lp25
उस्मानाबादपासून केवळ अठरा किलोमीटरवर असलेले तेर येथील श्री रामिलगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय म्हणजे आपल्याला इसवी सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकाशी जोडणारा दुर्मीळ दुवा आहे.

संस्कृतीला बोलते करण्याचे काम प्राचीन कलावस्तू करीत असतात आणि या संस्कृतीचा एकत्रित इतिहास कलाकृतीच्या एकत्रीकरणातून म्हणजेच संग्रहालयाद्वारे स्पष्ट होतो. गतकालीन संस्कृतीचा चालताबोलता इतिहास म्हणजे संग्रहालय होय. वेगवेगळ्या कलावस्तूंचे जतन व संवर्धन इथे केले जाते. सर्वसामान्य नागरिकांना या वस्तूंबद्दल माहिती व्हावी, तिचे महत्त्व समजावे हा उद्देश संग्रहालयाचा आहे. संग्रहालयाचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्रात विविध संग्रहालये पाहावयास मिळतात. त्यापकी काही सरकारी आहेत तर काही खासगी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात राज्यातील १३ वस्तुसंग्रहालये आहेत. त्यापकी उस्मानाबादपासून केवळ १८ किलोमीटरवर असलेले तेर येथील श्री रामिलगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय हे एक होय.
उत्खननाद्वारे तेरचे प्राचीनत्व इसवी सनपूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकाच्या आधी जाते. त्याचे प्राचीन नाव तगर होय. तगरचा उल्लेख ‘पेरिप्लास ऑफ द एरेथ्रीअन सी’ या ग्रीक खलाशाने लिहिलेल्या ग्रंथात सापडतो. तसेच टोलेमीच्या ग्रंथात सुद्धा तगरचा उल्लेख सापडतो. सातवाहनकाळात आणि त्यानंतर सात-आठव्या शतकापर्यंत तेर खूप मोठी बाजारपेठ होती. या ठिकाणाहून रोमशी व्यापार चालत असे. तेरच्या अवशेषांची सविस्तर पाहणी हेन्री कझिन्स यांनी १९०१ मध्ये करून त्याचा वृत्तांत १९०२-०३ मध्ये प्रसिद्ध केला. त्यानंतर १९२९-३० साली निजाम सरकारच्या पुरातत्त्व विभागाने तेर येथील मंदिरांची पाहणी केली. १९६० साली एका पुस्तिकेमध्ये डग्लस बॉरेट यांनी येथील कलात्मक वस्तूंचा परिचय आणि तेथील त्रिविक्रम, उत्तरेश्वर, कालेश्वर इत्यादी मंदिरांची माहिती दिली. १९५८ साली डॉ. चापेकर आणि बॅनर्जी त्यानंतर १९६७-६८ मध्ये डॉ. मोरेश्वर दीक्षित आणि १९७५ मध्ये डॉ. देव आणि डॉ. पथी यांनी येथील टेकडय़ांवर उत्खनन केले. डॉ. जामखेडकर यांनीसुद्धा या ठिकाणी उत्खनन केले.
तेर येथील रहिवासी रामिलगअप्पा लामतुरे यांचे लक्ष तेर येथे सापडणाऱ्या पुराणवस्तूकडे गेले. चॅटर्जी आणि एक ब्रिटिश संशोधक यांच्याबरोबर रामिलगअप्पा लामतुरे या परिसरातील पांढरीच्या टेकडय़ा फिरत असताना तेथे काही खापरे, प्राचीन वस्तू मिळाल्या आणि असे करता करता त्यांना पुरातत्त्वशास्त्राची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी स्वत: जवळचे पसे देऊन तेथील नागरिकांकडून त्या प्राचीन वस्तू विकत घेतल्या. असे करता करता त्यांच्या जवळ २३ हजारच्या जवळपास वस्तू संग्रहित झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाला त्या वस्तू विनामूल्य दिल्या. त्यानंतर त्या वस्तूंचेच हे संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. शासनाने तेर येथे संग्रहालयासाठी स्वतंत्र इमारत बांधून त्या वस्तू प्रदíशत केल्या आहेत. लोकांना कायमस्वरूपी पाहण्यासाठी संग्रहालय इ.स. १९७९ पासून सुरू झाले आहे. स्वत:चे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत असूनही एक सुसंस्कारित व्यक्ती काय करू शकते हे रामिलगअप्पा लामतुरे यांनी स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले. त्यामुळेच या वस्तुसंग्रहालयाचे नाव ‘श्री रामिलगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय’ असे ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयात एकूण तीन दालनात वस्तू ठेवल्या आहेत.
