हडाप्पा संस्कृतीपासून ते अगदी अलीकडच्या काळातील पुरातन वस्तू, कलाकृती, चित्रकला, प्रकृतिविज्ञान अशा अनेकविध विषयांना स्पर्श करणाऱ्या हजारो कलाकृतींचा खजिना एकाच ठिकाणी पाहायचा असेल तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाशिवाय पर्याय नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संग्रहालयांचे अनेक प्रकार असतात. एखादे संग्रहालय केवळ नाण्यांचे असते, एखादे केवळ चित्रकृतींचे असते, तर विविक्षित उत्खननातील सापडलेल्या वस्तूंनी एखादे संग्रहालय सजलेले असते; पण या साऱ्या वस्तू एकाच जागी पाहायच्या असतील तर आपल्याला थेट मुंबईच गाठावी लागेल.
तब्बल तीन एकरांवर विस्तारलेले छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अक्षरश: हजारो कलाकृतींनी समृद्ध आहे. पुरातन वस्तू, कलाकृती, चित्रकला, प्रकृतिविज्ञान अशा अनेकविध विषयांना स्पर्श करणारे हे संग्रहालय आपल्या समृद्ध अशा वारशाचे जतन करणारे आहे. इ.स.पूर्व २००० पासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंतच्या हजारो कलाकृतींना या संग्रहालयाने सामावून घेतले आहे.
देशातीलच नाही तर जगातील अनेक कलाकृतींचा वारसा जतन करणाऱ्या या संग्रहालयाची जन्मकथादेखील तितकीच रंजक आहे. प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारतभेटीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादे स्मारक बांधावे असा विचार करून १९०५ च्या ऑगस्टमध्ये मुंबईतील काही प्रतिष्ठित मंडळी टाऊन हॉलमध्ये एकत्र जमली होती. सर फिरोजशहा मेहता, न्यायमूर्ती बद्रुदीन तय्यबजी, नरोत्तम गोकुळदास, न्यायमूर्ती चंदावरकर, डेव्हिड ससून या मान्यवरांनी संग्रहालयाची संकल्पना उचलून धरली. खरे तर अशा एखाद्या संग्रहालयाची गरज या शहराला होतीच, त्याला प्रिन्स वेल्स यांच्या आगमनाच्या निमित्ताने चालना मिळाली आणि ११ नोव्हेंबर १९०५ ला प्रिन्स वेल्स यांनी दक्षिण मुंबईतल्या क्रीसेंट साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर या वास्तूची कोनशिला बसवली. मुंबईतील प्रतिष्ठितांच्या आणि बॉम्बे प्रेसिडन्सीच्या संयुक्त प्रयत्नातून संग्रहालयाची उभारणी सुरू झाली. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे त्याचे नामकरण करण्यात आले. इमारतीचा आराखडा कसा असावा यासाठी खुली स्पर्धाच घेण्यात आली. जॉर्ज विटेट या इंडो सॅरेसेनिक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वास्तुरचनाकाराचा आराखडा मंजूर करण्यात आला आणि एका भव्यदिव्य अशा वास्तूच्या बांधकामास १९०९ साली सुरुवात झाली. १९१४ साली या वास्तूचे बांधकाम पूर्णत्वास गेले तेव्हा तब्बल नऊ लाख रुपये खर्च झाला होता; पण ही इमारत संग्रहालय म्हणून सर्वासाठी खुली झालेली नव्हती. पहिल्या महायुद्धाच्या काळात या इमारतीचा वापर हा लष्करासाठी रुग्णालय म्हणून केला गेला. दरम्यानच्या काळात अनेक कलाकृती, वस्तूंचा संग्रह सुरूच होता. १९१५ मध्ये नाना फडणवीसांच्या संग्रहातील अनेक मौल्यवान कलाकृती सेठ पुरुषोत्तमदास मावजी यांच्याकडून मिळाल्या, तर १९१९ मध्ये मिरपुरखास या बौद्ध स्तुपातील उत्खननातील अनेक मौल्यवान अवशेष त्या उत्खननात सामील झालेल्या हेन्री कुझेन्स यांच्याकडूनच मिळाले.
