली, तर ती शिंग्रोबा मंदिराची. का तर तेथे बसमधून (बसवालेसुद्धा मंदिराच्या जवळून बस न्यायचे) हात काढला की भरपूर खोबरं प्रसाद म्हणून मिळायचं.
आमच्या घरातून दूर डोंगर आणि धबधबा (जो आज झेनिथ वॉटरफॉलच्या नावाने प्रसिद्ध आहे) तो दिसायचा. मधूनच एखाद्या आगगाडीचा आवाज यायचा. तेव्हा सगळे म्हणायचे तो डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) चा आवाज आहे. त्या प्रवासात भरपूर बोगदे आहेत व खायला-प्यायलासुद्धा खूप मिळतं. तेव्हा वाटायचं, डेक्कन क्वीनने एकदा तरी प्रवास करायला मिळावा. ती संधी मिळाली, मी मुंबईला नोकरीसाठी आल्यावर. तेव्हा मी होतो पंचविशीच्या आसपास. म्हणून वाटायचं, पहिल्यांदा या ट्रेननी प्रवास करतोय. एखादं आकर्षक व्यक्तिमत्त्व शेजारी बसलं तर काय मजा येईल. झालंही तसंच, आणि त्यातून त्या व्यक्तीने (आलं ना लक्षात मी काय म्हणतोय ते) माझ्याकडील मिड-डे कोडं सोडविण्यासाठी मागितला. पूर्ण कोडं सोडविणं जमेना म्हणून माझी मदत घेतली. पुणं येईपर्यंत आम्ही दोघं फक्त कोडं सोडवत बसलो होतो. त्यात काही खायचं-प्यायचं भानही विसरून गेलो. नंतर बऱ्याच वेळा बऱ्याच ट्रेननी प्रवास केला, पण असा योग मात्र कधी नाही आला. असो!
नंतर हुरहुर लागली ती विमान प्रवासाची. माझा पहिला विमानप्रवास थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरचा (मुंबई-सिंगापूर). प्रवासात मी एकटा व नवखा. विमान कर्मचारी अर्थातच अनुभवी. त्यांना पटकन समजलं हा नवखा प्रवासी (मी तिशीत असूनसुद्धा). त्यामुळे त्यांनी मला भरपूर विशेष सेवा दिली व जातीने लक्ष दिलं. हा अनुभव काही औरच. नंतर कामाच्या निमित्ताने भरपूर विमान प्रवास केला आणि मी विमान प्रवासाला सरावलो.
आता मात्र मला प्रवासात पाहायला आवडतात ती प्रवासात दिसणारी माणसं. ट्रेन सुरू व्हायच्या आधी रिझव्र्हेशन असूनसुद्धा सामान ठेवण्यावरून एकमेकांशी भांडणारी माणसं जसजसा प्रवास सुरू होतो व राहतो, तेव्हा खासकरून लांब पल्ल्याच्या प्रवासात भांडणं विरतात व मित्रत्व वाढतं, गप्पागोष्टी रंगतात. कधी-कधी गाण्यांच्या मैफिलीसुद्धा रंगतात. बरोबर आपल्या किंवा सहप्रवाशांबरोबर लहान मुलं असतील तर त्यांचे कारनामे बघण्यात प्रवास कधी संपतो तेसुद्धा कळत नाही. विमानात एखादा नवखा माणूस व नवख्या माणसांचा ग्रुप असेल तर तो विमानातसुद्धा आपली सीट पकडण्याची धडपड करताना दिसतो. अगदी हे सगळं पाहून हसू यायचं, पण आता मात्र ते पाहून माझा स्वत:चा पहिला विमान प्रवास आठवतो व मी हसू आवरतो.
पण एक मात्र आहे, आजवर तरी मला व माझ्या कुटुंबीयांना प्रवासात चांगली व अडचणीत मदत करणारी माणसं भेटलीत. मला आठवतं, साधारण दहा वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी आमच्या नातेवाइकांकडे गेलो होतो. तेथून आम्ही अचानक शिमल्याला जायचं ठरवलं. आरक्षण नव्हतं. शिमल्याची बस नाही मिळाली म्हणून मनालीच्या बसमध्ये बसलो. रात्रीचा प्रवास. दुसऱ्याच दिवशी मनालीला पोहोचलो. रोहटांग पास (बर्फ होताच), हिडिंबाचं मंदिर व सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकात, ज्याच्याबद्दल नुसतं वाचलं होतं तो याक नावाचा पांढराशुभ्र प्राणी पाहिला. मनालीला उतरल्यावर ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं तिथे गेलो. त्या हॉटेलमध्ये काही सोई नसल्यामुळे आम्ही तिथून अमृतसरला जायचं ठरवलं. भरपूर विचारपूस केल्यानंतर आम्हाला मनालीहून चंदिगढला जाणारी खास विशेष बस मिळाली. त्यात एकूण प्रवासी फक्त दोन (अर्थातच मी व माझी पत्नी). रात्रीची वेळ. सुनसान रस्ता. त्यात मध्येच पहाटे साधारण एक वाजता बस थांबली (टायर पंक्चर झालं असं आम्हाला बसचालकानं सांगितलं.) बसली ना आमची पाचावर धारण! कारण सुनसान रस्त्यांवरच्या चोऱ्यांबद्दल भरपूर वाचलं होतं, पण सुदैवानं तसं काही झालं नाही आणि थोडय़ा वेळाने बस चालू झाली. बसवाल्यांनी आम्हाला चंदिगढच्या हिमाचल प्रदेश टुरिझमच्या हॉटेलमध्ये नुसतं सोडलंच नाही, तर आमचं त्या हॉटेलमध्ये बुकिंगसुद्धा करून दिलं. तिथे आम्ही दोन-तीन दिवसांत चंदिगढमधलं रॉक गार्डन तर पाहिलंच, तसंच तिथूनच एका दिवसात खासगी गाडीने अमृतसरचं सुवर्णमंदिर व वाघा-बॉर्डरवरची परेड (भारत-पाकिस्तान) संध्याकाळी होते ती पाहिली.
आमचा टॅक्सी ड्रायव्हर धिप्पाड आणि पठाणी. मधूनच उतरायचा आणि काहीतरी खाऊन परत यायचा. आधी भीती वाटायची, आता काय होईल. पण त्याच्यामुळेच आम्हाला सुवर्णमंदिरात लंगरचा आस्वाद घेता आला. लंगरला आम्ही त्याच्याबरोबरच बसल्यामुळे त्यालाही आमच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली आणि आम्हीही स्वस्थ झालो.
मला आठवते, आमची केरळ ट्रिप आणि साधारण १८ तास (रात्रीची झोप धरून) हाऊसबोटवर राहिलो तो. हाऊसबोटवरची माणसं अर्थातच केरळीय (त्यातून गावाकडची) इंग्रजीचा गंध नाही व हिंदीसुद्धा त्यांना मोडकंतोडकंच येत होतं. त्यातून आम्हा दोघांना तिथला पुत्तू (उच्चार चुकीचा असेल तर क्षमस्व) नावाचा पांढरा पदार्थ व आम्ही शाकाहारी असल्यामुळे हाऊसबोटीच्या वरच्या बावर्चीने खास मेहनत घेऊन बनवलेले पदार्थ आवडले. ते पदार्थ कसे करतात व त्यात काय काय वापरतात त्याची माहिती विचारली. आमचा प्रश्न समजण्याची आणि त्याचे व्यवस्थित उत्तर आम्हाला देण्याची त्या हाऊसबोटवरील माणसाची धडपड काय वर्णावी! शब्दांत त्याचे वर्णन करणं कठीणच.