येथे दगडी शिल्प गॅलरी आहे. तसेच हस्तिदंती वस्तू, शंखाच्या वस्तू, हाडाच्या वस्तू, केओलीअन मूर्ती, मातीच्या मूर्ती, प्राण्यांच्या प्रतिकृती, स्त्री प्रतिमा, धार्मिक संप्रदायाच्या प्रतिमा, वाहनारूढ प्रतिमा, जनावरांच्या प्रतिमा, मणी, ताईत, इत्यादी. मातीच्या व शाडू मातीच्या विविध वस्तू, भाजलेल्या मातीच्या व दगडी वस्तू, हस्तिदंती व हाडांच्या वस्तू, काचेच्या भाजलेल्या मातीच्या मण्याचे तुकडे, भाजलेल्या मातीच्या, दगडी व केओलीन वस्तू, तांबे, पितळ व मिश्र धातूची विविध नाणी, धातूच्या विविध वस्तू, दीप व प्रतिमादीप, पदके व पुतळ्या, कर्णभूषणे, नक्षीदार बूड असलेली बोळकी, छिद्रयुक्त तोटय़ा इत्यादी वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत.
दगडी शिल्पे :
येथील वस्तुसंग्रहालयात काíतकेयाची अतिशय सुरेख, कलात्मक आणि दुर्मीळ प्रतिमा आहे. काíतकेय चतुर्भुज असून तो मयूरारूढ आहे. त्याच्या उजव्या खालील हातात कुकुट असून उजव्या वरील हातात खङ्ग आहे, तर डाव्या वरील हातात खेटक (ढाल) असून खालील हात मोरावर ठेवला आहे. काíतकेयाचा मुकुट उत्कृष्ट असून त्यावर मुंड दिसत आहेत. कर्णभूषणे, ग्रीविका, यज्ञोपवित, उदरबंध आहेत. दंडामध्ये केयूर असून हातामध्ये कंकण आहेत. सर्व आभूषणांनी युक्त असलेली ही प्रतिमा सहाव्या-सातव्या शतकातील असावी असा संशोधकांचा दावा आहे. याशिवाय वामनाची एक समभंग, द्विभुज प्रतिमा येथे आढळते. त्याच्या एका हातात छत्र आहेत. ब्रह्माची भग्न झालेली प्रतिमा या ठिकाणी आहे. भरव प्रतिमा द्विभंग असून चतुर्भुज आहे. प्रभावलय असलेली ब्रह्मदेवाची प्रतिमा दिसते. परंतु हातातील सर्व आयुधे भग्न आहेत. द्विभंग अवस्थेतील भरवीची प्रतिमा या ठिकाणी असून ती चतुर्भुज आहे. तिच्या खालच्या उजव्या हातात खङ्ग असून वरील डाव्या हातात धनुष्य आहे, तर खालील डाव्या हातात पात्र आहे. शिवपार्वतीची आिलगन प्रतिमा या ठिकाणी दिसते. शिव चतुर्भुज असून पार्वती द्विभुज आहे. शिवाच्या उजव्या खालील हातात अक्षमाला असून उजव्या वरील हातात त्रिशूळ आहे. तर डाव्या वरील हातात नाग असून डावा खालील हात पार्वतीच्या खांद्यावर आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर असून डाव्या हातामध्ये पुष्प आहे. ही प्रतिमा सर्व अलंकारांनी युक्त आहे. याशिवाय उमा महेश्वराची परिवार देवतेसह (गणपती व काíतकी) प्रतिमा येथे आढळते. विष्णूची देखणी प्रतिमा आपणांस दिसते. खालील उजवा हात भग्न असून वरील उजव्या हातात चक्र आहे. तर वरील डाव्या हातात शंख असून खालील हातात गदा आहे. विष्णूचे वाहन गरुड अंजलीहस्तमुद्रेत त्याच्या उजव्या पायाजवळ बसले आहे. तर लक्ष्मी उजवीकडे उभी आहे. याबरोबरच पाश्र्वनाथ, महावीर, गौतम बुद्ध यांच्याही प्रतिमा या ठिकाणी पाहावयास मिळतात.
lp26
केओलीन प्रतिमा :
सातवाहन आणि त्यानंतरच्या काळातील केओलीनच्या मूर्ती दोन साच्यामध्ये बनविलेल्या आहेत. तेर, पठण, नेवासे, कोल्हापूर या ठिकाणच्या उत्खननात अशा स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा बहुसंख्य मिळाल्या आहेत. या प्रतिमांचे चेहरे या ठिकाणी पाहायला मिळतात. विविध केशरचना, मोठे डोळे, गोबरे गाल, पसरट नाक आणि विविध अलंकारयुक्त परिधान केलेल्या प्रतिमा आहेत.
हस्तिदंत वस्तू :
हस्तिदंतामध्ये कोरलेली स्त्री प्रतिमा म्हणजेच आरशाची मूठ ही या ठिकाणचे वैशिष्टय़ आहे. याशिवाय हस्तिदंताच्या बाहुल्या ज्यांच्या माथ्यावर छिद्र असून त्यात (बहुधा) चकचकीत तांब्याच्या पत्र्याच्या आरशाचे दांडे अडकविले जाते. अशा स्त्रीमूर्ती भारतातून रोमन साम्राज्याच्या प्रदेशात निर्यात केल्या जात असाव्यात. याचा पुरावा इटलीमध्ये पॉम्पे येथे सापडलेली हस्तिदंताची ‘लक्ष्मी’ची म्हणून मानली जाणारी मूर्ती होय.