आतापावेतो अनेक कलाकृतींचा संग्रह झाला होता. १९२१ मध्ये संग्रहालयाचे पहिले गाइडबुकदेखील प्रकाशित करण्यात आले आणि १० जानेवारी १९२२ रोजी संग्रहालय सर्वासाठी खुले करण्यात आले.
तेव्हापासून आजवर अनेकांच्या संग्रहातील शेकडो दुर्मीळ कलाकृतींनी येथील संग्रहात दिवसेंदिवस भरच पडली आहे. सर रतन टाटा आणि सर दोराबजी टाटा यांच्या संग्रहातील युरोपियन आणि पौर्वात्य शैलीतील चित्रकृतींनी तर दोन मोठी दालनंच व्यापलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्याच संग्रहातील अनेक मौल्यवान अशा भारतीय वस्तूंनी संग्रहालयाची शान वाढवली.
बॉम्बे नॅचरल सोसायटीच्या माध्यमातून डॉ. सलीम अली यांनी नॅचरल हिस्ट्रीचा विभाग समर्थपणे साकारला. स्वत: डॉ. सलीम अली या विभागाचे पहिले मार्गदर्शक लेक्चरर होते. विशेष म्हणजे हे सारे उभे करताना त्याची मांडणी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली आहे. म्हणजे हिमालयातील उंचीवर आढळणाऱ्या पक्ष्याची मांडणी करताना त्याला पूरक अशी पाश्र्वभूमीदेखील तयार करण्यात आली आहे.
संग्रहालयाकडे अशा अनेक वस्तूंचा ओघ सुरूच होता. १९९५ साली कार्ल आणि मेहरबाई खंडालावाला ट्रस्ट यांच्याकडून अनेक दुर्मीळ वस्तूंचा संग्रह मिळाला.

आज या संग्रहालयात सुमारे ५० हजारांहून अधिक वस्तूंचा समावेश दिसून येतो. पुरातन वस्तुसंग्रह, कलासंग्रह, प्रकृतिविज्ञानसंग्रह आणि चित्रसंग्रह असे ढोबळमानाने चार विभाग पडतात.
भारत, तिबेट, नेपाळ आणि पौर्वात्य देशांतील या साऱ्या कलाकृती अत्यंत निगुतीने येथे संरक्षित आणि संवर्धित केल्या आहेत. देशभरातील कलाविद्यालयातून मिळालेली दुर्मीळ अशा तब्बल दोन हजार मिनिएचर पेंटिंग्जचा अनमोल संग्रह येथे करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुघलकालीन चित्रकृतींचा अनमोल खजानादेखील आहे. प्राचीन भारतीय कलेचा वारसा असणाऱ्या अनेक शिल्पांची स्वतंत्र गॅलरीच दिसून येते. मौर्य आणि गुप्त काळातील अनेक अवशेष कलात्मक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भारतीय शिल्पकलेची सुरुवात ज्या हडाप्पा संस्कृतीपासून झाली त्या काळातील शिल्पकलेचे अनेक नमुने ही या संग्रहालयाची अनमोल ठेव म्हणावी लागेल.
त्याचबरोबर आणखीन तीन महत्त्वांच्या विभागांचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे सामुद्रिक वारसा दालन, प्राचीन शस्त्रे दालन आणि नाणीसंग्रह.
