पर्यटन म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी जाणे आणि तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटणे अशी एक ढोबळ संकल्पना आपल्याकडे रूढ आहे. एरवी धार्मिक कार्यासाठी म्हणून बाहेर पडणाऱ्या कुटुंबांची संख्याही भारतासारख्या देशात भरपूर आहे, पण त्याला अद्याप आपण पर्यटनाच्या दृष्टीने चांगले वळण लावलेले नाही. थोडे वेगळे पर्यटन म्हणजे अिजठा-वेरुळसारख्या लेणींना भेट देऊन तेथील इतिहास आणि कला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. तरुण असाल तर गड- किल्ले गाठायचे. यापलीकडे फारसा विचार आपल्याकडे झालेला नाही. नृत्य- नाटय़ यांच्याचसाठी पर्यटन असा विचारही आपण करत नाही. पर्यटक कंपन्यांच्या कार्यक्रमात नृत्य-नाटय़ादी कला येतात त्या पापड-लोणच्यासारख्या तोंडी लावायला. पण थोडा वेगळा विचार केला तर लक्षात येईल की, या नृत्य-नाटय़ादी कलाही समजून घेण्यामध्ये सामान्य माणसाला रस असतो, मात्र ते समजून सांगणारे कुणी नाही. केवळ महाराष्ट्रापुरता विचार करायचा तरी आपल्याला आपल्याकडील प्रथा-परंपरांशी संबंधित बाबींची संस्कृतीशी चांगली सांगड घालून त्याचेही एक वेगळे विशेष पर्यटन सुरू करण्यास भरपूर वाव आहे. म्हणूनच या खेपेस ‘लोकप्रभा’ने पर्यटन विशेषांकामध्ये आग्नेय आशिया आणि संग्रहालय पर्यटन या वेगळ्या विषयांबरोबर आजवर कुणीही विचार न केलेल्या कला-परंपरांची वारसास्थळे या वेगळ्या विषयाला हात घातला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा