lp21
रोजच्या जगण्याच्या लढाईत आपल्याला पैशांच्या मागे धावावं लागत असलं तरी प्रत्यक्षात या पैशांचा, नाण्यांचा उगम कसा झाला या विषयाचा इतिहास मांडणारं एक अप्रतिम संग्रहालय नाशिकला अंजनेरी इथं आहे.

नाशिकचा कुंभमेळा जवळ आला आहे. त्र्यंबकेश्वरला तर आता माणसांची रीघ लागेल. काही खास जाणकार, त्र्यंबकेश्वर गडावरील शिवाच्या जटा (टोपीलाव्हा) हा अद्भुत निसर्गाविष्कार पाहायलाही जातील, पण याच नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एक विलक्षण असे संग्रहालय व एक संस्था आहे हे मात्र बऱ्याच जणांना ‘ठावकी’ नसते! ते संग्रहालय व ती संस्था म्हणजे अंजनेरी येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज्’ (म्हणजेच भारतीय नाणेशोध संस्थान). भारतातीलच नव्हे तर जगातील नाणेप्रेमींची पंढरी!
आपण आज जे चलन वापरतो, त्याचा साक्षात् ‘इतिहास’ या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे. अखंडित ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या आपल्या भारतीय इतिहासाचे एक वैशिष्टय़ म्हणजे नाण्यांची किमान अडीच हजार वर्षांची अखंडित परंपरा! भारतात, मौर्य कालखंडाच्याही पूर्वी इसपू. ५०० पासून नाणी पाडली जात व ती आजही उपलब्ध आहेत. प्राचीन नाण्यांचा संग्रह, अभ्यास, संशोधन, अगदी लिलाव करणारे थोडे लोक नाहीत! मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली यांसारख्या ठिकाणी अनेक संस्था-संघटना हे ‘वारसा जतनाचे’ काम करीत आहेत. बस्तीमलजी सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली हे काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्लब ऑफ कलेक्टिंग रेअर आयटेम्स्’ या संस्थेचा प्रातिनिधिक उल्लेख पुरेसा ठरू शकेल. तसे पाहता नाण्यांचा संग्रह, अभ्यास १९व्या शतकापासून सुरू झाला. बाळशास्त्री जांभेकर, जस्टीन अॅबट, प्रिन्सेप इ. अनेकांचा उल्लेख या संदर्भात करता येईल. परंतु शास्त्रशुद्ध संस्थात्मक अभ्यास हा २०व्या शतकातला!
इ.स. १९८०मध्ये कमलेश के. माहेश्वरी या नाणी संग्राहक प्रेमीतज्ज्ञ अशा सुप्रसिद्ध उद्योगपतींनी नाणकशास्त्राच्या सुसंगत-शास्त्रीय अभ्यास व संशोधनासाठी भारतीय नाणेशास्त्र शोध संस्था (Indian Institute of Research in Numismatic Studies)  या संस्थेची स्थापना केली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नाशिकपासून साधारणत: २३ कि.मी. अंतरावर अंजनेरी डोंगराच्या कुशीत, निसर्गरम्य वातावरणात ही संस्था आहे. सुंदर अशा वास्तू, सुसज्ज ग्रंथालय, तारांकित वाटावे असे अभ्यागत निवास (गेस्ट हाऊस), तज्ज्ञ-सुस्वभावी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, अप्रतिम संग्रहालय अशी याची वैशिष्टय़े सांगता येतील. माहेश्वरींच्या सोबत नाणक पितामह पितामह (कै.) डॉ. परमेश्वरीलाल गुप्त यांनीही या संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला. ते या संस्थेचे प्रथम संचालकही होते.
नाणक संग्रहालय : ‘संग्रहालय’ ही संकल्पना जरी आधुनिक असली तरी त्याची पाळेमुळे ही जुन्या काळात जातात. आपल्या इतिहास, संस्कृती, गत अस्तित्वाच्या खाणाखुणा ‘पकडून’ ठेवणारे ठिकाण म्हणजे संग्रहालय! त्या अर्थाने संग्रहालय ही खरं तर एक स्मरणरंजनाची (Nostalgic) जागा होय. भारतीय नाणेशास्त्र शोध संस्थेचे ज्याप्रमाणे संशोधन, नाणक प्रशिक्षण कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे हे उपक्रम आहेत, तद्वत ‘नाणक संग्रहालय’ ही खासियत होय. रस्त्यावरूनच Money Museum ( मुद्रा संग्रहालय) हा फलक आपले लक्ष वेधून घेतो आणि संस्थेच्या प्रसन्न आवारात जाताच आपण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतोय, याची जाणीव होते. ‘पैसा व नाणी’ यांच्या संग्रहालयात प्रवेश करताना आपण याच पैशासाठी धावतोय हे पाहणारा काही काळ तरी विसरून जातो व एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.
lp22
पुरातत्त्वशास्त्राचे महान पीठ असलेल्या डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या एका विधानाची या ठिकाणी प्रकर्षांने आठवण होते. ते म्हणतात की इतिहास, पुरातत्त्व, नाणकशास्त्र या विषयांची खऱ्या अर्थाने जनसामान्यांची नाळ जुळली पाहिजे. लोकाधार-प्रेम मिळाला तर या विषयाची अधिक जाणीव-जागृती व प्रगतीही होऊ शकेल. त्यासाठी मात्र या विषयांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचायला हवे. अंजनेरीची नाणेशास्त्र शोध संस्था नाण्यांबाबत हे कार्य बिनचूकपणे करीत आहे. दिवसागणिक किमान एक बस भरून माणसे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येतातच. खासगी पर्यटक वेगळे. जनसामान्यांपर्यंत चलनाचा इतिहास पोहचवण्याचे कार्य हे संग्रहालय अविरतपणे करीत आहे. रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता, हे आगळंवेगळं संग्रहालय सकाळी ९.३० ते १.०० व दुपारी २.०० ते ५.३० या वेळात प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले असते. आशिया खंडातील हे अशा प्रकारचे सध्या तरी एकमेव संग्रहालय आहे व संस्थाही एकमेवाद्वितीय अशीच आहे. खरं तर संस्था व संग्रहालय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेवटी दोहोंचे कार्य एकच-भारतीय नाणी, चलन यांचा संग्रह, अभ्यास, ज्ञानप्रसार व लोकाभिमुखीकरण!
मुद्रा संग्रहालयातील नाण्यांविषयी
नाणक पितामह (कै.) डॉ. परमेश्वरीलाल गुप्त यांच्या मते, आहत (Punchmarked) नाणी ही भगवान बुद्धांच्या म्हणजे इसपू. ६००-७०० इतकी जुनी आहेत. (परमेश्वरीलाल गुप्त यांनी यावर प्रबंध लिहिला आहे, विशेष म्हणजे हा प्रबंध प्रवासात हरवला असता त्यांनी तो पुन्हा लिहून पदवी मिळवली, ही तळटीप). अतिप्राचीन अशा या आहत नाण्यांवर कोणतीही लिपी वा मजकूर नसून फक्त सूर्य, चंद्र, झाड अशी चिन्हे आहेत! अंजनेरीच्या संग्रहालयात ही नाणी दिमाखात विराजमान आहेत. त्यांना पाहताना आपण सम्राट अशोकाच्या काळात कधी पोहोचलो हे आपणांसच समजत नाही. अर्थात या संग्रहालयात प्रामुख्याने ताम्रमुद्रा जास्त ठेवल्या आहेत.
सोने, चांदीची मौल्यवान नाणी संस्थेच्या तिजोरीत सुरक्षित आहेत. त्यांच्या जागी मात्र हुबेहूब प्रतिकृती ठेवल्या आहेत. भरपूर माहितीपूर्ण छायाचित्रे, तक्ते, नकाशे यांनी परिपूर्ण असे हे संग्रहालय असल्याने चलनाचा इतिहास आपल्या डोळय़ासमोर तरळतो.
आहत नाण्यांच्या नंतरच्या काळात भारतात आलेल्या परकीय ‘इंडो-ग्रीक’ राजांची नाणी ही कलात्मकदृष्टय़ा अत्यंत सुंदर आहेत. त्यांच्यावर एका बाजूस राजाचा अर्धपुतळा तर दुसरीकडे देवदेवतांचे चित्रण दिसते. ही नाणी आपणांस येथे पाहायला मिळतात. याप्रमाणेच महाराष्ट्राचे ‘पहिले राजे’ सातवाहन या राजघराण्याच्या उल्लेखाशिवाय नाण्यांचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही! ज्याचे घोडे तीन समूहाचे पाणी प्यायले आहेत, अशा गौतमीपुत्र सातकर्णीसारख्या पराक्रमी राजांचा इतिहास येथे नाणकरूपाने जतन आहे.
गुप्त राजांच्या नाणेरूपी सुवर्णयुगाच्या आधी भारतात राज्य केलेल्या कुषाण राज्यांची नाणी हीसुद्धा वैशिष्टय़पूर्ण होत. मानवी देहधारी शिव, कनिष्क या सम्राटाचा ‘सर्वधर्मसमभाव’ हाही आपणास कुषाणांच्या नाण्यांवर दिसतो.
