मराठवाडय़ामध्ये प्रबळ राजसत्ता राज्य करून गेल्या. सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या राजसत्ता इथे नांदल्या. सलग कार्यकाळ लाभल्यामुळे यांनी कलेला आश्रय दिला. प्रबळ, सामथ्र्यवान यादव राजघराण्याची राजधानी असलेले औरंगाबादजवळचे देवगिरी. इसवी सनाच्या १० व्या शतकापासून ते १४ व्या शतकापर्यंत यादव राजांनी या प्रदेशावर राज्य केले. भिल्लम, सिंघणदेव, कृष्णदेव, महादेव, रामचंद्रदेव असे सामथ्र्यशाली राजे या कुळात होऊन गेले. यादव नृपती शौर्य, कला आणि साहित्याच्या क्षेत्रातही प्रसिद्ध होते. ज्ञानेश्वर माऊ ली यांच्याबद्दल असे म्हणतात की,
‘‘तेथ यदुवंश विलासु,
जो सकळ कळा निवासु
न्यायाते पोषि क्षितिशु,
श्रीरामचंद्रु’’
संपन्न अशा मराठवाडय़ामध्ये मूर्तिकला, मंदिर स्थापत्य आणि साहित्याची भरभराट झाली होती. औरंगाबाद आणि त्याच्या परिसरामध्ये त्याच्या खुणा ठायी ठायी आढळतात. अजिंठा आणि वेरुळचे लयन स्थापत्य तर फारच प्राचीन आहे; परंतु त्याचबरोबर तेवढीच प्राचीन असलेली पितळखोरा लेणी, पाटणादेवी, कन्नड, ही ठिकाणेसुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरतात. औरंगाबादमध्ये मुक्काम करून एक-दोन दिवसांत ही आपला प्राचीन वारसा जपणारी स्थळे सहज पाहून होतात. काही अगदी वेगळी तरीसुद्धा न चुकता पाहायची स्थळे आपल्या सहलीमध्ये मुद्दाम समाविष्ट करून घेतली पाहिजेत. या प्रदेशात अत्यंत तीव्र उन्हाळा असतो, त्यामुळे ते दिवस सोडून वर्षभर केव्हाही इथे मनसोक्त फिरावे.
पितळखोरा लेणी
औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबादपासून कन्नड हे अंतर ६० कि.मी. आणि त्यापुढे पितळखोरा २० कि.मी. भरते. अत्यंत सुंदर आणि प्राचीन बौद्ध लेणी पाहायला पितळखोरा या ठिकाणी गेलेच पाहिजे. हे जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने संरक्षित केलेले आहे. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकामध्ये खोदलेली हीनयान पंथाची ही लेणी आणि तो सगळा परिसरच अत्यंत नयनरम्य आहे. गौताळा अभयारण्यात हा भाग येतो. लेण्यांमध्ये जाण्यासाठी उत्तम बांधलेल्या पायऱ्या आहेत. १४ लेण्यांचा हा समूह असून त्यातील चार चैत्यगृहे आहेत. त्यातील खांबांवर अत्यंत सुंदर रंगवलेली चित्रे आजही शाबूत आहेत. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली ती चित्रे खांबांचे आकार आणि खोदीव स्थापत्य पाहून आश्चर्याने बोटे तोंडात जातात. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून दगडी पन्हाळीचा केलेला वापर आणि ते पाणी थेट खालीपर्यंत नेऊन सोडायची तत्कालीन स्थपतींची दूरदृष्टी केवळ वाखाणण्याजोगी आहे. या लेण्यांच्या समोरील डोंगरामध्ये पण काही खोदीव गुहा असून त्यामध्ये स्तूप आहेत. कदाचित ते कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले असावेत.