नौकावहनाची तांत्रिक माहिती, दुर्मीळ नकाशे याचे दालन आपल्या प्राचीन दळणवळणाबाबतची उत्सुकता शमविणार आहे. शस्त्र दालनातील अल्लाउद्दीन खिलजीची तलवार, सम्राट अकबराचे चिलखत आणि ढाल हे आणखीन एक दुर्मीळ आकर्षण म्हणावे लागेल. त्या जोडीला अनेक तलवारी, ढाली, चिलखते आणि इतर शस्त्रांनी इतिहासकालीन विपुल शस्त्रभांडारांची कल्पना येऊ शकते. नाणीसंग्रह पाहताना तर त्या त्या काळातील अर्थव्यवस्थेचे बदल हमखास जाणवतात.
२००८ मध्ये संग्रहालयात नूतनीकरणाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले. अनेक नवी दालने सुरू करण्यात आली. साहजिकच इतक्या विभिन्न प्रकारच्या हजारो कलाकृतींना सामावून घेणारे हे संग्रहालयदेखील तितकेच अवाढव्य आहे. या वास्तूलादेखील वारसा इमारतीचा प्रथम दर्जा प्राप्त झाला असून, ‘युनेस्को आशिया-पॅसिफिक हेरिटेज अॅवार्ड २०१०’ या सन्मानाने गौरविण्यात आली आहे. आता हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या नावाने ओळखले जाते. हे संग्रहालय व्यवस्थित पाहायचे तर किमान एक संपूर्ण दिवस तरी हवाच; पण आणखीन चिकित्सक पद्धतीने पाहायचे तर तीन-चार दिवस तरी लागतीलच. महत्त्वाचे म्हणजे संग्रहालय पाहताना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुमच्यासाठी ऑडिओ मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक विभागाची माहिती ध्वनिमुद्रित करण्यात आली असून त्याला विभागवार क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्याला हव्या त्या दालनात जायचे आणि त्या-त्या कलाकृतीच्या समोरील संबंधित क्रमांक दाबून त्याची माहिती ऐकायची. तसेच काही दालनांमध्ये दृक् श्राव्य सादरीकरणांची सोयदेखील आहे. त्यामुळे अगदी आरामात स्वत: हे संग्रहालय पाहणे सहज शक्य होते.
संग्रहालयाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे नियमितपणे आयोजित केली जाणारी वर्कशॉप्स, व्याख्याने आणि प्रदर्शने. कलाकृतींच्या जतनासाठीचा एक खास विभागच येथे कार्यरत असून त्यामध्ये अनेक अद्ययावत तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत.

संग्रहालयाचा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे जगभरातील नामवंत अशा संग्रहालयांतील दुर्मीळ कलाकृतींचे प्रदर्शन. परदेशातल्या संग्रहालयामधून दर्जेदार आणि दुर्मीळ अशा कलाकृती येथे आणण्यात येतात. त्यामुळेच अनेक मौल्यवान अशा जागतिक दर्जाच्या कलाकृतींचा आस्वाद आपल्याला येथेच घेता येतो. मागील दोन वर्षांत ब्रिटिश म्युझिअम लंडन येथून ‘ममी द इनसाइड स्टोरी’ आणि एंटवर्प येथील १६ व्या शतकातील चित्रकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
मुंबई दर्शनाच्या एक दिवसाच्या ट्रिपवर येणाऱ्या अनेक गाडय़ा येथे रांगेत उभ्या दिसतात; पण त्यामध्ये संग्रहालय पाहणे यापेक्षा गेटवे ऑफ इंडियाला भेट देण्यासाठी पार्किंग आणि चार क्षण विश्रांती असेच याचे स्वरूप असते. खरे तर हे असे चटावरचे श्राद्ध उरकण्याइतक्या गडबडीत हे संग्रहालय पाहूच नये. त्यासाठी ठरवून वेळ काढूनच जावे लागेल.

कसे जाल? केव्हा जाल?
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस अथवा चर्चगेट स्थानकापासून नियमित बससेवा उपलब्ध आहे. संग्रहालय आठवडय़ाचे सर्व दिवस खुले असते.
सकाळी १०.१५ ते ६.००
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात विशेष सवलत आहे, तर मंगळवारी मुलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवून मोफत प्रवेश देण्यात येतो.