नासिकं च प्रयागं च पुष्करं नैमिषं तथा
पंचमं च गयाक्षेत्रं षष्ठं कुत्र न विद्यते
अर्थात, नासिक, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य आणि गया मिळून पाच क्षेत्रे होतात. सहावे कुठेही नाही, अशी महती असणारे नाशिक. ही ऋषींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी व मानवांची मोक्षभूमी म्हणून युगानुयुगे प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य नाशिक, पवित्र भूमी नाशिक, कुंभमेळ्याचे ठिकाण नाशिक, डोंगर, किल्ले, गिरिस्थाने यांनी वेढलेले नाशिक. द्राक्ष, कांदा या पिकांचे नाशिक. येवल्याच्या पैठणीचे नाशिक. अशी नाशिकची खूप मोठी ओळख आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिकजवळच त्र्यंबकेश्वरला उगम पावते. असा सगळा धार्मिक आणि पर्यटनदृष्टय़ा संपन्न असलेला हा नाशिक परिसर. नुसता नाशिक जिल्हा फिरून पाहायचा म्हटले तरी एक वर्ष कमी पडेल अशी या परिसराची श्रीमंती आहे. यात्रेकरू, पर्यटक, ट्रेकर्स, संशोधक अशा सर्वासाठी या परिसरात काही ना काही खजिना आहेच. नाशिकचा थेट रामायणाशी असलेला संबंध आणि त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिगामुळे जरी हे धार्मिक पर्यटनाचे केंद्र झाले असले तरीसुद्धा इतर अनेक वैशिष्टय़पूर्ण आणि आगळीवेगळी ठिकाणे या परिसरात आहेत. अगदी एका दिवसात किंवा दोन दिवसांमध्ये जाऊन पाहून होतील अशी आहेत आणि याच काही हटके ठिकाणांचा मागोवा घेऊ लागलो की, आश्चर्यकारक, सुंदर गोष्टी आपल्या समोर येतात.
टाकेद
नाशिकवरून इगतपुरी घोटीमार्गे टाकेदचे अंतर ४८ कि.मी. होते. या क्षेत्राचा संबंध थेट रामायणाशी आहे. सीतेला पळवून नेणाऱ्या रावणाला जटायूने मोठा विरोध केला. जटायूची शक्ती रावणापुढे खूपच कमी पडली आणि तो पक्षीराज जखमी होऊन पडला तो याच टाकेद ठिकाणी असे मानले जाते. प्रभू रामचंद्र तिथे येईपर्यंत तो जिवंत होता आणि त्यानेच रामाला सीतेच्या अपहरणाची घटना आणि दिशा दाखवली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारून पाण्याचा प्रवाह निर्माण केला आणि ते पाणी प्राशन केल्यावर या जटायूने आपले प्राण रामचंद्रांच्या मांडीवर सोडले. जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले. नाशिकपासून जेमतेम ४६ कि.मी.वर असलेले हे ठिकाण. आता तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक छोटेसे मंदिर उभारलेले आहे. काहीसा दुर्लक्षित असलेला हा परिसर आता कात टाकतो आहे. देवदेवतांची अनेक मंदिरे आपल्याला भारतवर्षांत आढळतात, पण जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झाले ते जटायू मंदिर मात्र दुर्मीळच म्हणायला हवे.
सिन्नरची यादवकालीन मंदिरे
नाशिकवरून पुण्याला जाताना ३६ कि.मी.वर एक सुंदर व्यापारी पेठ आहे आणि ती म्हणजे सिन्नर. अनेक ऐतिहासिक शिलालेखांतून उल्लेख आलेले श्रीनगर किंवा सिंदीनगर म्हणजेच आजचे सिन्नर हे गाव प्राचीन काळापासूनच व्यापारीदृष्टय़ा भरभराटीला आलेले शहर होते. हे यादवांच्या राजधानीचे शहर होते. नंतर यादवांनी आपली राजधानी देवगिरीला हलवली. याच सिन्नर गावात शिल्पसमृद्ध अशी यादवकालीन श्रीगोन्देश्वर आणि श्रीऐश्वर्येश्वर ही मंदिरे आज उभी आहेत. पैकी गोंदेश्वर मंदिर मोठय़ा दिमाखात उभे आहे, तर ऐश्वरेश्वर मंदिराची स्थिती काही फारशी चांगली नाही. पूर्वाभिमुख असलेले गोंदेश्वराचे मंदिर हे भूमिज शैलीमधील पंचायतन मंदिर आहे. मंदिराला विशाल आवार, त्याभोवती सीमाभिंत आणि भोवती नागर प्रकारची चार उप आयताने आहेत. नंदीमंडपपण अतिशय देखणा आहे. मंदिराच्या बाह्य़ांगावर अप्सरा, देवदेवतांचे शिल्पांकन दिसते.