गुप्त राजांची खास ‘देशी कलात्मक’ नाणी त्यानंतरच्या काळातील. त्याला नाणकशास्त्र उतरणीला लागलेला काळ (when numismatics lost its glory) अशा वर्णनाने ओळखले जाते, त्यातीलही नाणी पाहावयास मिळतात.
lp23भारतीय इतिहासाच्या मध्यमयुगीन काळातील दिल्ली सुलतान, मुघल यांची पर्शियन उर्दू लिपीतील नाणी त्यावरील टांकसाळींची नावे, राजांची बिरुदे ही समजून घेण्यासाठी प्राचीन नाण्याप्रमाणेच, मध्ययुगीन भारतीय नाण्यांवरील लिपी शिकविणारा अभ्यासक्रमही या संस्थेत उपलब्ध आहे. संग्रहालय पाहून कोणा व्यक्तीस अधिक जिज्ञासा निर्माण झाली तर संदर्भपूरक ग्रंथालय व नाण्यांची प्रकाशचित्रे असणारी तालिका (catalogue) येथे उपलब्ध आहे. मराठा कालखंड हा तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा खास जिव्हाळय़ाचा कालखंड. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ साली राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर पाडलेले ‘होन’ व ‘शिवराई’ आपणांस पाहावयास मिळतात. स्वत:च्या नावाचे चलन पाडणे हे मध्ययुगीन पद्धतीनुसार स्वातंत्र्य उद्घोषित केल्याचे एक लक्षण होते याची जाणीव ‘शिवराई’ नाणी पाहताना होते.
या संग्रहालयाची खासियत म्हणजे केवळ नाणीच नव्हे, तर नाणेरूप चलनापूर्वीच्या वस्तुविनिमय, धातु विनिमय, कवडी इ. चलनपद्धतींपासून ते एटीएमपर्यंतचा चलन प्रवास आपणांसमोर उलगडतो.
भारतीय नाणेशास्त्र शोध संस्थेच्या या विलक्षण संग्रहालयाची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे या विषयात ज्याची रुची निर्माण झाली आहे अशांसाठी संस्थेची नाणकविषयक प्रकाशनेही येथे विकत मिळू शकतात. संस्थेचे संचालक डॉ. अमितेश्वर झा, डॉ. दानेश मोईन व त्यांचे आजी-माजी सहकारी यांनी परिश्रमपूर्वक संशोधन करून जी गं्रथसंपदा निर्माण केली आहे ती येथे पाहावयास मिळते. अमितेश्वर झा यांच्या ‘भारतीय सिक्के, एक ऐतिहासिक परिचय’ या आशयाचे शीर्षक असणारे पुस्तक नवख्यापासून ते मुरब्बी संशोधकापर्यंत सर्वाना उपयुक्त असे आहे. १९८४ सालची ‘नाणी व इतिहास’, ‘१९८७ सालची’, ‘नाणी व पुरातत्त्वशास्त्र’, ‘१९९१ सालची नाणी व व्यापार’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे अहवालही पाहावयास मिळतात व त्यातून संस्था व संग्रहालयाचे नाणक शास्त्राला शास्त्रीय बैठक देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते.
या संग्रहालयाच्या जोडीला आदिम अशा गुहाचित्रांचा तसेच पुरातत्त्वीय विषयांचा अभ्यासही या ठिकाणी सतत चालू असतो.
‘भारतीय नाणक शास्त्राची मूलत्त्वे’ या पंधरा दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी (ज्याला मर्यादित जागा प्रवेश असतो.) देश-विदेशांतून शेकडो अर्ज येतात. या अभ्यासक्रमात प्रत्येक नाण्यांची हाताळणी, वर्गीकरण, वाचन, तालिकीकरण अशा अनेक विषयांचा समावेश असतो. नाण्यांचा अभ्यास कसा करावा हा ज्या प्रमाणे या कार्यशाळेचा हेतू आहे त्या प्रमाणे संग्रहालयात काही वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. उदा. नाण्यांच्या अभ्यासाचे ‘ट्रे’. ते या संग्रहालयात पाहावयास मिळतात.
थोडक्यात जुनी नाणी, मुद्रा, चलन यांचा इतिहास त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी या आगळय़ावेगळय़ा विषयास वाहून घेतलेल्या संग्रहालयास अवश्य भेट द्यावी.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Suspicion of explosives in air-conditioned coach of Dakshin Express panic among passengers
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तीन तास जीव मुठीत… प्रवाशांना अक्षरश: उड्या…
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Story img Loader