वेरुळचा घृष्णेश्वर
शिवपुराणात वर्णन केलेले हे बारावे ज्योतिर्लिग घृष्णेश्वर, घृष्णेश्वर किंवा घृश्मेश्वर या नावाने फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. औरंगाबादपासून ३० कि.मी.वर स्थित वेरुळ हे गाव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचे पाटीलकीचे वतन होते. त्यांचे पूर्वज घृष्णेश्वराचे अनन्यभक्त होते. वेरुळला आल्यावर समोरच घृष्णेश्वर मंदिराचा कळस नजरेस पडतो. मंदिराभोवती जवळजवळ १२ फूट उंचीचा कोट बांधलेला आहे. दारासमोर पूर्वाभिमुख हनुमंताचे देऊळ आहे. देऊळ आणि शिखर यांच्या मधल्या जागेत विविध अवतार शिल्पित केले आहेत. सभामंडपात शिवाकडे तोंड करून असलेला उठावदार नंदी आहे. अंतराळातून पुढे गर्भगृहात जाण्यासाठी ५ पायऱ्या उतराव्या लागतात. गाभाऱ्यात पूर्वाभिमुख शिवलिंग प्रस्थापित केलेले दिसते. याच ज्योतिर्लिगाला कुंकुमेश्वर असेही नाव आहे. पार्वतीच्या करांगुलीच्या घर्षणातून प्रगट झाला तो घृष्णेश्वर किंवा घृसृण म्हणजे केशर. केशरमिश्रित तिलक गिरिजेने लाविला म्हणून तो घृसृणेश्वर झाला. घृष्णेश्वर मंदिराच्या समोरचा रस्ता ओलांडून थोडे पुढे गेले की रानात गणपतीचे मंदिर आहे. घृष्णेश्वराला औरंगाबादवरून एका दिवसात जाऊन परत येता येईल; परंतु वेरुळ लेणी पाहायची असतील तर वेरुळ इथेच राहण्यासाठी उत्तम आहे. ते वेरुळ लेण्यांच्या अगदी जवळ आहे.
पाटणादेवी
पितळखोरा लेण्यांशेजारूनच जाणारी पायवाट थेट डोंगर उतरून पुढे पाटणादेवीला जाते. पण हा रस्ता ज्यांना डोंगरात चालायची सवय आहे त्यांच्यासाठी. इतरांनी परत मागे येऊन चाळीसगावच्या दिशेने जावे. औट्रम घाट उतरून गेल्यावर लगेच एक रस्ता पाटणादेवी साठी वळतो. त्या रस्त्याने गेले की पाटणादेवीचे मंदिर येते. हे अंतर सगळे मिळून २० कि.मी. एवढे आहे. पाटणादेवी या ठिकाणी चंडिका देवीचे मंदिर आहे. रम्य असा हा परिसर तीनही बाजूंनी डोंगराने वेढलेला आहे. या ठिकाणचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे महान गणिती भास्कराचार्य यांचे हे जन्मस्थान होते असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी इथे एक मठ स्थापन केला होता. त्यांचा नातू चांगदेव यानेही तो पुढे चालू ठेवला होता. यादव राजांचे मंडलिक निकुंभ राजे यांनी या मठाला राजाश्रय दिल्याचे सांगितले जाते. धवलतीर्थ, केदारकुंड, महादेव मंदिर अशी काही ठिकाणे याच परिसराच्या आसपास आहेत. सरत्या पावसाळ्यात इथे गेले तर डोंगरावरून कोसळणारे जलप्रपात आणि भरभरून आलेली रानफुले सर्वत्र पाहायला मिळतात. चाळीसगाव इथून अवघे १८ कि.मी.वर आहे.
विष्णूच्या शक्तींचे मंदिर – अन्वा
चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्म अशी चार आयुधे असतात. या आयुधांचा त्यांच्या हातातील क्रम बदलला की गणिती शास्त्रानुसार २४ कॉम्बिनेशन्स होतात. त्या प्रत्येक प्रकाराला केशव, माधव, नारायण, अशी संध्येत येणारी २४ नावे आहेत. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. इ. स.च्या अंदाजे बाराव्या शतकातील हे मंदिर मुळात वैष्णव मंदिर होते. मंदिरावरील सर्व शिल्पे ही वैष्णव आहेत. हे लक्ष्मीचे मंदिर असावे. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. दरवाजाच्या बाहेर वैष्णव द्वारपाल दिसतात. मंदिराच्या बाहय़भागावर चोवीस वैष्णव शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्यांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. जसे विष्णूची केशव, माधव, नारायण अशी नावे आहेत, त्याचप्रमाणे या शक्तींची सुद्धा कीर्ती, कांती, तुष्टी, पुष्टी, धृती अशी चोवीस नावे आढळतात. अग्निपुराण, पद्मपुराण, चतुर्वर्गचिंतामणी या ग्रंथांच्या आधारे ही माहिती मिळते. शक्तीचे या स्वरूपातील बहुधा हे एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे, तरीसुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहऱ्यावरील भावमुद्रा केवळ केवळ पाहण्याजोग्या आहेत. अजिंठय़ाला जाताना मुद्दाम, आवर्जून अन्वा या ठिकाणी थांबून हे मंदिर पाहून घ्यावे. वैष्णव मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा होय.
* औरंगाबाद-गोळेगाव-अन्वा-अंभई-अजिंठा असा प्रवास ठरवल्यास अन्वा आणि अंभई ही वेगळी ठिकाणे पाहून होतील. मुक्काम अजिंठय़ाला करावा.