ऐश्वर्येश्वर हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याभोवती एक दगडी सीमाभिंत असावी. मंडपावरील छप्पर पार पडून गेले आहे तरीसुद्धा गर्भगृहावरील छप्पर काही प्रमाणात शिल्लक आहे, पण या मंदिरावर काही वैशिष्टय़पूर्ण शिल्पकला आढळते. कमानीवर नृत्य करणारा शिव, त्याच कमानीवर असलेले लक्ष्मीचे शिल्प आणि गर्भगृहाच्या द्वारावरील ललाटावर कोरलेल्या सप्तमातृकांच्या मूर्ती, अंतराळाच्या छतावर असलेले अष्टदिक्पाल या आणि अशा बऱ्याच सुंदर मूर्ती आपल्याला या मंदिरावर पाहायला मिळतात.
गारगोटी संग्रहालय – सिन्नर
सिन्नर आता अजून एका गोष्टीसाठी जगप्रसिद्ध झाले आहे आणि ती गोष्ट म्हणजे इथले गारगोटी संग्रहालय. कृष्णचंद्र पांडे यांनी या संग्रहालयाची स्थापना केली. झीओलाइट या प्रकारच्या असंख्य स्फटिकांचे इथे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक झीओलाइटला स्वतंत्र रंग आणि आकार असतो हे इथे पाहिल्यावर प्रकर्षांने जाणवते. हे स्फटिक हिऱ्यांसारखे अथवा कोणत्याही मौल्यवान खडय़ांसारखे दिसतात. यांचा वापर खरं तर जलशुद्धीकरण आणि जड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. या ठिकाणी विविध खनिजे, स्फटिक आणि पाषाण निरनिराळ्या आकारांत आणि रंगांत पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे लाइट ग्रीन दगड, पिवळ्या कॅल्साइटचे स्फटिक यांचे प्रदर्शन मांडले आहे. या संग्रहालयाला सरस्वती पुरस्कार, सिन्नर गौरव पुरस्कार आदींनी गौरवण्यात आले आहे. हे संग्रहालय वर्षभर सकाळी १० ते रात्री १० उघडे असते. याचे प्रवेशमूल्य माणशी रु. १०० एवढे आहे.
* नाशिक—इगतपुरी—घोटी—टाकेद—सिन्नर—नाशिक असा भ्रमण मार्ग घेतल्यास १ दिवस पुरतो आणि महत्त्वाची स्थळे पाहून होतात.
* नाशिक—वणी—सटाणा—ताहराबाद—मुल्हेर—साल्हेर—मांगीतुंगी—सटाणा—नाशिक असा दोन दिवसांचा कायक्रम किल्ले आणि इतर पर्यटन यासाठी सुंदर आहे. सटाणा हे तालुक्याचे ठिकाण असून राहण्या—जेवण्याच्या उत्तम सोयी आहेत. जवळच देवळाणे चे सुंदर मंदिर.
* नाशिक—अंजनेरी—त्र्यंबकेश्व्र—हर्षगड—भास्करगड—त्र्यंबकेश्वर—नाशिक असा मार्ग सुद्धा सुंदर आहे. त्र्यंबकेश्व्र ला राहण्यासाठी चांगल्या धर्मशाळा, लॉजेस आहेत. शिवाय जेवायची पण उत्तम सोय आहे.
पांडव लेणी
नाशिकच्या नैर्ऋत्येस ८ कि.मी.वर अंजनगिरी पर्वताच्या रांगेत शंकूच्या आकाराचे तीन डोंगर दिसतात. त्यांना त्रिरश्मी असे नाव त्यामुळेच पडले. त्यातील मधल्या डोंगरावर पूर्वाभिमुख अशी काही लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांचे वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेल्या अनेक शिलालेखांमुळे प्राचीन इतिहासावर मोठा प्रकाश पडला आहे. सातवाहन राजघराण्याचा अभ्यास, त्यातील राजांची नावे, त्यांचे कर्तृत्व हे या शिलालेखांवरून उजेडात आले. ही सर्व बौद्ध लेणी असून यामध्ये बुद्ध आणि बोधिसत्त्वाच्या अनेक मूर्ती आहेत. या सर्व गोष्टींची ओळख नसल्यामुळे सामान्य लोकांत पांडव लेणी हे नाव रूढ झाले.
