lp14
इतिहास, संस्कृतीच्या पाऊलखुणांचा शोध घेताना इतर अनेक साधनांइतकीच महत्त्वाची ठरतात, ती संग्रहालयं. महाराष्ट्राला संपन्न अशा संग्रहालयांचा वारसा आहे. म्हणूनच भटकंतीच्या यादीत ज्यांचा समावेश केलाच पाहिजे अशा राज्यातल्या पाच महत्त्वाच्या संग्रहालयांबद्दल..

महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर सातारा. या शहराजवळ साधारणत: पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर कलेचा वारसा मिरवणारे एक सुंदर शहरवजा गाव आहे औंध. देशविदेशात औंध ओळखलं जातं ते तिथल्या नितांतसुंदर संग्रहालयामुळे. त्याचं नाव आहे श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय. इथले संग्रहालय, देशातील इतर संग्रहालयांपेक्षा थोडेसे वेगळे म्हणावे असे आहे. इथे संग्रहित आहेत आपल्या महाराष्ट्रातील, देशातील आणि जगभरातील अस्सल परंतु दुर्मीळ चित्रकृती, शिल्पकृती आणि काही प्रसिद्ध चित्रे, शिल्पकृतींच्या प्रतिकृती. या कलाकृती साकारल्यात प्रत्यक्ष त्या त्या काळातील जगप्रसिद्ध कलाकारांनी. या कलाकृतींना इथे महाराष्ट्रात, औंधला कष्टपूर्वक, कलात्मकतेने, तितक्याच सौंदर्यदृष्टीने जमवलंय एका मराठी संस्थानिक राजाने. त्याचं नाव श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी राजे, औंध संस्थान. हा राजा होता कलारसिक, कला-इतिहास अभ्यासक, कलासंग्राहक, छायाचित्रकार, कलाकारांचा आश्रयदाता आणि महत्त्वाचे म्हणजे स्वत: एक सिद्धहस्त चित्रकार.
औंधला पोहोचायला प्रथम साताऱ्याला जावे लागते. सातारा शहर मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा मोठय़ा शहरांशी महामार्गाने आणि लोहमार्गाने जोडलेले आहे. औंधला जवळ असणारे दुसरे छोटे शहर म्हणजे रहिमतपूर. हे शहरदेखील रेल्वेने जोडलेले आहे. ऐतिहासिक शहर रहिमतपूर आणि तिथली १७व्या शतकातील रणदुल्लाखानची कबर आणि इस्लामी वास्तू पाहून पुढे औंधला जाता येते. औंधला जाणारा रस्ता बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे हिरव्या, पिवळ्या, नानाविध छटांनी दुतर्फा बहरलेला असतो. नागमोडी वळणं घेत जाणारा हा रस्ता एका छोटय़ा घाटमाथ्यावर येऊन पुढे औंध शहराकडे वळतो. औंध शहरात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे दूरवर एक उंच पहाड आणि त्यावर तटबुरुजाच्या कोंदणात एका मंदिराचा कळस दिसू लागतो. हे मंदिर आहे श्री यमाई देवीचे; श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांची ही कुलदेवता. मुख्य रस्त्याला फाटा देत एक रस्ता डोंगरमाथ्याच्या दिशेने मंदिराकडे चढताना दिसतो. वळण घेत डोंगराच्या मधल्या टप्प्यावर हा रस्ता पोहोचतो तो औंधच्या श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाच्या आवारात. इथे उभी आहे १९३८ साली बांधून पूर्ण झालेली, निळेसावळे डोंगर व आकाशाच्या सान्निध्यातील संग्रहालयाची पांढरी करडी इमारत; वृक्ष, वेली, बगिचांनी वेढली आहे. या इमारतीची रचना खास संग्रहालयासाठीच केलेली आहे. या संग्रहालय वास्तूचे वैशिष्टय़ म्हणजे इमारतीच्या आत सूर्यप्रकाशाची केलेली कल्पक योजना. इथे मांडलेल्या प्रत्येक कलावस्तूवर दिवसभर पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश सौम्यपणे पसरलेला असतो. या इमारतीच्या छतभिंतींची खास रचना इथल्या शिल्पचित्रांना नैसर्गिक प्रकाशात उजळवून टाकते. प्रकाशाचे असे नियोजन चित्रातील रंग, रेषा, पोत आणि शिल्पांवर घडणाऱ्या छाया-प्रकाशाच्या खेळाला अप्रतिम लावण्य बहाल करते.
