lp47सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या दक्षिणेचा मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तालुक्यांचा भाग म्हणजे ढोबळमानाने मालवणी मुलूख समजला जातो. पश्चिमेला अथांग सिंधुसागर आणि पूर्वेला पाठीशी उभा असलेला सह्याद्री ही तर कोकणची खासियत. इथल्या मातीत अनेक कला जोपासल्या गेल्या. दशावतार ही इथली अगदी वैशिष्टय़पूर्ण अशी लोककला. जी इथे रुजली, जोपासली गेली, आपले एक खास वैशिष्टय़ सांभाळून ही कला वाढली. दुर्दैवाने आज या कलेला काही चांगले दिवस नाहीयेत. एक भरभराटीला आलेली कला काहीशा विपन्न अवस्थेमध्ये आज आहे. नक्की ही कला काय आहे आणि त्याचे निराळेपण कशात आहे हे पाहिले की आपणसुद्धा चकित होऊन जातो. 

भाते कापून झालेली असतात. विविध धान्यांच्या राशी शेतकऱ्याच्या खळ्यात उभ्या असतात. थंडी आता कुठे इथल्या मालवणी मुलुखात स्थिरावलेली असते. आणि इथे दहीकाला आणि दशावताराचा हंगाम सुरू होतो. तुळशीचे लग्न झाले की गावोगावचे दशावतारी आपल्या डोक्यावर सामानाचे पेटारे घेऊन गावोगाव फिरू लागतात. ‘दशावतारी इले’ अशी बातमी चाफ्याच्या फुलाच्या घमघमाटासारखी गावोगावी दरवळते. सारा मालवणी मुलूख मग दशावताराच्या नाटकांची आतुरतेने वाट पाहू लागतो. अनेक गावांतील देवस्थानांचे दशावतारी मंडळांशी संधान जुळलेले असते. त्या त्या गावात दशावतारी मंडळींचा मुक्काम पडतो. दशावतार म्हणजे विष्णूच्या दहा अवतारांची कथा. त्याचबरोबर पुराणातील विविध कथांवर आधारित बसवलेले नाटक म्हणजे दशावतार. गावातली हौशी मंडळी, शेतकरी ही लोकच अशा प्रकारची नाटके गावोगावी करीत असतात. दिवसभर शेतात राबून रात्री देवळाच्या आवारात मनोरंजनाची ही एक मोठीच सोय मालवणी मुलुखात जोपासली गेलेली आहे. दशावताराला नेपथ्य काहीच नाही. रंगमंचावर एक बाकडे मधोमध मांडलेले असते. बाजूला पेटीवाला, तबलेवाला आणि झांजवाला असे तीनच वादक. आणि एवढय़ाच संपत्तीच्या जोरावर ही मंडळी आपली कला सादर करतात. वेशभूषाकार, रंगभूषाकार असली चैन इथे कधीच परवडणारी नाही. प्रत्येक कलाकार आपली वेशभूषा आणि रंगभूषा स्वत:च करीत असतो. स्त्री पात्र रंगवणारा कलाकार इतकी अप्रतिम रंगभूषा करतो की प्रत्यक्ष रंगमंचावर अगदी शपथेवरसुद्धा सांगून खरे वाटणार नाही इतकी हुबेहूब स्त्री व्यक्तिरेखा साकारली जाते. प्रत्येक पात्राचा स्वत:चा एक पेटारा असतो. त्यामध्ये सगळी सामुग्री भरून ठेवलेली असते. सुरुवातीला या सर्व साधनसामुग्रीची पूजा केली जाते. गणपतीच्या मुखवटय़ाची पूजा केली जाते. आणि नंतर मग सगळे कलाकार आपापल्या नाटकातील पात्रानुसार रंगभूषा आणि वेशभूषा साकार करू लागतो.
दशावतार या नाटय़प्रकारचे एकमेवाद्वितीय वैशिष्टय़ म्हणजे या नाटकाला संहिता अजिबात नसते. जी कथा रंगमंचावर सादर करायची आहे ती कथा दिग्दर्शक सर्व कलाकारांना समजावून सांगतो. मग ही सगळी पात्रे अगदी उत्स्फूर्तपणे हे नाटक प्रेक्षकांसमोर सादर करतात. सुरुवातीला गणपतीचा प्रवेश, त्याची आरती होते आणि मग गणपती प्रसन्न होऊन सर्वाना आशीर्वाद देऊन परत जातो. मग सरस्वतीचे पूजन होते. मग नाटकाचा सूत्रधार रंगमंचावर येतो आणि आज कोणते नाटक सादर होणार आहे याची कल्पना प्रेक्षकांना देतो. सूत्रधाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. संपूर्ण नाटकाचे तो इतक्या योग्य आणि प्रत्ययकारी संचालन करत असतो की कुठेही गडबड, घोटाळा कधीच होत नाही. मग नाटकानुसार एक एक पात्रे रंगमंचावर येऊ लागतात आणि कथा पुढे सरकत असते. प्रत्येक जण आपापले संवाद ठरवतात आणि त्यात कुठेही विसंवादी सूर येत नाही. पाहणाऱ्याला समजत पण नाही की या नाटकाला कोणतीच संहिता नाहीये. कथा या सर्वसाधारणपणे पुराणातल्या किंवा रामायण, महाभारतातल्या असतात. परंतु केवळ एवढय़ाच शिदोरीवर रात्र रात्र ही नाटके रंगवली जातात हे एक मोठे आश्चर्यच आहे. हिडिंबा युद्ध, शंकासुर वध, अभिमन्यू वध ही काही खास नाटके लोकांची कायमच आकर्षणे ठरलेली आहेत. कोकणी माणसाला सुखान्त आवडतो. आणि म्हणूनच दशावतारी नाटके ही बहुधा सुखान्तच असतात. नाटक संपल्यावर प्रेक्षकांमध्ये थाळी फिरवली जाते आणि मग प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार त्या थाळीत पैसे टाकतात. गावातील श्रीमंत आणि मातब्बर व्यक्तींकडून मग कलाकारांना खास बक्षिसी दिली जाते.
