कैलास मानससरोवर यात्रा करायची असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी गरज असते ती प्रतिकूल वातावरणातही तगून राहणाऱ्या तीव्र मनोबलाची. ही यात्रा करणाऱ्याचे थेट अनुभव-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कैलास-मानससरोवर यात्रेला कुणी जावं, किंवा या यात्रेला कुणी जाऊ नये, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर नेमकेपणाने देता येणार नाही. पण एक ढोबळ उत्तर या संदर्भात नक्की देता येतं. ‘ज्याला मनापासून जावंसं वाटतं, तो प्रत्येक जण या यात्रेला जाण्यास पात्र आहे.’
इंग्रजीत असे म्हणण्याची प्रथा आहे, ‘व्हॉट आय से, आय मीन इट!’ वरील उत्तर मी अगदी मनापासून, प्रामाणिकपणे आणि वस्तुस्थिती सांगणारे, असे देतो आहे. खरोखरंच कैलास यात्रा कोणीही भाविक सहजी किंवा प्रयत्नपूर्वक करू शकतो. अर्थात हे विधान म्हणजे या यात्रेतील समस्यांचे सुलभीकरण नव्हे. ही यात्रा जगातील एक अतिशय खडतर आणि शारीरिक व मानसिक कसोटी पाहणारी यात्रा आहे हेसुद्धा आवर्जून लक्षात ठेवले पाहिजेच.
सांगण्याचा मुद्दा एवढाच की, तुम्हाला तीव्रपणे या यात्रेला जावेसे वाटणे हा या यात्रेला जाण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे. त्याचा व्यत्यास म्हणून असेही म्हणता येते की एखाद्याची जाण्याची उत्तम स्थिती असेल, शारीरिकदृष्टय़ा तो अतिशय तंदुरुस्त असेल तरीही मनातून त्याला या यात्रेचे आकर्षण नसेल तर तो ही यात्रा पूर्ण करू शकेलच याची खात्री नाही.
कैलास-मानससरोवर यात्रा गेल्या ३०-३५ वर्षांत मुळात खूप सोपी झाली आहे. विशेषत: नेपाळमधील काठमांडूहून मानससरोवरापर्यंत बसने जाण्याची सोय झाल्याने तर या यात्रेतील ‘थ्रील’ जणू संपूनच गेले आहे, असे वाटते. पूर्वी उत्तराखंडमधील पिठोरागडमार्गे सुमारे २०० किमीचे अंतर पायी तुडवून ही यात्रा करावी लागत असे. त्या तुलनेत आता जेमतेम ४५-५० किमी पायी चालावे लागते (पिठोरागडमार्गे जाणारी यात्रा अजूनही सुरूच आहे. ती केंद्र सरकारतर्फे आयोजित केली जाते आणि त्याची वैद्यकीय पात्रता खूपच कडक आहे!).
कैलास-मानससरोवर यात्रा श्रद्धेने आणि भावनेने करणाऱ्याला एक अत्यंत आनंददायी, स्वर्गीय आनंदाचा अनुभव येतो. त्या परिसरात नेमकी काय जादू आहे याचे वैज्ञानिक विश्लेषण न करताही हा अनुभव आपण घेऊ शकतो. सुमारे ३० वर्षांपूर्वी, वयाची साठी उलटून गेल्यानंतर, सलग तीन वेळा संपूर्ण पायी (पिठोरागडमार्गे) यात्रा केलेले गोरेगावचे रा. द. वाशीकर याचे मनाला पटेल असे विवेचन करतात. या परिसरात हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी तपाचरण केले. हे ऋषीमुनी म्हणजे त्या काळातील द्रष्टे समाजधुरीण होते आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी जे चिंतन केले त्यातून आपोआपच वातावरणात अनुकूल वायुलहरी (पॉझिटिव्ह वेव्ह्स) निर्माण झाल्या. त्यांच्या प्रभावामुळेच आपल्याला त्या परिसरात एक प्रगाढ शांतता, स्वर्गीय जाणीव होते, असे वाशीकरांचे म्हणणे आहे. तेथे गेल्यानंतर त्यांच्या विधानातील तथ्य आपल्याला जाणवल्याशिवाय राहात नाही.
यात्रेत नेमके कठीण काय आहे?