आज श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक वेगळे आणि खास असे संग्रहालय ठरले आहे. या संग्रहालयाच्या आवारात प्रवेश करताच दिसते ते श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींचे तिथल्या आसमंतात असणारे मेघडंबरीतील स्मारकरूपी अस्तित्व. त्यानंतर आहेत इतिहासाचे पाषाणरूपी साक्षीदार; अप्रतिम जैन, वैष्णव, गजलक्ष्मी इत्यादी मूर्तीचे अवशेष, प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या शिळा- ज्याला ‘वीरगळ’ म्हणतात ते, पतिनिधनानंतर सती गेलेल्या वीरांगनांच्या ‘सतीशिळा’, ‘शिलालेख’ आणि इतर अवशेष. मुख्य इमारतीच्या समोर आवारात उभे असलेले रूपवान संगमरवरी पुतळे आणि यातून पुढे दिसतो तो या संग्रहालयाचा कमानीचा वऱ्हांडा. त्यासमोर प्रवेशद्वार आणि त्यावर विराजमान असलेली रिद्धीसिद्धीसह श्रीगणेशाची प्रतिमा, सकळ कलांची देवता.
श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाचा विस्तार एकूण अठरा प्रशस्त कला विभागांचा असून, त्याखाली आणि वर अशा दोन भागांत विभागल्या गेल्या आहेत. तळाचा मध्यवर्ती भाग पुन्हा दोन विभागांत विभागून, यात प्रामुख्याने पाषाण आणि धातू शिल्पांची मांडणी केलेली आहे. इथली सर्व शिल्पे नैसर्गिक प्रकाशात उजळलेली असतात. या शिल्पांच्या लयदार, आरसपानी शरीरावर होणाऱ्या छायाभेदामुळे शिल्पसौंदर्याची नेत्रसुखद अनुभूती येते. इथल्या संग्रहात आहेत काही दिग्गज कलाकारांनी साकारलेली अस्सल शिल्पं, तर काही जागतिक कीर्तीच्या कलाकारांनी साकारलेल्या महान कलाकृतींच्या हुबेहूब प्रतिकृती, त्याही तितक्याच तोडीच्या कलाकारांनी घडवलेल्या. यातल्या काही प्रतिकृती तर थेट १५-१६व्या शतकातल्या अलौकिक ठरलेल्या ख्यातकीर्त कलाकारांच्या. या प्रतिकृतीच्या मांदियाळीत आहेत खुद्द मायकल अॅन्जलोच्या (१४७५-१५६४) ‘डेविड’ची प्रतिकृती, तर इटालियन शिल्पकार अन्तोनिओ कानोव्हाच्या (१७५७-१८२२) तीन सौंदर्यवतींच्या अप्रतिम समूह शिल्पाची प्रतिकृती ‘थ्री ग्रेसेस’ आणि ‘व्हीनस इटालिका’सारखी नितळ संगमरवरी सौंदर्यवती. पूर्णाकृती धातुप्रतिमेत प्रसिद्ध इटालियन शिल्पकार, जियोवानी दा बलोनिया (१५२९-१६०८) याची ‘फ्लाइंग मक्र्युरी’ नावाची जगन्मान्य शिल्पप्रतिकृती; इथल्या शिल्पसंग्रहाची शोभा वाढवत आहे. हा शिल्पकार आपली शिल्पे कांस्य आणि पाषाणासारख्या दोन वेगवेगळ्या माध्यमांत लीलया साकारत असे. या झाल्या काही पाश्चात्त्य कलाकारांच्या प्रसिद्ध कलाकृतींच्या अप्रतिम प्रतिकृती. महाराष्ट्रातल्या काही महान शिल्पकारांच्या संगमरवरी, कांस्यधातूच्या अस्सल कलाकृतीदेखील इथे प्रदर्शित आहेत. त्यात कोल्हटकरांनी घडवलेली छत्रपती श्रीशिवाजी महाराजांची दोन पूर्णाकृती देखणी कांस्यशिल्पे, एक युद्धसज्ज आवेशपूर्ण, तर दुसरे धावणाऱ्या घोडय़ावर बसलेले. याच कलाकाराचे डरकाळी फोडणाऱ्या, परंतु सावधपणे बसलेल्या आणि आपल्या शेपटीची हालचाल करणाऱ्या वाघाचे शिल्प नक्कीच लक्ष वेधून घेते.