* औरंगाबाद-वेरुळ-घृष्णेश्वर-कन्नड-पितळखोरा-पाटणादेवी-औरंगाबाद असा २-३ दिवसांचा कार्यक्रम ठरवता येईल. कन्नड हे तालुक्याचे ठिकाण आहे तिथे राहण्याच्या सोयी आहेत. अन्यथा पाटणादेवी पाहून चाळीसगावला मुक्कामाला जावे. चाळीसगाव हे रेल्वे स्थानक आहे.
* औरंगाबाद-पैठण-नाथसागर-जायकवाडी-औरंगाबाद असा एक दिवसाचा कार्यक्रम चांगला होईल. ज्ञानेश्वर उद्यानात रात्री प्रकाशझोतामध्ये नाचणाऱ्या कारंज्यांचा कार्यक्रम होतो. पैठण हे सुद्धा मुक्कामाला चांगले आहे.
औरंगाबाद लेणी
औरंगाबादमधील ‘बीबी का मकबरा’ या स्थळापासून जेमतेम २ कि.मी. वर विद्यापीठाच्या पाठीमागील टेकडीवर एक लेण्यांचा समूह कोरलेला आहे. त्यांनाच औरंगाबाद लेणी म्हणतात. हा १२ बौद्ध लेण्यांचा समूह आहे. महायान लेण्यांचे ते एक प्रमुख केंद्र होते. इ. स.च्या ७ व्या शतकात या लेणी खोदल्याचे सांगितले जाते. या सर्वातील उल्लेखनीय लेणे म्हणजे लेणे क्रमांक ९ हे आहे. हे लेणे आयताकार असून त्याला पुढे व्हरांडा आहे. व्हरांडय़ाच्या महील भिंतीत दोन टोकांकडे एक एक उपमंदिरे असून मधोमध मुख्य गर्भगृह आहे. दोन उपमंदिरांमध्ये पद्मपाणी आणि मैत्रेय बुद्धाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधील भिंतींवर बोधिसत्त्वाच्या शक्ती कोरलेल्या दिसतात. औरंगाबादला भेट दिल्यावर मुद्दाम जाऊन पाहण्यासारखे हे ठिकाण आहे.
पैठण
सातवाहन कुलाची राजधानी असलेले प्रतिष्ठान नगर म्हणजेच पैठण. औरंगाबादपासून ५५ कि. मी. वर असलेले हे ठिकाण प्राचीन काळी फारच भरभराटीला आलेले शहर होते. ग्रीक आणि रोमन संस्कृतीशी या शहराचा व्यापार चालत असे. पुढे ज्ञानदेवांनी इथल्या नागघाटावर रेडय़ाच्या तोंडून वेद वदवून घेतल्याचा प्रसंग, महानुभावपंथप्रवर्तक चक्रधरस्वामींचा पैठणशी आलेला संबंध. जनार्दनस्वामी आणि संत एकनाथांचे पैठण. महावस्त्र भरजरी पैठणीचे पैठण. अशी अनेक अंगांनी पैठणची ओळख आहे. जायकवाडीच्या नाथसागर आणि ज्ञानेश्वर उद्यानामुळे प्रसिद्ध असलेले हे शहर औरंगाबादच्या पर्यटनामध्ये अवश्य सहभागी करून घ्यायला हवे. एकनाथांचा वाडा, विष्णू मंदिरे, गोदावरी नदीवरील विविध घाट या अशा अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टी पैठणला आहेत. जैन पंथीयांचे २० वे र्तीथकर मुनिसुव्रतनाथांची वालुकाश्माची मूर्ती देखणी आणि पाहण्याजोगी आहे. पैठणला राहण्याच्या आणि जेवणाच्या सोयी उपलब्ध आहेत. इथे उन्हाळा फारच तीव्र असतो, त्यामुळे तो कालावधी टाळून इथे केव्हाही जावे.
औरंगाबाद म्हणजे केवळ अजिंठा-वेरुळ हे जे समीकरण झाले आहे ते काही अंशी खरे असले तरीसुद्धा हा परिसर खूपच समृद्ध आहे. आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली की विविध मंदिरे, लेणी, धार्मिक ठिकाणे अशा अनेक गोष्टी आढळतात. अजिंठा-वेरुळ मुळे हा परिसर जागतिक पातळीवर नक्कीच गेला आहे, तरीसुद्धा त्याच दर्जाच्या इतरही काही गोष्टी आपल्या भ्रमंतीमध्ये सामावून घेतल्या आणि डोळस भटकंती केली तर ती नक्कीच सार्थकी लागेल.