शंखाच्या वस्तू :
शंखापासून बांगडय़ा, मणी, कर्णभूषणे, पेंडे, बौद्धधर्मीयांच्या त्रिरत्नासारखी धार्मिक चिन्हे असलेले मणी इत्यादी उल्लेखनीय वस्तू आहेत.
हाडाच्या वस्तू :
हाडापासून बनविलेल्या डोळ्यात काजळ घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टोकदार बनविलेल्या काडय़ा तसेच विणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या टोकदार व खाच केलेल्या काडय़ा आढळून येतात.
मूर्तीचे प्रकार :
पुरुष मूर्ती, स्त्री मूर्ती, माता आणि बालक, दम्पती, वाहनारूढ मूर्ती, जनावरांच्या मूर्ती, जलचरांच्या मूर्ती असे मूर्तीचे अनेक प्रकार आहेत. पुरुष प्रतिमा, स्त्री प्रतिमा, लज्जागौरी, कमलासना देवी, वाहनारूढ प्रतिमा आढळतात.
मातीच्या वस्तू :
जनावरांच्या प्रतिमा, मणी, ताईत, पट्टी मणी, पेंडे, दिवे, प्रतिमादिवे, पदके, पुतळ्या, कर्णभूषणे, नक्षीदार बूड असलेली बोळकी, छिद्रयुक्त तोटय़ा अशा प्रकारे मातीच्या मूर्तीचे वर्गीकरण केले आहे. संग्रहालयामध्ये तांबडय़ा रंगांची मृद्भांडी, काळी मृद्भांडी, तांबडी व काळी मृद्भांडी, चित्रित मृद्भांडी, नक्षीदार बोळकी, इत्यादी पाहायला मिळतात.
धातूच्या वस्तू :
धातूच्या वस्तू जास्त करून लामतुरे संग्रहालयातच आढळून येतात. या संग्रहालयात तांब्याचा एक आरसा असून त्याचा व्यास दहा सेंटिमीटर आहे. त्याच्या मधोमध एक उंचवटा असून त्याला खाली छोटासा दांडा आहे आणि तितक्याच मापाचे झाकण आहे. सातवाहन आणि त्यानंतरच्या विविध कालखंडातील नाणी येथे प्रदíशत करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने तांब्यांची, चांदीची व सोन्याची नाणी दिसून येतात.
lp27
दगडाच्या वस्तू :
पाटीचा दगड, शहाबादी दगड अशा दगडांपासून साचे तयार करता येतात. या साच्यांचे अनेक प्रकार आहेत. या साच्यांपासून मानवी आकृती, जनावरांच्या आकृती, दागिन्यांचे निरनिराळे भाग, पदके आणि पुतळ्या बनविले जात. नाणी पाडण्यासाठीही साचे वापरले जात. दगडी चार पाय असणारे पाटे आणि वरवंटे या भागात पुष्कळ सापडले आहेत आणि ते येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. याबरोबरच प्राचीन जात्यांचे अनेक प्रकार आपणास पाहावयास मिळतात. आडवा खुंटा घालून दोन स्त्रिया समोरासमोर बसून धान्य दळतील अशा प्रकारची जाती येथे दिसतात. स्तुपाच्या वेदिकेचा काही भाग संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. त्यावरील वेगवेगळी पुष्पे पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात. दगडी देवांचे टाक येथील विथीकेमध्ये प्रदíशत केले आहेत.
लाकडाच्या वस्तू :
उत्तरेश्वर मंदिराची द्वारशाखा काढून या ठिकाणी शिवाचे लहान गर्भगृह तयार करून बसविले आहे. अतिशय वैशिष्टय़पूर्ण अशी ही द्वारशाखा आहे. द्वारशाखेवर वेलबुट्टी, हंस आणि मिथुने कोरलेली आहेत. आतील शाखेवर चौकोनी भौमितिक नक्षी आहे. हेन्री कझिन्स यांच्या मते ललाटिबबावर शिव, विष्णू, ब्रह्मा आणि सूर्य यांची एकत्रित प्रतिमा म्हणजे ‘ब्रrोशानजनार्दनअर्क’ ही प्रतिमा आहे.
तेर वस्तुसंग्रहालयात इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सन सातव्या-आठव्या शतकापर्यंतच्या वस्तू पाहावयास मिळतात. महाराष्ट्राचा इतिहास जाणण्यासाठी हे वस्तु-संग्रहालय अतिशय उपयुक्त आहे.
डॉ. माया पाटील-शहापूरकर

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Suspicion of explosives in air-conditioned coach of Dakshin Express panic among passengers
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तीन तास जीव मुठीत… प्रवाशांना अक्षरश: उड्या…
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Tourists can now taste sweet honey along with tiger sighting at Tipeshwar Sanctuary
टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’
Story img Loader