वर्षां, ग्रीष्म, वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षांतले सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना मानवी रूपात, ते ही स्त्री रूपात कल्पून, त्यांची नितांत सुंदर शिल्पं इथे पाहायला मिळतात. या शिल्पांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचं सहज जाणवणारं मराठीपण. जणू महाराष्ट्रातल्या आसमंतात दरवळणारे हे सहा ऋतू मराठमोळं लावण्य लेवून प्रत्यक्ष आपल्यासमोर भासमान झालेले आहेत. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला नक्कीच बोलकं करते. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘वसंत वाटे अतिगोड साचा.. शृंगार केला विविध फुलांचा.. वेणींत कानांत किर कटीला. गळ्यांत दुर्डीत उणे न त्याला..’ या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंतललनेचं मूर्तरूप एकमेकांस साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन; एका हातात फुलांची परडी; तर दुसऱ्या हातात सनाल कमलपुष्पे घेतलेली. शिवाय मनगटावर सुमनवलये, तर दंडावर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत; गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज आणि टपोऱ्या गुलाब पुष्पांची दाट गुंफलेला. गोंडय़ाचा, जाडसर पण नाजूक हार गळ्यात घालून सुहास्यवदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. याउलट ग्रीष्म ऋतू वा ‘ग्रीष्मकन्या’ उन्हाच्या झळांनी व्याकूळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’; आणि या ऋतुकन्येवर केलेली काव्य रचना, ‘घे विंझणां वातचि उन्ह आला..ये घाम वेणीभर मुक्त केला.. त्यागी तसे आभरणांसि बाला. हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला..’, मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतुकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतुराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत.
श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी शिल्पकलेलाही राजाश्रय दिला, त्यांनी अनेक स्थानिक शिल्पकार हेरून त्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी औंधला स्टुडिओची उभारणी केली. इतकेच नाही तर उत्तम शिल्पकामासाठी लागणारा उत्कृष्ट दर्जाचा संगमरवरी दगड ते दूर परदेशातून म्हणजे इटलीतून खास औंधला त्यांच्या स्टुडिओत मागवत असत. राजेसाहेबांच्या अशा मार्गदर्शनाने औंधला खऱ्या अर्थाने प्रतिभावंत शिल्पकार तयार झाले. पांडोबा पाथरवट आणि त्याची दोन मुले, राजाराम आणि महादेव हे तीन शिल्पकार, औंधला श्रीमंत राजे भवानरावांच्याच आश्रयाने नावारूपाला आले. त्यांनी अनेक शिल्पं घडवली; त्यातली अनेक शिल्प या कलाकारांनी ‘इटालियन मार्बल’मध्ये जरी कोरली असली, तरी त्यातून साकार झाली, ती इथल्या मातीतली ‘मराठी कलाकृती’. या शिल्पकारांनी घडवलेल्या अनेक सुंदर कलाकृतींपैकी काही कलाकृती इथल्या संग्रहालयात आज पाहायला मिळतात;
संग्रहालयाच्या मध्यवर्ती भागात एक अवाढव्य बुद्धिबळाचा पट आपले लक्ष नक्कीच वेधून घेतो. या पटावर दिसतात ते एकमेकांसमोर युद्धासाठी सज्ज असलेले विविध वेशभूषेतील सैन्य. या सैन्यात आहेत शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी, परस्परविरोधी राजे, वजीर, अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि उंट. युद्धभूमीवर लाल करडय़ा रंगातील हे सैन्य त्यांच्या त्यांच्या चौकोनात सज्जपणे उभे आहे. बुद्धिबळाचा हा पट खेळ सुरू झाला की सजीव होई. दोन्ही बाजूंकडून जो हा खेळ खेळला जात असे तेव्हा ही प्यादी उचलून ठेवायला माणसे असत.
