lp30
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच रणगाडय़ाचे आकर्षण असते. पण पुण्यापासून जवळ अहमदनगर जिल्ह्य़ात एक अप्रतिम असे रणगाडा म्युझियम आहे याची माहिती किती जणांना असते?

पहिल्या महायुद्धात रणगाडा या अद्भुत वाहनाच्या शोधाने अनेक युद्धांचे निकाल बदलले. कुठल्याही पृष्ठभागावरून आग ओकत जाणाऱ्या या वाहनाने पायदळात महत्त्वाचे स्थान पटकावले. भारतीय युद्ध इतिहासातही रणगाडय़ांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. एकेकाळी विदेशी बनावटीचे रणगाडे वापरणारा आपला देश आज स्वत: निर्माण केलेले रणगाडेही वापरतोय. जागतिक आणि भारतीय सैन्यातल्या रणगाडय़ांचा चालता-बोलता इतिहास आपल्याला आशियातील एकमेव अशा अहमदनगर येथील ‘रणगाडा म्युझियम’मध्ये पाहता येतो.
१५व्या शतकात अहमदशाह बादशहाने अहमदनगरचा किल्ला आणि राजधानीचे शहर वसविले. या शहराचे भौगोलिक स्थान आणि महत्त्व पाहून इंग्रजांनी आपला सैन्यतळ याच गावात उभारला. स्वातंत्र्यानंतरही भारतीय लष्कराचा तळ या भागात ठेवण्यात आला. लष्कराच्या ताब्यात असलेल्या दारूगोळ्याच्या डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवर आशियातील एकमेव ‘रणगाडा म्युझियम’ची निर्मिती करण्यात आली. १६ फेब्रुवारी १९९४ ला जनरल बी.सी. जोशी यांच्या हस्ते या म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. या संग्रहालयाची उभारणी आणि देखभाल आर्मड् कोअर सेंटर अॅण्ड स्कूल, (Armoured Corps Centre and School) अहमदनगर या लष्करी आस्थापनातर्फे केली जाते.
lp33
नगर एसटी स्थानकापासून साधारणपणे चार किमी अंतरावर, नगर-सोलापूर रस्त्यावर भारतीय बनावटीचा ‘विजयंता’ रणगाडा आपले लक्ष वेधून घेतो. या रणगाडय़ाजवळून रणगाडा म्युझियमकडे जाताना प्रथम आपल्या गाडीची नोंद व तपासणी होते. कमानीतून आत शिरल्यावर माळरानातून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला ठेवलेला अमेरिकन बनावटीचा उद्ध्वस्त ‘पॅटन रणगाडा’ पाहायला मिळतो आणि आपली उत्सुकता चाळवली जाते. थोडय़ाच अंतरावर माळरानाचा कायापालट होऊन आपण गर्द झाडीने वेढलेल्या आणि नीटनेटकी व्यवस्था असलेल्या उद्यानापाशी पोहोचतो.
