सातारकर छत्रपतींच्या वास्तव्यामुळे सातारा शहर आणि परिसराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यासंदर्भातील अनेक ऐतिहासिक स्थळे सातारा आणि परिसरामध्ये विखुरलेली दिसतात. सातारा परिसराचे वैशिष्टय़ म्हणजे पश्चिमेचा प्रदेश हा सह्य़ाद्रीच्या निकट सान्निध्याचा, भरपूर पावसाचा आणि याच सातारा जिल्ह्य़ाच्या पूर्वेचा प्रदेश पर्जन्यछायेमधला, दुष्काळी. कृष्णा, कोयना अशा नद्यांचा हा प्रदेश, पण या नद्यांपासून अंतर असलेल्या प्रदेशात आजही पाण्यासाठीची वणवण चालूच आहे. महाबळेश्वरसारखे उत्तुंग गिरिशिखर लाभलेला हा प्रदेश. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा प्रदेश. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा प्रदेश. वाई, मेणवली, धोम ही तीर्थक्षेत्रे याच प्रदेशात आहेत, तसेच निरनिराळी मंदिरे, देवस्थाने, किल्ले यांनीसुद्धा हा प्रदेश संपन्न आहे. सध्याच्या विकासाच्या युगात पवनचक्क्यांचा प्रदेश अशीसुद्धा आता ओळख सांगता येईल इतक्या पवनचक्क्या सातारा आणि आसपासच्या डोंगरांवर दिमाखात फिरताना दिसतात. कोकणात जाणारे अनेक प्राचीन घाटमार्ग सातारा परिसरातून खाली उतरतात. प्रतापगड, अजिंक्यतारा, वासोटा, मकरंदगडसारखे बेलाग किल्लेसुद्धा याच प्रदेशात पाहायला मिळतात.
महाबळेश्वर
६ जानेवारी १६६५ या दिवशी शिवाजीराजांनी आपल्या मातोश्री जिजाऊंची सुवर्णतुला या महाबळेश्वर क्षेत्री वेदमूर्ती गोपालभट बिन श्रीधरभट यांच्या आशीर्वादाने संपन्न केली. वयोवृद्ध असलेल्या सोनोपंत डबीर यांचीसुद्धा सोन्याने तुला करण्यात आली. श्रीमहाबळेश्वरचे मंदिर इ.स. १२१५मध्ये उभारल्याची नोंद मिळते. हे देवस्थान ऊर्जतिावस्थेला आणले ते जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी. क्षेत्रातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पंचगंगा मंदिर. कृष्ण-कोयना-वेण्णा-गायत्री आणि सावित्री या नद्यांचा उगम महाबळेश्वरी होतो. १८२८ मध्ये महाबळेश्वर परिसर ब्रिटिशांनी सातारकर छत्रपतीकडून मिळवला. हा परिसर मुळातच इतका निसर्गरम्य आहे की वर्षांतल्या कोणत्याही ऋतूमध्ये इथे यावे, मनसोक्त भटकावे, खिशाला परवडत असेल तर इथेच राहावे अन्यथा सातारा अथवा वाईला मुक्काम करावा. जवळजवळ सव्वाशे जातींचे पक्षी इथे नोंदले गेले आहेत. खूप मोठी वनसंपदा या भागाला लाभलेली आहे. माल्कम पेठ, केट्स, आर्थर सीट, रोझमंड अशी विविध ठिकाणे कायमच पर्यटकांनी फुललेली दिसतात. त्याचबरोबर तापोळा हे पण जलपर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. मोटरबोट, स्पीडबोट, अशा अनेक सुविधा इथे उपलब्ध आहेत. जवळच बामणोली आणि मग किल्ले वासोटा हे तर गिर्यारोहकांचे हक्काचे ठिकाण. तेच तेच पॉइंटस् पाहून कंटाळा आला असेल तर तापोळा अवश्य गाठावे.
साताऱ्याच्या जवळच असलेले सज्जनगड, कास आणि यवतेश्वर, ठोसेघर ही ठिकाणे तर ऐन पावसाळ्यामध्ये पाहिलीच पाहिजेत आणि ती तशी प्रसिद्धसुद्धा आहेत. परंतु सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावातील यादवकालीन मंदिरे आवर्जून पाहावी. तसेच सज्जनगडच्या पायथ्याशी आता समर्थ सृष्टी तयार झाली आहे. समर्थाच्या जीवनातील प्रसंग मूर्तिरूपाने जिवंत केलेले आहेत.