संग्रहालयाच्या आतील प्रशस्त प्रवेश मार्ग वेगवेगळ्या गॅलरीजना जोडला असून, या मार्गावर श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींचे आत्मचरित्र कृष्णधवल छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे. या छायाचित्रांतून पुढे सरकणारा त्यांचा जीवनप्रवास दर्शकास घेऊन जातो तो थेट भारतीय लघुचित्रांच्या, जलरंग, तैलरंगांच्या चित्रमयजगतात. इथल्या गॅलरीजच्या भिंतींवर विराजमान आहेत, प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे. जगद्विख्यात देशी- परदेशी चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती, तर काही चित्रकारांच्या एकमेव अस्सल चित्रकृती, अजिंठय़ाच्या चित्रांच्या आद्य प्रतिकृती, लाकडावर केलेले अप्रतिम कोरीव काम, हस्तिदंतातील प्रतिमा आणि त्यावरील नाजूक कलाकुसर, कांस्यमूर्ती, पुतळे, चिनीमातीची रंगीत नाजूक lp15भांडी, कापडावरील नक्षीकाम, गालिचे, शस्त्रास्त्रे, तिबेटी, चिनी, आफ्रिकन कलावस्तू, अशा नानाविध दुर्मीळ ऐतिहासिक कलावस्तू.
प्राचीन भारतीय चित्रकलेतील लघुचित्रांचा अर्थात ‘मिनिएचर पेंटिंग्ज’चा वेगळा असा खजिना इथल्या संग्रहात पाहायला मिळतो. यात मुघल, पहाडी-कांग्रा, राजस्थानी, पंजाब आणि दख्खनी चित्रशैलीच्या विजापूर, मराठा चित्रशैलीतील चित्रांचा समावेश आहे. यात काही रागमालाचित्रे, देवी-देवतांची चित्रे तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर काव्य करणाऱ्या कविभूषणाचे चित्र, छत्रपती श्रीशाहूमहाराज, पेशवे आणि काही मराठेशाहीतील प्रमुख सरदार यांची दुर्मीळ व्यक्तिचित्रे आहेत. परंतु या चित्रसंग्रहात सर्वात महत्त्वाचा आणि अद्वितीय आहे तो ‘किरातार्जुनीय’ या महाकवी कवी भारविच्या संस्कृत महाकाव्यावर आधारित लघुचित्रांचा देखणा चित्रसंच. महाकवी भारवि हा सहाव्या शतकातील एक प्रतिभासंपन्न संस्कृत कवी. महाकवी भारविच्या ‘किरातार्जुनीय’चा जवळपास शंभर चित्रांचा रंगीत संच चितारला आहे तो थेट अठराव्या शतकातील पहाडी चित्रकारांनी. कवी भारविचे ‘किरातार्जुनी’ हे सहाव्या शतकातील महाकाव्य, अनेक प्राचीन कलाकारांनी या काव्याचे रूपांतर शिल्प, चित्रात यापूर्वी केलेले आहेच.. या काव्याची भुरळ अगदी आजही तेवढीच आहे. हे काव्य आधारित आहे अर्जुन आणि किराताचे रूप घेतलेल्या देवाधिदेव महादेव यांच्यामधील युद्धावर. हे युद्ध म्हणजे शिवाने अर्जुनाची घेतलेली परीक्षा होती. ही परीक्षा का? तर अर्जुनास महादेवकडून तेजस्वी ‘पाशुपतअस्त्र’ प्राप्त करायचे होते म्हणून. ‘किरातार्जुनीय’ची कथा लघुचित्ररूपाने आपल्या समोर क्रमवार सरकत जाते ती अनेक प्रसंगांच्या चित्रणातून. हे प्रसंग बारकाव्यासह चितारलेत. यात