lp36
रणगाडा म्युझियममध्ये प्राथमिक अवस्थेतील रणगाडय़ांपासून पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वापरलेले ५०च्या वर रणगाडे लष्करी शिस्तीत मांडून ठेवलेले आहेत. पहिल्या चिलखती गाडीपासून आजच्या अद्ययावत रणगाडय़ापर्यंतच्या प्रगतीचा इतिहास इथे पाहायला मिळतो. म्युझियममध्ये शिरल्यावर दोनही बाजूंना ‘सेंच्युरियन टर्ट’ ठेवलेले आहेत. रणगाडय़ावरचा तोफ असलेला हा फिरता भाग कासवासारखा दिसतो म्हणून याला ‘टर्ट’(ल) म्हणतात. जमिनीवरून जमिनीवर व जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी याचा lp31उपयोग केला जात असे. रणगाडय़ासारखी याला चाके किंवा पट्टे नसतात. त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी दुसऱ्या वाहनाची मदत घ्यावी लागते. टर्टच्या पुढे रोल्स राइस कंपनीची पहिली चिलखती गाडी (Armoured Car) आपलं लक्ष वेधून घेते. रणगाडय़ाच्या शोधापूर्वी युद्धभूमीवर वापरण्यासाठी ब्रिटनच्या रॉयल नेव्हल एयर सव्र्हिसेसनी १९१४ साली रॉल्स राइस कंपनीबरोबर ‘रोल्स राइस सिल्व्हर घोस्ट’ या पहिल्या चिलखती गाडीची निर्मिती केली. पहिल्या महायुद्धात या गाडीचा वापर मोठय़ा प्रमाणात झाला. १९४१ मध्ये गाडीचे उत्पादन बंद करेपर्यंत त्यात अनेक बदल केले गेले. भारतात जनरल डायरने जालियनवाला बागेमध्ये शिरण्यासाठी या चिलखती गाडीचा उपयोग केला होता. ‘रोल्स राइस सिल्व्हर घोस्ट’च्या मागे ‘Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)’ ही १९३४ मध्ये जर्मनीत वापरली असलेली चिलखती गाडी त्यावरील नाझींच्या उलटय़ा स्वस्तिकच्या चिन्हामुळे चटकन नजरेत भरते.
चिलखती गाडी मजबूत असली तरी तिची चाके हाच तिचा मोठा अडथळा होता. त्यामुळेच युद्धभूमीवर गाडीच्या वापराला मर्यादा पडत. पहिल्या महायुद्धादरम्यान सर्वच देश अशा एका वाहनाच्या शोधात होते जे रस्ता नसलेल्या पृष्ठभागावरून म्हणजेच खाच, खळगे, खंदक, तारा, कुंपणे, दलदल, खडक, वाळू, वाळवंट, टेकडी या सर्वावरून मार्गक्रमण करू शकेल आणि त्याच वेळी शत्रूवर मारासुद्धा करू शकेल. त्यातूनच १९१६ साली इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जवळजवळ एकाच वेळी रणगाडय़ांची निर्मिती झाली. सुरुवातीच्या काळात lp32हा शोध गुप्त ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी या प्रोजेक्टला ‘मोबाइल वॉटर टँक’ असे नाव दिले. पुढील काळात रणगाडय़ात अनेक बदल झाले, पण त्याला चिकटलेलं ‘टँक’ नाव आजही सर्वतोमुखी आहे.
‘रोल्स राइस सिल्व्हर घोस्ट’समोरच अमेरिकन बनावटीची ‘एम३ ए१ रेकनन्सेस व्हेइकल’ (M3 A1 Reconnassance Vehical) ही चिलखती गाडी ठेवलेली आहे. या गाडीचा उपयोग शत्रूच्या भागात सैन्य पोहोचवण्यासाठी होत असे. या गाडीत काळानुसार बदल होत गेले. आताच्या आखाती युद्धात एम३ ए३ (M3 A3) या अत्याधुनिक तंत्राने सज्ज असलेल्या गाडीचा वापर केला गेला. त्याच्या पुढे ‘LVTA(4)’ हा पाण्यातून चालणारा अमेरिकन बनावटीचा ‘वॉटर बफेलो’ रणगाडा ठेवलेला आहे. युद्धनौकेवरील सामान किनाऱ्यावर आणण्यासाठी या रणगाडय़ाची निर्मिती करण्यात आली होती. यातही काळानुसार बदल होत गेले आणि प्रत्यक्ष युद्धातही याचा वापर केला गेला. ‘टोपास अॅम्पीबियस’ (Topas Ambiphious) आणि ‘शेरमन’ (Sherman) हे जमिनीवर आणि पाण्यात चालणारे रणगाडेही येथे पाहायला मिळतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आराखडा पास झाला म्हणून ‘व्हॅलेंटाइन’ नाव दिलेला रणगाडा दुसऱ्या महायुद्धात वापरला गेला. शत्रूचा मारा झाल्यावर पातळ पत्र्यामुळे हा रणगाडा लगेच पेट घेत असे त्यामुळे ‘मॅच बॉक्स’ या टोपण नावाने तो सैनिकांमध्ये ओळखला जात असे.
पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या रणगाडय़ांच्या गर्दीत एकमेव तरुण रणगाडा येथे पाहायला मिळतो. तो म्हणजे भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा ‘विजयंता’. १९६६ मध्ये नगरला झालेल्या शानदार समारंभात ‘विजयंता’ लष्करात दाखल झाला. भारत पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी करणाऱ्या या रणगाडय़ाचे उत्पादन १९८३ पर्यंत चालू होते. एकूण २२०० विजयंता रणगाडे लष्करात दाखल झाले होते. २००४ साली नगर येथील फायर रेंजवर या रणगाडय़ाला निरोप देण्यात आला होता. ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात बनवलेला विमानविरोधी तोफा असणारा ‘मटिल्डा’ रणगाडा आणि त्याचीच सुधारित आवृत्ती असलेले चर्चिल रणगाडे इथे पाहायला मिळतात.
lp35
दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर १९६५ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात रणगाडय़ांचा वापर मोठय़ा प्रमाणात झाला. या रणगाडायुद्धात पाकिस्तानी सैन्याचे पारडे जड होते. त्यांच्याकडे अमेरिकन बनावटीचे पॅटन, चॅफी, शेरमन असे अत्याधुनिक रणगाडे होते. भारतीय रणगाडय़ांपेक्षा त्यांची संख्याही जास्त होती. परंतु सियालकोट सेक्टर आणि चिविंडा-खेमखेरा, पंजाब येथे झालेल्या लढाईत भारतीयांनी पाकिस्तानी रणगाडय़ांना धूळ चारली. या युद्धात भारताने पाकिस्तानचे ४७१ रणगाडे नष्ट केले आणि ३८ रणगाडे ताब्यात घेतले. त्यातील शेरमन, एम-२४ चेफ, वॉटर बुलडॉग आणि एम-४७ पॅटन रणगाडे या ठिकाणी पाहायला मिळतात. युद्धात जिंकलेल्या रणगाडय़ांच्या तोफा खालच्या बाजूला वळवलेल्या असतात, त्याप्रमाणे या रणगाडय़ांच्या तोफाही खाली वळवून ठेवलेल्या आहेत. या लढाईत ‘पॅटन किलर’ किंवा ‘बहादुर’ म्हणून नावारूपाला आलेला ब्रिटिश बनावटीचा ‘सेंच्युरियन’ रणगाडा इथे पाहायला मिळतो. विमानातून नेता येण्यासाठी आकाराने छोटा आणि वजनाने हलका असा रशियन बनावटीचा पीटी-७६ आणि फ्रेंच बनावटीचा ‘एएमएक्स १३’ (AMX-13) हे छोटे रणगाडेदेखील येथे आहेत. १९६५च्या लढाईत वापरलेला ‘एएमएक्स – १३’ (AMX-13) हा भारतीय सैन्यात ‘जम्पिंग टँक किंवा बख्तावर’ या नावाने ओळखला जातो. या १९४८ साली झालेल्या पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धात १२००० फुटांवरील झोजिला खिंडीत भारतीय सैन्याने चढवलेला ‘स्टुअर्ट ’ रणगाडा दिमाखात उभा आहे.