ब्रह्मेंद्रस्वामींचे धावडशी
शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रrोंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ २५ कि.मी. असलेल्या धावडशी गावी ते कोकणातून येऊन स्थायिक झाले. परशुरामाचे निस्सीम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला एक लाख रुपये खर्चून भार्गवराम मंदिर उभारले आहे. त्यांचे प्रस्थ एवढे होते की जंजिरेकर सिद्दीच्या सरदाराकडून चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची नासधूस झाली तर त्यांनी सिद्दीकडूनच नुकसान भरपाई म्हणून ते देऊळ परत बांधून घेतले. धावडशीचे भार्गवराम मंदिर मोठे पाहण्यासारखे आहे. पाण्याचे तीन मोठे हौद बांधून जनावरे आणि माणसांसाठी स्वतंत्र सोय केलेली दिसते. तसेच मंदिरावरील मूíतकाम पण पाहण्याजोगे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी होय.
नाना फडणीसांची मेणवली
भले बुद्धीचे सागर असलेले नाना फडणीस म्हणजे मराठी साम्राज्याचे भूषण होते. प्रचंड बुद्धिमत्ता आणि निस्सीम स्वामीनिष्ठा या गुणांवर नाना एकेकाळी मराठेशाहीचे खंदे आधारस्तंभ होते. वाईच्या पश्चिमेला सुमारे तीन कि.मी. वर कृष्णेच्या डाव्या काठावर मेणवली हे एक टुमदार गाव आहे. गावात नाना फडणीसांचा वाडा, मेणवलेश्वर व विष्णू अशी दोन देवळे आहेत. मेणवलेश्वर मंदिरात पेशवाईच्या काळात काढलेली रंगीत चित्रे आणि देवळासमोर असलेली मोठ्ठी घण्टा या गोष्टी मुद्दाम पाहण्याजोग्या आहेत. मेणवलीला कृष्णेच्या काठावर एक सुंदर चंद्राकृती घाट बांधलेला आहे. मेणवली तसेच पुढे पांडवगड पायथ्याजवळून एक रस्ता सरळ काळूबाईला पण जातो.
* सातारा-केळघर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-मेणवली-धोम-सातारा हा मार्ग सर्वागसुंदर आहे. २ दिवस फिरायला उत्तम. महाबळेश्वर आणि वाई दोन्ही ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते. पावसाळ्यात महाबळेश्वर रमणीय होते.
* सातारा-धावडशी-मेरुिलग-लिंब गोवे-सातारा हा पण एक दिवसाचा प्रवासमार्ग सुरेख होतो. िलब गावी बासुंदी फार रुचकर मिळते.
* सातारा-रहिमतपूर-अंभेरी काíतकेय मंदिर-वडूज-औंध-कराड-सातारा असा प्रवासमार्ग एका दिवसात करता येतो. कराडजवळ कोळे नृसिंहपूरची नरसिंहाची देखणी मूर्ती अवश्य पाहिली पाहिजे. इथे पाऊस अगदी कमी, त्यामुळे वर्षभर केव्हाही उत्तम. तरी शक्यतो उन्हाळा टाळावा.
कासवाच्या पाठीवर नंदी- धोम
सुखसरिता कृष्णेच्या काठावरील वाई, मेणवली आणि धोम ही अतिशय रम्य स्थळे असूनही ती पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिली आहेत. साताऱ्याहून वाई माग्रे अवघ्या ४४ कि.मी. वरील धोम आणि तिथले लक्ष्मी-नृसिंह मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. आगळ्यावेगळ्या गोल उंच बांधकामावर कडेला सज्जा सोडून हे देवस्थान बांधले आहे. चतुर्भुज नृसिंह आणि त्याच्या मांडीवर लक्ष्मी अशा सुंदर मूर्ती आहेत. याच मंदिराच्या आवारात आहे एक दगडी बांधणीचे शिवमंदिर आणि अतिशय प्रमाणबद्ध, सुबक अशी काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आणि त्यावरची मेघडंबरी. नंदीसह मेघडंबरी एका भव्य कासवाच्या पाठीवर अंबारीसारखी उभारलेली आहे. हे कासव एका भव्य हौदाच्या मधोमध आहे. कमलपुष्पी हौदात जेव्हा पाणी भरलेले असते तेव्हा हे कासव त्यात तरंगत आहे आणि पाठीवर नंदीची अंबारी डोलते आहे असा भास होतो.
औंधचे भवानी वस्तुसंग्रहालय
खटाव तालुक्यातील औंध हे पंतप्रतिनिधींच्या संस्थानचे गाव. कुलदेवता यमाई आणि भगवानराव पंतप्रतिनिधींनी उभारलेलं वस्तुसंग्रहालय या इथल्या मुद्दाम भेट द्यायच्या गोष्टी. सकाळी १० ते १ आणि दुपारी २ ते ५ या वेळात हे संग्रहालय उघडे असते. सोमवार हा सुट्टीचा वर आहे. या संग्रहालयात राजा रविवम्र्याने काढलेली अप्रतिम चित्रे पाहून डोळ्याचे पारणे फिटते. या शिवाय अनेक देशी-परदेशी चित्रांचे नमुने इथे मांडलेले आहेत. त्यात हेन्री मूरची ‘मदर अॅण्ड चाइल्ड’ ही शिल्पकृती आवर्जून पाहावी. संग्रहालायानंतर दहा बुरुजांच्या तटबंदीने युक्त अशा यमाई मंदिराकडे जाता येते. गाभाऱ्यात एक शिविलग आणि ६ फूट उंचीची यमाईची देखणी मूर्ती मन प्रसन्न करते. मंदिराच्या शिखरावरील विविध देवदेवतांच्या शिल्पाकृती थक्क करणाऱ्या आहेत. सातारा ते औंध हे अंतर ४२ कि.मी. आहे.
श्रीक्षेत्र माहुली
महाबळेश्वरी उगम पावलेल्या कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम साताऱ्यापासून जेमतेम ५ कि.मी. असलेल्या माहुली इथे होतो. पेशवाईतील सुप्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचा जन्म याच माहुली गावातला. कृष्णा नदीच्या अलीकडील भागाला संगम माहुली, तर नदीपलीकडील भागाला क्षेत्र माहुली म्हणतात. संगम स्थान असल्यामुळे इथे बरीच मंदिरे पाहायला मिळतात. पकी ताईसाहेब पंतसचिव यांनी बांधलेले श्रीराधाकृष्ण मंदिर, औंधच्या श्रीपतराव पंतप्रतिनिधींनी बांधलेले श्रीबिल्वेश्वर मंदिर, परशुरामपंत अनगळ यांचे श्रीरामेश्वर मंदिर ही काही महत्त्वाची मंदिरे होत. श्रीबिल्वेश्वर मंदिरासमोर असलेल्या श्रीसंगमेश्वर मंदिरावरील लक्ष्मीचे चित्र, फुलपाखरांची नक्षी कौशल्यपूर्ण आहेत. माहुली हे धार्मिक ठिकाण असल्याने सातारकर छत्रपतींचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अंत्यसंस्कार इथे केले गेले आणि त्यांचीही स्मारक-वृंदावने उभारली गेली.
१५ मोटांची विहीर – लिंबशेरी
अनेक मजले खोल, पाण्यापर्यंत पायऱ्या असणाऱ्या विहिरी गुजरातमध्ये मोठय़ा संख्येने आहेत. पण अशीच एक सुंदर विहीर आहे साताऱ्याच्या अगदी जवळ िलब गावी. साताऱ्याहून पुण्याला जाताना ९ कि.मी. वर िलब फाटा आहे. तिथून तीन कि.मी. आत ही विहीर आहे. शाहू छत्रपतींची राणी वीरूबाई हिने ही पंधरा मोटा असलेली अत्यंत देखणी विहीर बांधली. आजूबाजूच्या शेतीला पाणी पुरवण्यासाठी असलेल्या १५ मोटांच्या खुणा अजूनही दिसतात. विहिरीत आतून व्यालांची शिल्पे दिसतात. तर तिथेच एक कमानदार पूल आहे. त्याच्या वरती एक प्रशस्त दालन आहे. विहिरीवरील या दालनात बसल्यावर अतिशय थंडगार वाटते.
या विहिरीवरील शिलालेखात ‘श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब’ असे कोरलेले आहे. िलब गावात कृष्णामाईचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो.