किल्ले, लेणी, मंदिर या सगळ्यांशिवाय महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा आहे तो समृद्ध लोकजीवनाचा. कलांचा. त्यांचा परिचय करून घेत, व अनुभवत केलेली भटकंती हासुद्धा जीवन समृद्ध करणारा आगळावेगळा अनुभव ठरू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुंदर देशा, पवित्र देशा याबरोबरच विविध परंपरांनी समृद्ध देशा आणि सुंदर कलांच्या देखण्या देशा असेही महाराष्ट्राचे वर्णन करायला हवे. जे जे उत्कट, उदात्त, उन्नत ते ते सर्वत्र इये देशी पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. सह्यद्रीच्या राकट रांगा, किल्ले, सागरकिनारे, मंदिरे, पुळणी, गर्द वनराई, खडकामध्ये खोदलेली लेणी, जुनी अप्रतिम मंदिरे आणि त्यामध्ये असलेल्या अत्यंत सुबक आणि देखण्या मूर्ती. अभयारण्ये ही तर आपली वारसास्थळे आहेतच. त्यांना आपण भेट देऊ शकतो.
याचबरोबर आपला महाराष्ट्र वर्षांनुवर्षे चालत आलेल्या असंख्य रूढी-परंपरा, त्यांचे विविध रूपाने केले गेलेले सादरीकरण, नाटय़, संगीत, विविध कला अशा असंख्य असंख्य रूपाने नटलेला आहे, समृद्ध आहे. या सगळ्या गोष्टींना परंपरांचा अप्रत्यक्ष वारसा अथवा अमूर्त वारसा असे म्हणता येईल. चित्रकथी, दशावतार, मारबत, गावपळण, झाडीपट्टी रंगभूमीसारख्या पारंपरिक कला, परंपरा यांचे वैविध्य आपल्याकडे आहे. पिढय़ान्पिढय़ा जोपासल्या गेलेल्या या कला, रूढी, परंपरा आपल्या महाराष्ट्राचे भूषण आहेत.
गावोगावी भरणाऱ्या जत्रा-यात्रा आणि त्यामध्ये सादर होणाऱ्या काही वैशिष्टय़पूर्ण कला पाहिल्या की निव्वळ आश्चर्य वाटते. परंतु याचबरोबर आपले दुर्दैव असे की, कमी होत चाललेला लोकाश्रय आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे यातल्या अनेक गोष्टी आता काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत. बेसुमार औद्योगिकीकरण, मनोरंजनाच्या आभासी साधनांकडे असलेला कल यामुळे या सुंदर कलांना काहीशी उतरती कळा लागलेली दिसते. परंतु या कलांचे सादरीकरण करणारे कलाकार मात्र निराश नाहीत. ते आजही अत्यंत जोमाने आपले काम करीत आहेत. एक ना एक दिवस लोकांना आमचे महत्त्व कळेल आणि ते परत या कलांचा आस्वाद पूर्वीसारखाच मोठय़ा उत्साहाने घेतील या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या मंडळींनी आजही या कला टिकवून धरल्या आहेत. यापैकी काही कला-परंपरांचा हा आढावा. त्या परंपरा अजूनही तितक्याच जोमाने चालू आहेत आणि सादर केल्या जातात. त्यांची माहिती व्हावी आणि जेव्हा पर्यटकांना शक्य होईल तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचा आस्वाद घ्यावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.
विविध लोककला, संगीत, नृत्य, नाटके इत्यादींनी जशा या कला बहरलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही खास गोष्टींची निर्मिती करणे हेसुद्धा यामध्ये सामील आहे. तांबट लोकांनी घडवलेली तांब्याची भांडी, बुरूड मंडळींनी बांबूपासून तयार केलेल्या विविध गोष्टी हासुद्धा आपला वारसाच नव्हे काय? वासुदेव, भुत्या, गोंधळी, कडकलक्ष्मी, हिरवादेव, दारात येणारा नंदीबैल ही सगळी मंडळी हळूहळू पडद्याआड जायला लागली आहेत. अशा अजूनही काही कला आहेत की ज्यांचे दर्शन आपण अवश्य घ्यावे, त्यांची माहिती घ्यावी आणि त्या आपल्या भटकंतीमध्ये मुद्दाम समाविष्ट करून घ्याव्यात. इथे सांगितलेल्या परंपरांशिवाय गावागावात आणखीही बराच मोठा वारसा जपलेला असेल यात शंकाच नाही.
या ठिकाणी लिहिलेल्या या कला काहीशा प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत. पण त्या खूपच वेगळ्या आणि लक्षवेधी आहेत, पर्यटकांनी त्या आवर्जून अनुभवायलाच हव्यात म्हणून हा खटाटोप…
आशुतोष बापट

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special