सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. अनेक कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, पत्रकार, अभिनेते, लेखक, राजकारणी या मातीने देशाला दिलेले आहेत. या मातीचा गुणधर्मच असा काही निराळा आहे की गावोगावी हमखास कोणी ना कोणीतरी कलाकार सापडतोच. दशावतार ही लोककला जशी इथली खासियत आहे तशीच आता लोप पावत चाललेली अजून एक कला या प्रांती आहे आणि ती म्हणजे चित्रकथी. चित्रकथी म्हणजे कागदावर पौराणिक कथांची चित्रे काढून ती चित्रे समोर धरून त्यावरून कथा सांगणे. कधी कधी त्या चित्राला खाली काठी लावून ती एकाशेजारी एक अशी चित्रे लावून त्यावरून कथा सांगणे. जसजशी कथा पुढे सरकत जाते, तसतसे त्या कथेच्या अनुषंगाने विविध चित्रे एकामागोमाग प्रेक्षकांच्या समोर येत राहतात. कलाकार ती चित्रे हातात धरून त्यानुसार कथा रंगवत असतो. कुडाळजवळच्या पिंगुळी या गावात एकच कुटुंब आता ही कला जोपासते आहे. चित्रकथी ही कला जी काही तग धरून उभी आहे ती केवळ या गंगावणे कुटुंबाच्या भरवशावरच टिकून आहे. परशुराम गंगावणे यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून ही कला जोपासली आणि आता पिंगुळीला ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ नावाचे या कलेला वाहिलेले सुंदर प्रदर्शन उभारले आहे. राजाश्रय असताना बहरलेली ही कला नंतरनंतर क्षीण होत गेली. परंतु गंगावणे यांनी अवहेलना सहन करीत ही कला टिकवून धरली आणि आता त्यांची मुले या कलेची जोपासना करत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुळात हे गंगावणे कुटुंब ठाकर या आदिवासी समाजातले. ठाणे, रायगड जिल्ह्यात सह्याद्रीला धरून जो ठाकर समाज आहे त्यातलेच हे कुटुंब. यांचे पूर्वज पोटापाण्याकरिता दक्षिणेला सरकत सरकत गेले आणि नंतर कुडाळ इथे स्थायिक झाले. जयराम, बापू महाराज, खेम सावंत या मंडळींचा मोठाच आश्रय या कलेला लाभलेला होता. चित्रकला, बाहुल्या करणे, त्यासाठी बकऱ्याच्या चामडय़ाला योग्य तो आकार देणे असे या कलेचे स्वरूप आहे. हा ठाकर समाज एकूण ११ कलांमध्ये तरबेज आहे. चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चामडय़ाच्या श्ॉडो पपेट असे खेळ करणे हा या मंडळींचा एक उद्योग. पण याचबरोबर मालवण, सिंधुदुर्ग या परिसरात पिढय़ान्पिढय़ा ही मंडळी हे खेळ करीत आलेली आहेत. ठाकरांचा गोंधळ असे त्याला संबोधले जाते. या समाजातील कलाकार मंडळींचे गुण ओळखून बापू महाराजांनी यांना कागद उपलब्ध करून दिला. पूर्वी पानावर चित्र काढणारे हे लोक मग कागदावर चित्रं काढू लागले आणि त्यातूनच चित्रकथीचा जन्म झाला. हाताने तयार केलेल्या १२ बाय १८ इंचाच्या कागदावर चित्रे काढून त्यांचे खेळ मंदिराच्या उत्सवात सादर होऊ लागले. चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करणारी ही जमात नंतर बाहुलेकर या नावानी ओळखली जाऊ लागली. कुडाळ तालुक्यातील केळबाई मंदिरात रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत या बाहुलेकरांचे खेळ चालत असत. खेळाच्या आधी तंबोरा पूजन केले जाई. या कलाकारांच्या उदरनिर्वाहाची सोय गावानेच करायची असे. गावातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक कवळी (पेंढा) द्यायची. प्रत्येक घराने एक शेर भात यांना द्यायचा अशी रीत असे. सुकळवाड, मळेवाड, तळावणे, गुळदिये, नेरूर इथे यांचे कार्यक्रम ठरलेले असायचे. गावातील प्रतिष्ठित मंडळी यांना कार्यक्रमासाठी कायमच आमंत्रित करीत असत. साळगाव इथल्या वेताळ मंदिरात तुळशीच्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी चित्रकथीचे खेळ पिढय़ान्पिढय़ा सादर केले जातात. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ हे बरेच नंतर आले. आधी फक्त चित्रकथीलाच मोठे महत्त्व होते. ही ठाकर मंडळी मग बांबूचे पेटारे डोक्यावर घेऊन कुडाळ ते कारवारपर्यंत सहा महिने खेळ करत फिरत असत. गावात गेल्यावर गावाच्या बाहेर यांची मुक्कामाची सोय असायची. ज्या गावात खेळ करायचा, त्या गावातल्या घराघरांत जाऊन मासे वाटायचे आणि ‘बाहुलेकर इलो’ अशी साद घालायची आणि गावात रात्री चित्रकथीच्या प्रयोगाला येण्याचे निमंत्रण द्यायचे अशी यांची प्रथा होती. राजाश्रय असल्याच्या काळात यांचा पेहेराव म्हणजे अंगात जाकीट आणि डोक्याला फेटा असा असायचा. राजाश्रय संपल्यानंतर ही कला भीकमागी कला झाली. समाजातील लोक नंदीबैल, पोतराज हे खेळ करीत गावोगावी फिरून उदरनिर्वाह चालवू लागले. हिरोबा म्हणजे मोरपिसाचा हिरवा कुंचा हातात घेऊन पोतराज नाचून खेळ करत असे म्हणून त्यास हिरवादेव असेही म्हटले जायचे. काही गावांची पिढय़ान्पिढय़ा असलेली परंपरा सोडली तर या कलेला अवकळा आली. तरीसुद्धा परशुराम गंगावणे यांनी ही कला जोपासली, वृद्धिंगत केली, अनेक हालअपेष्टा, अवहेलना सहन करून त्यांनी ही कला टिकवून ठेवली.
रणसिंग, म्हस्के, गंगावणे, सिंगनाथ, बाहुलेकर अशी या समाजातील मंडळींची आडनावे दिसतात. हे जरी ठाणे-रायगडवरून आलेले ठाकर असले तरी आता यांचे विवाहसंबंध फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यतच होतात. रायगडशी आता त्यांचा संबंध राहिलेला नाही. यांच्या लग्नविधीला भटजी नसतो तर पंच मंडळींच्या साक्षीने लग्ने केली जातात. मोहाची दारू सर्वाना वाटली जाते. जन्म-लग्न-मृत्यू अशा कोणत्याही प्रसंगी मोहाची दारू हा एक अविभाज्य घटक असतो. हिरोबाची (कुंचा) पूजा केली जाते. हातात मशाल घेऊन पोतराज त्याची पूजा करतो. राधानृत्य हा एक लग्नातला महत्त्वाचा घटक असतो. लग्नात चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या आणि पारंपरिक गाणी असे कार्यक्रम केले जातात.

गंगावणे यांनी आता पिंगुळीला सुसज्ज संग्रहालय उभारले आहे. त्याच ठिकाणी ते २-३ दिवसांची कार्यशाळासुद्धा आयोजित करतात. कुडाळच्या जवळच धामापूरला महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आहे. तिथे ४० ते ५० माणसांची व्यवस्था होऊ शकते. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळासुद्धा पिंगुळीला आयोजित केल्या जातात. पुणे आणि मुंबईलासुद्धा खास खेळ आणि कार्यशाळा घेतल्या जातात. खास आदिवासी उपकरणे, वाद्ये, पोशाख, हिरोबा, चित्रकथीसाठी वापरली जाणारी चित्रे आदींचे सुंदर प्रदर्शन पिंगुळीला ठाकर आदिवासी कला केंद्रात मांडलेले आहे. कलेचे एक विस्मयकारक दालनच आपल्यासमोर खुले होते. काही ठरावीक शुल्क देऊन हे प्रदर्शन पाहता येते. त्याचबरोबर इथेच कळसूत्री बाहुल्यांचे खेळसुद्धा दाखवले जातात. खरं तर चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या यांचे कार्यक्रम वाढदिवस, विविध समारंभ अशा वेळी मुद्दाम या लोकांना बोलावून सादर केले गेले पाहिजेत. म्हणजे ही कला जिवंत ठेवणे आणि या कलाकार लोकांना आर्थिक मोबदला देऊन प्रोत्साहित करणे हे दोन्हीही साध्य होईल. हल्ली छोटय़ा छोटय़ा समारंभातूनसुद्धा विविध खेळ खेळले जातात. तिथे ही कला जर सादर केली तर आपला सांस्कृतिक वारसा लोकांसमोर आणण्यास हातभार लागेल. महाराष्ट्र शासनाने गंगावणे यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे. विविध सांस्कृतिक समित्यांवर कला सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. हे अत्यंत जिव्हाळ्याने जोपासलेले प्रदर्शन आणि टिकवून धरलेली ही चित्रकथीची कला मुद्दाम खास वेळ काढून भेट देण्याजोगी आहे. कुडाळपासून अगदी तीन कि.मी. वर मुख्य हमरस्त्याच्या बाजूलाच असलेले हे प्रदर्शन प्रत्येकाने पाहावे असेच आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग किंवा गोव्याला जाताना अगदी आवर्जून पिंगुळीला थांबावे आणि कलेचा एक मोठा खजिना मनसोक्त पाहून घ्यावा.
केव्हा जावे? कसे जावे?
कुडाळ एसटी स्टँडवरून तीन किलोमीटरवर असलेल्या पिंगुळी येथे जाण्यासाठी रिक्षेची सोय आहे. दूरध्वनीवरून पूर्वसूचना दिल्यास वर्कशॉप आयोजित केले जाऊ शकते.
पत्ता : ठाकर आदिवासी कला अंगण, मु.पो. पिंगुळी (गुढीपूर), एम.के.जी. रोड, महामार्ग क्र. १७, तालुका- कुडाळ,
जिल्हा- सिंधुदुर्ग. पिन- ४१६ ५२८
संपर्क: ०२३६२-२२२३९३/०९४०४९१९१६१/०९९८७६५३९०९