अंजनेरी
नाशिकपासून त्र्यंबकेश्वरच्या वाटेवर २४ कि.मी.वर अंजनेरी नावाचे टुमदार गाव लागते. याच गावाच्या पाठीशी अंजनेरीचा किल्ला उभा आहे. अंजनेरी हे पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थान आहे असे इथे समजले जाते. अंजनीमातेचे मंदिर इथे आहे. अंजनेरी गावात काही प्राचीन मंदिरांचे भग्नावशेष पाहायला मिळतात. याच अंजनेरी गावात एक संस्था लक्षणीय काम करते आहे. नाणक शास्त्राला वाहून घेतलेल्या या संस्थेचे नाव इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन न्युमिस्मिटिक स्टडीज. डॉ परमेश्वरीलाल गुप्ता आणि डॉ. के. के. माहेश्वरी यांनी या संस्थेची स्थापना १९८० साली केली. न्यूमिस्मिटिक स्टडी म्हणजेच नाण्यांचा अभ्यास. इतिहास जाणून घेण्यासाठी नाणी किंवा नाणक शास्त्राचा मोठा वापर केला जातो. या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना खूप मोठा नाण्यांच्या अभ्यासाचा खजिना उघडून दिला आहे. असंख्य नाणी, त्यामागचा इतिहास, त्यांचे फोटो अशा अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतात. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात १५ दिवसांचा निवासी अभ्यासक्रम या संस्थेतर्फे चालवला जातो. सोमवार ते शनिवार सकाळी ९.३० ते १.०० आणि २.०० ते ५.०० या वेळात हे नि:शुल्क संग्रहालय उघडे असते. संपर्क: ०२५९४२-२०००५.
त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिगांपैकी एक ज्योतिर्लिग नाशिकपासून फक्त ३० कि.मी.वर आहे. श्राद्धविधी करण्यासाठीसुद्धा हे क्षेत्र परिचित आहे. त्र्यंबकेश्वरच्या पाठीशी असलेला ब्रह्मगिरी पर्वत आणि त्यावर असलेले गोदावरी नदीचे उगमस्थान, निवृत्तिनाथांची समाधी असलेली गुहासुद्धा याच ब्रह्मगिरी पर्वतात आहे. श्रावण महिन्यामध्ये या ब्रह्मगिरी पर्वताला भाविक मोठय़ा श्रद्धेने प्रदक्षिणा घालतात. काहीशी खडतर असलेली ही प्रदक्षिणा शिवाच्या नामस्मरणामध्ये लीलया पार केली जाते. नाशिकमध्ये मुक्कामाच्या भरपूर सोयी असल्यामुळे दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम करून ही आणि अशी अनेक ठिकाणे आपल्या सोयीने पाहता येतात.
वणीची सप्तशृंगी देवी
सह्य़ादीच्या अजिंठा सातमाळा रांगेत नाशिकपासून ६० कि.मी. अंतरावर वणी नांदुरी या गावी डोंगरावर सप्तशृंगी देवीचे ठाणे आहे. अत्यंत प्रसिद्ध आणि ८ फूट उंचीची दगडामध्ये कोरलेली भव्य देवी प्रतिमा नितांत सुंदर आहे. हातात विविध आयुधे धारण केलेल्या देवीचे रूप भव्य आणि रौद्र आहे. नवरात्रात जरी इथे मोठी यात्रा भरत असली तरी वर्षभर भक्तांचा राबता या ठिकाणी चालू असतो.
एक ना अनेक अशा विविध गोष्टींनी नाशिक परिसर नटला आहे. वर्षांतल्या कोणत्याही ऋतूमध्ये गेले तरी निसर्गाची विविध रूपे दाखवणारा हा परिसर विशेषत: पावसाळ्यामध्ये फारच रमणीय भासतो. धार्मिक स्थळांचे पावित्र्य आणि निसर्गाची अखंड सोबत यामुळे नाशिक परिसराची भटकंती नितांत सुंदरच होते.