या यात्रेची काठिण्यपातळी आपल्याला माहीत असलेल्या सर्व हिंदू यात्रांमध्ये सर्वाधिक आहे. या यात्रेची तुलना एका अर्थी अमरनाथ अथवा चारधाम यात्रेशी करता येईल. परंतु कैलास यात्रा या यात्रांपेक्षा निश्चितपणे कठीण आहे.
अन्य कठीण यात्रा हिमालयातीलच असल्या तरीसुद्धा आपण आपल्या देशात, परिसरात, माणसांत आणि जगात आहोत ही भावना सतत आपल्या मनात असते. कैलासाच्या पायथ्याशी प्रत्येकाला एक जबरदस्त ‘होमसिकनेस’ जाणवतो. तो इतका तीव्र असतो की कणखर मनाच्या माणसालासुद्धा सुसंगत विचार करणे शक्य होत नाही. विरळ हवा, संपूर्ण परके वातावरण, घरापासून हजारो किमी दूर आणि संपूर्ण हिमालयमध्ये या परिस्थितीने ही अगतिकतेची भावना येते. मग मनात चित्रविचित्र विचारांचे थैमान सुरू होते, एकाच वेळी गाढ झोपेतील अनाकलनीय स्वप्ने आणि त्याच वेळी शेजारचा माणूस काय करतो आहे याचीही जाणीव अशी गोंधळात टाकणारी स्थिती आपण कैलासाच्या पायथ्याशी अनुभवतो. किमान एकदा तरी ‘मरो ती कैलास परिक्रमा, कोणी हेलिकॉप्टरची सुविधा दिली तर ताबडतोब इथून निघून जाऊ,’ असा विचार मनात येतोच येतो. यात्रा कठीण म्हणायचे ते याच टप्प्यासाठी. मात्र हा टप्पा एकदा निग्रहाने पार केला की मग सगळे सोपे होऊन जाते.
काठमांडूहून नेपाळच्या रस्त्यांनी आणि भारतीय बनावटीच्या रस्त्यांनी अवघ्या सव्वाशे किमीवरील कोडारीला पोहोचेपर्यंत नाकी दम येतो. मुंबई अथवा महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील रस्त्यांची आठवण यावी, असा हा खड्डय़ांतील प्रवास आहे. मात्र कोडारी सीमा ओलांडून तिबेटमध्ये, अर्थात चीनमध्ये प्रवेश केला की चित्र ३६० अंशात बदलते. विश्वास बसू नये एवढा गुळगुळीत (लालूंच्या भाषेत सांगायचे तर हेमामालिनीच्या गालांसारखा) रस्ता आपल्याला थेट मानससरोवरापर्यंत साथ देतो. या सुमारे हजार-बाराशे किमीच्या रस्त्यावर क्वचितच समोरून गाडय़ा येतात. आपल्याला ओव्हरटेक करून जाणारी गाडी तर दिसतच नाही. इतकी विरळ वाहतूक असूनही इतका उत्तम, व्यवस्थित रेखांकन केलेला रस्ता बघून चिनी अभियंत्यांबद्दल मनात फक्त चांगलीच भावना येते. अगदी मानससरोवरचा परिक्रमा मार्गसुद्धा कच्चा असला तरी खूपच सुखकर आहे. अर्थात ही सारी सज्जता तिबेटमधून नेपाळ सीमेवर कमीत कमी वेळात हजारोंचे सैन्य आणता यावे यासाठीची आहे, हेसुद्धा लक्षात घ्यायलाच हवे.
या संपूर्ण प्रवासात आपल्याला आणखी दोन गोष्टी अखंड सोबत करतात. ‘हाय टेन्शन’ वीजतारांचे जाळे आणि मोबाइल टॉवर. प्रवासभर या दोन गोष्टी आपल्याला सतत दिसत राहतात. मोबाइलचे नेटवर्क तर कधीच जात नाही. अगदी कैलास परिक्रमा मार्गावरील सगळ्यात अवघड अशा १९ हजार फुटांवरील डोल्मा पास येथेसुद्धा मोबाइलची रेंज असते. किंबहुना ‘हातात मोबाइल आहे पण त्याला रेंज नाही’ ही परिस्थिती स्थानिकांना माहीतच नाही.
या व्यतिरिक्त आनंद वाटावा, असे या प्रवासात फारसे काही नाही. आसपास विस्तीर्ण ओसाड प्रदेश, अधूनमधून दिसणारे प्रचंड तलाव आणि कडाक्याची थंडी हे दोन-तीन दिवसात बदलत नाही.
या यात्रेचा खडतर मार्ग अर्थातच कैलासाची तीन दिवसांची परिक्रमा. सुदैवाने (!) हा मार्ग अजूनही पायीच आक्रमावा लागतो. या अडीच दिवसांतील पहिला दिवस ‘अगदी सोपा’ असल्याचे सांगितले जाते. तसे ते खरेही आहे. पण तुलनेतच ते खरे आहे. माझा व्यक्तिश: अनुभव असा की या दिवशी मुक्कामावर पोहोचताना मला जाणीव झाली ती अशी की आपण आयुष्यात या आधी कधीच एवढे प्रचंड दमलो नव्हतो. या मुक्कामात हवामान खराब असेल तर मग विचारूच नका! मनात नाही नाही ते विचार, थंडी एवढी की अंगावर तीनपदरी लोकरीचे कपडे आणि वर ४ इंच जाडीच्या दोन दुलया पांघरूनसुद्धा कुससुद्धा बदलण्याची इच्छा होत नाही. आजच एवढे दमलो तर उद्याचा ‘कठीण’ प्रवास कसा करणार या भावनेचे असह्य़ ओझे मनावर येते. मात्र ही रात्र एकदा का सरली की मग दुसरा दिवस एवढा धामधुमीचा, दगदगीचा, दमण्याचा जातो की बाकी विचार पळूनच जातात. डोल्मा देवी ही कैलासाची रक्षणकर्ती देवी असल्याचे स्थानिक तिबेटी लोक मानतात. या पॉइंटवर पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास तुलनेत खूपच सोपा आहे. मुख्य म्हणजे पुढे सगळा उतार आहे. अर्थात तोसुद्धा जपूनच उतरावा लागतो. पण चढण्याचे कष्ट संपल्याच्या आनंदात ते कष्ट फारसे जाणवत नाहीत. पण पुढे आणखी एक ‘छोटेसे’ संकट ठाकलेले असते. सगळ्यात कठीण भाग संपल्याच्या आनंदात आपण असतो. १९ हजार फुटांवरून पुन्हा १६ हजार फुटांवर आपण खाली उतरतो आणि आता आलोच मुक्कामाला अशी आपली भावना होते. प्रत्यक्षात पहिल्या दिवसासारखाच सपाटीचा पण न संपणारा रस्ता आपल्यासमोर येतो. सकाळपासून डोंगर चढून थकलेले पाय आणि मन या रस्त्यावरून पावसाचा आणि क्वचित बर्फाचा मारा खात ४-५ तास चालण्यास तयारच नसतात. अक्षरश: पाय ओढतच हे अंतर संपवावे लागते.
हे झाले प्रत्यक्ष प्रवासातील अडचणींचे. पण या व्यतिरिक्त काही मानसिक अडचणी या यात्रेत येतात. या यात्रेविषयी कितीही माहिती घेतली, पुस्तके वाचली, व्हिडीओ आणि यू-टय़ूब पाहिल्या तरी नेपाळची कोडारी सीमा ओलांडून तिबेटमध्ये प्रवेश केल्यानंतर मनात अस्वस्थता सुरू होते. त्याची कारणे मुख्यत: दोन. आपल्याला डोंगर हिरवेगार बघण्याची सवय असते. परंतु येथे पहिल्याच दिवशी सुमारे १० हजार फुटांवर गेल्यावर डोंगरावर वीतभर उंचीच्या गवताव्यतिरिक्त काहीच नसते. मैलोन्मैल आपल्याला येथे माणूसही दिसत नाही आणि अक्षरश: कापरं भरवणारी थंडी. त्यात एखादे गाव लागले तरी कुणाशीसुद्धा आपण संवाद साधू शकत नाही.
दुसरा त्रास दुहेरी असतो. एकीकडे विरळ हवामानात शरीरातील ऑक्सिजन टिकून राहावा म्हणून भरपूर पाणी पिण्यास सांगितले जाते. पाण्यातून आपोआप शरीराला ऑक्सिजन मिळतो, पण जास्त पाणी प्यावे तर थंडीमध्ये दर तासा-दोन तासाने लघवीला जावे लागते. एरवी ही बाब किरकोळ वाटते, पण कडाक्याच्या थंडीत बाहेर उघडय़ावर दिवसात १०-१२ वेळा जावे लागणे अतिशय जिकिरीचे असते.
त्याही पुढे अडचणींचा डोंगर वाटावा अशी स्थिती म्हणजे तिबेटमधील शौचालये! खरे तर तिबेटमध्ये शौचालये नाहीतच. सकाळी उठून बाहेर कुठेतरी जायचे. ‘होल वावर इज अवर’ अशी स्थिती. आपली सगळी मुक्कामाची ठिकाणे छोटय़ाशा गावांमधील हॉटेलांमध्ये असतात. एक खड्डा खणायचा आणि त्यापुढे एक भिंत बांधायची की झाले शौचालय. त्यात आपण हंगामाच्या पहिल्या १०-१२ दिवसांनंतर जात असू तर तिथल्या नरकाची कल्पनाही करता येणार नाही. यावर उपाय म्हणून हातात पाण्याची बाटली घेऊन जरा दूर कुठेतरी आडोशाला जाणे त्यातल्या त्यात सोयीचे. पण मग त्यासाठी पहाटे, अंधारात जाणे भाग पडते. तसेही येथे प्रवास उजाडता उजाडताच सुरू होतो. पण मग पहाट म्हणजे दिवसातील सगळ्यात थंड वेळ. अशा वेळी थंड पाण्याची बाटली घेऊन जाणे म्हणजे दिव्यच असते. बरे न जावे तर दिवसभरात अन्यत्र कुठेही पुढे ‘बरी’ सोय न मिळण्याचीच खात्री.
म्हटले तर या अडचणी फार महत्त्वाच्या नाहीत, परंतु या गैरसोयींमुळे अनेकांचे शरीरस्वास्थ्य आणि परिणामी मन:स्वास्थ्य बिघडते. त्याचा यात्रेत मोठा दुष्परिणाम होतो. वास्तविक अमरनाथ वा चारधाम यात्रांमध्येही असा त्रास होतो. परंतु तिथे आपण आपल्या भाषेत बोलणाऱ्या लोकांमध्ये आणि आपल्याच देशात असतो. मानसिकदृष्टय़ा तो फार मोठा आधार असतो.
थोडक्यात सांगायचे तर कडाक्याची थंडी (आणि त्यानुषंगाने पाणी पिणे), विरळ आणि कोरडी हवा, अति उंचीवरील तीव्र चढ, शौचालयांची अनुपलब्धता आणि संपूर्ण अनोळखी वातावरण या अडचणींवर मात करण्याची मानसिकता हवी.
तिबेटमध्ये प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व यात्रेकरूंना वातावरणाची सवय व्हावी म्हणून पर्वतीएवढी एक टेकडी चढावयास लावतात. १५-२० मिनिटांत चढू, असे सुरुवातीला वाटते. प्रत्यक्षात चांगली तब्येत असणाऱ्यांनाही किमान तासभर लागतो. ज्यांना अशी अजिबात सवय नसते त्यांची सुरुवातीलाच अशी कसोटी लागते, पण काहीजणांना सुमारे दोन तास लागतात. पण जे दोन तासांत चढतात ते यात्रा नक्की पूर्ण करतात. कारण एकच, कैलास परिक्रमा करायचीच, त्यासाठी कितीही कष्ट उपसावे लागले तरी बेहत्तर! अशी त्यांची ठाम मनोभूमिका असते.
आमच्याबरोबर गटामध्ये सोलापूर जिल्ह्य़ातील एक शेतकरी आजीआजोबा आले होते. आजोबा सुमारे ६८ तर आजी साठीच्या. पण आमच्या गटप्रमुखाला या दोघांचा अजिबात त्रास झाला नाही. उलट एक पन्नाशीतील गृहस्थ अतिशय तक्रारखोर होते. त्यांना यात्रा सुखरूप पूर्ण करूनही समाधान काही मिळाले नाही. म्हणून मी म्हणतो, मनाचा ठाम निश्चय असेल तर कैलास तुम्हाला आनंदाने आपली प्रदक्षिणा करू देतो!