पूर्वीच्या काळी रात्र रात्र चालणारी ही दशावतारी नाटके आता मात्र जेमतेम दोन अडीच तासांची असतात. आता प्रेक्षकांची मागणीसुद्धा थोडक्यात प्रयोग करण्याची असते. मोचेमाडकर, वालावलकर, चेंदवणकर अशी काही प्रख्यात दशावतारी नाटक मंडळी अजूनही या मुलुखात आपले बस्तान बसवून आहेत. अनेक महान कलाकारांनी ही कला मन:पूर्वक जोपासली आणि वृद्धिंगत केली. त्यातले राजाभाऊ आजगावकर, धोंडी महानकर, गंगाराम मेस्त्री, बाबा पालव अशा अनेकांची नावे घेता येतील. बाबी नालंग या कलाकाराला तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या दशावतारातील कलेबद्दल पुरस्कार देऊन गौरवले आहे. इतकी उंची गाठलेला हा कलाप्रकार सध्या मात्र दूरदर्शन, विविध वाहिन्या, त्यावरील रटाळ मालिकांपुढे झाकोळला गेला आहे. दशावताराला खूप मोठा इतिहास आहे. इ.स. १७२८ मध्ये शामजी नाईक काळे यांनी दशावताराचा पहिला प्रयोग आडिवरे इथे महाकालीच्या मंदिरामध्ये केल्याची नोंद मिळते. परंतु शामजी नाईकांनी या कलेचा जीर्णोद्धार केला असावा. कारण दशावताराचे उल्लेख रामदासस्वामींच्या दासबोध या ग्रंथामध्ये आढळतात. समर्थ दशावताराबद्दल असे लिहितात की
‘खेळता नेटके दशावतारी,
तेथे येती सुंदर नारी
नेत्र मोडिती कलाकुसरी,
परी ते अवघे धटिंगण’
(दासबोध ६-८-११)
दशावताराचे इतके समर्पक वर्णन दासबोधात आले याचा अर्थ हा नाटय़प्रकार खूप जुना होता यात शंकाच नाही. काही काळ तो सुप्तावस्थेत गेला असावा आणि शामजी नाईक-काळे यांनी त्याचे पुनरुज्जीवन केले असावे. कर्नाटकात सादर केला जाणारा यक्षगान हा नाटय़प्रकारसुद्धा दशावताराला अगदी समांतर असा आहे. यक्षगानमध्ये नृत्यावर भर दिलेला असतो. तर दशवतारामध्ये जोरदार अभिनय आणि आवाजाची फेक यावर भर दिसतो. शिवराम कारंथ यांच्यासारखे दिग्गज कलाकार यक्षगानाला लाभले आणि त्यांनी हा नाटय़प्रकार जगभर प्रसिद्ध केला. दुर्दैवाने दशावताराला असा वलय असलेला कोणी कलाकार नाही लाभला त्यामुळे या कलेची वाढ कोकणच्या बाहेर काही होऊ शकली नाही. सावंतवाडी येथील प्रा. विजय फातर्पेकर यांनी या कलेच्या वाढीसाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच तुषार नाईक मोचेमाडकर हेसुद्धा ही कला मोठय़ा आत्मीयतेने जोपासताना दिसतात. शासनाने या दशावतार मंडळींना आता छोटय़ा बसेससुद्धा दिलेल्या आहेत. परंतु आजही दशावतार म्हटले की कोकणी माणसाच्या डोळ्यापुढे डोक्यावर पेटारे घेऊन गावोगावी नाटके करणारेच येतात. रात्री झगमगीत कपडे घालून राजा, राणी बनलेले दशावतारी कलाकार नाटक संपले की आपला सर्व संसार त्या पेटाऱ्यात परत भरून ठेवतात. गावकरी लोकांनी दिलेली बिदागीची रक्कम खिशात खुळखुळत असते. ती घेऊन सारी मंडळी उठतात, आपले जुने, फाटके कपडे परत अंगावर चढवले जातात आणि ते पेटारे डोक्यावर घेऊन ही मंडळी ते देऊळ सोडतात. नवीन गावी नवीन देवळात खेळ करण्यासाठी दशावतारी संतुष्ट मनाने चालू लागतात. सिनेमा, चित्रवाहिन्यांच्या या जमान्यात आजही या मालवणी मुलुखात दशावतारी लोकांचे खेळ मोठय़ा उत्साहाने सादर केले जातात आणि मालवणी माणूस मोठय़ा आतुरतेने त्याची वाट पाहत असतो.
केव्हा जावे? कसे जावे?
आजकाल शहरातून नाटय़गृहांमध्येदेखील दशावताराचे प्रयोग होत असले तरी कोकणातील पारंपरीक दशावताराचे प्रयोग पाहायचे असतील तर वेंगुर्ला आणि सावंतवाडी परिसरात जावे लागेल. नवरात्रानंतर दिवाळीपासून अनेक मंदिरात हे प्रयोग होत असतात. कोटकामते गावातील भगवती देवीच्या मंदिरात त्रिपुरी पोर्णिमेच्या आदल्यादिवशी साजऱ्या होणाऱ्या गावभोरीप कार्यक्रमादरम्यान दशावताराचा खेळ पाहता येईल.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
forest cover , Sindhudurg district, Western Ghats,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनआच्छादनात वाढ तर पश्चिम घाटात घट, चिंतेची बाब
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
Story img Loader