डोंगर, झाडे, पाने, फुले, पक्षी, मृत अथवा जीवित पशू, पाणी, आकाश, देव, दानव, यक्ष, अप्सरा, राजमंदिरे, युद्धभूमी, परस्परविरोधी शस्त्रास्त्रे; जशी पर्जन्यास्त्र विरुद्ध अग्निस्त्र, सर्पास्त्र विरुद्ध गरुडास्त्र. आणि शेवटी अर्जुनाने प्रत्यक्ष पशुपती शिवाला प्रसन्न करून पाशुपतअस्त्र कसे मिळवले याचे मनोहारी दर्शन देत ही चित्रकथा संपते. भारविच्या काव्य प्रतिभेचे हे रंग आणि कुंचल्याच्या माध्यमातून साकार झालेले ‘चित्रकिरातार्जुनीय’ असे दुसरे नाही.
अजिंठा लेणीचा शोध आणि तिथली प्राचीन भित्तिचित्रे जगभराच्या कलाइतिहासाच्या विषयात एक आश्चर्याचा विषय ठरली गेली. या भित्तिचित्रांच्या प्रथम प्रतिकृती चितारल्या त्या इंग्रज चित्रकारांनी, परंतु चित्रकार आणि कला इतिहासकार असलेल्या श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीनी आणि त्यांच्या सहकारी चित्रकारांनी अजिंठय़ाच्या चित्रांच्या अनेक प्रतिकृती केल्या, त्याही रंगीत छायाचित्रणाच्या त्या वेळच्या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. आज अजिंठय़ाच्या या बहुमोल प्रतिकृती औंधच्या संग्रहालयाच्या कलादालनात पाहायला मिळतात.
पाश्चात्त्य चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती आणि काही चित्रकारांच्या दुर्मीळ, परंतु मूळ चित्रकृती हे या संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्टय़. प्रसिद्ध ‘रेनिसान्स’ चित्रकार लिओनाडरे दा विन्ची (१४५२-१५१९) याची ‘मोनालिसा’ आणि ‘सेंट जॉन इन द वाइल्डरनेस’ या दोन चित्रांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे आहेत. इटालियन चित्रकार राफिएल (१४८३-१५२०) याचे गाजलेले चित्र ‘मॅडोना ऑफ द चेअर’; प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार इंया ओगीस डोमिनिक एंग्रा (१७८०-१८६७) याची ‘द सोर्स’सारखी चित्रप्रतिकृती. या आणि अशा अनेक चित्रकृती सुवर्णजडित नक्षीदार चौकटीच्या कोंदणात एखाद्या अमूल्य रत्नासारख्या जपलेल्या आपल्याला इथे दिसतात. पाश्चात्त्य चित्रकारांच्या अस्सल चित्रात, स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को गोयां (१७४६-१८२८) हा ओल्डमास्टर्समधला शेवटचा चित्रकार त्यांनी स्वत: चितारलेले ‘मार्केट सीन’ हे चित्र; तर दुसरा स्पॅनिश चित्रकार एफ. लिंगर हिदाल्गो (१८८०-१९४५) याचे ‘पॅलेस ऑफ अॅलेक्झांडर’ आणि फ्रेडा मारस्टोन (१८९५-१९४९) नावाच्या चित्रकर्तीचे ‘सीन ऑफ टॉवर’ यासारखे जगद्विख्यात चित्रकार आणि त्यांच्या ‘ओरिजिनल’ चित्रकृती औंधच्याच संग्रहात आहेत. या संग्रहात विसाव्या शतकातील प्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर यांनी साकारलेले शिल्पदेखील आहे.
भारतीय चित्रकलेचा युगप्रवर्तक चित्रकार राजा रवी वर्मा (१८४८-१९०६) आणि श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी दोघेही समकालीन. दोघेही एकमेकांचे प्रशंसक होते. राजा रवी वर्माने चितारलेली तीन विख्यात चित्रे, ‘सैरंध्री’, ‘मल्याळम स्त्री’ आणि ‘दमयंती’ या संग्रहालयाच्या कलादालनात जपलेली आहेत. याव्यतिरिक्त प्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर (१८६७-१९४४) यांची चित्रे. चित्रकार मुल्लर (१८७८-१९६०) यांनी चितारलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चित्ररूप चरित्र. अॅन्तोनिओ त्रिंदाद (१८६९-१९३५) ज्यांची ख्याती पूर्वेचा ‘रेम्ब्रॉ’ अशी होती. महाराष्ट्रातले दिग्गज चित्रकार आबालाल रहिमान, माधव सातवळेकर, हळदणकर, बाबुराव पेंटर, रवींद्र मेस्त्री, जी. ठाकूरदास, एम.जी. गुजर, चित्रकर्ती अंबिका धुरंधर आणि बंगालच्या नंदलाल बोस, जे. पी. गांगुली, यामिनी रॉय, सरला वर्मा. सारदा उकील यांच्या प्रसिद्ध चित्रांनी इथले कलादालन सजले आहे. अर्थात एवढय़ावरच औंधचे संग्रहालय संपत नाही. श्रीमंत पंतप्रतिनिधीचे वडीलदेखील कलाप्रेमी होते. त्यांनी भिवा सुतार नावाच्या एका उत्तम चित्रकार, शिल्पकारास राजाश्रय दिला होता. या चित्रकाराने अनेक चित्रं काढली, पण त्याचे एक चित्र ‘रामपंचायतन’ खूपच प्रसिद्ध झाले, त्याच्या अनेक रंगीत शिळाछापप्रती निघाल्या, अनेकांच्या घरात त्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाल्या ते चित्र या संग्रहात आजही विराजमान आहे. या चित्रकाराव्यतिरिक्त बरमप्पा कोटय़ांळकर नावाचा दुसरा प्रतिभावान चित्रकार पंतप्रतिनिधींकडे होता. हा चित्रकार निष्णांत व्यक्तिचित्रकार, निसर्गचित्रकार होता, पण त्याची खरी प्रतिभा दिसत होती, ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांच्या चित्रणातून. ‘शिवाचे तांडव’, ‘राज्याभिषेक’, ‘कृष्ण’, ‘दत्त’ आणि ‘त्रिपुरासुरवध’ यांसारखी सुंदर चित्रं या चित्रकाराने साकारली. आज ही चित्रे त्या त्या चित्रकारांना समर्पित केलेल्या कला दालनातून मांडलेली आहेत.
हस्तिदंतात कोरलेल्या वस्तूंचे एक वेगळे दालन इथे आहे. या दालनात आहेत शुभ्र हस्तिदंतात कोरलेल्या नाजूक देवप्रतिमा, व्यक्तिप्रतिमा आणि नक्षीदार वस्तू. काही मूर्तीवर तर शुद्ध सुवर्णाचा वर्खदेखील जडवला आहे. हस्तिदंती प्रतिमांचे इथले वैशिष्टय़ म्हणजे त्यातल्या काही प्रतिमांची दिसणारी स्थानिक मराठी शैली. श्री राम, सीता, हनुमान, श्रीविष्णू शारदागणेश. इत्यादी मूर्ती मराठी शैलीत फारच खुलून दिसतात. हस्तिदंतात कोरलेल्या बंगाली आणि इतर शैलीतील मूर्तीसुद्धा इथे आहेतच. अर्थात हस्तिदंती कलेचे इथले दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे छोटी व्यक्ती शिल्पे. ही शिल्पे आहेत श्रीमंत श्रीनिवास महाराज आणि स्वत: श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि इतर व्यक्तींची. महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्तिशिल्प घडवलीत त्या त्या व्यक्तींच्या रंगचित्रांवरून. एकीकडे त्या व्यक्तीचे चित्र आणि दुसरीकडे ही छोटी शिल्प ठेवली की त्यातलं तंतोतंत साम्य लगेच लक्षात येतं. खरं तर हा एक दुर्मीळ कलाप्रकार इथेच पाहायला मिळतो. ही हस्तिदंती कला साकारली आहे महादेव पाथरवट आणि त्याच्या शिष्यांनी; औंधलाच हे कलाकर ही कला शिकले. गुडीगर नावाच्या कर्नाटकातील शिरसीच्या कलाकाराची चंदनाच्या लाकडातील दोन कलाकृती अप्रतिम काष्ठशिल्पाचा नमुना आहेत. एक श्रीदेवी यमाई आणि दुसरे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चंदनात साकार झालेले ‘शिवचरित्र’ अत्यंत नाजूकपणे कोरले आहे.
याव्यतिरिक्त स्वत: श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी चित्रित केलेली अनेक चित्रं इथल्या संग्रहालयाच्या एका दालनात मांडलेली आहेत. या चित्रात रामायणावर आधारित अनेक चित्रं आहेत. याशिवाय त्यांनीच चितारलेली, ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगावर आधारित चित्रेदेखील आहेत. सुप्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर यांच्या मते प्रतिनिधींच्या चित्राची एक वेगळी शैली होती; त्यांच्या त्या खास शैलीस त्यांनी ‘औंधस्कूल’ नावाने गौरविले होते.
औंधचे श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाचा फक्त एवढय़ाच संग्रहावर थांबले नाहीत तर आजही या संग्रहालयाचा चित्र, शिल्पसंग्रह समृद्ध होत आहे; त्यामुळे आधुनिक कलाकारांच्या अनेक गाजलेल्या कलाकृती आपल्याला इथे पाहावयास मिळतात. या संग्रहालयाच्या नावात ग्रंथालयाचा उल्लेख येतो कारण औंधच्या राजाने अनेक पुस्तकेही जमवली होती. त्यातूनच या ग्रंथालयाचा जन्म झाला. आज शेकडो दुर्मीळ पुस्तके अभ्यासकांसाठी इथे उपलब्ध आहेत.
औंध संस्थानचे तत्कालीन राजे श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीनी बांधलेले श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय वैशिष्टय़पूर्ण होते. इथली प्रत्येक अमूल्य कलावस्तू त्यांनी स्वत: देशविदेशात जाऊन जमवलेली. त्यांच्या या कलासंग्रहाचा आणि तद्नंतर संग्रहालय उभारण्याचा काही विशिष्ट हेतू होता; हा हेतू होता मराठी मनाच्या ज्ञानमय कलाजाणिवेचा, सौंदर्यदृष्टीचा आणि विशेष म्हणजे भविष्यातील कलाकारांच्या पिढीसाठी नवनिर्मितीच्या प्रेरणास्रोतांच्या आदर्श कलासंग्रहाचा. स्वातंत्र्यपूर्व काळात चित्रकला, शिल्पकला संग्रहालयाची अशी वेगळी, आदर्श कल्पना बहुधा महाराष्ट्रात, औंधलाच प्रथम साकार झाली असावी. आज श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीच्या मनातील संग्रहालयाची संकल्पाना सफल झाली आहे. हे संग्रहालय सर्वसामान्यांच्या कला जाणिवेचे, चित्रशिल्प कलेच्या अभ्यासकांचे प्रमुख केंद्र ठरले आहे.
डॉ. श्रीकांत प्रधान

adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’