याशिवाय अनेक रणगाडे काही विशिष्ट कामासाठी बनवण्यात आले होते, तेही इथे पाहायला मिळतात. ‘शेरमन बीच आर्मर्ड रेकव्हरी व्हेईकल’ आणि ‘सी लायन’ हे दोन रणगाडे बीचवर वाळूत आणि पाण्यात चालवण्यासाठी बनवण्यात आले होते. नॉर्मेडीच्या लढाईत त्यांचा चांगला उपयोग झाला. ‘सेंटॉर डोझर’ हा रस्ते बनवणारा रणगाडा, ‘चर्चिल ब्रिज’, ‘व्हॅलेंटाइन ब्रिज’, ‘शेरमन ब्रिज’ हे पूल तयार करणारे रणगाडेही इथे पाहायला मिळतात. रणगाडय़ाचा सर्वात नाजूक भाग म्हणजे त्याच्या चाकावरील पट्टा. त्याला लक्ष्य करण्यासाठी भूसुरुंग पेरले जातात. या भूसुरुंगांना नष्ट करणारा ‘शेरमन क्रॅब’ हा काहीसा विचित्र दिसणारा lp34रणगाडाही येथे पाहायला मिळतो. ‘हा-गो’, ‘चि-हा’ अशी विचित्र नावे असलेले जपानी बनावटीचे रणगाडे, रशियन बनावटीचे ‘टी४’ (T4) इत्यादी रणगाडे पाहायला मिळतात.
या म्युझियममध्ये तीन हॉल बांधलेले आहेत. पहिल्या मेमरी हॉलमध्ये ‘इंडियन आर्मीच्या आर्मर्ड कोअरचा’ १९७१ पूर्वीचा इतिहास आणि दुसऱ्या मेमरी हॉलमध्ये १९७१ नंतरचा इतिहास फोटो, दस्तऐवज, पदके, मॉडेल्स, युद्धाच्या व्यूहाचे नकाशे यांच्याद्वारे मांडलेला आहे. याशिवाय प्रत्येक रेजिमेंटची घोषवाक्ये, झेंडे, चिन्ह आणि आजपर्यंत त्यांना मिळालेल्या पदकांची यादी येथे लावण्यात आलेली आहे. या मेमरी हॉलचे आकर्षण म्हणजे १९७१ च्या लढाईत पाकिस्तानकडून हस्तगत केलेला झेंडा. तिसरा हॉल म्हणजे ‘हिरोज गॅलेरी’ आर्मर्ड कोअरमध्ये शौर्य गाजवलेल्या, शहीद जवानांची माहिती आणि फोटो असलेला हॉल आहे.
रणगाडा म्युझियमचा परिसर गर्द वनराईने नटलेला आहे. जागोजागी फुलझाडे, कारंजे, लॉन्सची रचना या परिसरास नयनरम्य करते. बसण्यासाठी जागोजागी बाक ठेवलेले आहेत. म्युझियममध्ये कॅफेटेरियाची सोय आहे. म्युझियमचे आकर्षण असणारे रणगाडे सुस्थितीत ठेवलेले आहेत. त्यांच्या बाजूला माहिती फलक लावलेले आहेत. लष्कराच्या ताब्यात असूनही छायाचित्रणास बंदी नाहीये. नाममात्र शुल्कात हे म्युझियम पाहता येते. तरीही आशियातील या एकमेव रणगाडा म्युझियमला भेट देणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. रणगाडय़ाचे आकर्षण लहान थोरांना सर्वानाच असते. एखादा दिवस थोडीशी वाट वाकडी करून नगरच्या रणगाडा म्युझियमला भेट द्यायला काहीच हरकत नाही.

adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’

म्युझियमला कसे जाल?
अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर अहमदनगरपासून चार किलोमीटर अंतरावर आर्मर्ड कॉर्पस सेंटर अॅण्ड स्कूलच्या आवारात हे संग्रहालय आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळापासून आजपर्यंतचे देश-विदेशी रणगाडे पाहायला मिळतात. पूल बनविणारा रणगाडा, भूसुरुंग नष्ट करत जाणारा ‘क्रॅब रणगाडा’, विमानातून नेता येण्याजोगा छोटा रणगाडा, १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने जिंकलेला पॅटन रणगाडा ही येथील मुख्य आकर्षणे आहेत. वर्षभर सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात हे रणगाडा म्युझियम पाहत येते. या म्युझियममध्ये प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्काबरोबरच राज्य किंवा भारत सरकारने दिलेले फोटो आयडेंटी कार्ड जवळ असणे आवश्यक आहे. (उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, इ.)
अमित सामंत